महिलेला करणीची भीती घालून लाखो रूपयांचा गंडा : वाई येथे बुवाला अटक

प्रशांत पोतदार -

करणी काढण्याच्या आणि सोन्यात गुंतवलेले पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने वाई तालुक्यातील कुटुंबाला 21 लाख रुपयांचा गंडा घालणार्‍या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली. गणेश विठोबा शिंदे असे या भोंदू बाबाचे नाव आहे. त्याचबरोबर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याने सातारा आणि मुंबई परिसरात अनेकांना गंडा घातला आहे.

शहीद जवानाची पत्नी आणि आई या दोघींना वेगवेगळे गाठून एकमेकांवर करणी केल्याचे सांगत ती काढून देण्यासाठी या भोंदू भगताने त्यांच्याकडूनही दोन लाख रुपये उकळले. त्यामुळे मुलाच्या मृत्यूनंतर वर्षभराच्या आतच या कुटुंबाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. याप्रकरणी जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत वाई पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. त्याची दखल घेत गुन्हे शाखेने समांतर तपास करून 12 तासांत या भोंदू बाबाला गजाआड केले.

गणेश शिंदे हा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील चांदवडी (पुनर्वसन) येथे राहतो. मागील दहा वर्षांपासून त्याला अघोरी विद्या येत असून करणी काढून देण्याच्या बहाण्याने त्यांची अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढून आर्थिक लूट करतो. नोकरी लावणे, सोने दुप्पट करून देणे या बहाण्यानेही त्याने शेकडो जणांना गंडा घातला आहे. यासाठी केंद्रातील प्रभावशाली मंत्र्यांकडे ओळख असून तुम्हाला सरकारी नोकरी लावून देतो, असे सांगून अनेकांची गणेश याने फसवणूक केली आहे. तसेच पोलिसांकडे तक्रार दिल्यास पीडितांना जीवे मारण्याची धमकी तो देत असे.

वाई तालुक्यातील पीडित कुटुंबाला मानसिक आणि शारीरिक त्रास सुरू होता. त्यामुळे हे कुटुंब एका व्यक्तीच्या सांगण्यावरून गणेश शिंदे यांच्याकडे गेले. त्याने या पीडितेला अघोरी विधी करण्यास सांगितले. तसेच हा विधी न केल्यास पत्नीला मृत्यू येईल, अशी बतावणी केली. विधीच्या बहाण्याने गणेश पीडित कुटुंबीयांच्या घरी गेला. त्यातील प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र घेऊन त्याने सर्व घराची माहिती गोळा केली. या माहितीचा आधार घेत गणेशने, ‘घरातील प्रत्येकाला दुसर्‍या सदस्याचा मृत्यू होईल, त्यामुळे विधी करणे आवश्यक आहे,’ असे सांगण्यास सुरुवात केली. तसेच ‘या कुटुंबातील दुसर्‍या नवविवाहित जोडप्यातील पतीलाही तुझ्या पत्नीचा मृत्यू होईल; तसेच तुझ्या होणार्‍या अपत्याचा जन्माआधी मृत्यू होईल,’ अशी भीती दाखवली. या नवविवाहित जोडप्यातील पत्नीला, ‘तुमचा पती सहा महिन्यांमध्ये जोगत्या होईल. तुमच्या पुढील सात पिढ्याही तृतीयपंथीय म्हणून जन्माला येतील,’ अशी भीती दाखवली. त्यामुळे हे कुटुंबीय घाबरले. याचा गैरफायदा घेत गणेशने अघोरी विधीसाठी आठ लाख रुपयांची मागणी केली. तसेच हा विधी केला नाही तर आठ दिवसांत पतीचा मृत्यू होईल, असे धमकावले. त्यामुळे या कुटुंबाने कर्ज काढून आणि व्याजाने पैसे उसने घेऊन ते गणेशला दिले. त्याने पाच लाख रुपयांचा दैवी ताईत दिल्याची बतावणी केली.

करणी काढण्यासाठी विविध अघोरी विधी करण्यासाठी त्याने या कुटुंबाकडून सुमारे 12 लाख रुपये उखळले.

भगत गणेश शिंदे याला पीडित कुटुंबाने मोठी रक्कम दिल्याने या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली. त्यामुळे या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यासाठी, ‘मुंबईतील फ्लॅट आणि गावाकडील घर गहाण ठेवून पैसे गोळा करा आणि एका महिन्यात पैसे परत देऊन घर सोडवा,’ असे या कुटुंबाला सांगितले. त्याचबरोबर पुढील एका महिन्यात तुम्हाला पैसे दुप्पट करून देतो, असे त्याने सांगितले. याला भुलून या कुटुंबाने त्यांना 9 लाख 50 हजार रुपये दिले. मात्र एका महिन्याने त्याच्याकडे पैशांची मागणी करताच त्याने बहाणा सुरू केला. पैसे परत देतो, असे सांगून 14 लाख 65 हजार रुपयांचा धनादेश या कुटुंबाला दिला. मात्र त्याची पडताळणी केली असता तो खोटा असल्याचे समजताच या कुटुंबाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार दाखल केली. समितीने कुटुंबीयांना घेऊन वाई पोलीस ठाणे गाठले.

याप्रकरणी विशेष सहकार्य पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे लाभले. तसेच गुन्हे शाखेने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बाबाला तात्काळ गजाआड केले.

या मोहिमेत ‘अंनिस’च्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, नितीन हांडे, वाई शाखेचे रणवीर गायकवाड, अतुल पाटील, दिलीप डोंबिवलीकर; तसेच ‘अंनिस’चे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार, सातारा ‘अंनिस’चे भगवान रणदिवे, डॉ. हमीद दाभोलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित प्रकरणात आणखी कोणासही फसविले असल्यास त्यांनी निर्भयपणे पोलिसांना अथवा अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) यांना संपर्क साधावा.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]