गणपती दुग्धप्राशन आणि लातूर पोलिसांची तत्परता

माधव बावगे - 9422469564

21सप्टेंबर 1995 : मु. पो. लातूर

गुरुवार, दि. 21 सप्टेंबर 1995 या एकाच दिवशी अगोदर गणपती आणि काही वेळानंतर शैव पंथातील सर्वच देवदेवता दूध प्यायला लागल्या, ही पूर्वनियोजित, ठरवून पसरवलेली अफवा सूर्यप्रकाशाच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने पसरली. ती राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरलेली दिसून आली. टीव्ही चॅनलवर तर याच बातमीने ताबा घेतला होता. गनिमत, त्यावेळी आताच्या सारखी ‘फोर जी’ मोबाईल एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हती, नाही तर काय चित्र दिसले असते, याचा अंदाजच करता आला नसता. बहुतेक सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी याची रंजित माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी दंग होते. शोध घेत गेला तर एक वेगळेच चित्र समोर आले. ज्या-ज्या देशात भारतीय आहेत, त्या-त्या देशात देवदेवतांनी दुग्ध प्राशन केले.

त्या दिवशी मी सकाळीच लातूर परिसरातच बाहेर होतो. साधारणतः 11.30 च्या सुमारास तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचा फोन आला. महा. अंनिसच्या उपक्रमामुळे त्यांची चांगली ओळख झाली होती. एस. पी. साहेब म्हणाले, ‘सर तुम्ही कुठे आहात?’ ‘लातूरच्या बाहेर; पण जवळच आहे सर,’ मी उत्तरलो. सर म्हणाले, ‘तुम्हाला काही कळले का?’ मी म्हणालो, ‘सर कशाबाबत?’ ‘अहो, आज सर्व मंदिरांसमोर रांगाच्या रांगा लागल्या आहेत. मंदिरातील सर्व मूर्ती दूध पिताहेत. हा धार्मिक आणि श्रध्देचा भाग असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसा खबरदारीचा उपाय म्हणून सर्व मंदिरांजवळ आमचा बंदोबस्त लावलाय. तुम्ही आणि तुमची चळवळ याकडे कशी पाहते, हे जाणून घेण्यासाठी फोन केला होता.’ मी म्हणालो, ‘सर मी लवकरच पोचतो.’ तोपर्यंत मी डॉ. नरेंद्र दाभोलकर सरांना फोन केला आणि सांगितलं की, ‘डॉक्टर, मला लातूर जिल्हा पोलीस अधीक्षकांचा फोन आला होता. जे घडतंय ते त्यांनी सांगितले आणि महा. अंनिस याकडे कशी पाहतेय, असे त्यांनी विचारले.’

तेव्हा डॉक्टर माझ्याशी सविस्तर बोलले. म्हणाले, ‘ही खूप चांगली संधी आहे. तुमच्या डी. एस. पीं.ना भेटून शहरातून फेरी काढण्यासाठी परवानगी मिळते का बघा. परवानगी मिळाली तर फेरीत काय सांगायचे ते मी सांगतो, ते तू लिहून घे.’ ते बोलत राहिले, मी मुद्दे लिहून घेत राहिलो. (1) हे सर्व ठरवून धर्मांध, सनातनी वृत्तींनी योजनाबध्द केलेला बनाव आहे. (2) नवीन शैक्षणिक धोरण आणि मूल्यशिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य सांगितलं आहे आणि भारतीय संविधानाने तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार, प्रचार आणि प्रसार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे, असे सांगितले आहे. गणपती दुग्ध प्राशनाचा हा कथित चमत्कार याच्याशी विसंगत आहे. (3) विज्ञानाचा नियम डावलून एकही चमत्कार होऊ शकत नाही. जे घडतंय ते आपण तपासू. त्यास अनुमती असावी. विज्ञानाचे नियम पाळून निर्जीव मूर्तीला दूध पाजवून दाखवावे. त्यासाठी महा. अंनिसचे रु. 5 लाखाचे जाहीर आव्हान आहे.’

गणपती किंवा मूर्ती दूध पित नाही. ही ठरवून पसरवलेली अफवा आहे. त्यातील वस्तुस्थिती काय आहे, ते आम्ही प्रयोगांती करून दाखवतो, आपण ते समजून घ्यावे. कुठल्याही मूर्तीने ग्लासाने, वाटीने, तांब्यांने, बाटलीने, कप-बशीने दूध पिले नाही, जे दूध पिले ते चमच्यानेच पिले. हा चमत्कार दैवी नाही तर तो पृष्ठीय ताण (Surface Tension) तत्त्वाचा प्रयोग आहे. दुधाने अर्धवट भरलेला चमचा मूर्तीच्या तोंडाला लावला आणि चमचा वाकडा न करता सरळ धरला तर चमच्यातील दूध कमीही होत नाही आणि मूर्तीही दूध पित नाही. तोच चमचा काठोकाठ भरला (दुधाला पृष्ठीय ताण असतो) आणि न हलवता मूर्तीच्या तोंडाला स्पर्श होईल असा धरला तर केशाकर्षणाने (Capilary Action) चमच्यातील दूध कमी होत जाते. याचा अर्थ ते दूध मूर्ती पित नाही, तर कमी होणारे दूध हे मूर्तीच्या तोंडाच्या खालच्या बाजूने पातळ थरातून खाली ओघळत जाते आणि मूर्तीच्या उतार भागात साचते. तो पातळ थर चटकन दिसत नाही आणि नेमके याकडे लोक चिकित्सकपणे पाहत नाहीत. त्यांना वाटते ते दूध मूर्तीनेच पिले. याचे एक साधे उदाहरणही घेता येईल – आपण हॉटेलमध्ये बसलोय. समोर सन्माइकाचा टेबल आहे. त्यावर पाण्याचा एक मोठा थेंब असेल तर ते पाणी इकडे- तिकडे जात नाही. त्याला जर आपण आपल्या बोटाने थेंबाचा पृष्ठीय भाग आणि टेबलला स्पर्श केला तर ते सर्व पाणी त्या बाजूने ओघळते. नेमकी हीच क्रिया या गणपती दुग्ध प्राशनामागे आहे. हे सर्व समजून घेऊन त्याचे प्रात्यक्षिक करून पाहिले.

मा. उपाध्याय सरांना फोन करून सांगितले, ‘सर, मी याबाबत डॉ. नरेंद्र दाभोलकर सरांना फोन करून सर्व माहिती मिळवली आणि त्याचा प्रयोगही करून बघितला आहे. सर म्हणाले, ‘चांगली बाब आहे, तुम्ही लोकांपुढे समजावून सांगू शकाल?’ आम्हाला हेच हवे होते. मी म्हणालो, ‘सर, आम्हाला मंदिरात जाऊन हे पाहता येईल का? कारण आम्ही परस्पर गेलो तर लोकांना आम्ही ‘अंनिस’चे कार्यकर्ते महणूण ओळख आहे. काही प्रश्न निर्माण झाला तर…?’ ‘तुम्ही जा, तिथे पोलीस असतील. त्यांना निरोप द्या आणि तुम्ही तिथे फक्त निरीक्षण करा; पण लोकांशी कसलीही चर्चा करू नका. कारण हा लोकांच्या श्रध्देचा प्रश्न असतो,’ असे सरांनी सांगितले. आम्ही एक-एक मंदिर करीत लोकांच्या रांगा, त्या रांगेतील लोक पाहत होतो. अफवा अशी होती की, नागपूरहून प्रदीप राठी यांना त्यांच्या नातेवाईक यांचा फोन आला की, नागपुरात गणपती दूध पित आहेत. (प्रदीप राठींचेच नाव का, तर राठींनी लातुरात अष्टविनायक आणि विराट हनुमानाची स्थापना केली आहे.) त्यांनी अष्टविनायक मूर्तीला दूध पाजले, ही बातमी वार्‍यासारखी पसरली आणि सर्वच मंदिरांतील मूर्ती दूध पिऊ लागल्या. आम्ही भक्तांप्रमाणेच गर्दी कमी असलेल्या मंदिरात जाऊन बारकाईने निरीक्षण केले. लोक मात्र कुतुहलाने, श्रध्देने दूध पाजत होते. त्यांच्या चर्चाही ऐकल्या; पण त्यांच्या नजरेतून हे सुटले नाही की, सर्वजण हातात दुधाचा ग्लास आणि चमचा घेऊन आलेले आहेत. यांच्या हातात दूधही नाही आणि चमचाही नाही. ही कुजबुज ऐकली आणि आम्ही तिथून काढता पाय घेतला. दुसरे हेही लक्षात आले की, फक्त मंदिरातील मूर्ती दूध पिताहेत; पण मरिआई, सटवाईला दूध पाजायला कुणी दिसले नाहीत. आमचे निरीक्षणही पूर्ण झाले होते.

आम्ही याबाबतची बातमी तयार करून महा. अंनिसची भूमिका वर्तमानपत्रात दिली. लातूरमधून एक केबल नेटवर्क चालते. त्यावर मुलाखत ही दिली. हे केबल दररोज जवळपास 60 हजार लोक पाहतात. रात्री दिवसभराचा वृत्तांत डॉ. दाभोलकर सरांना सांगितला. त्यांनी लातूर टीमचे खूप कौतुक केले. त्याचबरोबर माझ्याकडे डी. एस.पीं.ना अभिनंदनही सांगितले. ‘दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पोलीस परवानगी घेऊन शहरातून प्रबोधन फेरी काढणार आहोत, त्यास पोलीस अधीक्षकांनी संमती दिली आहे,’ हेही मी डॉक्टरांना सांगितले. रात्री आम्ही भिंतीवरच्या श्रीदेवीच्या कॅलेंडरलाही दूध पाजण्याचा प्रयोग करून बघितला. मूर्तीची क्रिया याही ठिकाणी दिसून आली.

दुसर्‍या दिवशी म्हणजे दि. 22 सप्टेंबर 1995 रोजी गांधी चौक पोलीस ठाण्यात जाऊन गणेश दुग्ध प्राशन प्रबोधन फेरीची आणि लाऊड स्पीकरची लेखी परवानगी घेतली. ठरल्याप्रमाणे महा. अंनिस आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी 5 वाजता प्रबोधन फेरी राजर्षी शाहू कॉलेजमधून सुरू केली. एक तीनचाकी सायकलरिक्षा, बॅटरीवरील लाऊड स्पीकर, एका ट्रेमध्ये गणेशमूर्ती, चमचासह दुधाचे भांडे दोन-दोनच्या रांगेत फेरी सुरू झाली. ही फेरी हनुमान चौक – सुभाष चौक – हत्ते कॉर्नर – गंज गोलाई – मुख्य रस्त्याने परत हनुमान चौक – बस स्थानक ते गांधी चौक असा फेरीचा मार्ग होता. या संपूर्ण फेरीत संत समाजसुधारकांच्या विचारांचा लाभलेला वारसा, भारतीय संविधानाची मानवी मूल्ये, अफवांचे तंत्र याबाबतची माहिती, घोषणा देत, जागोजागी ही फेरी थांबून गणेशमूर्तीला दूध पाजण्याचे प्रात्यक्षिक करून त्याचे वैज्ञानिक विश्लेषण करीत ते दूध ट्रेमध्ये कसे जमा होते, याचे प्रात्यक्षिक दाखवत निघाली. गांधी चौकात तिचा समारोप करण्यात आला. प्रबोधन फेरीत घोषणा होत्या, ‘पित नाही, पित नाही – मूर्ती दूध पित नाही’, ‘गणपती दूध पिण्याचा चमत्कार सिद्ध करून दाखवा रु. पाच लाख मिळवा’, ‘अफवांना बळी पडू नका – अंधश्रद्धांना थारा देऊ नका’, ‘हल्लाबोल, हल्लाबोल – अंधश्रध्दांवर हल्लाबोल’, ‘नहीं चलेगी नहीं चलेगी – बुवाबाजी नहीं चलेगी’ अशा घोषणा देत या प्रबोधन फेरीत जवळपास 100 कार्यकर्ते, युवक-युवती सहभागी होते.

प्रशासन खंबीरपणे सोबत असेल तर अंधश्रद्धांना कसा आळा घालता येऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण देता येईल. महाराष्ट्राच्या गृह विभागाने कठोर भूमिका घेतली असती तर राज्यभरात हे शक्य होऊ शकले असते.

दुसर्‍या बाजूला प्रसारमाध्यमांतून महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी, ‘माझ्या पत्नीच्या हातांनी ही गणपतीनी दुग्ध प्राशन केले,’ असे समर्थन केले; तर उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी, ‘माझ्या हातून गणपती दूध पिले नाही,’ असे सांगितले. दिल्लीमध्ये लालकृष्ण अडवानी आणि प्रमोद महाजन यांनीही गणपतीला दूध पाजले. त्यावेळी ओरिसाचे मुख्यमंत्री बिजू पटनायक यांनी तर, ‘गणपती दूध पिण्याची घटना घडत असेल तर ती मंदिरे तात्पुरती बंद करा आणि तरी पण अफवा पसरवत असतील तर पुजार्‍यांना अटक करा,’ अशा सूचना पोलिसांना दिल्या.

भावनेच्या आधारे भारावलेल्या मनाचा ताबा अफवेने घेतला की लोक कुठलाही विचार न करता आपला विवेक गहाण ठेवून शिकलेले लोकही कसे बळी पडतात, आपला वेळ- श्रम-पैसा कसा वाया घालवतात, हे यावरून सिद्ध होते. या घटनेमुळे आपल्या देशाची प्रतिमा जागतिक पातळीवर मात्र मलिन झाली, हे नक्की.

महा. अंनिसच्या वतीने मात्र तेव्हापासून 21 सप्टेंबर हा दिवस विज्ञानाच्या क्षेत्रातील काळा दिवस समजून राज्य स्तरावर ‘चमत्कार सत्यशोधन दिन’ म्हणून पाळला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांनी तो साजरा केला जातो. 21 सप्टेंबर 1996 ला ‘विद्यार्थ्यांचे गणरायाला पत्र’ या राज्यस्तरीय अभिनव पत्रलेखन स्पर्धेचे राज्यस्तरीय आयोजन केले होते. पुढे दरवर्षी शाळा, कॉलेज, ग्रामीण भागातून सप्रयोग चमत्कार व्याख्यानाचे आयोजन करून त्यामागील विज्ञान समजून देण्याचे उपक्रम घेतले जातात. यावर्षी 21 ऑगस्ट ते 21 सप्टेंबर या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात चमत्कार व त्यामागील विज्ञानासंदर्भात महा. अंनिसच्या विचाराच्या दररोज दोन ‘पोस्ट’ पाठवल्या जात आहेत. राज्य व राष्ट्रीय पातळीवर दोन वेबिनारचे आयोजनही करण्याचे नियोजन आहे. चमत्कार सादरीकरण व त्यामागील विज्ञान याबतच्या तीन ग्रुपमध्ये स्पर्धांचे आयोजन करून त्यासाठी प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे रु. 3000, 2000, 1000 असे बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. अशा विविध उपक्रमातून चळवळीच्या वतीने प्रबोधनाचे कार्य प्रभावीपणे चालू आहे.

हे लिहीत असतानाच आमच्या लातूर जिल्ह्यात समाजमाध्यमांवर अशाच अफवांचे पेव फुटले आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही हजारो स्त्री-पुरुष लोक शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या अहमदपूर येथील भक्तिस्थळावर दि. 28 ऑगस्ट रोजी जमा झाले. ‘फिजिकल डिस्टन्स’चा फज्जा उडाला. पोलीस यंत्रणाही हादरून गेली. शेवटी निष्कर्ष काय निघाला, तर मालमत्तेवर डोळा ठेवून महाराजांना भावनिक ब्लॅकमेल केले जात होते. त्यांचा बंदोबस्त केला जाईल. महाराजांच्या हाडोळती आणि अहमदपूर येथील मठात उत्तराधिकारी नियुक्त करून महाराजांनी, ‘मी समाधी घेणार नाही,’ असे जाहीर करून प्रसाद घेतला, असे सूत्रांनी सर्व लोकांसमोर जाहीर केले. अफवा अशी होती की, 104 वर्षांचे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज संजीवन समाधी घेणार. त्यासाठी त्यांनी तीन दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. याअगोदरही याच महाराजांचा हवाला देऊन रात्री लाईट बंद करून थाळी वाजवली तर कोरोना हद्दपार होईल, अशी समाजमाध्यमांतून ‘पोस्ट’ फिरवली गेली. तेव्हाही मी त्यांच्या प्रतिनिधीशी फोनवर बोललो, तेव्हा त्यांनी खुलासा केला की, महाराजांनी असे सांगितले नाही. कोणीतरी ती अफवा पसरवली आहे, असा खुलासा महाराजांनी केला होता. अशाच पद्धतीने कुठलीही अफवा पसरवण्यामागे काही ना काही तरी सुप्त हेतू असतो. त्यात आर्थिक लाभाचा, मताचा किंवा मी किती लोकांना मूर्ख बनवू शकतो, ही विकृत सुप्त भावना असते; विशेषतः धर्मांध आणि सनातनी लोकांचा यामागे हात असू शकतो. तेव्हा नागरिकांनी शहानिशा केल्याशिवाय त्या पुढे पाठवू नयेत. अपेक्षा आहे की, वैज्ञानिक पद्धत वापरून घडणार्‍या घटनांकडे कसे पाहावे, याचे शिक्षण-प्रशिक्षण दिले जावे. विवेकाचा आवाज बुलंद करूया!


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]