डॉक्टरांच्या देवाधर्माबद्दलच्या भूमिकेने प्रेरणा मिळाली

गुरुनाथ जमालपुरे - 8600610664

मी एक सेवानिवृत्त शिक्षक असून माझे मूळ गाव दैठना (ता. शिरूर अनंतपाळ) आहे. माझे शिक्षण उदगीर येथे झाले असून मला तीन मुली, एक मुलगा आहे. चारही मुलं पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. लग्नानंतर पत्नीचे अर्धे राहिलेले शिक्षण मी पूर्ण पूर्ण करून घेतले. आठवीत असताना वडिलांचे छत्र हरवले. लहान वयातच माझ्यावर अंधश्रद्धा निर्मूलनाचे संस्कार झाले होते.

9 ऑगस्ट 1989 या वर्षी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘महाराष्ट्र अंनिस’ची स्थापना केली. केंद्रप्रमुख असताना मला याची माहिती झाली. मला डॉक्टरांना भेटण्याची व त्यांच्या देवाबद्दलच्या भूमिकेची माहिती घ्यावीशी वाटली. त्यांचे साहित्य खरेदी करण्यासाठी मला उदगीर येथे संधी मिळाली. डॉक्टरांचे उदगीर येथे व्याख्यान होते. तेथे मी हजर झालो. सर्वप्रथम स्टॉलवरील डॉक्टरांचे सर्व साहित्य खरेदी केले. घरी गेल्यावर आठवड्यात ते संपूर्ण वाचले. माझ्या डोक्यात एकच विचार होता की, देवाबद्दल डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी काय विचार मांडले आहेत. ते शोधण्याचा प्रयत्न केला; पण त्या साहित्यात देव आहे किंवा नाही, याबद्दलचा स्पष्टपणे उल्लेख आढळून आला नाही. थोडे मन उदास झाले; पण माझ्या डोक्यात डॉक्टरांबद्दलची आपुलकी काही कमी झाली नाही.

15 ऑगस्ट 1994 या वर्षी ज्येष्ठ पत्रकार अनंत अपसिंगेकर यांनी ‘महाराष्ट्र अंनिस’ची शाखा उदगीर येथे डॉ. ना. य. डोळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली. मी परत ‘अंनिस’ कार्यकर्ता होण्याच्या तयारीस लागलो. 20 फेब्रुवारी 2000 या वर्षी ‘महाराष्ट्र अंनिस’च्या वतीने उदगीर येथे तालुकास्तरीय महिला परिषद घेण्यात आली होती. त्या ठिकाणी माझी व ‘महाराष्ट्र अंनिस’ शाखाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अनंत अपसंगेकर यांच्याशी ओळख झाली. मी सचिव अ‍ॅड. गंगाधर घुमाडे यांच्याकडे 250 रुपये देऊन ‘अंनिस’ शाखा उदगीरचा रीतसर सदस्य झालो. नंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भेट उदगीर येथील एका कार्यक्रमस्थळी झाली होती, त्यावेळी मी डॉक्टरना थेट ‘देव आहे किंवा नाही,’ असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी संविधानातील कलमाचा आधार घेऊन मला समजावले. त्यांच्या चेहर्‍यावर कसल्याही प्रकारचा आविर्भाव दिसून आला नाही. घटनेने प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे पूजा-अर्चा, उपास-तापास करण्याचा अधिकार दिला आहे, म्हणून देवाच्या विरुद्ध बोलले तर घटनेच्या विरुद्ध होतो, म्हणून ही संघटना धर्माबद्दल तटस्थ राहते, असे सांगितले. त्यांच्या या स्पष्टीकरणातून मला उत्तर मिळाले, त्यांच्या उत्तर देण्याच्या पद्धतीने प्रेरणा मिळाली आणि मी ‘अंनिस’च्या कामात स्वतःला झोकून दिले. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रातून जे विचार सांगितले जातात, त्यांचे महत्त्व ओळखून मी हे मासिक सर्वदूर पोेचविण्याचे मनोमन ठरवले आणि वार्तापत्राचे वर्गणीदार करण्यासाठी माझे मित्रमंडळ, शिक्षक, नातेवाईक यांच्या भेटीगाठी घेऊ लागलो. काही जण प्रतिसाद देऊन वर्गणीदार होतात, तर काही जण फक्त आश्वासन देऊन मला कटवतात; पण मी चिकाटी सोडत नाही. दरवर्षी वार्तापत्राचे 100 सभासद नोंदवतोच.

गुरुनाथ जमालपुरे

मी शिक्षक असताना उदगीर तालुका शिक्षक पतसंस्था सहकारी संस्थेचा अध्यक्ष होतो. त्यामुळे माझे विविध लोकांशी संपर्क आला. त्याचा फायदा मला पंधरा वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे वर्गणीदार करून घेण्यासाठी होत आहे. बारा वर्षांपासून मी स्वतः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा ‘शतकवीर’ असून वार्तापत्राचे 100 अंक घरोघर जाऊन वितरण करतो. माझ्या कार्याचा विचार करून माझी प्रधान सचिव म्हणून नेमणूक केली. त्यामुळे मी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीस हजर राहू लागलो. तेव्हा ‘महाराष्ट्र अंनिस’ची ध्येय-धोरणे, उपक्रम, कार्यक्रम यांची पूर्णपणे जाणीव झाली. संकल्पपत्र भरून घेणे, सर्पमित्रांसोबत शाळेत जाऊन सापांविषयीची माहिती देणे, चमत्कार सादरीकरणाचे प्रयोग आयोजित करणे, भानामती, बुवाबाजी, मानसिक रोग यावर सखोल माहिती ‘महाराष्ट्र अंनिस’ आणि डॉक्टरांमुळेच मला मिळाली. इस्लामपूर येथे माझा ‘शतकवीर’ म्हणून डॉक्टरांच्या उपस्थितीत अच्युत गोडबोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. त्यामुळे माझ्यात एक प्रेरणा निर्माण झाली आणि जमीन स्तरावर आणखी मी जोमाने कर्तव्य करू लागलो.

मी वार्तापत्राचे संकलित लेखांचे तीस खंड विकले आहेत. वार्तापत्राचे वर्गणीदारांकडे आजही आठ ते दहा हजार रुपये बाकी येणे असून ते आजही वसूल होऊ शकत नाहीत. मी ते माझ्या पेन्शनमधून पैसे वार्तापत्राकडे जमा करतो. मी कधीही कोणाकडूनही चहाची अपेक्षा न करता हे सामाजिक कार्य करीत असतो. डॉ. नरेंद्र दाभोलकर शहीद झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ दोन वर्षे त्यांच्या नावे उदगीर येथे व्याख्यानमाला आयोजित केली होती. तिचे आयोजन, नियोजन करणे, पत्र काढणे, वाटप करणे इत्यादी मी केले होते. ही प्रेरणा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यामुळेच माझ्यात निर्माण झाली आहे.

जादूटोणाविरोधी कायदा पारित होतेवेळी मी स्वत: नागपूर हिवाळी अधिवेशनावेळी धरणे आंदोलनात सामील होतो. ही प्रेरणा शहीद डॉक्टरांकडून मला मिळाली. ‘अंनिस’चा प्रसार सर्वत्र लोकांमध्ये करीत असतो. विज्ञान, निर्भयता, नीती यावर मी नेहमी बोलत असतो. अनेक धर्म मूर्तिपूजक नाहीत. मला चार्वाक, लोकायत यांची विचारसरणी आवडते. अनेक समाजसुधारकांनी समाज सुधारणेचे विचार दिले, समाजातल्या वाईट प्रथा बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले. परंपरावादी, रुढीवादी, समाजघातक विचार नाकारायचे असतात. ते सर्वच कार्यकर्त्यांना पटणारे आहे, असे मला वाटते. मला विज्ञाननिष्ठ विचार डॉक्टरांमुळेच मला मिळाला.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]