करणी काढण्यासाठी सहा लाखाची कबुतरे देऊन मांत्रिकाकडून फसवणूक

राहुल माने - 9654093359

अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत बोहरी मुस्लिम कुटुंबाची जवळपास पावणेसात लाख रुपयांना फसवणूक झाल्याचा प्रकार जानेवारी 2021 मध्ये पुण्यातील कोंढवा भागात समोर आला. “तुमच्या भावावर केलेल्या करणीमुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो,” अशी भीती दाखवून करणी उतरविण्यासाठी खास कबुतरे लागतील, असे यामध्ये गुन्हा नोंद झालेल्या संशयितांनी सांगितले. ही कबुतरे आणण्यासाठी एका व्यक्तीकडून यांनी 6 लाख 80 हजार रुपये घेतल्याची फसवणुकीची धक्कादायक घटना घडली. याविषयीची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्वरित हालचाल करीत याबद्दल पोलिसांना सतर्क केले. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. कोंढवा खुर्द येथील 36 वर्षीय व्यक्तीने याबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार कुतबुद्दीन नजमी याला अटक करण्यात आली, तर त्याचा साथीदार हकिउमुद्दिन मालेगाववाला यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती कोंढवा पोलीस ठाण्याच्या प्रतिनिधींनी दिली.

याबद्दल विस्तृत माहिती अशी की, तक्रारदार अबिझर फतेहपूरवाला कुटुंबीय कोंढवा बुद्रुकमध्ये राहण्यास आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा भाऊ आजारी पडला होता. अनेक औषधोपचार करूनही त्याला आराम मिळत नव्हता. त्यामुळे अबिझर यांची आई एका धर्मगुरूकडे प्रार्थना करण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्या ठिकाणी मालेगाववाला यांच्याशी तिची ओळख झाली. त्यानंतर मालेगाववालाने अबिझर यांच्या आईला फोन करून भावावर उपचार करण्यासाठी एका व्यक्तीस घेऊन येत असल्याचे सांगितले. एके दिवशी मालेगाववाला व नजमी हे दोघेही अबिझर यांच्या घरी गेले. अबिझर यांच्या भावावर पत्नीने करणी केली असल्याचे नजमी यांनी सांगितले. “तुमच्या चांगल्या कामामुळे भाऊ जिवंत आहे; पण तो 75 टक्के ‘डेंजर झोन’मध्ये,” असेही या दोघांनी सांगितले. त्यामुळे अबिझर यांचे कुटुंबीय घाबरले. त्यानंतर त्यांनी यावर दोघांकडे उपायाची विचारणा केली. नजमी आणि मालेगाववाला यांनी अबिझर कुटुंबीयांना, “मुंबईत कबुतरे असून, काळी जादू स्वतःवर घेतात. त्यामुळे सगळा त्रास कमी होतो. कबुतर विकत घेतल्यास घरातील व्यक्तीचा मृत्यू टळेल आणि त्याच्याऐवजी कबुतरांचा मृत्यू होईल,” असेही त्यांनी सांगितले. मात्र, ही कबुतरे महाग असल्याचे दोघांनी सांगितले. त्यानंतर दोघांनी अबिझर यांच्या भावावरील करणी उतरविण्यासाठी लागणारी कबुतरे आणण्यासाठी सहा लाख 80 हजार रुपये घेतले; पण आजार काही कमी झाला नाही. त्यावेळी त्यांना हा सर्व फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आले. हा प्रकार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख आणि पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांच्या कानावर गेला. अबिझर फतेहपूरवाला यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर संशयित कुतबुद्दिन नजमी याला पोलिसांनी अटक केली.

फिर्यादी अबिझर यांचा भाऊ हुझेफा याचे 2010 मध्ये गुजरातमधील मुलीसोबत लग्न झाले होते. परंतु पत्नीपासून मूल होत नसल्याने त्यांचा 2017 मध्ये परस्परसंमतीने घटस्फोट झाला होता. चार महिन्यांपूर्वी हुझेफा हा तापामुळे आजारी पडला होता. त्याला कोरोना झाले असेल, या शंकेने कुटुंबाने त्याची चाचणी करवून घेतली असता त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर अनेकदा उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी धर्मगुरू सय्यदना सैफुदीन यांना मुलाची तब्येत ठीक होण्याकरिता अल्लाहकडे प्रार्थना करण्याची विनंती करण्याबाबत अर्ज देण्यास गेले होते. त्यावेळी त्यांना तिथे हकिमउद्दिन मालेगाववाला भेटला. त्यास हुझेफाच्या आजारपणाबाबत सांगितले असता त्याने, “मी तुमच्या घरी येऊन मुलास पाहतो,” असे सांगितले. त्याप्रमाणे हकिमउद्दिन एका माणसाला घेऊन हुझेफा याचे घरी गेला. त्यावेळी त्याने मांत्रिक उपचार करून हुझेफा याच्या पत्नीचा फोटो पाहण्यास मागून तो पाहत त्याने दुसर्‍या दिवशी कुटुंबीयांना भेटण्यास बोलवून हुझेफाच्या पत्नीनेच त्याच्यावर काळी जादू केल्याचे सांगितले व त्यामुळे त्यास त्रास होत असल्याचे म्हणाला. तो मरणाच्या दारात असून त्याचा कधीही मृत्यू होऊ शकतो, असे सांगून घरातील आणखी दोघांना काळ्या जादूचा त्रास होण्याची शक्यता आहे, असे देखील सांगितले. त्यावर उपचार करण्याकरिता त्याने, “मुंबईत सैफी महेल येथे जाऊन महागडी कबुतरे खरेदी करावी लागतील. ती कबुतरे काळी जादूची बला त्यांच्या अंगावर घेतात. त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही,” असे सांगत चार कबुतरे खरेदी करण्यास सहा लाख 80 हजार रुपये मागितले. त्यामुळे हुझेफाच्या वडिलांनी बँक खात्यातून पैसे काढून दिले.

फिर्यादी अबिझर फतेहपूरवाला पुढे म्हणतात की, दि.25 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी माझी आई तसलिम व पत्नी सारा धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्याकडे माझ्या भावाची तब्येत ठीक करण्यासाठी देवाकडे (अल्लाहकडे) प्रार्थना करण्याची विनंती करण्याबाबत अर्ज देण्यासाठी फाकरी हिल्स, कोंढवा बुद्रुक, पुणे येथील जमात ऑफिसमध्ये गेलो होतो. त्यावेळी तेथे हकिमउद्दिन राज मालेगाववाला हे होते. त्यावेळी माझ्या आईने व पत्नीने त्यांना माझ्या भावाच्या आजारपणाबाबत सर्व माहिती देऊन अर्ज दिला. तसेच त्यांना माझ्या आईने मोबाईल नंबर दिला. त्याच दिवशी शेख हकिमउद्दिन यांनी माझ्या आईच्या फोनवर दुपारच्या सुमारास फोन करून, “सायंकाळी एका माणसाला घरी घेऊन येतो. तो तुमच्या मुलाच्या आजाराबाबत विचारपूस करून उपाय सांगेल,” असे सांगितले.

फिर्यादी अबिझर पुढे सांगतात – “त्या दोन तरुणांनी पुढे हज येथून घरी आणलेले ‘जमजम’चे पाणी व ‘करबला’ची माती ही पाण्यात मिक्स करून पिण्यासाठी देण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी माझ्या भावाच्या पत्नीचा फोटो पाहण्यासाठी मागून घेतला. तो पाहून माझ्या वडिलांना त्यांनी हिल व्हिव रेसीडन्सी, मिठानगर, कोंढवा येथे येण्याबाबत सांगितले. त्यावेळी माझे वडील, आई, व भाऊ दुसर्‍या दिवशी त्यांच्याकडे गेले. त्यावेळी तेथे गेल्यावर माझ्या वडिलांना व आईला कुतुबुद्दिन नजमी यांनी, “माझ्या भावावर त्याच्या पत्नीने काळी जादू केली आहे, त्यामुळे त्यांला त्रास होत आहे. तुम्ही चांगली कामे करता त्यामुळे तो जिवंत आहे; नाहीतर तो दिवाळीतच मरण पावला असता,” असे सांगितले. “तो आता 75 टक्के ‘डेजर झोन’मध्ये असून त्याचा कधीही मृत्यू होऊ शकतो,” असे सांगितले. तसेच “आमच्या घरातील आणखी दोन लोकांना काळ्या जादूचा त्रास होऊ शकतो,” असेही सांगितले. त्याच दिवशी सायंकाळी मी व माझे वडील कुतुबुद्दिन नजमी यांच्याकडे जाऊन आलेल्या परिस्थितीवर काय उपाय आहे का, याबाबत चर्चा करण्यासाठी गेलो. त्यावेळी त्यांनी आम्हाला, “सैफी महेल, मुंबई येथे स्पेशल कबुतर असतात, ती काळ्या जादूची बला आपल्यावर घेतात. त्यामुळे आपल्या कुटुंबीयांना काही त्रास होत नाही. परंतु ती कबुतरं खूप महाग असतात, ती मागवायची असेल तर मला सांगा,” असे सांगितले. तसेच त्यावेळी त्यांनी माझ्या भावाच्या पत्नीच्या घराबद्दल सर्व माहिती अचूक सांगितली. त्यावेळी आम्हाला त्या गोष्टीचे आश्चर्य वाटले व आमचा त्यांच्यावर विश्वास बसला. आम्ही दि. 27 नोव्हेंबर, 2020 रोजी त्याच्याकडे पुन्हा पुढे काय करायचे आहे, असे विचारण्यासाठी गेलो. तेव्हा त्यांनी, “आम्हाला काजू, बदाम, अंजीर हे घेऊन या त्याच्यावर मी मंत्र मारून देतो, ते भावाला खायला द्या,” असे सांगितले.

फिर्यादी अबिझर फतेहपूरवाला पुढे म्हणतात, कुतुबुद्दिन नजमी यांनी सांगितलेल्या गोष्टीवर आमचा विश्वास बसत नसल्याने आम्ही दुसर्‍या दिवशी त्याच्याकडे जाऊन त्यांनी सांगितलेल्या गोष्टी करण्यास तयार नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी मागविलेली कबुतरे आली असून, आम्हाला चार कबुतरे दाखवून ती घेऊन जाण्याबाबत सांगितले. परंतु आम्ही कबुतर घेऊन जाण्यास तयार नसल्याचे सांगितले. तसेच त्याच्याकडे परत पैशांची मागणी केली. याबद्दल आम्ही आमच्या समाजातील लोकांना कळविले. त्यांनी त्याच्याशी चर्चा करून पैसे परत करण्याबाबत सांगितले. तेव्हा त्याने मला माझ्या दिलेल्या पैशांपैकी तीन लाख रुपये परत केले. परंतु उर्वरित पैसे देण्यासाठी टाळाटाळ करु लागला. वारंवार मी त्याच्याकडे पैसे मागितले. परंतु कुतुबुद्दिन नजमी यांनी पैसे देण्यास नकार दिला. माझे दुबई येथे राहणारे नातेवाईक आणि उज्जैनमधील नातेवाईकांनी कुतुबुद्दिन नजमी हा माणूस चांगला नाही आणि यांनी काहीतरी बेकायदेशीर कृत्य केले आहे, अशी माहिती कळवली. यावरून त्यांनी माझी व माझ्या कुटुंबीयाची फसवणूक केली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव यांच्याशी चर्चा करून त्यांचा सल्ला घेऊन आज रोजी तक्रार देण्यासाठी कोंढवा पोलीस स्टेशनला आलो.

यानंतर जेव्हा ‘अंनिस’च्या पुढाकाराने गुन्हा दाखल झाला, तेव्हा संशयिताला दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आणि नंतर जामिनावर सोडून देण्यात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

राहुल माने, पुणे

संपर्क – 96540 93359


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]