दिल्लीच्या ब्रह्मर्षी कुमार स्वामी यांच्यावर नागपुरात गुन्हा दाखल

गौरव आळणे -

नागपूर अंनिसच्या पाठपुराव्याला यश

मागील वर्षी दि. 17 ऑगस्ट 2019 ला दिल्ली येथील ब्रह्मर्षी श्री कुमार स्वामी यांनी नागपूर येथील कोराडी रोडवरील विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे सलग दोन दिवस सत्संग व प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाची नागपुरातील सर्व हिंदी, मराठी, इंग्रजी वर्तमानपत्राच्या मुख्यपृष्ठावर संपूर्ण पानभर लाखो रुपये किमतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. त्या जाहिरातीमध्ये मंत्रोपचाराने असाध्य आजार व रोगनिवारण करण्याचा दावा केला होता. ही रोगमुक्तीची जाहिरात वाचून हजारो नागरिक क्रीडा संकुलातील प्रवचनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी कुमार स्वामींच्या शिष्यांनी व सहकार्‍यांनी पूजेचे विविध साहित्य, जपमाळा व औषधी म्हणून मंतरलेले पाणी; तसेच अन्य साहित्य अवाजवी भावाने विकले होते.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नागपूर शाखेच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारची जाहिरात करणे व मंत्रशक्तीद्वारे आजाराचे निवारण करणे, हा गुन्हा असल्यामुळे आक्षेप घेऊन त्या विरोधात मानकापूर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवून कायदेशीर कार्यवाहीची मागणी केली होती. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संबंधित गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रेंगाळत राहिली. परंतु कार्यकर्त्यांच्या अथक व सतत पाठपुराव्यापुढे अखेर 10 जुलैला औषधी द्रव्य आणि तीलिस्मी (जादूटोण्याचे) उपचार (आक्षेपार्ह) जाहिराती अधिनियम 1954 कलम 3, 4, 5 अन्वये पोलीस निरीक्षक गणेश ठाकरे व पोलीस उपनिरीक्षक वाय. पी. सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील चौकशीची कार्यवाही मानकापूर पोलीस प्रशासन करीत आहे.

या कारवाई करिता राज्य सरचिटणीस संजय शेंडे, जिल्हाध्यक्ष जगजित सिंग, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत श्रीखंडे, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय मोकाशी, जिल्हा प्रधान सचिवद्वय गौरव आळणे, रामभाऊ डोंगरे व कोराडी शाखा कार्याध्यक्ष बबन गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला.