ह.भ.प. देवदत्त परुळेकर -
भगवंताचे वसतिस्थान जर वैकुंठ असेल तर वैकुंठीचा देवच पंढरीला आला, तो भक्तांच्या भक्तीच्या प्रेमापोटी. आता तो इथेच वास्तव्याला असतो, तो भक्तांच्या नामभक्तीच्या प्रेमापोटी. म्हणून माऊलींनी पंढरीचे वर्णन करताना हे ‘भूवैकुंठ’ आहे, ‘बाप तीर्थ’ आहे असे केले आहे.
बाप तीर्थ पंढरी । भूवैकुंठ महीवरी ।
भक्त पुंडलिकाचे द्वारी । कर कटावरी राहिला ॥
तर नामदेवराय पंढरीरायाला गोड विनवणी करतात –
वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी । वास दे पंढरी सर्वकाळ ॥
वैकुंठ कोपट जुनाट झोपडी । नको अडाअडी घालू आम्हा ॥
वैकुंठी जाऊनि काय बा करावे । उगेचि बैसावे मौनरुप ॥
तर जनाबाई म्हणतात –
आम्ही स्वर्गसुख मानु जैसा ओक । देखोनिया सुख पंढरीचे ॥
न लगे वैकुंठ वांछू कैलास । सर्वस्वासी आस विठोपायी ॥
भूलोकातच वैकुंठ पंढरीच्या रुपाने आल्यावर भक्तांना वैकुंठाचे काही अप्रुप राहिले नाही. उलट देवांची परिस्थिती काय झाली, याचे वर्णन नाथबाबा करतात –
इच्छिताती देव पंढरीचा वास । न मिळे सौरस तया काही ॥
ज्यांना वैकुंठात जावयाची आस आहे, त्यांचीही सोय संतांनी लावली ती भूलोकीच पंढरीच्या रुपाने वैकुंठ आणून.
संतांना मात्र वैकुंठात जाण्याची इच्छा नाही की तीर्थयात्रेचेही महत्त्व वाटत नाही. ज्ञानेश्वर माउली तर म्हणतात
तुम्हीं व्रतें नियमु न करावे । शरीरातें न पीडावें ।
दुरी केंही न वचावें । तीर्थासी गा ॥
तुम्ही व्रते, नियम करून शरीराला पीडा देऊ नका. दूर कोठे तीर्थाला जाऊ नका. तुकोबा तर प्रश्न विचारतात –
तीर्थी जावोनी काय तुवा केले? । चर्म प्रक्षाळीले वरी–वरी ॥
केवळ तीर्थात स्नान केल्याने मनाची शुद्धता कशी होणार? तरीही सर्व संतांनी पंढरीला जायचा, पंढरीची वारी करायचा आग्रह का धरला?
पंढरी हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर ते संतांचे माहेर आहे. त्या काळातील ग्रामीण भागातील पारंपरिक कुटुंबातील विवाहित स्त्रीच्या मनात आपल्या माहेराविषयी ज्या भावना असतील, जी ओढ असेल त्याच भावना, तीच ओढ संतांच्या मनात पंढरीबद्दल आहे. एकनाथ महाराजांचा सुप्रसिद्ध अभंग आपण अनेक वेळा ऐकला असेल –
माझे माहेर पंढरी । आहे भीवरेच्या तीरी ॥
नामदेवराय पंढरीविषयी म्हणतात –
माहेर संतांचे । नामया स्वामी केशवाचे ॥
तर तुकोबा हीच भावना व्यक्त करतात –
पंढरीये माझें माहेर साजणी । ओविये कांडणीं गाऊं गीती ॥
या अभंगात तुकोबांनी आपल्या माहेरी कोण-कोण आप्त, सोयरे भेटतील, याची यादी दिली आहे. रखुमाई-विठ्ठल या मातापित्यांसह उद्धवापासून पुंडलिकापर्यंत आणि निवृत्ती-ज्ञानदेवांपासून रोहिदास, कबीर, चोखा मेळ्यापर्यंत संतांची एक यादीच दिली आहे. पंढरीला जायचे ते या सार्यांना भेटायला, या सार्यांच्या संगतीचे सुख भोगायला, म्हणूनच तुकोबांनी प्रत्यक्ष मुक्तीला आणि वैकुंठात जायलाही नकार दिलाय. तुकोबा म्हणतात –
झणी मुक्ति देसी जरी पांडुरंगा । मग या संतसंगा पाहू कोठे? ॥
मग पंढरीचा आनंद सोहळा । पाहू मग डोळा कोणाचिया? ॥
तुका म्हणे असो तुझी कृपादृष्टी । न लगे वैकुंठी वास आम्हा ॥
पंढरी हे सर्वांचेच माहेर आहे आणि तिथे गेल्याने सर्व दुःख नाहीसे होते, जीवाला विश्रांती मिळते व आनंद प्राप्त होतो, असे नाथबाबा सांगतात –
तापत्रयें तापलीया पंढरीसी यावें । दरुशनें मुक्त व्हावें हेळामात्रें ॥
दुःखाची विश्रांती सुखाचा आनंद । पाहतां चिदानंद विठ्ठल देव ॥
संसारीं तापलें त्रितापें आहाळले । विश्रांतीये आले पंढरीसी ॥
सर्वांचे माहेर भाविकांचे घर । एका जनार्दनी निर्धार केला असे ॥
पंढरीला जाण्याचे आणखीही काही कारण आहे. पंढरी ही एक मोठी बाजारपेठ आहे. इथले व्यापारी इनामाकरिता प्रसिद्ध आहेत, असे वर्णन चोखोबा करतात –
इनामाची भरली पेठ । भूवैकुंठ पंढरी ॥
तर संत जनाबाई वर्णन करतात –
विवेकाची पेठ । उघडी पंढरीची वाट ॥
तेथें नाहीं कांहीं धोका । उठाउठी भेटे सखा ॥
या पेठेत बाजार कसा भरतो, व्यापारी कोण आहेत आणि व्यापार कसा चालतो, याचे सुंदर वर्णन तुकोबांनी केले आहे –
संतसज्जनीं मांडिलीं दुकाने । जें जया पाहिजे तें आहे रे ।
भुक्तिमुक्ति फुकाच साठीं । कोणी तयाकडे न पाहे रे ॥
दोन्हीच हाट भरले घनदाट । अपार मिळाले वारकरी रे ।
न वजों म्हणती आम्ही वैकुंठा । जिहीं देखिली पंढरी रे ॥
संत-सज्जनांनी येथे दुकाने मांडली आहेत. विवेकाचा माल त्यांच्यापाशी भरपूर आहे. संत विवेकाशिवाय असूच शकत नाहीत, असे ज्ञानेश्वर माउलींनी संतांचे वर्णन केलेले आहे –
चंद्रु तेथें चंद्रिका । शंभु तेथें अंबिका ।
संत तेथें विवेका । असणें कीं जी ॥
चंद्र आणि चांदणे, शंभू आणि अंबिका हे एकमेकांपासून विलग असू शकत नाहीत. तसेच संत सदैव विवेकाने, सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून श्रेयस्कर असेच वागत असतात. समाजासाठी योग्य काय आहे आणि अयोग्य काय याची त्यांना जाण असते, भान असते. या नीर-क्षीरविवेकाची रुजवण समाजात व्हावी, म्हणून त्यांचे सर्व प्रयत्न असतात. या संतांच्या पेठेत ज्याला जे पाहिजे ते आहे. भुक्ती आणि मुक्ती तर फुकट उपलब्ध आहेत. पण गिर्हाईकांचाही विवेक असा की, ते त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. आम्ही पंढरी पाहिली असल्याने आता वैकुंठात जाणार नाही, असा व्यवहार ते करतात.
इतर क्षेत्रांपेक्षा पंढरी आगळी-वेगळी आहे, संतांना अत्यंत प्रिय आहे. याला आणखीही काही कारणं आहेत. तुकोबा वर्णन करतात –
उठाउठीं अभिमान । जाय ऐसें स्थळ कोण ॥
तें या पंढरीस घडे । खळां पाझर रोकडे ॥
नेत्री अश्रूचिया धारा । कोठें रोमांच शरीरा ॥
तुका म्हणे काला । कोठें अभेद देखिला ॥
तत्काळ अभिमान जाईल, असे जगात कोणते स्थळ असेल, तर ते पंढरीक्षेत्र होय. ही गोष्ट पंढरीतच घडते. एखादा दुर्जन पंढरीस गेला आणि तेथे त्याला योग्य महात्म्यांच्या मुखाने संतकथेचे श्रवण घडले, तर त्याच्याही अंत:करणाला प्रेमाचा पाझर फुटेल, हे निश्चित आणि त्याचे ठिकाणी भक्ती, प्रेमाची आवड निर्माण होईल. संतांचे गुणानुवाद ऐकून डोळ्यांत प्रेमाश्रूंच्या धारा आणि अंगावर रोमांच कोठे उभे राहात असतील तर ते पंढरीतच होय. तुकाराम महाराज म्हणतात, ‘लोकहो, अभेदरूपी काला तुम्ही पंढरीवाचून इतरत्र बघितला आहे काय?’
एकदा अभिमान गेला की चराचरांत तो विठ्ठलच भरलेला आहे, असा जेव्हा अनुभव येतो, त्यावेळी आपल्यामध्ये आणि पंढरीमध्ये द्वैत राहत नाही. नामदेवराय म्हणतात –
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ।
ज्ञानेश्वर माउली हा अनुभव व्यक्त करताना म्हणतात –
अवघे विश्वचि माझे घर । ऐसी मती जयाचि स्थिर ।
किंबहुना चराचर । आपणची जाहला ॥
चोखोबाही हाच अनुभव व्यक्त करतात –
देही देखिली पंढरी । आत्मा अविनाश विटेवरी ॥
तो हा पांडुरंग जाणा । शांति रुक्मिणी निजांगना ॥
आकारले तितुके नासे । आत्मा अविनाश विठ्ठल दिसे ॥
ऐसा विठ्ठल दृष्टी ध्यायी । चोखा मेळा जडला पायी ॥
हाच अनुभव नाथबाबा व्यक्त करतात तो असा –
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥
भाव–भक्ति भीमा उदक तें वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥
दया–क्षमा–शांति हेंचि वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥
ज्ञान–ध्यान–पूजा विवेक आनंद । हाचि वेणुनाद शोभतसे ॥
दश इंद्रियांचा एक मेळ केला । ऐसा गोपाळकाला होत असे ॥
देखिली पंढरी देहीं–जनीं–वनीं । एका जनार्दनी वारी करी ॥
काया ही माझी नाही. देवाची पंढरी आहे. कारण यात विठ्ठल, तो परमेश्वर आत्मरुपाने राहतो, प्रकाशरुपाने नांदतो आहे. कायारूप पंढरीतही भावभक्तीरूप भीमा नदी आहे. त्या भावभक्तीरूप भीमेचे किनारी शोभून दिसणारा आत्मरुपी पांडुरंग कटेवरी हात ठेवून उभा आहे. भीमेकाठी भावभक्तीचे हे वाळवंट आहे, ते दया, क्षमा, शांतीचे वाळवंट आह, जेथे वैष्णवांचा सत्संग लाभतो. मनातील सर्व विकार इथे गळून पडतात.
याच काया पंढरीत ज्ञान, ध्यान, पूजाभाव, विवेक व आनंदाचा मधुर ध्वनी, वेणुनाद घुमतो. काया पंढरीचा गोपाळकालाही अद्भुत आहे. हा गोपाळकाला दहा इंद्रियांचा आहे. गोपाळकाल्यात वेगवेगळे स्वाद असतात. तशीच दहा इंद्रिये सुध्दा वेगवेगळ्या विषयांसाठी आहेत. त्यांचे वेगवेगळे रसस्वाद आहेत. पण संतांसाठी आता इंद्रियांचे अनेक विषय राहिलेच नाहीतच. भिन्न रसस्वाद राहिलेच नाहीत, तर भक्ती हा एकच रस व पांडुरंग हा एकच विषय राहिला आहे. ही चैतन्यरूप पंढरी सर्वच देहांमध्ये, सर्वच जनांमध्ये, वनांमध्ये, चराचरामध्ये पाहिली. तिची अनुभवरूप वारी आपण अविरत करतो, असे नाथबाबा सांगतात.
लेखक संपर्क : 94220 55221