जीवनकौशल्याची निकड

डॉ. चित्रा दाभोलकर - 9422496495

कठीण प्रसंगात निर्भयपणे आणि धीराने वाट काढण्यासाठी लागणारा सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त करून, इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता आत्मसात करण्यासाठी लागणार्‍या कौशल्यांना जीवनकौशल्येम्हणतात. या जीवनकौशल्यांची ओळख करून देणार्‍या लेखमालेतील हा पहिला लेख.

कोरोना महामारीच्या महासंकटामुळे जागतिक पातळीवर मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अगदी लहान मुलांपासून अतिवृद्ध माणसांचे मानसिक आरोग्य कसे चांगले राखावे, यावर सर्व तज्ज्ञांची विचारांची घुसळण चालू आहे; पण यापूर्वी अशाच प्रकारच्या एका सांसर्गिक रोगाच्या महामारीच्या काळात जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ इ. संघटनांच्या अधिपत्याखाली डॉक्टर्स, शिक्षक, समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ इ. सर्व तज्ज्ञ लोकांनी एकत्र येऊन जागतिक पातळीवर सर्व लोकांचे मानसिक आरोग्य वृद्धिंगत करण्यासाठी ‘जीवन कौशल्य शिक्षणा’ची निकड सांगितली होती. तो सांसर्गिक आजार म्हणजे HIV (human immuno deficiency virus) मुळे होणारा एड्स हा आजार होय. (AIDS – acquired immunodeficiency syndrome) हा आजार विषाणुजन्य असला तरी तो रक्तातील किंवा शारीरिक स्रावातून, लैंगिक संबंधातून प्रसारित होतो. याचे शास्त्रीय ज्ञान झाले होते. सर्व जगभरात युवापिढी याची बळी ठरते आहे, हे समजल्यानंतर त्या आजाराच्या प्रतिबंधासाठी युवापिढीमध्ये वर्तणूक बदल करण्याची गरज आहे, हे लक्षात आले. नुसती माहिती देऊन वर्तणूक बदल होत नाही, तर त्या माहितीचे ज्ञानात रुपांतर होणे आवश्यक असते. एखादी गोष्ट नीट समजून घेतली की, त्या माहितीचे ज्ञानात रूपांतर होते आणि नंतर त्यामुळे वर्तणूक बदल होण्याच्या दृष्टीने कल (attitude) बदलतो.

आपल्याला माणसामध्ये काही बदल घडवून आणायचा असेल, तर या स्थित्यंतरासाठी समाजाची मानसिकता बदलणे महत्त्वाचे असते. समाजस्वास्थ्य म्हणजेच समाजाचे मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी समाज घटकांमध्ये जीवनकौशल्य असणे आवश्यक आहे. ज्या समाजात शांतता, एकोपा, सर्वसमावेशकता आणि सर्व सामाजिक घटकांमध्ये एकमेकांबद्दल आस्था असते, तसेच सतत होणार्‍या बदलांना, स्थित्यंतरांना सामोरे जायची मानसिकता असते, तो समाज प्रगती करू शकतो. आपण या समाजाचे घटक आहोत आणि स्वत: पलिकडे विचार करून आपण त्याच्या प्रगतीसाठी, स्वास्थ्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे, असे समाजभान येण्यासाठी प्रथम प्रत्येक समाजघटकाने म्हणजेच प्रत्येक व्यक्तीने जीवनकौशल्ये आत्मसात करणे योग्य ठरते.

ही जीवनकौशल्ये मनोसामाजिक कौशल्ये आहेत. जगात निर्भयपणे जगण्यासाठी, प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, अडीअडचणींना धीरोदात्तपणे तोंड देण्यासाठी ही कौशल्ये आवश्यक आहेत. दैनंदिन आयुष्यात येणार्‍या वेगवेगळ्या कठीण प्रसंगांना निर्भयपणे आणि धीराने सामना करण्यासाठी लागणारा सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त करून इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता आत्मसात करण्यासाठी लागणार्‍या कौशल्यांना जीवनकौशल्ये म्हणतात.

जीवनकौशल्ये आत्मसात केली की, आपली वैचारिक क्षमता वाढते. वेळ, साधनसामुग्री, विविध संसाधने आणि आपले सामर्थ्य (शक्ती) याचा वापर आपण योग्य प्रकारे करू शकतो. चांगले-वाईट समजून घ्यायची क्षमता वाढल्यामुळे कठीण प्रसंग टाळता येतात. संभाव्य धोकादायक परिस्थितीची अटकळ बांधून त्यावर मात मिळविण्यासाठी आपण सज्ज राहू शकतो.

स्थूलमानाने या कौशल्यांचे उपप्रकार समजून घेऊ. एक म्हणजे वैचारिक कौशल्ये- स्वत:ची जाणीव, सामाजिक जाणीव, आयुष्याचे ध्येय ठरवण्याची क्षमता, समस्येची उकल करता येणे, निर्णय कौशल्य, साधकबाधक विचार करण्याचे कौशल्य आणि नवनवीन विचार करण्याचे कौशल्य (वेगळ्या प्रकारे विचार करणे किंवा नवीन विचार मांडणे)

दुसरे म्हणजे सामाजिक कौशल्य- समाजात इतरांशी जुळवून घेता येणे, इतर माणसांबरोबर काम करता येणे, त्यांच्या भूमिका समजून घेता येणे, जबाबदारीने वागणे, ताणतणावाचा सामना करता येणे, वेगळ्या विचारधारेच्या माणसांशी संवाद साधता येणे.

तिसरे म्हणजे चर्चेने मार्ग काढण्याचे कौशल्य – इतरांशी चर्चा करून मार्ग काढताना तुमची मते ठाम असणे आवश्यक आहे, तसेच मूल्ये आणि विश्वास परखड असणे आवश्यक आहे. अयोग्य कृतीला ठामपणे नाही म्हणता येणे महत्त्वाचे ठरते.

जगभरातल्या 120 कोटी पौगंडावस्थेतील मुलांपैकी (वय 10 ते 19 वर्षे) 25.3 कोटीपेक्षा जास्त मुले भारतात आहेत. यापैकी बहुसंख्य मुलामुलींच्या प्रगतीच्या मार्गामध्ये जात, लिंग, दारिद्य्र आणि राहण्याचे ठिकाण असे अनेक अडथळे येतात. या मुलांना जीवनकौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून मनोसामाजिक कौशल्ये शिकवली आणि आत्मबळ दिले, तर त्यांच्यातून जबाबदार नागरिक तयार होतील. म्हणजेच औपचारिक शिक्षण, व्यवसायाभिमुख शिक्षण आणि तांत्रिक कौशल्य यासोबतच जीवनकौशल्य शिक्षण देणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास, चिकाटी आणि लवचिकता वाढते आणि आयुष्यात येणार्‍या दूर्धर प्रसंगांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य वाढते.

ही कौशल्ये अगदी लहानपणापासून शिकवली पाहिजेत. ही शिकून घेण्याजोगी कौशल्ये आहेत. शालेय अभ्यासक्रमात यांचा अंतर्भाव केला आहे. मूल्यशिक्षण अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र तासिका ठेवण्याच्या शिक्षणखात्याच्या आग्रहामुळे त्याची परिपूर्ती झाली नाही; परंतु ही मनोसामाजिक कौशल्ये मुलांमध्ये रुजवण्यासाठी वेगवेगळी तासिका जीवनकौशल्ये असण्याची गरज नाही. शालेय अभ्यासक्रमातील धड्यांमधून, छोट्या घटनांच्या चर्चेतून, भूमिका नाट्यातून, एखाद्या चित्रपटावरील चर्चेतून, दैनंदिन घटनांतून, वेगवेगळ्या अनुखंडातून या कौशल्यांची रुजवात करणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकांनी प्रशिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.

स्वत:ला समजून घेणे (self awareness), सहानुभाव किंवा आस्था (Empathy), परस्पर नातेसंबंध (interpersonal relations), प्रभावी संप्रेषक – संवादकौशल्य (communication), साधक बाधक विचार करण्याचे कौशल्य (creative thinking), नवविचार निर्मिती कौशल्य (creative thinking), समस्येची उकल (problem solving), निर्णयक्षमता (decision making), ताणतणावावर मात (coping with stress) आणि भावना ताब्यात ठेवण्याचे कौशल्य (coping with emotion) ही दहा जीवनकौशल्ये समजून घेऊन आत्मसात केली, तर व्यक्ती म्हणून आपण समृद्ध होतो.

या प्रत्येक कौशल्याचा सखोल अभ्यास जीवनभर चालूच राहणार, याची जाणीव प्रत्येक माणसाला असली पाहिजे. आयुष्यभर विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहून ही कौशल्ये विकसित करण्याची क्षमता असणारी माणसेच संतुलित जीवन जगताना दृष्टोत्पत्तीस पडतात.

लेखिका संपर्क : 94224 96495


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]