-
20 ऑगस्ट, 2021
डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिन 20ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस म्हणून देशभर साजरा होतो. यावर्षी भारतभर या दरम्यान अनेक विज्ञानवादी, विवेकवादी संस्था संघटनांनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. नामवंत संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहयोगाने झालेल्या विविध कार्यक्रमांमधून वैज्ञानिक दृष्टीकोनाबाबत जाणीवजागृती व समकालीन वास्तवातील विविध घडामोडींवर वस्तुनिष्ठ विचारमंथन घडून आले.
छत्तीसगड
दिनांक 14 ऑगस्ट रोजी छत्तीसगढ विज्ञान सभा आणि मध्यप्रदेश विज्ञानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘देशमें काले जादू के खिलाफ राष्ट्रीय कानून क्यों जरूरी है? या विषयावर वेबिनार घेतले गेले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, मनसोपचरतज्ञ डॉ हमीद दाभोलकर यांनी प्रमुख वक्ता म्हणून आपले विचार मांडले. छत्तीसगढ विज्ञानसभेचे अध्यक्ष प्रा एम. एल. नायक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर एस. आर. आझाद (महासचिव, मध्यप्रदेश विज्ञानसभा) यांनी प्रास्ताविक केले. तर डॉक्टर वाय. के. सोना (राज्यसचिव, छत्तीसगढ विज्ञानसभा) यांनी वेबिनारचे संचालन केले.
दिल्ली
आय. एम. एफ. एस. दिल्ली आयोजित वेबिनारमध्ये ‘भारतीय ज्ञानपरंपरेच्या परिचयाच्या निमित्ताने फलज्योतिष अभ्यासक्रमाचा चंचुप्रवेश’ या विषयावर विचारमंथन झाले. यामध्ये डॉक्टर सौमित्रो बॅनर्जी (कोलकता आयसर येथील प्राध्यापक व भटनागर पुरस्काराने सन्मानित नामवंत शास्त्रज्ञ), डॉक्टर हमीद दाभोलकर, डॉक्टर सोमा माली (प्रधान शास्त्रज्ञ, बायो इन्फर्मेटिक्स, आय सी ए आर, एन बी पी जी आर नवी दिल्ली) हे सहभागी झाले होते. डॉक्टर विनय कुमार (सहयोगी प्राध्यापक, झाकीर हुसेन महाविद्यालय, दिल्ली विद्यापीठ) यांनी परिसंवादाचे समन्वयक म्हणून काम पहिले.
कर्नाटक
ब्रेकथ्रू सायन्स सोसायटी, कर्नाटक राज्य युनिट आणि ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क यांनी संयुक्तपणे एका व्याख्यानाचे आयोजन केले होते. राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिन आणि जे. आर. लक्ष्मणराव जन्मशताब्दी वर्ष 2021 चे औचित्य साधून संपन्न झालेल्या या कार्यक्रमात नामवंत खगोल भौतिक शास्त्रज्ञ प्रज्ज्वल शास्त्री यांनी विचार मांडले.
हरियाणा
हरियाणा विचारमंच, हरियाणा ज्ञान विज्ञान समिती आणि भारत ज्ञान विज्ञान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 19 ऑगस्ट रोजी वेबिनार आयोजित केले गेले. यात ‘खगोलशास्त्र आणि ज्योतिष’ या विषयांवर डॉक्टर टी. व्ही. वेंकटेश्वरन (वरिष्ठ शास्त्रज्ञ, विज्ञान प्रसार, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली यांनी विचार मांडले. तसेच डॉक्टर रविंद्र बंसल, (शास्त्रज्ञ, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ अस्ट्रोफिजिक्स बंगळुरू) यांनी ‘मिथक, अंधश्रद्धा आणि विचार’ या विषयावर मार्गदर्शन केले. 20 ऑगस्ट रोजी कर्नाल येथील शहीद उधमसिंग शासकीय महाविद्यालय, मटकमेजरी, इंद्री च्या रसायनशास्त्र विभागाने वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर हरियाणा विज्ञान मंच चे अध्यक्ष श्री वेद प्रिया यांचे व्याख्यान आयोजित केले.
ओरिसा
भारत ज्ञानविज्ञान समिति ओरिसा यांच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी ‘कोव्हीड काळात वैज्ञानिक दृष्टीकोन’ या विषयावर परिसंवाद झाला. श्रीमती आशा मिश्रा, श्रीमती उशारणी बेहरा, डॉक्टर बसंती मोहंती यांनी यात सहभाग घेतला. श्रीयुत नृसिंह प्रधान यांनी सूत्रसंचलन केले. या कार्यक्रमात प्रबीरकुमार दास, संतोष कार आणि निरंजन माली यांनी अनुभवकथन केले. ज्ञान विज्ञान समिती, मधेपुरा यांच्या वतीने 20 ऑगस्ट वैज्ञानिक चेतना दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी बिहारच्या ज्ञान विज्ञान समितीचे पूर्वसचिव प्रा. सछिदनंद उद्घाटक म्हणू सहभागी झाले. भारत ज्ञान विज्ञान समिति ओडिसा यांनी ‘आस्क व्हाय?’ हा संदेश देणारी सुंदर पोस्टर्स तयार केली.
मध्यप्रदेश
मध्यप्रदेश भारत ज्ञान विज्ञान समिती भोपाल यांच्या वतीने 19 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय वैज्ञानिक चेतना दिवस एका चर्चा-संवादाने संपन्न झाला. यात पद्मश्री बाबुराव दहिया, श्री शरदचंद्र बेहार (पूर्व मुख्य सचिव मध्य प्रदेश), श्री बी. एम. सिंह राठोर (पूर्व मुख्य वन संरक्षक, मध्यप्रदेश) श्री. श्याम बोहरे (कार्यकारी अध्यक्ष, मध्यप्रदेश, भारत ज्ञान विज्ञान समिति भोपाळ) हे मान्यवर सहभागी झाले होते.
झारखंड
सायन्स फॉर सोसायटी झारखंड, वैज्ञानिक चेतना सायन्स पोर्टल वेब जमशेदपूर यांच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी ‘सामाजिक परिवर्तनसमोरील छद्म विज्ञानाचे आव्हान आणि जन-विज्ञान आंदोलनाची भूमिका’ या विषयावर विचार चिंतन करणारा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर गौहार रझा, (निवृत्त प्राध्यापक, ए सी एस आय आर) हे होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर आली इमाम खान (अध्यक्ष सायन्स फॉर सोसायटी झारखंड) यांनी मांडणी केली. तर डॉक्टर एस के नारंग (पूर्व उपनिदेशक, एन एम एल जमशेदपूर) यांनी अध्यक्षीय मनोगत मांडले.
बिहार
बिहारच्या ज्ञान विज्ञान समितीने, डॉक्टर रांबाबू आरी यांच्या अध्यक्षतेखाली मुक्त परिसंवाद आयोजित केला. प्रा एन. सी. शर्मा (महासचिव , बी जी व्ही एस) डॉक्टर काशीनाथ चटर्जी (राष्ट्रीय सचिव, बी जी व्ही एस), आशा मिश्रा (राष्ट्रीय उपाध्यक्ष बी जी व्ही एस) नवी दिल्ली हे सहभागी झाले. वरिष्ठ पत्रकार बिरजू प्रसाद यांनी चर्चेचे संचालन केले.
तेलंगणा
तेलंगणातील मुधनम्मकंल निर्मूलन छत्रसाधना समितीच्या वतीने ‘तेलंगणा राज्य अतिमानवी अंधश्रद्धा प्रथा आणि काली जादू प्रतिबंध व उच्चाटन कायदा मसुदा 2021’ प्रसिद्धीचा कार्यक्रम आयोजित केला. तेलंगणा राज्याच्या मानवी हक्का आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जी चंद्र हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. तर डॉक्टर जी राधाराणी (प्रधान न्यायाधीश, रंगारेड्डी जिल्हा सत्र न्यायालय) या विशेष अतिथी होत्या. समितीचे अध्यक्ष सी एल एन गांधी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष्स्थान भूषविले.
महाराष्ट्र
पुणे क्रीएटिव्ह व नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन यांनी संयुक्तपणे ‘कोव्हीड विरोधी लक्ष्यात वैज्ञानिक दृष्टीकोन’ या विषयावर वेबिनार आयोजित केला. डॉक्टर गगनदीप कांग (टिल वी विन चे सहलेखक) यांनी ‘कोव्हीड 19 विरोधातील लढा’ या विषयावर माहिती दिली. न्यूज क्लिक चे संस्थापक आणि ए आय पी एस एन चे ई सी मेंबर प्रोबीर पूरकायस्थ यांनी ‘कोव्हीडविरोधी लक्ष्यातील पत्रकारितेची आघाडी’ या विषयावर मांडणी केली. डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी मणीपूरच्या किशोरचंद्र वाङ्ग्खेम आणि इरेन्द्रो लिचोंबम या दोन पत्रकारांना सन्मानित केले. त्यांना कोव्हीड 19 चा गाईचे शेण वा मूत्र याच्या योगे मुकाबला करता येणार नाही अशा आशयाच्या फेसबुक पोस्ट लिहिल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक झाली होती. ए आय पी एस एन आणि पुणे क्रिएटिव्ह यांनी एकत्र येत दोन्ही पत्रकारांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे रोख परितोषिक दिले.
विवेक मोण्टेरो यांनी कार्यक्रमाचे संचलन केले. नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन आणि अॅक्टिव टीचर फोरमच्या वतीने नागेश वाईकर यांनी परभणी हिंगोली येथे शालेय कार्यक्रमाचे आयोजन केले. बी जी व्ही एस, महाराष्ट्रच्या वतीने पोस्टर प्रदर्शन, प्रश्न मंजूषा आणि प्रचार यात्रांचे नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली येथे आयोजन केले गेले.
(संकलन – मुक्ता दाभोलकर)