गीता हासूरकर -
‘चेहर्याकडे पाहून तुमचे भविष्य सांगते, तुमच्या अडचणी दूर करते,’ असे सांगून दीड हजार रुपये प्रवेश शुल्क व उपचारासाठी 25 हजार; तसेच गुण आल्यास आणखी 25 हजार रुपये, असा दर सांगणार्या भोंदू महिलेचा पर्दाफाश अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे केला. त्यांना शाहूपुरी पोलिसांची मदत झाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही या कारवाईस बळ दिले. सृष्टी राजेश मोरे (वय 40, रा. शाहूपुरी, कुंभार गल्ली) असे तिचे नाव आहे. तिच्यावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी सांगितले की, शाहूपुरी, कुंभार गल्लीत ही महिला आपण ज्योतिषशास्त्रात पारंगत असल्याचे सांगून लोकांना आमिषे दाखवत होती. अतींद्रिय शक्ती, भूतबाधा यांच्यासाठी उपाययोजना करून देणे, त्यासाठी होम-हवन करून देते, असे दावे केले होते. त्याबद्दलची तक्रार ‘अंनिस’कडे आली होती.
त्याची दखल घेऊन ‘अंनिस’च्या कार्यकर्त्या गीता हसूरकर तिच्याकडे गेल्या. पीडित म्हणून सीमा पाटील यांना नेले. त्यांनी आपले नातेवाईक म्हणून महिला पोलीस व पुरुषांस सोबत नेले. त्यावेळी महिलेचा चेहरा बघून डोळ्यांत बघून मनातले ओळखणारे, फोन नंबरवरून भविष्य सांगितले, बसलेल्या जागेवर तुमच्या घरी काय आहे, काय नाही, तुमच्या घरातली मानसिक स्थिती कशी आहे? वगैरे सांगत असताना संशयित सृष्टी मोरेला पकडून दिले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिच्यावर गुन्हा नोंदवला.
अंगारा, लिंबू, कवड्या केल्या जप्त
तिच्या घरातून अंगारा-धुपारा, अंगावरून उतरून टाकण्याच्या वस्तू, नारळ, लिंबू, लिंबूला खोचलेल्या लवंगा, त्याचबरोबर एका पुडीमध्ये उडीद, कापूर व झाडांच्या मुळ्या तसेच कवड्या, ज्योतिषशास्त्राचे पुस्तक असे साहित्य जप्त केले.
जिल्हा प्रशासनाची महत्त्वाची मदत…
या प्रकरणावरून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासोबत झालेल्या चर्चेमुळे या कामाला उभारी मिळाली. त्यांनी लोकांना जागृत करण्यासाठी कामाला लागा, असे सांगितले, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही मोलाची मदत केल्यामुळे हे ‘स्टिंग ऑपरेशन’ यशस्वी झाल्याचे सीमा पाटील यांनी सांगितले.
– गीता हासूरकर, कोल्हापूर