भावना दुखावण्याच्या आजारावर औषध शोधणारा ‘जीनियस!’

डॉ. हमीद दाभोलकर -

डॉ. एरॉन (Aaron) बेक या जगद्विख्यात मनोविकारतज्ज्ञाचे नुकतेच फिलाडेल्फिया येथील राहत्या घरी निधन झाले. शंभर वर्षांचे अत्यंत अर्थपूर्ण आणि समाधानी आयुष्य त्यांना मिळाले. मानवी मनाची ‘अव्यक्त मन’ आणि ‘व्यक्त मन’ अशी मांडणी करणारा सिग्मंड फ्रॉईड आपल्याला थोडाबहुत माहीत असतो; पण डॉ. एरॉन बेक आणि त्यांच्या मनोविकार क्षेत्रातील कामाविषयी आपण ऐकले किंवा वाचले नसणे अगदी स्वाभाविक आहे. या पार्श्वभूमीवर मानवी मनाचे आणि वर्तनाचे आकलन मूलगामी पद्धतीने बदलणार्‍या डॉ. एरॉन बेक यांचे काम समजावून घेणे हे त्यांचे स्मरण करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, असे वाटते. त्यांच्या कामाला आपल्या काळाचा देखील एक अत्यंत महत्त्वाचा संदर्भ आहे. एवढ्या-तेवढ्या गोष्टींवरून भावना दुखावल्या जाणार्‍या कालखंडात आपण सगळे जगत आहोत! केवळ त्या भावना स्वत: दुखावून घेऊन आपण थांबत नाहीत, तर सगळ्या समाजाला आपल्या दुखण्यासाठी वेठीस धरण्याची एक पद्धत आपल्याकडे रूढ झाली आहे. अशा कालखंडात तर भावना दुखण्याच्या आजारावर औषध शोधणार्‍या डॉ. एरॉन बेक यांचे विचार खूपच अधिक महत्त्वाचे होतात.

भावना दुखावण्याचे दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंग आपण सहज आठवू शकतो. कामाच्या ठिकाणी बॉस घालून-पडून बोलतो म्हणून अस्वस्थ होणे, परीक्षेत अपेक्षेसारखे गुण मिळाले नाही म्हणून येणारे वैफल्य, प्रेमाच्या नात्यात किंवा लग्नात अपयश आल्याने झालेले अतीव दु:ख… अशा अनेक गोष्टी आपण आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या स्वत:च्या आयुष्यात अनुभवत असतो. यामधून जाणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या भावना दुखावण्याच्या कारणांचा आपण ‘लसावि’ काढला तर तो “परिस्थिती अशी निर्माण झाली म्हणून माझ्या भावना दुखावल्या किंवा दुसर्‍याने मुद्दामच माझ्या भावना दुखावल्या, हा निघतो.” आपल्या अस्वस्थतेसाठी दुसर्‍या व्यक्तीला किंवा परिस्थितीला दोष देणे सुरू होते. याची पुढची पायरी म्हणजे, ‘समोरची व्यक्ती किंवा परिस्थिती बदलत नाही, तोपर्यंत माझे भावनिक दुखणे दुरुस्त होणार नाही, अशी धारणा करून घेतली जाते.’ यातूनच परिस्थितीशरणता आणि परिस्थिती बदलावी म्हणून कर्मकांडे; त्यामधून येणारी फसवणूक हे सारे सुरू होते. डॉ. बेक यांनी या भावना दुखावण्याच्या जो आजार आहे, त्या विषयी नवीन कोरी करकरीत मांडणी केली. अगदी मुळावरच घाव घातला म्हटले तरी चालेल. त्या मांडणीनुसार, ‘कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला होणारा भावनिक त्रास हा प्रत्यक्षातील घटनेचा नसून त्या घटनेचा आपण जो अर्थ लावतो, त्याचा असतो.’ एक छोटे उदाहरण घेऊ. दरवर्षी हजारो मुले परीक्षेत नापास होतात. पण त्यामधली फारच थोडी नापास झालो म्हणून आत्महत्येचा प्रयत्न करतात. आता याचा अर्थ सरळ आहे की, आत्महत्येचे विचार हे परीक्षा नापास होण्याच्या घटनेशी थेट संबंधित नाहीत. तसे असते तर प्रत्येक नापास मुलाने आत्महत्येचा विचार केला असता; प्रत्यक्षात असे होताना आपल्याला दिसत नाही. मग काय घडते, तर ज्या मुलांचे मन असा विचार करते की, ‘आपण परीक्षेत नापास झालो, म्हणजे आपण जगण्यास लायक नाही. ’ तीच मुले आत्महत्येचा विचार करतात, जी मुले, ‘आता नाही तर पुढच्या वेळी पास होऊ!’ असा विचार करतात, ती आत्महत्येच्या वाटेला जात नाहीत. याचाच अर्थ असा की, आपल्याला होणारा भावनिक त्रास हा ‘त्या’ नापास होण्याच्या घटनेमुळे नसून त्या घटनेचा आपण जो अर्थ लावतो, त्याच्याशी संबंधित आहे! म्हणजे हा ‘भावना दुखावण्याचा आजार’ नसून ‘भावना दुखावून घेण्याचा आजार’ आहे, डॉ. बेक यांच्या मांडणीतून हे सत्य पुढे आले. तेवढेच महत्त्वाचे दुसरे सत्य असे की, एखाद्या प्रतीक्षिप्त क्रियेसारखे हे विचार आपल्या मनाच्या पटलावर उमटत असतात. त्यांच्या या स्वरुपामुळे आपण असे धरून चालतो की, ते विचार योग्यच आहेत; प्रत्यक्षात मात्र परिस्थितीच्या पलिकडे जाऊन स्वत: निर्णय घेऊन आपण स्वत:चा कुठल्याही परिस्थितीला दिलेला प्रतिसाद बदलू शकतो, अधिक विवेकी आणि विधायक करू शकतो, असा त्या उपचार पद्धतीचा गाभा आहे. एकदा आपण अशा प्रकारे स्वत:चे विचार तपासायची आणि बदलायची सवय स्वत:ला लावली की, आपल्याला परिस्थितीमधून येणारी भावनिक हतबलता पण बदलता येते. आपल्या मनावर आपला ताबा मिळवण्याच्या दृष्टीने आपले एक महत्त्वाचे पाऊल पडते.

साधारण 1960 ते 70 च्या दशकाच्या दरम्यान ही मांडणी डॉ. बेक यांनी केली, तेव्हा मानवी वर्तनाला त्याच्या अव्यक्त मनातील आणि बालपणातील अनेक घटनांशी संबंधित कारणे असतात, या स्वरुपाची सिग्मंड फ्रॉईड यांची मांडणी प्रबळ होती. मानवी मनाच्या अभ्यासात तिचे म्हणून एक स्वतंत्र महत्त्व आहे. त्यामध्ये मानवी अंतर्मन आणि अव्यक्त भावना यांचा खूप मोठा प्रभाव आहे. आपल्या सर्व भावभावना या त्या अंतर्मनाच्या गुलाम आहेत आणि त्यांचा गुंता सुटल्याशिवाय आपण आपली वर्तणूक बदलू शकत नाही, अशी एक हतबलता आणि परिस्थितीशरणता त्यामध्ये आहे. डॉ. बेक यांनी देखील या ‘सायकोअनालिसिस’ म्हटले जाणार्‍या पद्धतीचा अभ्यास केला होता. त्याच्या मर्यादांचे भान लक्षात आल्यामुळे त्यांनी या मानवी विचारांना केंद्रस्थानी ठेवणारे आणि प्रत्येक माणसाला परिस्थिती कशीही असली, तरी आपल्या भावनांचा लगाम आपल्या हातात घेता येऊ शकेल, अशी विचारनिष्ठ उपचार पद्धती शोधून काढली. याच स्वरुपाची मांडणी आणि काम करणारे डॉ. अल्बर्ट एलिस आणि डॉ एरॉन बेक हे दोघेही साधारणत: समकालीन होते. डॉ. एलिस यांनी ही विचार आणि उपचार पद्धती सामान्य लोकांपर्यंत नेण्यासाठी त्यांची हयात खर्च केली; तर डॉ. बेक यांनी त्याचा शास्त्रीय अभ्यास, संशोधन आणि त्याविषयी प्रशिक्षण देणे यावर आयुष्यभर जोर दिला.

जगप्रसिद्ध जर्नल्समध्ये साधारण 600 पेपर आणि दोन डझन पुस्तके यांच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार आणि संशोधन मांडून ठेवले आहे. आजअखेर लाखो लोकांनी मानसिक अस्वस्थतेच्या वेळी त्यांनी शोधलेल्या उपचार पद्धतीचा वापर करून स्वत:ला सावरले आहे आणि येत्या कालखंडात ही संख्या वाढतच जाणार आहे.

‘डिप्रेशन’ आजाराच्या सौम्य टप्प्यावर ही उपचार पद्धती औषधांइतकीच प्रभावी ठरते, असे संशोधन आता जगभर मान्य आहे. केवळ ‘डिप्रेशन’ नव्हे तर व्यक्तिमत्त्व दोष, व्यसनाधिनता यांच्यापासून ते तीव्र मानसिक आजारांपर्यंत, विविध आजारांमध्ये या विचारकेंद्री उपचार पद्धतीचा वापर केला जातो.

नातेसंबंध टिकावेत आणि बहरावेत, यासाठी त्यांनी ‘लव्ह इज नॉट इनफ!’ (केवळ प्रेम पुरेसे नाही..) या गमतीशीर नावाचे पुस्तक लिहिले आहे. चांगल्या आणि अर्थपूर्ण नात्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नसते. त्याबरोबर मनाची संवेदनशीलता, उदारता, जबाबदारीचे भान, निष्ठावानपणा असे अनेक महत्त्वाचे गुण असतात, हे डॉ. बेक यांनी आपल्या लक्षात आणून दिले आहे. एकमेकांवर अतीव प्रेम करणारी अनेक नाती दीर्घकाळ का टिकू शकत नाहीत आणि फारसे प्रेम नसलेली नाती देखील अनेक वेळा कशी दीर्घकाळ टिकतात, याचे उत्तर हे पुस्तक वाचताना मिळू शकते. 2002 आणि 2015 मध्ये त्यांचा दोन वेळा दलाई लामा यांच्याशी संवादाचा कार्यक्रम झाला. ही विचारकेंद्री उपचार पद्धती आणि बुद्धविचार यामध्ये मोठे साम्य असल्याचे निरीक्षण डॉ. बेक यांनी नोंदवून ठेवले आहे. विविध धर्मांमधील पुनर्जन्म, मागच्या जन्मीचे पाप, स्वर्ग-नरक या संकल्पनांपलिकडे जाऊन आपल्या जीवनातील दु:खाचे स्वत:च्या आत असलेले कारण शोधणार्‍या ज्या परंपरा आहेत, त्यांना देखील पुढे नेणारा हा विवेकवादी विचार आहे. केवळ वैयक्तिक दु:ख आणि भावनांचे दुखावणे नाही, तर समाजपातळीवर देखील हे विचार खूप महत्त्वाचे आहेत. ‘शत्रुकेंद्री जगणे’ आणि आपल्या आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीला दुसर्‍या कोणाला तरी जबाबदार धरण्याची जणू एक पद्धत आपल्याकडे निर्माण झाली आहे. या शत्रुकेंद्री आणि भूतकाळवादी विचारधारेला एक सशक्त पर्याय देण्याचे सामर्थ्य या स्वकेंद्री, विचारनिष्ठ आणि वर्तमानाला महत्त्व देणार्‍या पद्धतीमध्ये आहे.

शेवटपर्यंत कार्यरत राहिलेल्या डॉ. बेक यांचे काम हे आता बेक इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पुढे जात राहील. ‘मनाच्या पृष्ठभागावर देखील खूप काही असते, आपण केवळ डोळे उघडून बघायला पाहिजे,’ हा डॉ. बेक यांचा संदेश आपण ध्यानात घेतला पाहिजे. आपले स्वत:चे, आपल्या कुटुंबाचे; आणि एकुणात समाजाचे खूप भले करण्याची ताकद या विचारात आहे.

-डॉ. हमीद दाभोलकर, मानसोपचार तज्ज्ञ

(hamid.dabholkar@gmail.com)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]