‘ग्रहणामुळे बाळाला व्यंग निर्माण होते’ ही अंधश्रद्धा – अंनिस

संजय बनसोडे - 9850899713

सूर्यग्रहणात ज्या गरोदर महिलेने भाजी चिरली होती, त्या महिलेने दिलाय सदृढ बाळाला जन्म

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने इस्लामपूर येथील गर्भवती महिलेने ग्रहणकाळातील अंधश्रद्धा झुगारून स्वतः ग्रहण पाहिलं. त्या महिलेची नुकतीच प्रसूती झाली असून तिने एका छानशा कन्येला जन्म दिला आहे. ते बाळ सदृढ व निरोगी आहे. ग्रहणाचा मानवी जीवनावर कसलाही परिणाम होत नसल्याचे सिद्ध झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी दिली.

इस्लामपूर (जि. सांगली) येथील समृद्धी चंदन जाधव या तरुणीने 21 जून रोजी झालेल्या सूर्यग्रहणकाळात गर्भवती असूनही ही ग्रहणकाळात ज्या गोष्टी करायच्या नाहीत, त्या सर्व निर्भयपणे केल्या. त्यामध्ये भाजी चिरणे, पाने-फुले-फळे तोडणे, अन्नपदार्थ खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालणे, मांडी घालून बसणे, एवढेच नव्हे; तर सोलर फिल्टरमधून ग्रहणही पाहिले.

समाजात ग्रहणाबाबत मोठ्या अंधश्रद्धा आहेत. ग्रहणकाळात गर्भवती महिलेने अशा काही गोष्टी केल्यास जन्माला येणारं अपत्य हे व्यंग घेऊन येतं किंवा त्या बाळाला जन्मतःच काही दोष तयार होतात, असे गैरसमज आहेत. हे गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्याचं काम ‘महा. अंनिस’ सातत्याने करत आहे. राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे आणि कार्यकर्त्यांनी जाधव कुटुंबीयांचं प्रबोधन केलं आणि खात्री दिली की, ग्रहणकाळामध्ये मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे गर्भवती महिलेवर सुद्धा किंवा होणार्‍या बाळावर कोणतेही परिणाम होणार नाहीत. त्यामुळे हे कुटुंबीय ग्रहणकाळातील अंधश्रद्धा झुगारून देण्यास तयार झाले. ग्रहणकाळात जे जे करायचे नाही, ते ते सर्व या गर्भवती महिलेने धाडसाने केले. जाधव कुटुंबीयातील समृद्धीची सासू सिंधूताई, पती चंदन, दीर दीपक यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाले.

काही दिवसांपूर्वीच समृद्धीची प्रसूती झाली. तिला कन्यारत्न झालं. ही मुलगी गुटगुटीत व निरोगी असून कुटुंबात आनंदी वातावरण बनले आहे. ग्रहणाचा या बालिकेवर, तिच्या आईवर कोणताही परिणाम झाला नाही. अनेक अंधश्रद्धातून भीती तयार होते आणि त्यातून मानसिक गुलामगिरी. या सर्वांतून मुक्त करण्याचे काम जाधव कुटुंबीयांनी करून समाजापुढे एक नवा पायंडा पाडला आहे. सामान्य कुटुंबातील असूनही ही त्यांनी उचललेलं पुरोगामी पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.

आपल्या भावना व्यक्त करताना समृद्धी जाधव म्हणाल्या, “ग्रहणाचा मानवी जीवनावर, गर्भवती महिलेवर; किंबहुना तिच्या बाळावर कोणताही परिणाम होत नाही, हा माझा अनुभव आहे. ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी माझं व माझ्या कुटुंबाचे प्रबोधन केल्यामुळे हे धाडसाचे पाऊल उचलू शकले. आधुनिक काळात अशा अंधश्रद्धांना आपण बाजूला केले पाहिजे. यापुढील प्रत्येक ग्रहणाच्या वेळी मी व माझे कुटुंबीय प्रबोधन करणार. ‘विज्ञान, निर्भयता, नीती – नसे कशाचीही भीती’ ही घोषणा सर्वांनी लक्षात ठेवावी.

समृद्धी जाधव यांनी टाकलेलं कृतिशील पाऊल समाजाला प्रेरणादायी ठरेल. या कृतिशील उपक्रमाने पुढील काळात ग्रहणाच्या वेळी लोकांची जागृती करण्यासाठी हे उदाहरण महत्त्वाचे ठरेल. खगोलीय आविष्कार आणि ग्रहण याबाबत ‘अंनिस’ नेहमीच प्रबोधन करते, अशा प्रतिक्रिया ‘महाराष्ट्र अंनिस’चे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी दिली.

प्रा. डॉ. नितीन शिंदे, संजय बनसोडे, प्रा. तृप्ती थोरात, विनोद मोहिते, प्रा. बी. आर. जाधव, अवधूत कांबळे, योगेश कुदळे, प्रा. विष्णू होनमोरे, प्रा. प्रमोद गंगनममाले, प्रशांत इंगळे यांनी विशेष प्रयत्न केले.

संजय बनसोडे (राज्य प्रधान सचिव)


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]