डॉ. शंतनु अभ्यंकर -
चूक शोधा, चूक मान्य करा, चूक दुरुस्त करा आणि प्रगती साधा, असं विज्ञान नावाची युक्ती आपल्याला सांगते. चूक आणि अज्ञान मान्य करणं, ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. मेंडेलिफची आवर्तसारिणी (झशीळेवळल ढरलश्रश) नावाचा चौकोन-चौकोन असलेला एक मोठ्ठाच्या मोठ्ठा तक्ता तुम्ही रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत पहिला असेल. तो असा दिसतो.
सार्या मूलद्रव्यांची क्रमवार आणि शिस्तशीर मांडणी या तक्त्यात केली आहे. आज आपल्याला सारी मूलद्रव्ये माहीत आहेत. सारे चौकोन आता भरलेले आहेत.
पण जेंव्हा मेंडेलिफ नावाच्या शास्त्रज्ञाने हा तक्ता पहिल्यांदा तयार केला, तेव्हा (1869) काही मोजकीच मूलद्रव्ये ठाऊक होती. त्याने केलेला पहिला-वहिला तक्ता असा दिसत होता.
यात काही चौकोन चक्क रिकामे दिसत आहेत. रिकामे चौकोन हीच तर त्याच्या यशाची गुरुकिल्ली. त्याच्या पूर्वीही अनेक जणांनी असा तक्ता करायचा प्रयत्न केला होता. ठाऊक होती ती सारी मूलद्रव्ये, सगळ्या चौकोनात भरून, शिस्तीत बसवण्याचा प्रयत्न केला होता. पण मेंडेलिफ यशस्वी ठरला. याचे कारण त्याने सगळे चौकोन भरलेच पाहिजेत, हा अट्टाहास सोडून दिला.
प्रत्येक चौकोन म्हणजे काही विशिष्ट गुणधर्म अशी याची रचना आहे. काही चौकोनांत आपल्या गुणधर्माने फिट्ट बसतील, अशी मूलद्रव्ये त्या काळी माहीतच नव्हती. अशा अज्ञात मूलद्रव्यांच्या संभाव्य जागा त्याने रिकाम्या ठेवल्या आणि तक्ता जुळून आला. या रिकाम्या जागा म्हणजे अज्ञान मान्य असण्याच्या खुणा.
याच्याही पूर्वी, जेव्हा युरोपीय प्रवासी प्रथम दूरदेशी जहाजे हाकू लागले, तेव्हा त्यांनी त्या किनारपट्टीचे नकाशे बनवले होते. किनारपट्टीलगतचा प्रदेश त्यांना चांगलाच माहिती होता. पण थोडे आत गेल्यास काय आहे, हे अजिबात माहीत नव्हते. मग त्यांच्या नकाशात किनारपट्टीच्या प्रदेशातील सर्व बारकावे असत. पण आतल्या भागात भुतेखेते, चित्र-विचित्र प्राणी, पक्षी, राक्षस अशी काल्पनिक चित्रे काढून ती जागा भरवलेली असे. पुढे काही शतकांनंतर काढलेल्या नकाशात मात्र अज्ञात जागा कोरी ठेवलेली आढळते. अज्ञानाचा शोध, हा माणसाला लागलेला एक मोठा शोध आहे. प्रामाणिकपणाची ही मोठ्ठीच्या मोठी झेप म्हणायची! असा प्रामाणिकपणा आपल्याला विज्ञान नावाच्या युक्तीकडे घेऊन जातो. जे माहीत नाही, ते माहीत नाही, म्हणायला विज्ञानाला शरम वाटत नाही. उदाहरणार्थ पृथ्वीवर पहिला सजीव कसा निर्माण झाला, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत नाही. याविषयी आपल्याला नेमकं काही सांगता येत नाही. ‘पृथ्वीवर पहिला सजीव कसा निर्माण झाला,’ असं विचारलंत तर तुमच्या विज्ञानाच्या शिक्षिका तुम्हाला काही पान-गुची गोष्ट (पाहा या लेखमालेतील लेखांक 1) सांगणार नाहीत. त्या कदाचित म्हणतील, ‘या प्रश्नाचं नेमकं उतर माहीत नाही बाई! मोठेपणी तूच शोधून काढ! …आणि मला म्हातारीला घरी येऊन सांग!!’ पण इंटरनेटवर शोधलंत तर पहिला जीव आला कुठून हे सांगणार्या जगभरातल्या सात-आठ डझन कथा सहज सापडतील. कित्येक कथांत आकाशातल्या कोणा शक्तीने हे केल्याचं सांगितलं आहे. कुठल्याशा कथेत अंड्यातून पहिला जीव निपजला, असं सांगितलं आहे. ‘बॅबिलोनिया’च्या (आजचा इराक देश) कथेत मुम्मु-टियामत आणि आपसू या आदि (म्हणजे मूळ) आईबाबांपासून जीवसृष्टी उत्पन्न झाल्याचं सांगितलं आहे. सारे जीव पृथ्वीच्या पोटातून वर आले, असंही सांगणार्या कथा आहेत. पण असल्या कोणत्याच कथेत आजवर काहीही तथ्य आढळलेलं नाही; म्हणजे विज्ञानालाही काही सांगता येत नाही आणि या कथांतही काही दम नाही.आता तुमच्या मनांत येईल की जर का विज्ञानालाही काही माहीत नाही, तर मग एखादी कथा खरी मानून चालायला काय हरकत आहे? हरकत आहे तर… हरकत अशी आहे, की एखाद्या प्रश्नाचं उत्तर एकदा सापडलं असं तुम्ही समजलात, की आपोआपच पुढील शोध थांबतो. समजा सर्व सजीव सृष्टी पृथ्वीच्या पोटातून वर आली आहे, असं आपण समजून चाललो, तर प्रत्यक्षात सजीव सृष्टी कशी उत्पन्न झाली, हे कशाला कोण शोधत बसेल? दुसरा मुद्दा असा की, असं एखादं खोटं आणि चुकीचं कारण आपण मान्य केलं की, पुढचे सारे आडाखे, अंदाज, इतर संबंधित प्रश्नांची उत्तरेही चुकत जातात. उदाहरणार्थ एखादा आळशी मुलगा गणितात नापास झाला आहे. त्याला शून्य मार्क आहेत. समजा तो म्हणाला, ‘उत्तरपत्रिकेवरचा हा लाल भोपळा जमिनीतून येऊन तिथे बसलाय’ किंवा ‘एका अंड्यातून हे शून्याचे अंडे बाहेर आलं आणि माझ्या बोकांडी बसलं.’ तर तुम्ही काय म्हणाल? जोपर्यंत आपल्या आळशीपणामुळे, अभ्यास न केल्यामुळे, शून्य मार्क पडल्याचं तो मान्य करत नाही, शून्य मार्कांमागचं खरंखुरं कारण शोधून काढत नाही, तोपर्यंत त्याची प्रगती होईल का? म्हणूनच एखाद्या प्रश्नाचं खरं उत्तर माहीत नसेल तर, माहीत नाही, असं मान्य करावं. चुकीचे, खोटे कारण कधीही चिकटवू नये. विज्ञान नावाची युक्ती आपल्याला असं सांगत असते.
लेखक संपर्क – 98220 10349