अशोक वानखडे -

हिरवा, भगवा, लाल, निळा
झेंड्यांमध्ये गर्द असतात॥
धर्माचे हे रंग असे की
रंगांना ही धर्म असतो॥
धर्माच्या जाती-पाती अन्
जातींचाही धर्म असतो॥
सप्ताहाचे दिवस जातवार
महिन्यांचाही धर्म असतो।
‘शिवपहाट’ अन् ‘धम्मरजनी’
प्रहराचाही धर्म असतो॥
शब्दांच्या जाती पाहिल्या
भाषेचा ही धर्म असतो॥
तीर्थाचेही गाव असते
गावालाही धर्म असतो॥
आडनावाची जात असते
नावामध्ये धर्म असतो॥
केस असो, पोशाख असो
दाढी, शेंडीला धर्म असतो॥
पालक, चुका, मेथी, मटकी
आहाराचा ही धर्म असतो॥
तुळशी हिंदू झाली तेव्हा
मोगरा मुस्लिम असतो॥
गाय हिंदू, बकरा मुस्लिम
प्राण्यांचाही धर्म असतो॥
उत्सवाचा धर्म असतो
त्यौहाराचा धर्म असतो॥
पुस्तकांचा धर्म असतो
मस्तकांचा धर्म असतो॥
गीता, बायबल, कुराणात
पानोपानी धर्म असतो॥
हरली माणुसकी आणि
मारला माणूस तरी ही।
एक म्हणावा कसा गड्यांनो?
वेगवेगळा धर्म असतो॥
–अशोक वानखडे, कल्याण