डॉ. नरेंद्र दाभोलकर अकरावा स्मृती विशेषांक - ऑगस्ट 2024

वार्तापत्राची सुरुवात
कोणत्याही चळवळीच्या दृष्टीने त्या संघटनेचे मुखपत्र ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यातही अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या प्रबोधनपर चळवळीसाठी व प्रस्थापित व्यवस्थेविरोधात लढणार्‍या संघटनांसाठी तर मुखपत्र ही फारच गरजेची बाब असते. कारण इतर प्रस्थापित प्रसारमाध्यमांतून तुम्ही बहिष्कृत असता, अशावेळी संघटनेचे मुखपत्र म्हणजे संघटनेचा बाहेरच्या जगाशी असलेला संपर्क असतो, संवाद साधण्याचे साधन असते, तुमच्या संघटनेच्या वाटचालीचा आलेख, इतिहास असतो, अधिकृत दस्तऐवज असतो. तसेच ते तुमच्यावर होणार्‍या वैचारिक हल्ल्यांच्या विरोधातील संघर्षाचे हत्यारही असते. संघटनेच्या मुखपत्राचे काम दुहेरी असते. केवळ रिपोर्टिंग नसते. आंदोलनांना, लढ्याला, मोहिमेला, उपक्रमाला आवश्यक तपशील पुरविणे; माहिती पुरविणे, वैचारिक सामग्री पुरविणे त्यातून कार्यकर्त्यांना, सर्वसामान्यांना चळवळीसाठी तयार करणे, प्रोत्साहित करणे आणि मग त्या आधारावर झालेल्या ठिकठिकाणच्या आंदोलनात, लढ्यात, मोहिमेत, उपक्रमात काय घडले, याचा वृत्तांत जगाला पुरविणे. तो पुरवताना त्या आंदोलन, उपक्रम, मोहिमेच्या यशापयशाची, परिणामांची चर्चा मुखपत्रात घडवणे. थोडक्यात, आपण करत असलेल्या कामाचे एका पातळीवरील मूल्यमापन करण्याचे मुखपत्र हे स्थान आहे. त्यातूनच जशी संघटनेचा कार्यकर्ता घडण्याची प्रक्रिया सुरू होते, तशीच सर्वसामान्य वाचकांच्या मानसिकतेत बदल घडण्याच्या प्रक्रियेसही प्रारंभ होतो. त्या अर्थाने संघटनेचे मुखपत्र हे संघटनेचे बळ आहे. ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ याला अपवाद नाही.


मुखपत्र आणि प्रस्थापित वर्तमानपत्रे, प्रसारमाध्यमे यात मूलभूत फरक आहे. प्रस्थापित वर्तमानपत्रे ही बाजाराशी निगडित असतात, त्यांचा संबंध नफ्याशी असतो. पण मुखपत्र संघटनेशी, संघटनेच्या ध्येय-धोरणांशी निगडित असते. वर्तमानपत्राच्या लोगोत मोठमोठे क्रांतिकारी शब्द असतील; पण त्याच्याशी बांधिलकी असायलाच हवी, अशी काही अट नसते. पण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोगोत ‘विज्ञान’, ‘निर्भयता’, ‘नीती’ हे काही केवळ शब्द म्हणून नसतात, तर ‘विज्ञानाने प्रस्थापित केलेले सत्य निर्भयपणे आणि कालसुसंगत नैतिकतेने प्रस्थापित करणे’ हा या शब्दांमागचा आशय असतो आणि त्याच्याशी बांधिलकी बाळगतच मुखपत्राला वाटचाल करावी लागते.


‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ आज ज्या स्वरुपात आहे, त्याचा पहिला अंक ऑगस्ट 1990 ला प्रसिद्ध झाला. त्याआधी 1987 मध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ नावाची पत्रिका चोपडा येथून निघत असे. त्याचे संपादक ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊ केंगे हे होते. त्यानंतर 1988 मध्ये ‘भ्रम आणि निरास : अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ या नावाने नागपूरहून जी पत्रिका निघत असे, त्याचे संपादक श्याम मानव होते. या पत्रिकेच्या संपादक मंडळात मुकुंदराव किर्लोस्कर, भा. ल. भोळे यांच्या बरोबरीने डॉ. नरेंद्र दाभोलकरही होते. ही पत्रिका अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती काढत असे.


पुणे येथे जाहीरनामा परिषद 28 आणि 29 जानेवारी, 1989 ला झाली व त्यानंतर वर्षभरातच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली. त्या वेळेस कार्यरत असणार्‍या शाखांत पुणे आणि पनवेल शाखा जोरात होत्या. पुणे शाखेने ‘कवडसे’ नावाने ऑगस्ट 1989 मध्ये मासिक सुरू केले. पत्रकार माधव गोखले त्याचे काम बघत. पनवेल शाखेचे कार्यकर्ते उल्हास ठाकूर आणि श्याम कदम यांनी ‘अंनिसवार्ता’ नावाचा अंक जानेवारी 1990 ला काढला आणि अशा रीतीने ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’च्या वाटचालीला सुरुवात झाली. ‘कवडसे : अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’चे ऑक्टोबर 1990 पासून डॉ. विद्याधर बोरकर हे संपादक झाले. त्याच्या मुद्रक/प्रकाशक अलका जोशी या होत्या, त्यांच्या भावाची प्रेस मुंबईतील भांडुपला होती. तेथे हा अंक छापला जायचा आणि ते गठ्ठे घेऊन अलका जोशी एखाद दुसर्‍या कार्यकर्त्याबरोबर वितरणासाठी पनवेलला जायच्या आणि उल्हास ठाकूर हाताने त्यावर पत्ते लिहायचे आणि मासिक पोस्टात टाकायचे. मासिक फक्त खासगी वितरणासाठी होते. ऑगस्ट 1991 ला पुण्याच्या शुभांगी शहा या संपादक झाल्या. 1992 पासून वार्तापत्राचे व्यवस्थापन पुन्हा पनवेल शाखेकडे आले. फेब्रुवारी 92 मध्ये मुंबई येथील दादरला कार्यकारिणीची बैठक झाली त्यात समितीचे अध्यक्ष एन. डी. पाटील यांनी मुखपत्राचे नाव ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ असे ठेवावे, असे सुचविले व त्याची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली. ही प्रक्रिया फेब्रुवारी 1993 साली पुरी झाली व सुरुवातीला ‘कवडसे’ आणि नंतर ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ नाव असलेले द्वैमासिक ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र मासिक’ म्हणून आर. एन. आय. दिल्ली येथे नोंद झाले. पनवेलचे डॉ. प्रदीप पाटकर ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’चे संपादक झाले.


जून 1995 पासून वार्तापत्राचे व्यवस्थापन सांगलीला हलविण्यात आले व डॉ. प्रदीप पाटील त्याचे संपादक झाले व सहसंपादक प्रा. प. रा. आर्डे झाले. 2001 साली राहुल थोरात यांची व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली आणि 2003 साली प. रा. आर्डे वार्तापत्राचे संपादक झाले. जवळजवळ 25 वर्षांनंतर 2019 साली प. रा. आर्डे वार्तापत्राच्या संपादकपदावरून निवृत्त झाले. या संपूर्ण काळात राजीव देशपांडे,प्रभाकर नानावटी, टी. बी. खिलारे, संजय सावरकर, डॉ. आशुतोष मुळ्ये, उमेश सूर्यवंशी या सहसंपादकांचा वार्तापत्राच्या वाटचालीत मोठा सहभाग आहे.


पुण्याचे मिलिंद जोशी सुरुवातीपासून वार्तापत्राची मुखपृष्ठे तयार करायचे, आजही करतात. तर उज्ज्वला परांजपे या अंकाच्या टायपिंगचे काम करायच्या आणि मुद्रितशोधनाचे काम प्रा. जगदीश आवटे करायचे.आज प. रा. आर्डे वार्तापत्राचे सल्लागार संपादक असून राजीव देशपांडे संपादक म्हणून या वर्षी निवडले गेले, तर राहुल थोरात व्यवस्थापकीय संपादक आहेत. मुक्ता दाभोलकर, कोल्हापूरचे अनिल चव्हाण, इस्लामपूरचे डॉ. नितीन शिंदे आणि बुलढाण्याचे नरेंद्र लांजेवार असे सहसंपादक आहेत.


उपक्रमांची माहिती व वैचारिक मांडणी
स्वातंत्र्य, समता आणि न्याय यावर आधारित शोषणमुक्त समाज निर्माण होण्याच्या मार्गात भारतात ‘अंधश्रद्धा’ या प्रमुख अडसर आहेत. शिक्षण सर्वव्यापी झाले म्हणून, समृद्धी आली म्हणून त्या नष्ट झाल्या नाहीत तर त्यासाठी अंधश्रद्धांवर हल्ला ोल करण्याशिवाय गत्यंतर नाही; पण हा हल्लाबोल थेटपणे न करता आपल्या परंपरातील पुरोगामी वारशाची मदत घेत संघटन, प्रबोधन आणि संघर्ष या मार्गाने केला तर जास्त परिणामकारक होईल, हे लक्षात घेत डॉ. दाभोलकरांनी काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या सहाय्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. त्या अनुषंगाने अनेक आंदोलने, उपक्रम, मेळावे, मोहिमा, परिषदा, यशस्वीपणे पार पाडल्या. विवेकी व्यक्ती घडविणे पर्यायाने विवेकी समाज घडविणे; हे ध्येय उराशी बाळगत अंनिस काम करीत आहे आणि हे काम जनतेपर्यंत पोचविण्याचे काम ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ (अंनिवा) गेली जवळजवळ 30 वर्षे करीत आहे.


शहीद डॉ. दाभोलकरांचे वार्तापत्रासाठीचे योगदान, मार्गदर्शन खूपच मोठे आहे. एखाद्या कार्यकर्त्याने अगर वाचकाने लिहिलेल्या चार ओळीच्या पत्रालाही ते हमखास उत्तर देतच. त्यांच्या हयातीत झालेल्या प्रत्येक मोहीम, उपक्रम, आंदोलन, परिषदा यावर तर त्यांनी आपल्या भ्रमंती, आपली बिरादरी, विस्तारणारी क्षितिजे, स्पंदन या सदरातून लिहित सर्वसामान्य वाचकांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला; तसेच वेळोवेळी वेगवेगळ्या प्रश्नांवर घेतलेली भूमिका, त्या घेण्यामागचे उद्देश, गणपती विसर्जन, होळी, दिवाळीतील फटाकेविरोधी अभियान यासारखे वेगवेगळे उपक्रम घेण्यामागची वैचारिक भूमिका वार्तापत्राच्या अनेक छोट्या-मोठ्या लेखातून मांडली आहे. तसेच वार्षिकारकातून लिहिलेल्या प्रदीर्घ लेखातून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची सैद्धांतिक भूमिका, बुवाबाजीविरोधातील चळवळीची मांडणी, कृतिशील धर्मचिकित्सा, धर्मचिकित्सेतून मानवतेकडे, आध्यात्मिक आकलन, धर्मनिरपेक्षता, आरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञाननिष्ठ मानवतावाद, लोकशाही प्रबोधन, रचनात्मक संघर्ष, संघटना बांधणी, जातपंचायतीला मूठमाती असे अनेक लेख लिहित अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची मांडणी केली आहे. कायद्याची निकड, समज, त्यावरील आक्षेप व त्याबाबतची वस्तुस्थिती अशा सर्वांगाने ते अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याबद्दल सतत 18 वर्षे वार्तापत्रातून लिहित होते. डॉक्टर वार्तापत्रातील लेखातून एका बाजूला कार्यकर्त्यांना सृजनशीलपणे काम करायला प्रोत्साहित करत, त्यांच्या कामासाठी आवश्यक तो वैचारिक तपशील पुरवत व त्याने केलेल्या कामाचे कौतुक करत कामातील त्रुटीवरही बोट ठेवत. वार्तापत्राचे दुहेरी उद्दिष्ट आपल्या लेखनातून साध्य केले आहे.

बुवा-बाबांचा भांडाफोड
बुवाबाजी हा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीशी अतिशय निगडित असा अत्यंत संवेदनशील विषय. गेली तीस वर्षे महाराष्ट्राच्या विविध भागातील कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील बुवा-बाबांचा भांडाफोड करत आहेत.
बुवाबाजीसाठी बुवा-बाबा अवलंबत असलेले मार्ग आणि त्यावर मात करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपले बुद्धिचातुर्य, धाडस, व्यवहार चातुर्य वापरत रचलेले सापळे, अवलंबलेले डावपेच याची वर्णने गेल्या तीस वर्षांतील ‘अंनिवा’च्या जवळजवळ प्रत्येक महिन्याच्या अंकात प्रसिद्ध झालेली आहेत. तसेच त्या कार्यकर्त्यांना आलेल्या विविध अनुभवांवर व त्यांच्या विविध पैलूंवर सातत्याने ‘अंनिवा’त लेख प्रसिद्ध होत आले आहेत. परमेश्वराचे अस्तित्व, आत्मा, पुनर्जन्म, धर्म व धर्माच्या सोबत येणारी कर्मकांडे, पारलौकिक जीवन, अ मानवी शक्तींचा संचार, अतींद्रिय ज्ञान, दैवी उपचार, परामानस शक्ती यांसारख्या आधुनिक विज्ञानाने निकालात काढलेल्या संकल्पनांचा लबाडीने वापर करीत जनसामान्यांना लुबाडण्याचा धंदा, सत्यसाईबाबा, आसारामबापू, रामदेव बाबा, नरेंद्र महाराज, पांडुरंगशास्त्री आठवले, ब्रह्माकुमारी, अनुराधादेवी, रविशंकर, अनिरुध्द बापू, पार्वतीमाँ, कल्की भगवान, अनुराधा देशमुख, माता अमृतानंदमयी, डॉ. वर्तकसारखे आध्यात्मिक बुवा करत आहेत. या आध्यात्मिक बाबांकडे प्रचंड पैसा आहे. त्या जोरावर त्यांनी सगळ्या प्रसारमाध्यमांना आपल्या ताब्यात घेतले आहे. पण ‘अंनिवा’ने या मोठ्या बुवांच्या कारनाम्यांचा पर्दाफाश करणारे लेख निर्भीडपणे छापले आहेत.


अनिष्ट रुढी-प्रथांना विरोध व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार
‘अंनिवा’ने हाताळलेल्या विषयांचा आवाका खूपच मोठा आहे. बुवाबाजीचा पर्दाफाश करण्यापासून सुरु झालेली ही चळवळ गेल्या तीस वर्षांत अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा यांची चिकित्सा, भूत, भानामती, देवी अंगात येणे, भुताने झपाटणे, डाकीणप्रथा, देवदासी प्रथाविरोध, जटा निर्मूलन , जाती निर्मूलन, मंत्र-तंत्र, व्रतवैकल्ये, चमत्कार, यज्ञ-याग, फलज्योतिष व त्याचे थोतांड, भ्रामक वास्तुशास्त्र, शकुन-अपशकुन, वेद-पुराणासारख्या ग्रंथातील कालविसंगत गोष्टी, पर्यावरणपूरक रीतीने सण साजरे करण्याविषयीचे कृती कार्यक्रम, सणसमारंभांना कालसुसंगत स्वरूप, जत्रा-यात्रेतील पशुहत्याविरोध, कुंभमेळा, मानसिक आरोग्य व मनाचे रोग, मानसमित्र संकल्पना, व्यसनविरोध, वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञानप्रसार, विज्ञानबोध वाहिनी, सर्वधर्मचिकित्सा, अध्यात्म, नैतिकता, धर्मस्थळांची चिकित्सा, प्रस्थापित आध्यात्मिक बुवा-बाबा, नवउदारवादी आर्थिक परिस्थितीत निर्माण झालेले कॉर्पोरेटबाबा यांच्या कारनाम्यांचा लेख-जोखा, भ्रामक विज्ञानाच्या सहाय्याने लोकांची होत असलेली दिशाभूल, जाहिरातबाजीतून जात असलेला चुकीचा संदेश, स्त्रियांचे होत असलेले शोषण, शिक्षण, मूल्यशिक्षण, शारीरिक आजार व त्यासंबंधीचे समज-गैरसमज आणि त्यावर होत असलेले पर्यायी उपचार, योग्य आहार आणि घातक आहार, सामाजिक बहिष्कार, जातपंचायत, आंतरजातीय-धर्मीय लग्ने, जोडीदाराची विवेकी निवड, सत्यशोधकी विवाह, संविधान बांधिलकी अशा विविध अंगाने गेली तीस वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रातून लिहिती राहिली आहे.


मोहिमा, परिषद, अधिवेशनासारख्या उपक्रमांचे सविस्तर वृत्तांत
‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने गेल्या तीस वर्षांत विविध उपक्रम, परिषदा, संघर्ष, मोहिमा, आंदोलने, मेळावे आयोजित केले. यात कोकणातील ‘शोध भुताचा मोहीम’, मराठवाड्यातील ‘ही भानामती नव्हे, ही तर विकृती’ अशी घोषणा देत निघालेली भानामती प्रबोधन धडक मोहीम, यात्रेतील पशुहत्याबंदी निर्धार परिषद, जादूटोणाविरोधी कायदा निर्धार मोहीम, जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार मोहीम, सत्यशोधक चमत्कार यात्रा, बुवाबाजीविरोधी संघर्ष व चमत्कार यात्रा, ‘अंध रुढीच्या बेड्या तोडा’ परिषद, महाराष्ट्रव्यापी महिला परिषद, वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद, बुवाबाजी संघर्ष परिषद, डाकीण प्रथाविरोधी अभियान, विवेकजागर कृती परिषद, महिला जाहीरनामा परिषद, ‘फिरा’ या संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जाहीरनामा परिषद, शैक्षणिक जाहीरनामा स्वीकृती परिषद, युवा संकल्प परिषद, मानसिक आरोग्य व प्रबोधन कृती परिषद, जादूटोणाविरोधी कायद्याची जनसंवाद यात्रा, धार्मिक दहशतवाद व असहिष्णुताविरोधी राज्यस्तरीय संकल्प परिषद, विवेकवाद्यांची राष्ट्रीय परिषद, या सर्वांचे सविस्तर वृत्तांत सहभागी मान्यवर आणि विचारवंतांच्या भाषणातील गोषवार्‍यासह देत ‘अंनिवा’ने प्रसिद्ध केले व महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोचविले. हे वृत्तांत केवळ अहवाल स्वरूपात नाहीत, तर त्या वृत्तांतांचे स्वरूप कार्यकर्त्यांची ‘वैचारिक जाणीव वाढावी’, त्याची संघटनात्मक जाण वाढावी, त्याचा उत्साह वाढावा; तसेच सर्वसामान्य वाचकाला त्या प्रश्नाचे सर्व कंगोरे लक्षात यावेत, त्याचे प्रबोधन व्हावे, असे आहे.


मान्यवरांचा व कार्यकर्त्यांचा परिचय
गेल्या 30 वर्षांत डॉ. दाभोलकरांच्या हाकेला ओ देत हजारो कार्यकर्त्यांनी एक सशक्त चळवळ आपले तन, मन, धन देत उभी केली. अशाच काही क्रियाशील कार्यकर्त्यांच्या कामाची ओळख, कौटुंबिक आधार व पार्श्वभूमी यावर आधारित त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, जीवनचरित्राचा उलगडा करणार्‍या मुलाखती ‘अंनिवा’ने प्रसिद्ध केल्या आहेत. यात प्रामुख्याने डॉ. नरेंद्र दाभोलकर, बाबा आरगडे, प. रा. आर्डे, मच्छिंद्र वाघ, भास्कर सदाकळे, मच्छिंद्र मुंडे, शब्बीरभाई, शहाजी भोसले, मिलिंद देशमुख, विष्णुदास लोणारे, सविता शेटे, राजेश मडावी हे आहेत. या अंनिसच्या कार्यकर्त्यांबरोबरच जे समाजातील मान्यवर आहेत, विचारवंत आहेत आणि अंनिसचे हितचिंतक आहेत, त्यांच्याशी संवाद साधत त्यांचे विचार समजून घेणारे लेख, मुलाखती ‘अंनिवा’ने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात कॉ. गोविंद पानसरे, निळूभाऊ फुले, डॉ. श्रीराम लागू, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. पुष्पाताई भावे, डॉ. जयंत नारळीकर, कर्मवीर व्यंकटअण्णा रणधीर, गांधीवादी शास्त्रज्ञ नरसिंहय्या, विजयवाड्याच्या नास्तिक केंद्राचे गोरा, डी. डी. बंदिष्टे, सत्यपाल महाराज यांसारखे मान्यवर आहेत.


संत व समाजसुधारकांचे विचार
आपल्या महाराष्ट्राला संत, समाजसुधारकांचा मोठा वारसा आहे. हा विवेकी विचारांचा वारसा ‘अंनिवा’ने जपला आहे. कधी लेखाच्या स्वरूपात, कधी वर्षभर चालणार्‍या सदराच्या स्वरूपात ‘अंनिवा’ने हे विवेकी विचार जनतेपर्यंत पोेचविले आहेत. यात कबीर, तुकाराम, बसवेश्वर, बहिणाबाई, रविदास सारखे संत आहेत; तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले, सावित्रीबाई, ताराबाई शिंदे, चे गव्हेरा, अब्राहम कोवूर, र. धों.कर्वे, डी. डी. कोसंबी, धर्मानंद कोसंबी, शहीद भगतसिंग, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, अण्णाभाऊ साठे, असगर अली इंजिनियर, सुधारककार आगरकर, रोमिला थापर त्याच बरोबर रिचर्ड डॉकिन्स, आईनस्टाईन, रिचर्ड फेनमन, कार्ल सेगन, रसेल, फ्रान्सिस बेकन, जेम्स रॅन्डी हे विदेशी शास्त्रज्ञ, लेखक, जादूगार आहेत.


धर्मचिकित्सा व समाजप्रबोधन
बाजारीकरण आणि धर्मांधिकरणाच्या या कालखंडात धार्मिक पर्यटनाने टोक गाठले आहे. धर्मस्थळांची अक्षरश: बजबजपुरी बनली आहे. त्या-त्या गावातील जवळजवळ सर्वांचे हितसंबंध त्या धर्मस्थळात गुंतलेले आहेत. त्यामुळे कोणीच त्या विरोधात ‘ब्र’ काढत नाही. पण ‘अंनिवा’ने सुरुवातीपासूनच या धर्मस्थळाची झाडाझडती घेतलेली आहे. शनि शिंगणापूर, शिर्डी, तिरुपती, अजमेर, माउंट अबू, त्र्यंबकेश्वर, बद्रिनाथ, तुळजापूर, सम्मेद शिखरजी, श्रृंगेरीपीठ, नृसिंहवाडी, काशी-वाराणसी, सैलानीबाबाचा दर्गा, गाणगापूर या धर्मस्थळांना ‘अंनिवा’ने प्रत्यक्ष भेटी देत खास चिकित्सक लेख लिहिले आहेत.


‘अंनिवा’ने नेहमीच धर्मचिकित्सा करत धर्माचा विधायक विचार करणार्‍याचा वारसा मानला आहे. आज या वारशाला धोका निर्माण झाला आहे. कारण आज धर्माचा विचार लोकांच्यात दुही माजविण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी केला जात आहे. त्यामुळेच धर्माचे तथाकथित ठेकेदार धर्मचिकित्सेला नेहमीच कडवा विरोध करत आलेले आहेत. धर्माची चिकित्सा करणे, हे काम त्यांच्या मुळावरच येणारे आहे. पण सत्याचा शोध घेणारे त्यातून परिवर्तनाची वाट चोखळणारे धर्मचिकित्सेला नाकारत नाहीत. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे सत्याचा हा शोध सुकर झाला आहे. त्यामुळे ‘अंनिवा’ने विज्ञान युगातील धर्माचे स्वरूप, धर्मांधांचा विकास, देव-धर्माचा उपयोग काय? संतांचे संघर्ष, अध्यात्म ः एक प्रचंड गोंधळ, आत्म्याची वैज्ञानिक तपासणी, धर्म आणि समाजव्यवस्थेची फारकत हवी, धर्मनिरपेक्षतावाद्यांपुढील आव्हान, भारताचे धर्मनिरपेक्ष अस्तित्व धोक्यात, धर्माचे मर्म, धार्मिक क्रौर्याचा इतिहास, धर्मनिरपेक्षतेची गरज, धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यातील संघर्ष असे विषय घेऊन कार्यकर्त्यांना व सर्वसामान्य जनतेला विचारप्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे.


डॉ. भा. ल. भोळे यांनी म्हटले आहे, “अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ म्हणजे धर्माविरुद्ध नकारात्मक बंड नसून ती नवसमाजनिर्मितीची सकारात्मक चळवळ आहे.” त्यामुळे या समाजात कोणतेही क्रांतिकारी परिवर्तन घडण्यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन करणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच ‘अंनिवा’ने अंधश्रद्धा, दैववाद, रूढी-परंपरा, अनिष्ट प्रथा याबाबत लेख प्रसिद्ध केले आहेत. अंधश्रद्धेचा उगम व कारणे, गणपती दुग्ध प्राशन, मुस्लिम समाजातील अंधश्रद्धा, कुर्बानी म्हणजे काय फक्त पशुबळी देणे? सर्पाविषयी गैरसमजुती व अंधश्रद्धा, व्रतवैकल्यात बुडालेला महाराष्ट्र, अंत्यविधीतील अंधश्रद्धा आणि पुरुषी वर्चस्व, संत आणि चमत्कार, गायत्री मंत्राचा भुलभुलैय्या, रक्ताश्रूचा चमत्कार की येशूची थट्टा? भुताच्या शोधात, या जगात भुते असतात? चेटूक, अंगात येणे, तावीज-गंडे तोडायला हवेत, वैभवलक्ष्मी व्रत, पोतराज प्रथा प्रखर लढा आवश्यक, काळूबाई : शोध आणि बोध, विवाह सोहळा आणि विवेक अशांसारखे अनेक लेख समाजाला पडलेल्या अंधश्रद्धेच्या विळख्याचे चित्रण करताना दिसतात.


डॉ. दाभोलकरांचे वाक्य आहे की, “विज्ञानाची सृष्टी घेतली; जाते पण दृष्टी घेतली जात नाही.” हे बरोबरच आहे. कारण असा एक समज आहे की, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन; पण प्रत्यक्षात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व आपल्या राजकीय, सामाजिक वा शैक्षणिक व्यवस्थेत बिंबविलेच जात नाही. हे लक्षात घेत ‘अंनिवा’ने या बाबतीत डॉ. जयंत नारळीकर, डॉ. हेमू अधिकारी, डॉ. शरद अभ्यंकर, डी. डी. बंदिष्टे, रावसाहेब कसबे, विठ्ठलराय भट्ट यांच्यासारख्यांना वार्तापत्रातून लिहिते केले. शास्त्रीय विचार पद्धती, विज्ञान म्हणजे काय?, विज्ञानाचा भारतीय स्रोत, विज्ञान साक्षरता म्हणजे काय?, वैज्ञानिक शिक्षणातील मूल्ये, थोडी शास्त्रीय सत्ये लक्षात घ्या, विज्ञान, वैज्ञानिक पद्धत व विवेकवाद, विश्वनिर्मितीच्या शोधासाठी, मुक्त चिकित्सा परमेश्वराची, देवाचा आणि आत्म्याचा शोध, नास्तिकता, ईश्वराचा निरर्थक शोध थांबवा. इत्यादी लेखातून समाजप्रबोधन करत आले आहे.


प्रतिगामी विषयांविरोधी लेख
जनसामान्यांच्या अज्ञानाचा, असहाय्यतेचा गैरफायदा घेत अंधश्रद्धा पसरविण्याचे काम पुरोहितशाहीने केले. त्यासाठी त्यांनी मनुस्मृती, वेद, यज्ञ, योग, ध्यानधारणा, पुनर्जन्म, मन:शक्ती, दैववाद यांचा वापर करून घेतला. आज तर याला ऊत आला आहे. ‘मनुस्मृती’तील विषमता, वेद शिका वेद, वैदिक गणित किती गणित, वैदिक शेती- म्हणजे काय भानगड रे दादा, यज्ञ ही मागासलेल्या समाजाची धर्मसंस्था, अवैज्ञानिक अग्निहोत्र, ध्यानम् शरणम् गच्छामि, योगाचे मार्केट, ध्यानधारणेची वैज्ञानिक चिकित्सा, मन:शक्तीने शस्त्रक्रिया, नशिबाचा खेळ, गोमूत्र प्रतिगाम्यांची भंपकगिरी, नागमणीचा डंख अशा प्रतिगामी विषयांविरोधातील अनेक लेख ‘अंनिवा’ने प्रसिद्ध करून त्यातील फोलपणा उघड केला आहे. काही वर्षांपूर्वी धर्मधार्जिण्या शासनाने शालेय विद्यार्थ्यांसाठी मूल्यशिक्षणाचा घाट घातला होता. त्या अनुषंगाने धार्मिक मूल्ये रुजविण्याची शासनाची चाल होती. ‘अंनिवा’ने या विरोधात भूमिका घेत शून्य मूल्यांचे शिक्षण, अवमूल्यन शिक्षण, तळागाळात मूल्य शिक्षण कसे रुजेल? मूल्यशिक्षण कसे असावे?, भोंदू बाबूचे मूल्य शिक्षण, असे लेख प्रसिद्ध केले होते.


‘अंनिवा’चे वैशिष्ट्यपूर्ण विशेषांक
‘अंनिवा’ने गेल्या तीस वर्षांत अनेक वैशिष्ट्यपूर्ण विशेषांक काढले. पहिला विशेषांक मार्च-एप्रिल 1993 मध्ये ‘शोध भुताचा-बोध मनाचा कोकण मोहीम विशेषांक,’ जुलै 1994 मधील संमोहन विशेषांक, 21 सप्टेंबर 1995 ला गणपती दूध प्यायल्याची अफवा पसरविल्याच्या संदर्भात नोव्हेंबर 1995 ला ‘गणेश दुग्ध प्राशन विशेषांक’ काढले गेले. फेब्रुवारी 1998 मध्ये ‘अंध रुढीच्या बेड्या तोडा’, ‘महाराष्ट्रव्यापी संकल्प परिषद विशेषांक’ लातूरला झालेल्या महिला जाहीरनामा परिषदेचा विशेषांक फेब्रुवारी 2005 मध्ये काढण्यात आला. मे 2013 मध्ये ‘दुष्काळ व जलसाक्षरता विशेषांक’, 20 ऑगस्ट 2013ला डॉ. दाभोलकरांचा खून झाला. त्यानंतर ‘अंनिवा’ने सप्टेंबर-ऑक्टोबर 2013 चा ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन विशेषांक’ काढला. अतिशय अल्पावधीत आणि अतिशय तणावाच्या परिस्थितीत या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले होते. आज डॉ. दाभोलकरांच्या खुनाला सहा वर्षे होत आहेत. या सहाही वर्षी डॉ. दाभोलकर स्मृती विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉक्टरांचा खून झाला पण 18 डिसेंबर 2013ला जादूटोणाविरोधी कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्यासंदर्भातील ‘कायदा विशेषांक’ अंनिवाने त्वरित जानेवारी 2014 मध्ये काढला. फेब्रुवारी 2015 मध्ये ‘फसवे विज्ञान भांडाफोड विशेषांक’ काढण्यात आला. तसेच अंनिसचे अध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील यांना नव्वद वर्षेपूर्ण झाल्याबद्दल अंनिसने आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यानिमित्त अनिवाने ‘डॉ. एन. डी. पाटील विशेषांक’ जुलै 2018 ला काढला.


अंविवाचे दर्जेदार वार्षिकांक
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे वार्षिकांक खूपच वैशिष्ट्यपूर्ण ठरत आलेले आहेत. ‘अंनिवा’चा पहिला वार्षिक विशेषांक निघाला 1996 मध्ये. त्यावेळेस वार्षिक न म्हणता ‘दिवाळी अंक’ असेच म्हणत. त्या अंकाला जाहिराती घेण्यात आल्या. पहिल्या वर्षी अंक पूर्ण होईपर्यंत एक लाखांच्या जाहिराती जमा होताच आम्ही (प्रदीप पाटील संपादक होते, मी राजू देशपांडे संपादन सहाय्य करत होतो आणि अनिश पटवर्धन खजिनदार होता.) एकमेकांना आनंदाने फोन करत एकमेकांचे अभिनंदन केले. त्याचवेळेस लक्षात आले दिवाळी अंक हा संघटनेसाठी आर्थिक स्रोत होऊ शकतो. पुढे नियमितपणे वार्षिकांक (दिवाळी अंक संबोधण्यास अनेक कार्यकर्त्यांनी आणि वाचकांनीही विरोध दर्शवला.) निघू लागला. डॉक्टर वार्तापत्राच्या संपादकीय कामात कधीच लक्ष द्यायचे नाहीत. वार्षिकांकाच्या मीटिंगसाठी हमखास यायचे. आम्हीच त्यांना लेखकांना फोन करायला लावायचो. त्यांचा लेख अगदी ठरलेल्या वेळेत आणि सांगितलेल्या शब्दसंख्येत नेमका यायचा. वार्षिकांकाच्या जाहिरातींसाठी मात्र ते अख्या महाराष्ट्रात फिरायचे. जिथे जायचे तिथे वर्गणीदार गोळा करायचेच.


वार्षिकांकात सुरुवातीपासूनच एखाद्या धर्मस्थळांची चिकित्सा असायची. शनि शिंगणापूर पासून त्याची सुरुवात झाली. एखाद्या वरिष्ठ शास्त्रज्ञाची, सामाजिक कार्यकर्त्याची किंवा चळवळीच्या ज्येष्ठ हितचिंतकाची मुलाखत, डॉ. दाभोलकरांचा प्रदीर्घ लेख, त्यात ते अंधश्रद्धा निर्मूलनाच्या एखाद्या विषयाची सखोल मांडणी करायचे. पुढे एखाद्या सामाजिक चळवळीची, संस्थेची सर्वांगीण माहिती प्रत्यक्ष तेथे जाऊन घेऊन रिपोर्ताज पद्धतीने दिली जाते. प्रत्येक वार्षिकांकात एखाद्या प्रस्थापित बुवाचा भांडाफोड त्याच्या आश्रमात किंवा प्रत्यक्ष त्याच्या स्थळावर जाऊन केलेले. खाप पंचायतीसारख्या प्रतिगामी संघटनांचे स्वरूप उलगडणारे वृत्तांत किंवा आसाममधील डाकीण प्रश्नाचा प्रत्यक्ष तेथे जाऊन घेतलेला सखोल वेध, उत्तर प्रदेशातील सत्यशोधक चळवळ चालविणार्‍या ‘अर्जक संघा’ची प्रत्यक्ष जाऊन करून दिलेली सर्वांगीण ओळख. केरळ साहित्य परिषदेचा दिलेला परिचय वार्षिकांकातील विविध विषयावरील परिसंवाद हे अंकाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य पुरोगामी लेखक, विचारवंत, कार्यकर्ते यांची उपस्थिती या परिसंवादात लागलेली आहे.

पंचवीशी निमित्त साहित्य संमेलन
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राला 25 वर्षे झाली म्हणून वार्तापत्राने दोन दिवसाचे ‘दुसरे अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन’ सांगली येथे 14 व 15 मे रोजी आयोजित केले होते. या दुसर्‍या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आ. ह. साळुंखे हे होते. हे संमेलन म्हणजे संयोजनाचा उत्कृष्ट नमुना ठरले. अतिशय उत्साहात पार पडलेल्या या संमेलनाला भरउन्हात दोन हजार कार्यकर्ते, साहित्यप्रेमी, श्रोते हजर होते. भाषातज्ज्ञ गणेश देवी, ‘द हिंदू’चे माजी पत्रकार पी. साईनाथ, सत्यपाल महाराज, तारा भवाळकर, देशभरातील विवेकवादी मासिकांचे संपादक अशी अनेक मान्यवर मंडळी संमेलनाला हजर होती. जून 2016 चा अंक साहित्य संमेलन विशेषांक म्हणून काढण्यात आला.


‘अंनिवा’चे तीन खंड
‘अंनिवा’च्या रौप्यपूर्तीनिमिताने ‘अंनिवा’च्या संपादक मंडळाने ‘थॉट अ‍ॅण्ड अ‍ॅक्शन’ या आपल्या इंग्रजी मासिकाचे संपादक प्रभाकर नानावटी यांच्या संपादकत्वाखाली एक मोठा आणि अत्यंत महत्वाचा प्रकल्प पूर्ण केला. गेल्या 25 वर्षातील ‘अंनिवा’मधील निवडक लेखांचा संग्रह ‘समग्र अंधश्रद्धा निर्मूलन’ या नावाने तीन खंडात प्रकाशित केला. प्रत्येक खंडात दोनशे पानाची प्रत्येकी पाच पुस्तके आहेत. गेल्या 25 वर्षांतील अंकाच्या आकाराच्या सुमारे पंधरा हजार छापील पानांतून हे लेख संपादित केलेले आहेत. या लेखांची संख्या 800 असून 300 लेखकांनी हे लेख लिहिलेले आहेत. हे लेख वाचत असताना त्या-त्या काळातील सर्व प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर उभे राहातात व चळवळ कोणत्या प्रसंगाना सामोरी गेलेली आहे. याचा प्रत्यय येतो. यातील पहिल्या खंडातील चार पुस्तकांत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी वार्तापत्रासाठी लिहिलेल्या सर्वच्या सर्व लेखांचा समावेश केलेला आहे व इतर खंडातील पुस्तकात गेल्या 25 वर्षांतील चळवळ आहे.


‘वार्तापत्रा’वरील खटले
‘अंनिस’सारख्या संघटनेला सनातन्यांच्या संघटनांकडून नेहमीच लक्ष्य केले जाते. ‘अंनिवा’ने या संघर्षात चळवळीची भूमिका ठामपणे मांडली आहे; परिणामी सनातन्यांकडून जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी वार्तापत्रावर बदनामीचे 11 खटले दाखल करण्यात आले आहेत. या 11 खटल्यांपैकी 6 खटल्यांत वार्तापत्राची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यापैकी अनेक खटल्यात सांगलीचे प्रसिद्ध वकील अ‍ॅड. दत्ताजीराव माने, मुंबई हायकोर्टातील अ‍ॅड. अतुल अल्मेडा आणि गोव्याचे वकील अ‍ॅड. प्रीतेश नायक यांनी ‘अंनिवा’ला मोलाची मदत केली आहे.


कार्यालयीन व्यवस्थापन
1995 साली वार्तापत्राचे कार्यालय सांगलीला आले. त्यावेळचे संपादक डॉ. प्रदीप पाटील यांच्या चार्वाक या बंगल्यातील दोन खोल्यातून हे कार्यालय थाटण्यात आले. तेथून जवळजवळ 19 वर्षे वार्तापत्र निघत होते. डॉक्टरांच्या खुनानंतर वर्षभरातच संघटनेने सांगली येथील कार्तिक अपार्टमेंट, संजयनगर येथे घेतलेल्या स्वत:च्या मालकीच्या प्रशस्त व सुसज्ज कार्यालयात वार्तापत्र हलविण्यात आले. आज वार्तापत्राच्या कार्यालयात सुहास यरोडकर आणि सुहास पवार हे दोन पूर्णवेळ कर्मचारी कार्यरत आहेत. व्यवस्थापकीय संपादक म्हणून राहुल थोरात वार्तापत्राची संपूर्ण व्यवस्था सक्षमपणे पाहत आहेत.
सध्या वार्तापत्राचे आठ हजार सभासद असून, ते संपूर्ण महाराष्ट्रभर जाते. वार्तापत्राच्या संपादक मंडळाची मिटींग ही दरमहा सांगलीला होत असते. ही मिटींग नियमित होत असते. त्यामुळे गेली 29 वर्षे वार्तापत्राच्या प्रकाशनात एकदाही खंड पडला नाही.


पुढील संकल्प व समारोप
आजचे युग डिजिटल आहे. जर आपल्याला कालसुसंगत चळवळ चालवायची असल्यास वार्तापत्रानेसुद्धा इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रवेश करणे गरजेचे आहे. त्यानुसार वार्तापत्रासाठी स्वतंत्र वेबसाईट निर्माण करण्याची आमची भविष्यातील योजना आहे. त्यासाठीचे माहिती केंद्र उभारण्याचा आमचा मानस आहे.
कार्यकर्त्यामुळेच वार्तापत्राला देणग्या मिळतात, जाहिराती मिळतात, वर्गणीदार मिळतात तसेच तो संघर्ष करत असतो, आंदोलने करत असतो. त्यामुळेच वार्तापत्र समृद्ध होत असते. वार्तापत्राचा हा सारा डोलारा उभा आहे, कार्यकर्त्यांच्या जीवावर. आज आपण व आपल्यासारख्या पुरोगामी संघटना एका अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहोत. प्रतिगामी शक्ती नुसत्याच प्रबळ झाल्या आहेत, असे नाही तर आज त्यांच्या हातात सर्वंकष सत्ता आहे. त्यामुळे या संविधानाच्या मूल्याच्या विरोधी असणार्‍या शक्तीशी आपला संघर्ष अटळ आहे. या अटळ संघर्षासाठी कार्यकर्त्यांसमवेत ‘अंनिवा’सुद्धा सिद्ध आहे, हीच खात्री या त्रिदशकपूर्ती निमित्त देत आहोत.

  • राजीव देशपांडे, संपादक
    अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
    संपर्क : 9136109845

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]