-
पूरग्रस्त दुर्लक्षित झाकडे (ता. पाटण, जि. सातारा) येथे ‘सातारा जिल्हा अंनिस’ची मदत
दि. 31 जुलै रोजी पहाटे 4 वाजता सुरू झालेली व रात्री 9 पर्यंत तब्बल 17 तास 220 किलोमीटरचा प्रवास करून चाललेली ‘सातारा जिल्हा अंनिस’ची पूरग्रस्त बांधवांना प्रत्यक्ष भेट व मदत मोहीम अविस्मरणीय ठरली.
निसर्गाच्या संकटात खर्या अर्थाने दुर्लक्षित राहिलेले छोटेसे केवळ 17 कुटुंब असलेले गाव. ज्या गावात जाण्यासाठी चक्क जेसीबी बोलवावा लागला. बरोबर घेऊन गेलेले सर्व जीवनावश्यक किराणा किट, भोजन पाणी बॉटल व शालोपयोगी वस्तूंचे बॉक्स जेसीबीच्या पुढील माती ठेवण्यासाठी असलेल्या खोर्यावर ठेवले. काही कार्यकर्ते त्यावर बसले काही ड्रायव्हर केबीनमध्ये बसले. भरपावसात आणि चक्क साधारण दीड ते 2 किलोमीटरचा अत्यंत खडतर असा चिखल व साधारण 4 फूट पाण्यातून प्रवास करून उद्ध्वस्त रस्ते पार करत गावात पोचलो.
सर्व कुटुंबांतील लहान-थोर एकत्र आले. गेली आठ दिवस गावात लाईट नाही. प्रवास करण्यास रस्ता बंद. अजून शासकीय कोणतीच मदत वा साधा सर्व्हे नाही, हे सर्व ऐकून मन सुन्न झाले. “आमची मदत हे आमचे कर्तव्य आहे. समाजातील अनेक सामाजिक बांधिलकी मानणारे यांना आवाहन करून मिळालेली मदत आपल्यापर्यंत पोचवत आहोत. कोणतेही उपकार आम्ही करत नाही. आपले दुःख खूप मोठे आहे, याची जाणीव आहे.” आमचा संवाद त्यांना खूप काही मनस्वी आनंद देत होता. हे त्यांच्या प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसत होता.
यानंतर आम्ही पूरग्रस्त तारळे गाव गाठले. तेथेही 5 कुटुंबांतील व्यक्तींना भेटलो, मदत दिली व पुढे पाली गावात पोचलो. 3 कुटुंबीयांना भेटून मदत दिली. तिन्ही गावांत ‘अंनिवा’ हे मासिक व विवेकानंद यांचे पुस्तकही भेट दिले.
अशी अनेक दुर्लक्षित गावे सातारा जिल्ह्यातील पाटण, वाई, जावळी, मेढा भागात आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे. ‘सातारा जिल्हा अंनिस’ अशा गावांना शक्यतेप्रमाणे मदत करणार आहेच. पण प्रशासनानेही त्वरित लक्ष घालून येथे पोचावे. तसेच जागरूक नागरिकांनी यासाठी शक्य ती मदत करून ‘अंनिस’च्या या मोहिमेत आपला वाटा द्यावा. ही मदत आम्ही निश्चित दुर्लक्षित व गरजूंपर्यंत पोचवू, असे नम्र आवाहन ‘सातारा जिल्हा अंनिस’ करत आहे.
या संपूर्ण मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग व कृतिशील मदत पाटणचे सुहास चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक श्री. नितीन पिसाळ, हॉटेल नंदनवनचे संचालक संभाजी मिसाळ पाडेगाव, लोणंद, हॉटेल रानवाराचे संचालक चंद्रकांत पाटील कोकरूड; तसेच ‘सातारा जिल्हा अंनिस’चे राज्य कार्यकारी समिती सदस्य प्रशांत पोतदार (सातारा), बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सदस्य भगवान रणदिवे (सातारा), जातपंचायतविरोधी समितीचे राज्य सदस्य शंकर कणसे (पिंपरी रहिमतपूर), सीताराम चाळके, बुवाबाजी संघर्ष सदस्य सातारा जिल्हा, विलास भांदिर्गे, अध्यक्ष ‘सातारा जिल्हा अंनिस’ व किशोर धरपडे पाली यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
—
‘अंनिस’ रायगडचा महाड पूरग्रस्तांना मदतीचा हात
कोकणातील रायगड, रत्नागिरी व पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील काही भाग महापुरामुळे अनेक दिवस पाण्याखाली होता. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका चिपळूण आणि महाडला बसला. कित्येक घरं पाण्याखाली जाऊन कित्येक संसार उघड्यावर आले आहेत.
अशा वेळी त्या अडचणी वाटून घेऊन थोड्या कमी करू शकतो, या भावनेतून आपत्तीग्रस्त संसाराला मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांसाठी मदत केंद्र तयार करून राज्यभरातून मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ‘रायगड अंनिस’कडे पुणे, ठाणे व रायगड जिल्ह्यातून मदत आली होती. यातून पूरग्रस्त कुटुंबीयांना तांदूळ, आटा, डाळ, तेल, साखर, सॅनिटरी पॅड, मलम, क्लिनिंग मॉप यासारख्या 20 साहित्याचा समावेश असलेले किट तयार केले. या मदतीचे वाटप जिल्हा प्रधान सचिव संदेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महाडमधील खरवली, ढालकाटी फाटा, बिरवाडी रोड, राजेवाडी, काझी मोहल्ला येथे नुकतेच करण्यात आले. पेण, अलिबाग व महाड शाखांचे कार्यकर्ते प्रदीप खैरे, संकल्प गायकवाड, लेखा फाटक, जुई घरत, लक्ष्मण राठोड, नेहल कांबळे, प्रतीक आव्हाळे यांनी सर्वेक्षण व प्रत्यक्ष मदत वाटप कामात सहभाग घेतला.
त्यापूर्वी पेण येथून सकाळी जिल्हा शाखेच्या वतीने मदत पथकाला महाड येथे जाण्यासाठी सदिच्छा दिल्या. यावेळी रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर, राज्य कार्यवाह महिला विभाग मीना मोरे, पेण शाखाध्यक्ष हबीब खोत, रायगड जिल्हा उपाध्यक्ष कान्हेकर, सावनी गोडबोले, श्रीनिवास गडकरी, निशिगंधा गडकरी, प्राचार्य सतीश पोरे, संचिता गायकवाड, चंद्रहास पाटील, नरेश म्हात्रे हे कार्यकर्ते उपस्थित होते.
—
सांगली अंनिसतर्फे पूरग्रस्तांसाठी किटचे वाटप
‘सांगली अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांसाठी जमा केलेल्या जीवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप मुस्तफा मुजावर यांचे सावली बेघर निवारा केंद्रात 20 ऑगस्ट डॉ. दाभोलकर स्मृतिदिनी केले गेले. वाल्मिकी आवासमधील घरकाम, मजुरी करणार्या पूरग्रस्त महिलांना मदत वाटप केले गेले. ‘अंनिस’च्या कार्यकर्ते गीता ठाकर, डॉ. सतीश पवार, प्रा. अमित ठाकर, राहुल थोरात, डॉ.संजय निटवे, डॉ. सविता अक्कोळे, संजय गलगले, त्रिशला शहा, चंद्रकांत वंजाळे यावेळी उपस्थित होते.