भोंगा आणि हनुमान चालिसा

अनिल चव्हाण - 9730006091

(मला मेलीला काय कळतंय?)

संध्याकाळच्या वेळी आई दरवाजात बसलेली असते. रस्त्यावरून येणार्‍या-जाणार्‍यांची चौकशी करण्यात तिचा वेळ जातो. काहीजण फिरायला जात असतात, तर काहीजण बाजारात. त्यातील बरेचजण रोज एकच प्रश्न विचारतात, “काय, बसलासा?”

आईचेही उत्तर ठरलेले – “होय! तुम्ही बाजारात चालला वाटतं?”

एखादा ‘उकडते खूप’, ‘महागाई किती वाढली?’, ‘रस्त्यातले खड्डे’ अशा विषयांवर सुद्धा बोलतो.

आई दारात बसली होती, त्याचवेळी गुंड्याभाऊ आणि गुरुजी आपली पिशवी सावरत आले. “नमस्कार आई…” म्हणत घरात शिरले.

“आई, आज मुले कुठे दिसत नाहीत?” गुरुजी म्हणाले.

“आज त्यांचा मामा मित्राच्या गावी जत्रेला घेऊन गेलाय. त्यामुळे सगळं कसं शांत-शांत वाटते. रोज त्यांची भांडणे सोडवता- सोडवता वेळ कसा जातो ते कळत नाही. येतील आता एवढ्यातच.” आईने एका दमात सगळे सांगून टाकले. “पण तुम्ही आज संध्याकाळी कसे काय?”

“त्याचं काय झालंय, आम्ही ‘हनुमान चालिसा’ म्हणावं, म्हणतोय.”

“वा वा! पण तुम्हाला कोणी अडवले? म्हणा ना!”

“हनुमान चालिसा’ आणि तोही भोंगा लावून, मशिदीसमोर!”

“का बरं? मशिदीसमोर का?”

पण प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी दारात गाडी थांबली. पोरांना घेऊन मामा खाली उतरला. प्रत्येकाच्या हातात खेळणी होती, फुगे धरले होते.

“अरे थांबा! थांबा!! घाई करू नका!”

पण तिकडे लक्ष न देता मुलं घरात शिरली. प्रत्येकजण आपण काय-काय पाहिलं, याचं वर्णन करू लागला. “आजी माहीत आहे काय? या जत्रेत मोठा पाळणा होता.” आदिने आजीला माहिती सांगायला सुरुवात केली.

“खरेच?”

“प्रत्येक जत्रेत असतो; त्यात काय एवढं?”

हातवारे करून करून स्वरानं हसत भर घातली.

आदिच्या अज्ञानाला वीरा आणि वेदांत हसले.

“बरं, आधी हात-पाय, तोंड धुवा आणि जेऊन घ्या,” आईची सूचना.

“आम्ही जेवलोय.”

“मामा सुद्धा?”

“हो.”

एवढ्यात शंभूने आपण आणलेली पिपाणी वाजवली. भोंग्याच्या आकाराची पिपाणी. त्यावर गाणं म्हणता येते का, तो पाहत होता. पिपाणी एकाच सुरात वाजत होती. स्वराने खेळण्यासाठी जेवणाचा सेट आणला होता. छोटे-छोटे चमचे, छोटासा कुकर, छोटा तवा.

वीराने क्रिकेट साहित्य घेतले होते. ती बाहेर काढू लागली.

“अरे…अरे, किती ही खेळणी!” गुंड्याभाऊ कौतुकाने विचारपूस करू लागला. प्रत्येकजण त्याच्या किमती सांगत होता.

“एवढे पैसे कोणी दिले?”

“आम्हाला आईने, आजीने जाताना पैसे दिले होते!”

आई म्हणाली, “गुंड्याभाऊ, पोरांना पैसे हातात दिले आणि सांगितलं यामध्ये येईल तेवढेच खेळणे घ्यायचे. आतापासूनच मुलांना सवय लावली पाहिजे. अंथरूण पाहून पाय पसरावेत; नाहीतर शेजार्‍यांनी मिक्सर आणला, की आपल्याला हवा. टीव्ही आणला की आपला टीव्ही त्यापेक्षा मोठा हवा. अशा तर्‍हेची हाव बरी नव्हे हो.” हा टोमणा कोणासाठी होता ते कळले नाही.

“अनेकांच्या घरात अनावश्यक वस्तूंची नुसतीच रेलचेल झालेली असते!” गुरुजींनी भर घातली.

“मला मेलीला काय कळतेय? पण जाहिराती बघून लोक वस्तू घेतात बरं. प्रत्येक वस्तू आपल्याला हवीशीच वाटते.” काऊनेही आपले मत मांडले आणि चहाचे कप सर्वांच्या हातात दिले.

मुलेही चहा पिऊन फ्रेश झाली आणि पुन्हा खेळात दंग झाली. सर्वजण थोडे स्थिरस्थावर झाल्याबरोबर गुरुजींनी आपला मुद्दा पुढे रेटला, “आपण सर्वजण उद्या सकाळी मशिदीसमोर भोंगा लावून ‘हनुमान चालिसा’ म्हणावयाची आहे.”

“हनुमान चालिसा’ येथे म्हणा; तिथे जाऊन म्हणायचे काय कारण?”

“हे बघा आई, मशिदीवर भोंगे लावणे बेकायदेशीर आहे, तरी आम्ही शांत बसायचं का?”

“नका शांत बसू. त्यावर कारवाई करायचे अधिकार तुमच्याकडे आहेत काय? तुम्ही तक्रार करा. महापालिकेचे अधिकारी त्यासाठीच आहेत. आपण कर भरतो त्यातून त्यांना पगार मिळतो. ही कामे त्यांनी करायची आहेत.” आई म्हणाली.

“अहो, पण मशिदीत शस्त्रास्त्रे पण साठवतात.”

“हो का? मग तुम्ही शांत का बसता? पोलिसांना सांगा ना, पोलीस त्यासाठी आहेत. शस्त्र शोधायचं काम तुमचे आहे काय?”

“आई, तुम्हाला ठाऊक आहे ना, अधिकारी काय आणि पोलीस काय; काही कारवाया करत नाहीत. ‘त्यांचे’ लांगुलचालन करतात, म्हणून ‘त्यांचं’ं चालते.”

“तसं असेल तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता.”

“तिथं तरी काय होणार आहे? तुम्ही न्यायालयात दाद मागितली आहे काय? ते काय म्हणाले? पाहा, आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. तुम्हाला परस्पर निर्णय घेऊन न्यायदान करण्याचे कारण नाही.” आईने निर्णय दिला.

“एवढा वेळ गल्लीतच राहणारे गाडीचे ड्रायव्हर सय्यदभाई आणि मामा गप्पा ऐकत होते. ते पुढे झाले. “गुंड्याभाऊ, कैसे हो? ‘हनुमान चालिसा’ गाना है ना? तो हम भी आपके साथ है!”

“सय्यदभाई, अंदर आओ, काऊ सय्यदभाई को चाय देव.” आईने फर्मान सोडले आणि म्हणाली, “आप का भाडा कितना हुआ?”

“आप से क्या भाडा लेना माँजी, बच्चेलोगों के साथ बहुत मजा आया!” चहा भुरकत सय्यदभाई म्हणाले.

थोड्या वेळात मुलांना कंटाळा आला. मग आदिने आपल्या खिशातली पिपाणी काढली. वीराच्या कानाजवळ गेला आणि त्याने भोंगा जोरात वाजवला. “आई बघ ना! माझ्या कानाजवळ येऊन वाजवायला लागलाय.”

काऊने आदिच्या पाठीत एक धपाटा घातला.

“तिकडे जाऊन वाजवायचं. दुसर्‍याला त्रास होईल असे खेळ खेळायचे नाहीत; नाहीतर अजून एक धपाटा बसेल.” काऊने भोंग्याचा प्रश्न अर्ध्या मिनिटात मिटवला.

“बघितलंत गुरुजी, मोठ्यांनी असे प्रश्न मिटवावे लागतात. तुम्ही ‘हनुमान चालिसा’ घरी म्हणा आणि भोंगाही घरातच वाजवा!” आईने सल्ला दिला.

“चला, गुंड्याभाऊ चला!”

“मला मेलीला काय कळतंय? पण भाऊजी, तुम्ही काय सांगत होतात?” काऊने विचारले.

“काही नाही. तुम्ही येत नाही म्हटल्यावर आम्ही भोंगा घरीच वाजवतो.” गुरुजींनी आपली पिशवी गळ्यात अडकवली.

लेखक संपर्क ः 97300 06091


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]