भ्रामक वास्तुशास्त्राविरुद्ध ठाणे अंनिसचा लढा..!

वंदना शिंदे -

रोटी, कपड़ा और मकान या मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे ‘मकान’. मकान म्हणजे घर वा घर नावाची वास्तू. ही वास्तू ज्या शास्त्राच्या आधारे निर्माण केली जाते, त्या शास्त्राला सोप्या भाषेत ‘वास्तुशास्त्र’ असं म्हणतात. वास्तविक, वास्तुशास्त्र हा क्रमिक अभ्यासक्रमाचा आणि रोजच्या जगण्याचा विषय आहे. वास्तू वा वास्तुशास्त्र, आधुनिक माणसाच्या सामाजिक, आर्थिक प्रतिष्ठेचा विषय आहे. तो माणसाच्या आनंदाचा, समाधानाचा आणि तितकाच सुरक्षेचा व स्थैर्याचा विषय आहे. अगदी आदिम काळात मानव गुहेत राहात होता. त्यानंतर कुडा-मेडाच्या झोपडीत राहू लागला. पुढे मानवाच्या सर्वांगीण प्रगतीप्रमाणे त्याच्या निवासाच्या, त्याच्या घराच्या निर्मितीत सुद्धा आमूलाग्र बदल होत गेला. वास्तू-निर्मितीच्या कार्याला विजेची, यांत्रिकीकरणाची साथ मिळाली आणि त्याच्या प्रगतीत ‘घर’ ही फक्त गरजेची वस्तू वा सुरक्षेची बाब वा स्थैर्याचे लक्षण न राहता, मानवाच्या सामाजिक व आर्थिक प्रतिष्ठेची बाब सुद्धा झाली.

हे सर्व सांगण्याचे कारण असं की, अशा या घर/वास्तुनिर्मितीच्या शास्त्रात म्हणजेच ‘वास्तुशास्त्रा’मध्ये, काळाच्या ओघात दैव, प्रारब्ध, पाप-पुण्य, शुभ-अशुभ अशा बाबींचा शिरकाव झाला. त्यामुळे ‘निव्वळ आणि निखळ’ वास्तुशास्त्रात अशास्त्रीय बाबी जोर धरू लागल्या. वास्तू जिवंत असते, वास्तूला जन्म-मरणाचे फेरे असतात, ती तुमच्या आयुष्यावर बरे-वाईट परिणाम करू शकते, या आधारावर वास्तूमध्ये दोष असतात व अशा दोषांमुळे वास्तूमध्ये राहणार्‍या व्यक्तींना मानसिक व आर्थिक नुकसान होऊ शकते, तसेच सदर दोषांमुळे वास्तूमध्ये राहणार्‍या व्यक्तींचा मृत्यूही उद्भवू शकतो वगैरे, अशा प्रकारचे वेगवेगळे व सपशेल अवैज्ञानिक, असिद्ध भ्रम पुरातन वास्तुशास्त्राच्या नावाखाली पसरवायला सुरुवात झाली. ह्या अशा अवैज्ञानिक भ्रमांच्या आधारे, मग समाजामध्ये भीती उत्पन्न केली जाऊ लागली, जी आजही केली जाते, व त्यापुढे, त्याद्वारे समाजाचे शोषण केले जाते. अशी भीती व त्या आधारेचे शोषण, ही आपल्या समाजाच्या सुदृढतेसाठी अतिशय घातक आहे. असेच किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे सपशेल अवैज्ञानिक, असिद्ध भ्रम, अनेक स्वयंघोषित वास्तुशास्त्रतज्ज्ञ समाजामध्ये पसरवत असतात. श्री. रविराज अहिरराव हे असेच एक स्वयंघोषित वास्तुशास्त्रतज्ज्ञ जे आपल्या पुस्तकांद्वारे, व्याख्यान/प्रेझेंटेशन्सच्या माध्यमातून ह्या सर्व बाबी गेल्या कित्येक वर्षांपासून पसरवत आहेत.

ह्याच श्री. रविराज अहिरराव यांनी सन २०११ मध्ये कोल्हापूर व इस्लामपूर या शहरांमध्ये ‘वास्तुशास्त्र’ या विषयावर आधारित व्याख्यान आयोजित केले होते. तेव्हा, कोल्हापूरमधील आर्किटेक्ट श्री. जीवन बोडके, सांगलीतील आर्किटेक्ट श्री. रवींद्र चव्हाण, तसेच आर्किटेक्चर कॉलेजमधील विद्यार्थ्यांची संघटना आणि तेथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखा व काही समविचारी संघटना, या सर्वांनी मिळून श्री. अहिररावांच्या कार्यक्रमाला आक्षेप घेतला व स्थानिक पोलिसांकडे याबाबत रीतसर तक्रार नोंदविली. वास्तुशास्त्राच्या आधारे समाजामध्ये पसरवली जाणारी भीती, त्या आधारे केले जाणारे शोषण यासारखे प्रमुख मुद्दे ह्या आक्षेपापाठीचे कारण होते. या आक्षेपांना, त्या वेळी सामान्य नागरिकांचाही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला आणि त्यामुळे हे जणू एक जनआंदोलनच बनले. साहजिकच त्यामुळे, स्थानिक पोलीस प्रशासन सक्रिय झाले. त्यांनी पुढाकार घेऊन श्री. अहिरराव आणि तक्रारदार यांच्यामध्ये चर्चा घडवून आणली. ही चर्चा अनेक स्तरांवर झाली, त्यासंबंधी पत्रव्यवहार झाला, त्याच्या बातम्या स्थानिक वर्तमानपत्रातही आल्या होत्या. परिणामी, काही अटी-शर्तींना अधीन राहून श्री. अहिरराव यांनी त्यांचा कार्यक्रम करण्याचे ठरवले. त्यानुसार अगदी किरकोळ उपस्थितीत अहिरराव यांनी कार्यक्रम केला. २०११ सालच्या ह्या प्रकरणानंतर अहिरराव यांचे असे जाहीर कार्यक्रम झाल्याचे ऐकिवात नव्हते.

‘IIIA ठाणे रिजनल चॅप्टर’ने आयोजित केलेल्या ‘आयडीसीएस २०२३’ या कार्यक्रमांतर्गत, रविवार, ४ जून २०२३ रोजी, रविराज अहिरराव यांचे वास्तू या विषयावर प्रेझेंटेशन ठेवले गेले व त्यामुळे अनेक वर्षांनी, ‘रविराज अहिरराव व वास्तुशास्त्र’ हे विषय पुन्हा एकदा एकत्रितपणे चर्चेत आले.

या कार्यक्रमाला ठाण्यातील आर्किटेक्टस् यांच्या खखअ या संघटनेने सपोर्टिंग ऑर्गनायझेशन म्हणून पाठिंबा घोषित केला होता. खखअ च्या व्हॉट्सअप-ग्रुपवर जेव्हा या कार्यक्रमाची पत्रिका प्रसिद्ध झाली तेव्हा या संघटनेतील आर्किटेक्ट श्री. शिवप्रसाद महाजन आणि श्री. समीर शिंदे यांनी अहिरराव यांच्या वास्तू या विषयावरील प्रेझेंटेशन विरुद्ध आक्षेप नोंदवला. त्यामुळे ह्यावर सदर ग्रुपवर चर्चा सुरु झाली व सभासदांच्या मागणीमुळे IIA, ठाणे सेंटर यांना ह्या कार्यक्रमाबाबत स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक झाले. प्राथमिक माहितीनुसार, सदर कार्यक्रमात श्री. अहिरराव यांच्या प्रेझेंटेशनचा समावेश करतेवेळी IIIA ठाणे रिजनल चॅप्टरने, खखअ ठाणे सेंटरला विश्वासात घेतले नव्हते. श्री. अहिरराव यांच्या सहभागाबद्दल, त्यांना कार्यक्रम-पत्रिका प्रसिद्ध झाल्यानंतरच समजले होते. त्यामुळे, IIA, ठाणे सेंटरचे चेअरमन आर्किटेक्ट श्री. मकरंद तोरसकर, को-ऑप्टेड मेंबर श्री. सुशील सुळे व इतर सर्व कमिटी मेंबर यांनी श्री. अहिरराव यांच्या प्रेझेंटेशनला विरोध दर्शविण्याचे ठरवले. त्याप्रमाणे, IIA ठाणे सेंटरने एक रीतसर पत्र पाठवून, ‘IIIA ठाणे रिजनल चॅप्टर’ला तसे कळवले. श्री. अहिरराव यांचा सहभाग वगळता इतर संपूर्ण कार्यक्रमाला पाठिंबा असल्याची ‘स्तुत्य व प्रभावी’ भूमिका खखअ ठाणे सेंटरने घेतली.

दरम्यान, आर्किटेक्ट श्री. शिवप्रसाद महाजन आणि श्री. समीर शिंदे यांनी महा. अंनिस ठाणे शाखेच्या सचिव, श्रीमती वंदना शिंदे यांच्यासोबत संपर्क साधला व श्री. अहिरराव यांच्या प्रेझेंटेशनची पूर्वकल्पना दिली. अंनिस, ठाणे यांनी अजून काही आर्किटेक्टस् व इतर समविचारी संघटना, यांची मिटिंग बोलावून, अहिरराव यांच्या ‘वास्तू’वर आधारित कार्यक्रमावर, त्यांच्या पूर्वप्रकाशित पुस्तकाद्वारे अहिरराव यांनी मांडलेल्या मतांवर सविस्तर चर्चा केली आणि आक्षेपांचे मुद्दे नकी केले. आपले मुद्दे लावून धरून पुढे समाजापर्यंत पोहचवण्यासाठी कृती-कार्यक्रमाची रूपरेषा ठरली. परंतु, प्रत्यक्ष कृती-कार्यक्रम व जनआंदोलन करण्यापूर्वी आयोजकांसोबत एकदा चर्चा करावी यावर सर्वांचे एकमत झाले. नेमके त्याच दिवशी, IIIA ठाणे रिजनल चॅप्टरने श्री. महाजन यांना चर्चेसाठी बोलावले. त्या चर्चेबाबत, महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे, आर्किटेक्ट व इतर समविचारी संघटनांनी आपला आक्षेप व विरोध प्रथम मागे घ्यावा अशी आयोजकांनी विनंती केली. परंतु त्याला श्री. शिवप्रसाद महाजन यांनी स्पष्ट नकार दिल्यांनतर, IIIA ठाणे रिजनल चॅप्टरने एक नवीन पर्याय दिला.

तो पर्याय असा होता की, विरोध करणार्‍यांनी आपले आक्षेप/प्रश्न लिखित स्वरूपात ‘IIIA ठाणे रिजनल चॅप्टर’कडे द्यावेत. त्या प्रश्नांना श्री. अहिरराव मंचावरील कार्यक्रमातून उत्तरे देतील आणि त्या उत्तरांनी समाधान झाले नाही किंवा ती उत्तरे समर्पक नसतील किंवा अशास्त्रीय असतील, तरीही आपण पुन्हा आक्षेप घ्यायचा नाही. अशा एकतर्फी अटी-शर्तीवर कार्यक्रम करू या, असा प्रस्ताव या चर्चेदरम्यान, आयोजकांनी श्री. महाजन यांच्यापुढे ठेवला. परंतु त्यातून काहीच निष्पन्न होणार नसल्याने अशा सर्व विकल्पांना श्री. महाजन यांनी नकार दिला व चर्चा निष्फळ ठरली. आयोजक हे अहिरराव यांचा कार्यक्रम करण्यावर ठाम राहिले आणि आर्किटेक्ट श्री. शिवप्रसाद महाजन, इतर समविचारी व्यक्ती व संघटना यांच्या मदतीने निषेध नोंदवून सदर कार्यक्रमाविरुद्ध आक्षेप घेण्यावर ठाम राहिले.

आर्किटेक्ट श्री. शिवप्रसाद महाजन आणि श्री समीर शिंदे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे समितीच्या सचिव श्रीमती वंदना शिंदे, श्री. संजय मंगो, वकील श्री. प्रशांत पंचाक्षरी, श्री. जगदिशभाई खैरालिया, श्रीमती गीता महाजन, श्री. एम. ए. पाटील इ. ठाण्यातील प्रगतिशील, पुरोगामी समविचारी व्यक्तींनी चर्चा करून पुढील कृती-कार्यक्रम निश्चित केला. ‘IIIA, ठाणे रिजनल चॅप्टर’ने आयोजित केलेल्या एकूण तीन दिवसांच्या सर्व कार्यक्रमांपैकी, फक्त श्री. रविराज अहिरराव यांच्या कार्यक्रमाला वरील सर्वांचा विरोध होता. सबब, विरोध करताना उर्वरित कार्यक्रमाला कुठेही बाधा पोहचू नये, असे सर्वांचेच मत होते. त्यामुळे, कृती-कार्यक्रम आखताना विशेष काळजी घेतली गेली व त्यानुसार, ‘आयडीसीएस, २०२३’ या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून, ‘IIIA ठाणे रिजनल चॅप्टर’ यांना, तसेच कायदा तथा सुव्यवस्था सांभाळणारे प्राधिकरण म्हणून कापूरबावडी पोलीस स्टेशनला कृती-कार्यक्रमाचे निवेदन देण्याचे ठरले. त्याप्रमाणे, दि. ३० मे २०२३ रोजी, श्रीमती वंदना शिंदे यांनी स्वतः सदर निवेदन दोन्ही ठिकाणी दिले. IIIA ठाणे रिजनल चॅप्टरला निवेदन देताना, चॅप्टरचे चेअरमन श्री. जोशी हे स्वतः उपस्थित होते.

निवेदन दिल्यानंतर, आयोजकांना आपली चूक लक्षात आली असावी म्हणून किंवा निवेदनाच्या दबावामुळे म्हणून, पण दुसर्‍या दिवशी आयोजकांनी अहिरराव यांचा ‘आयडीसीएस, २०२३’ या कार्यक्रमातील सहभाग वगळला व त्यांचे प्रेझेन्टेशन रद्द केले. तशा आशयाचा अधिकृत ई-मेल त्यांनी प्रथम खखअ ठाणे सेंटरला व आर्किटेक्ट श्री. शिवप्रसाद महाजन आणि महा. अंनिस ठाणे शाखेच्या सचिव, श्रीमती वंदना शिंदे यांना सुद्धा पाठवला. IIIA ठाणे रिजनल चॅप्टरने महाराष्ट्राच्या पुरोगामी व विवेकवादी परंपरेला साजेसा निर्णय घेतला हे विशेष. हा निर्णय घेतल्याबद्दल अंनिस, ठाणे समितीच्या सचिव श्रीमती वंदना शिंदे यांनी सर्वांच्या वतीने ‘IIIA ठाणे रिजनल चॅप्टर’चे अभिनंदन केले व त्यांना त्यांच्या भविष्यातील सर्व समाजाभिमुख उपक्रमांकरिता सदिच्छा दिल्या.

– वंदना शिंदे

लेखिका संपर्क : ९८६९१ ५१६७९


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]