व्ही. टी. जाधव - 9850440947
डॉ. दाभोलकर मला सांगायचे की, जे चाळीसच्या वर्षांच्या पुढचे आहेत, त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. त्या वयाच्या आधीच्या लोकांना बदलण्याचा प्रयत्न करा. माझी पत्नी ‘सोळा शुक्रवार’ वगैरे करायची. पण मी कधीही थेट विरोध न करता संवाद साधून वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या दिशेने जाण्यासाठी प्रयत्न केले. आज मला समाधान आहे की, माझे संपूर्ण कुटुंब या दिशेने वाटचाल करत आहे. आमच्या घरात देवा–धर्माचं कुठलंही कर्मकांड होत नाही.
संवादक ः राहुल विद्या माने
सर, तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगाल का?
माझे बालपण आणि तारुण्य हे शेतकरी कुटुंबातील एका साध्या वातावरणात घडत गेले. मी मालेगावचा राहणारा. नाशिक जिल्ह्यातील. मालेगावचे तीन भाग आहेत- मालेगाव, संगमेश्वर आणि कॅम्प. मालेगाव माळी समाजाचं गाव आहे. मालेगाव ‘गिरणा’ आणि ‘मोसम’ अशा दोन नद्यांच्या काठी वसलेले शहर आहे. अडीचशे वर्षांचा इतिहास आहे या गावाला. संगमेश्वर हे आधी मोठे खेडेच होते. या गावात सर्व जातींचे लोक होते. तिथे लोहार गल्ली, सोनार गल्ली, महारवाडा, मांगवाडा अशी जातीनिहाय वस्ती होती. दुसर्या बाजूला ब्राह्मण आणि वैश्य उच्चवर्णीय लोक हे नदीच्या दुसर्या बाजूला म्हणजे मालेगावमध्ये राहायचे. लहानपणी माझे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण संगमेश्वरमधल्या शाळेत गेले. आमच्या जाधव घराण्यात कोणीही शिकले नव्हते. आमची घरची परिस्थिती सधन होती; पण शिक्षण अजिबात नव्हते. माझ्या काकांची सगळी मुले शेती करण्यात मग्न होती. आई माझी अतिशय गरीब घरची होती. मामा अगदी साध्या नोकरीवर त्यांचं भागवायचा. आम्ही सहा भाऊ आणि तीन बहिणी असे नऊ जण भावंडे होतो. आमच्या काकांची जर मुलं यात जोडली तर आम्ही पंधराजण भावंडं होतो.
मोठ्या कुटुंबात असण्याचे काही वेगळे संस्कार झालेत का तुमच्यावर?
शिक्षणाकडं कुणाचंच लक्ष नव्हतं. कुणी म्हणायचं नाही शिका म्हणून वगैरे. चुलत्याची मुलं शेतात काम करायची. त्यामुळे वडिलांना सुद्धा वाटायचं की, मी शेतात काम करावं. वडील उत्कृष्ट मोडी लिपीत लिहायचे. ते मसाल्याचे दुकान चालवायचे. पण आईला नेहमी वाटायचं की, मी शिकावं म्हणून. माझा मोठा भाऊ एम. एससी., बी. एड. झाला आणि मी बी. एस्सी., बी. एड. झालो.
लहानपणीचा एखादा अनुभव सांगाल का, ज्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारायची सवय लागली किंवा ज्यामुळे एखाद्या गोष्टीवर स्वत:ची भूमिका घडवण्याची तुम्हाला प्रेरणा मिळाली?
लहानपणी मी आमच्या घराण्यात सर्वांत जास्त आज्ञाधारक असल्यामुळे मला महादेव मंदिरात निरांजन लावायला थोरल्या काकू पाठवत असत. त्या मला सतत देवघरासमोर माळ जपत बसलेल्या दिसायच्या. मी सहावीत असताना सलग दोन वर्षे मी हे काम केले होते. त्यावर्षी अधिक मास होता. मंदिरात मी दररोज पाहायचो की, गावातले एक पाटील येऊन भजन करायचे. तिथं दररोज नऊवारी साडी घातलेली एक महिला येऊन त्या पाटलाला वाकून नमस्कार करायची. ते पाटील त्या महिलेशी काहीतरी अनैतिक वर्तन करायचे. माझ्या बालमनाला हे अतिशय विचित्र वाटायचं. मी ‘ती’ गंमत गल्लीतील मित्रांना सांगितली, तेव्हा आम्ही सर्वांनी यावर त्या पाटलाला आणि महिलेला येता-जाता चिडवायला सुरुवात केली. हे माझ्या चुलत भावाला कळले, तेव्हा त्यानं मला चांगलाच मार दिला. तेव्हापासून मंदिरात जायची इच्छाच झाली नाही आणि नंतर तर जाणेच बंद झाले. पुढे शरद बेडेकर यांचे ‘ईश्वरविरहित जीवन’ हे पुस्तक वाचनात आले.
तुम्हाला सामाजिक कामाची ओळख पहिल्यांदा कशी झाली?
मी शाळेत असताना आठवी-नववीपासून राष्ट्र सेवा दलात जायला सुरुवात केली. सेवा दलात अनेकांची भाषणं ऐकायला मिळाली. यदुनाथ थत्ते, ना. ग. गोरे यांचे विचार मला ऐकायला मिळाले. त्याच्यानंतर मी बाबा आमटे यांच्या ‘आनंदवन’-‘सोमनाथ’ प्रकल्पाला दहा दिवसांचे शिबीर केले. कुठल्या-कुठल्या परिस्थितीत लोक राहतात, आपण काहीच करत नाही, याबद्दल माझ्या मनात मंथन सुरू झाले. आपण नोकरी करतो वगैरे ठीक आहे; पण सामाजिकदृष्ट्या आपण काहीतरी केलं पाहिजे, अशी माझी जाणीव विकसित झाली. बाबा आमटे यांच्याजवळ दहा दिवस राहायला मिळाले. परीट गुरुजींना ऐकायला मिळालं. तिथं श्रमदानातून संस्कार झाले.
मालेगावमध्ये तरुण वयात तुम्हाला मिळालेल्या सामाजिक वातावरणाने तुम्हाला समृद्ध केले, त्याबद्दल कृपया विस्ताराने सांगा.
मालेगावमध्ये मी य. ना. जाधव विद्यालय (पूर्वीचे लोकमान्य विद्यालय) इथं मी शिकलो. जाधव हे मोठे स्वातंत्र्यसैनिक आणि माजी खासदार होते. नाशिक जिल्ह्यात मालेगावमध्ये पहिल्यापासून सेवा दलाचे काम जोरदारपणे चालत होते. नोकरीला लागल्यापासून काही कारणांनी मी सेवा दलापासून अलिप्त राहिलो आणि आता निवृत्तीनंतर पुन्हा मी सेवा दलाशी सक्रिय झालो आहे. माझ्या जुन्या सहकार्यांमध्ये अशोक फराटे, य. ना. जाधव, दत्ता वडगे असे बरेच लोक होते. मालेगावमध्ये पहिल्यापासून सामाजिक बांधिलकी असलेले वातावरण आहे. तिथल्या बर्याच उपक्रमांमध्ये मी सहभाग घेतला आहे.
पहिल्यांदा तुमचा ‘अंनिस’च्या कामाशी संबंध कधी आला?
1993 मध्ये मी एक शिबीर केलं. त्यानंतर मी सहभागी व्हायला सुरुवात केली. आमच्या घरी बर्याच रुढी-परंपरा चालायच्या. बरेच सण धूमधडाक्यात साजरे व्हायचे. तुळशीचे लग्न, गणेशोत्सव, नवरात्र, वटपौर्णिमा आमच्या कुटुंबात साजरे करायचो. जाधव समाजात कुणीही वारले तरी आम्हाला मुंडन करावे लागायचे. ती प्रथा मी थांबवण्याचा प्रयत्न केला. तिथून माझा ‘अंनिस’च्या चळवळीशी संबंध आला. याच काळात मला श्याम मानव यांची भाषणं ऐकायला मिळाली. नंतर ‘वैज्ञानिक जाणिवा शिबिरा’त डॉ. नरेंद्र दाभोलकर आले होते. त्यात आम्ही वीस शिक्षकांसह सहभागी झालो आणि त्यानंतर आमचे संपूर्ण कुटुंब ‘अंनिस’ चळवळीशी जोडले गेले. आम्ही जिल्हा पातळीवर बर्याच वर्षांपासून विज्ञान निबंध स्पर्धा आयोजित करायचो. माझ्या निवृत्तीनंतर मी 2007-08 मध्ये मी ‘विज्ञानबोध वाहिनी’च्या कामाला सुरुवात केली. आमचं कुटुंब संपूर्णपणे या विचारांनी बदलले आहे.
घरामध्ये कर्मकांडाला विरोध करताना आपल्याच कुटुंबीयांशी आणि नातलगांशी वाद घालावा लागतो, हे प्रबोधन अधिक समजूतदारपणे कसं करता येईल; कुणाचीही मनं न दुखावता?
डॉ. दाभोलकर मला सांगायचे की, जे चाळीसच्या वर्षांच्या पुढचे आहेत, त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. त्या वयाच्या आधीच्या लोकांना बदलण्याचा प्रयत्न करा. माझी पत्नी ‘सोळा शुक्रवार’ वगैरे करायची. पण मी कधीही थेट विरोध न करता संवाद साधून वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या दिशेने जाण्यासाठी प्रयत्न केले. आज मला समाधान आहे की, माझे संपूर्ण कुटुंब या दिशेने वाटचाल करत आहे. आमच्या घरात देवा-धर्माचं कुठलंही कर्मकांड होत नाही.
नास्तिकतेबद्दल तुमचं जे नातं आहे, ते कसं वाढत गेलं?
सुरुवातीला श्याम मानव आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या भाषणांनी, लिखाणाने माझ्यावर तर्कनिष्ठेतेचे संस्कार केले. ‘अंनिस’च्या कार्यात आल्यावर वाचन वाढतच गेलं. नंतर मुग्धा कर्णिक, रिचर्ड डॉकिन्स यांचं साहित्य वाचत गेलो. अलिकडे मी भगत सिंग यांचे ‘मी नास्तिक का आहे?’ हे वाचलं. शंतनु अभ्यंकर यांचं लिखाणवाचलं. डॉ. हमीद दाभोलकर यांचं ‘विवेकाच्या वाटेवरी’ हे पुस्तक वाचलं. प्रा. प. रा. आर्डे यांचं पुस्तक वाचलं. ‘देव आहे का नाही?’ या चर्चेमध्ये माझा अभ्यास वाढवण्यासाठी माझं वाचन मी वाढवत नेलं. महात्मा फुले, इतिहासकार राजवाडे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, जयंत नारळीकर यांची पुस्तके वाचत गेलो. उत्क्रांतीविषयक अभ्यास वाढवला. सुरुवातीला आमच्या समाजातून माझ्या नास्तिकपणाला विरोध झाला नाही; पण व्यावसायिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी विरोध झाला.
धार्मिक, जातीय, प्रादेशिक उन्माद आजच्या काळात वाढत आहे. त्याला एक कार्यकर्ता म्हणून कसा प्रतिसाद देता येईल?
होय. धार्मिक, जातीय, प्रादेशिक उन्माद आजच्या घडीला खूपच बोकाळला आहे. कट्टर धार्मिक, जातीयवादी, राजकारणी मंडळी सामान्य लोकांच्या भावना अधिक ‘टोकदार’ करीत असतात. कारण त्यातून अशा लोकांना त्यांचा स्वार्थ साधायचा असतो. हा ‘ढोंगीपणा’ लोकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे कडव्या मूलतत्त्ववादी व सनातनी संघटनांचे फावते. अखिल मानवजात विविध धर्मांत विभागली गेली आहे. अनेक धर्मयुध्दांत मानवाची हानी सर्वांत जास्त झाल्याचा इतिहास आहे, तरीही धर्मांध व जात्यांध अंधभक्तांची संख्या खूप जास्त असल्याने तुलनेने संख्येने अत्यल्प असलेल्या विवेकवादी विचारसरणीची लढाई तशी अवघड आहे. देव, धर्म आदी कल्पना या मानवाच्या शोषणासाठी आहेत, हे पटवून देणे तसे अवघड आहे. ‘आपली ही लढाई दशकांची नसून शतकांची आहे, हे समजून घेतले पाहिजे,’ असे डॉ. दाभोलकर नेहमी म्हणत असत. विविध प्रदेशांतील, जाती-धर्मातील ‘कर्मकांडे’ या अंधश्रद्धाच असतात, हा विचार आपण ‘वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’ व ‘विवेक वाहिनी’च्या माध्यमांतून विद्यार्थ्यांमध्ये रुजवू शकतो. ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हा साने गुरुजींचा संदेश पोचविणे ही काळाची गरज आहे. युवा पिढीत ‘धर्मचिकित्सा’ करण्याची सवय लागली तर भविष्यात पुढची पिढी अधिक सजग होईल, असे मला वाटते.
शिक्षक म्हणून काम करताना तुमची चळवळीबद्दल असलेली वैचारिक बांधिलकी आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही बजावत असलेले कर्तव्य यांचा कधी आमना–सामना झाला का?
आमच्या संस्थेत एक वाद झाला, त्याबद्दल थोडं सांगतो. नोकरीच्या शेवटच्या काही वर्षांत मी काही काळ मुख्याध्यापक होतो. 2006 मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होता. निरोप समारंभात भाषण आणि इतर संवाद होण्यासाठी वेळ जास्त मिळावा, असा पण त्यात उद्देश होता. कार्यक्रमासाठी खगोल अभ्यासक सुधाकर भालेराव हे प्रमुख पाहुणे होते. त्यावेळी कार्यक्रमातील अनावश्यक कर्मकांडाला फाटा द्यावा म्हणून मी सरस्वतीपूजन न करण्याचा निर्णय घेतला; पण पाहुण्यांनी करायला हरकत नाही, अशी भूमिका घेतली आणि तसा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम पार पडल्यावर संस्थेतल्या हितशत्रूंनी माझ्याविरोधात प्रचार करून संस्थेमध्ये सरस्वतीपूजन करायला नकार दिला, या मुद्द्यावर माझी बदनामी करण्याची मोहीम उघडली आणि कार्यक्रम झाल्यावर दहा दिवसांनी माझ्या विरोधात मानहानी करणारी बातमी छापून आणली. त्यामुळे माझ्या विरोधात संस्थेमध्ये वातावरण तयार झाले. मी सरस्वतीपूजनाला नकार कसा देतो, म्हणून माझ्या तोंडाला काळे फासायला शिवसेनेचे कार्यकर्ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींसह आले. मी सरस्वतीच्या प्रतिमेला हार घालून माफी मागावी, असा त्यांचा अट्टाहास होता. या सर्व प्रकरणाची माहिती मी डॉ. दाभोलकरांना देत होतो. त्यांनी माझ्याविरोधात कलुषित झालेले वातावरण समजून घेऊन मला हे प्रकरण फार न ताणण्याचा सल्ला दिला. आयुष्यात सामाजिक कामात कधीही तडजोड न करणार्या डॉ. दाभोलकरांच्या या भूमिकेचे मला आश्चर्य वाटले नाही. कारण ते नेहमी कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदनशील असत. कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची वाताहत होऊ नये, याबद्दल ते सतत दक्ष असत.
सामाजिक क्षेत्रात इतर संघटनांशी सहकार्य करून ‘अंनिस’चे काम कसे पुढे नेता येईल?
सामाजिक क्षेत्रात काम करताना चळवळीस इतर समविचारी संघटनांशी जोडून घ्यावे लागते. उदा. व्यसनमुक्ती, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरणरक्षण, जातिअंत इत्यादी. जातीयवादी, धार्मिक संघटनांचे काम विस्तारत असताना अशा परिस्थितीत राष्ट्र सेवा दल, ‘छात्रभारती’सारख्या निधर्मी, विज्ञानवादी संघटनेच्या सहकार्याने आपले काम ‘एकमेका साह्य करु। अवघे धरु सुपंथ॥’ या उक्तीप्रमाणे पुढे नेता येईल. कुठलेही राजकीय पाठबळ नसताना आपण वैचारिक लढा देऊन, जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा असे दोन कायदे मंजूर करून घेतले आहेत. आपापसांतील मतभेद विसरून, महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून एकजुटीने असे कार्य पुढे नेता येते. उदा. नाशिकमधील सुमारे पन्नास पुरोगामी संघटनांनी येऊन ‘दाभोलकर विवेक व्याख्यानमाला’ स्थापन केली. गेल्या आठ वर्षांपासून अखंडपणे दर महिन्याच्या 20 तारखेला व्याख्यान घेत आहेत, हे कौतुकास्पद आहे.
सध्याच्या काळात अर्धवट माहिती, ‘फेक न्यूज’, अवैज्ञानिक माहितीचा प्रसार होतो आहे. तो थांबवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काय–काय केलं पाहिजे?
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु हल्ली विज्ञान-तंत्रज्ञानाने आणखी एक गरजेचे साधन उपलब्ध करून दिले आहे. ते म्हणजे मोबाईल (भ्रमणध्वनी). ग्रामीण, आदिवासी खेडूतापासून ते पुणे मुंबईसारख्या महानगरातील उद्योजकांच्या हातात असणारे हे मोबाईल म्हणजे जादूचे यंत्रच! संदेशवहन, शिक्षण, खेळ, मनोरंजन, इंटरनेट असे सर्व काही यात आहे; शिवाय हे यंत्र वापरायचे कसे, यासाठी कुठल्याही विद्यापीठाचे शिक्षण घ्यावे लागत नाहीच. तसेच वापरण्यास जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत, वय व लिंग असा कुठलाही भेदभाव नाही. चार-पाच वर्षांच्या बालकापासून ते 90-95 वर्षांपर्यंतच्या अतिज्येष्ठापर्यंत ‘मोबाईल’ कोणीही वापरू शकतात. ‘व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी’कडून येणारे बरे-वाईट मेसेजेस, पोस्ट्स, ‘फेक न्यूज’, अवैज्ञानिक माहितीचा सतत भडिमार होत असते. या षेीुरीवशव पोस्ट न वाचताच षेीुरीव केल्या जातात. ‘आग के तरह फैला दो’ या टाईपच्या बातम्या प्रामुख्याने धर्मांध, जात्यांध, राजकारणी लोकांच्या हितासाठी असतात. बुद्धिभेद, दिशाभूल; तसेच वैयक्तिक चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशाने पसरविल्या जातात. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण त्यांची सत्य-असत्यता तपासून मगच ती बातमी पुढे ‘अग्रेशित’ (षेीुरीव) करावी. यासाठी ‘पोस्टचेक’, ‘फॅक्टचेक’ सारखे ीुंळीींंशी हरपवश्रश वापरून सकारात्मक पर्याय निवडावा. कार्यकर्त्यांनी सजग राहून अशा प्रकारच्या पोस्ट डिलीट करणेच योग्य!
कार्यकर्त्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
कार्यकर्त्यांनी वाचन केलंच पाहिजे. एक चांगला श्रोता बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचं वाचन केलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी पद, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि पुरस्कार यांची अभिलाषा न धरता काम करत राहिलं पाहिजे. आपण शेवटपर्यंत विद्यार्थी राहिलं पाहिजे आणि प्रसिद्धीपासून दूर राहिलं पाहिजे. ‘अंनिस’ कार्यकर्त्याने वैज्ञानिक दृष्टी, शोधक बुद्धीला चालना देऊन विवेकी व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी पुढील बाबींचा अंगीकार करणे गरजेचे आहे – 1) विचार : यासाठी अवांतर वाचनात प्रश्नचिन्ह, ‘पूर्णविराम’, ‘विचार तर कराल’, ‘श्रद्धा अंधश्रद्धा’ आदी पुस्तके वाचून विवेकाचा नवा विचार आत्मसात करावा. 2)आचरण : आपण केलेल्या विवेकी विचारांप्रमाणे आपले आचरण असणे तितकेच गरजेचे आहे. 3) उच्चार व प्रचार : विचार तर्काला पटल्यावर त्यांचा उच्चार व प्रचार प्रथम आपल्या कुटुंबात, मित्रपरिवार व नंतर आपले कार्यक्षेत्र असे क्रमाने करावा. ‘अंनिस’ची ‘देवधर्म’ याबाबतची भूमिका तटस्थतेची आहे, हे समजून घ्यावे. 4) संघटन : ‘अंनिस’च्या जवळच्या शाखेत सहभागी होऊन संघटित शक्ती निर्माण करावी. आपण हे काम आपल्या इच्छेनुसार करीत असल्याने पद, प्रसिद्धी, पुरस्कार यापासून दूर राहावे, सहमतीने व एकजुटीने काम करावे. असे प्रसंग क्वचित येतात. भारतीय संविधानाला अधीन राहून शक्य तितके योगदान द्यावे. जादूटोणाविरोधी कायदा; तसेच सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा होण्यासाठी कार्यकर्त्यांनी दीर्घकाळ अहिंसक संघर्ष केला आहे. शेवटी सर्वांत महत्त्वाचे सत्याच्या वाटेवर निर्भयपणे ठाम राहण्यासाठी ‘अंनिस’ वार्तापत्र व संघटना मार्गदर्शिका यांचे नियमितपणे वाचन होणे गरजेचे आहे.
तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात समाधानाच्या कोणत्या गोष्टी वाटतात?
सतत शिकत राहिलं पाहिजे. निवृत्तीनंतर मी चडउखढ चा अभ्यासक्रम केला. चारचाकी गाडी शिकलो. संस्कृत संभाषण वर्ग केला. रेडिओ दुरुस्तीचा अभ्यासक्रम केला असल्याने रेडिओ दुरुस्ती करण्याची आवड आहे. उर्दू भाषा शिकली आहे. विज्ञान आणि गणितात रुची आहे. व्यवसाय मार्गदर्शन सुद्धा करतो. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कामातून मला एक ‘वेगळी ओळख’ मिळाली. आदरणीय शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या संपर्कामुळे डॉ. एन. डी. पाटील, डॉ. आ. ह. साळुंके, डॉ. सदानंद मोरे, मेधा पाटकर यांसारख्या विचारवंतांना व सामाजिक कार्यकर्त्यांना जवळून ऐकता आले. चित्रपट सृष्टीतील निळूभाऊ फुले, डॉ. श्रीराम लागू, जब्बार पटेल अशा दिग्गज कलावंतांना प्रत्यक्ष भेटता आले. साहित्यिक तारा भवाळकर, जागतिक कीर्तीचे सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांच्याशी प्रत्यक्ष बोलता आले, याबद्दल मनस्वी समाधान आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माझे संपूर्ण कुटुंबच ‘विवेकी विचारां’चे झाल्याने मी खूप समाधानी आहे, असे नम्रपणे नमूद करतो. धन्यवाद !
–व्ही. टी. जाधव
संपर्क : 9850440947