-
आपला मे 2021 मधील छदमविज्ञानविरोधी विशेषांक वाचला. तो अत्यंत आवडला म्हणून मुद्दाम आपणास हे लिहून कळवीत आहे. छदमविज्ञान आणि मानसशास्त्र हा डॉ. हमीद दाभोलकरांचा लेख अत्यंत उत्तम असून अत्यंत संयमितपणे लिहिलेला आहे. रोखठोक भूमिका घेणे म्हणजे प्रतिपक्षाशी तुसडेपणाने बोलणे नव्हे. खरे तर या संयमित भूमिकेमुळे सांगणार्याचे म्हणणे अधिक पटते व सकारात्मकतेने घेतले जाते.
अंजली चिपलकट्टीचा लेखही उत्कृष्ट व अत्यंत साजेशी उदाहरणे व महत्त्वाचे सिद्धांत सांगून लिहिलेला आहेत. ‘ सेल्फ डाउट हे मजबूत आत्मविश्वासाचं लक्षणच ठरतं.’ हे वाक्य अत्यंत उत्तम आणि अशा कामांसाठी आवश्यक असेच आहे.
डॉ. शंतनु अभ्यंकरांचा लेख रोखठोकपणे सांगतो की अन्न व औषध विभाग आधुनिक औषधांसाठी कडक तपासण्या, शास्त्रीय व काटेकोर निकष योजतो पण तो विषय पर्यायी पद्धतींचा अत्यंत गचाळ, तोकडे व निरर्थक निकष मान्य करतो. ही या पर्यायी औषधोपचाराची अवैज्ञानिकता त्यांनी स्पष्ट केली आहे.
डॉ. प्रदीप पाटील यांचा लेख म्हणजे अनेक वर्षे चालत आलेल्या विविध कल्पनांची छान चिरफाड करणारा आहे. ते वाचून आपले विज्ञान-तंत्रज्ञान खाते कितपत वैज्ञानिक आहे असाच प्रश्न पडतो. प्रा. अनिकेत सुळे यांनी छद्मविज्ञानी दाव्यांचे केलेले वर्गीकरणही पटते. त्यांनी भारताप्रमाणेच पुढारलेला म्हणविणारा अमेरिका देश- म्हणजे स्वतः डोनाल्ड ट्रम्प, एर्दोगान, बोलसनरो, पोलंड इत्यादी देशातून केलेले अवैज्ञानिक दावे एकुणच जगाची विचारप्रक्रिया स्पष्ट केलेली आहे.
नितीश नवसागरे यांच्या लेखातील उदाहरणे आपल्याला पुन्हा चार शतके मागे घेऊन जाणारीच आहेत. स्त्रीला प्रश्न विचारण्याबद्दल भुताटकीने पछाडले समजून तिच्या गळ्यात दगड बांधून तिला पाण्यात सोडायचे. असल्या रानटी न्यायव्यवस्थेसंबंधी खरे तर मोर्चेच काढायला हवेत. मोर ब्रह्मचारी असून त्याचे अश्रू पिऊन प्रजनन होते म्हणणार्या न्यायाधीशाला सुशिक्षित म्हणायचे? असल्या लोकांच्या हाती न्यायव्यवस्था असली तर कसले न्याय मिळणार? प्रभाकर नानावटींचा मेंदूला स्मार्ट बनविण्यासंबंधीचा लेख अत्यंत समर्पक व सत्यता दर्शविणारा आहे. अजूनही आपल्या देशातही कौमार्य चाचण्या होऊ शकतात हे वाचून आपण नक्की कोणत्या दिशेला चाललो आहेत असा प्रश्न पडतो.
प्रा. प.रा. आर्डे यांचा वजन उतरविण्या संबंधीचा लेख तर घरोघरी – विशेषतः भरपूर पैसे असलेल्या सुशिक्षित(?) घराघरांमध्ये व त्यातही तरुणपिढीपर्यंत पोचविला पाहिजे. अनिल चव्हाण यांचा लेख म्हणजे धमाल आहे. त्यांचे विनोदी व्यक्तीच्या तोंडी घातलेले संवाद व वक्तव्ये म्हणजे हसता हसता पुरेवाट झाली. अत्यंत उत्तम लेख. डॉ. उत्तमा जोशी यांचा लेख गर्भाच्या वाढीविषयीचा शाळा-कॉलेजमध्ये शिकतो त्यासाठीचा उत्तम पाठ आहे असे वाटले. डॉ. संजय नीटवे यांचा लेखही तशाच प्रकारचा असून सर्व मूळ प्रक्रिया सोप्या भाषेत स्पष्ट करणारा आहे. या दोन्ही लेखांतून सर्वसामान्य माणसाला खूपच महत्त्वाचे ज्ञान मिळते.
नरेंद्र लांजेवार यांनी महाराष्ट्राशी केलेला संवादही सत्य परिस्थिती पुढे आणतो. घर भाड्याने देतानाही जात, आडनाव पाहूनच दिले जाते. राज्यात रुग्णालयांऐवजी मंदिरांचीच संख्या वाढत आहे हे विदारक सत्य असून ते पुढारलेल्या महाराष्ट्रात आहे ही विचार करायला लावणारी बाब आहे.
डॉ. छाया पोवार यांच्या लेखामुळे माझ्या डोळ्यात पाणीच आले. आपण ज्या गोष्टी हव्या म्हणून बदल करायला पाहत आहोत ते काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी व राजाराम छत्रपतींच्या मातोश्री यांनी शतकापूर्वीच प्रत्यक्षात उतरविल्याचे वाचून मन भरून आले आणि आता आपण पुन्हा उलट्या दिशेने वाटचाल करीत आहोत ही वस्तुस्थिती मनाला खूपच त्रास देऊन गेली.
थोडक्यात काय तर हा सर्व अंकच अत्यंत उत्तम व मुद्दाम संग्रही ठेवावा असा झाला आहे.
शेवटी एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख क रावा असे वाटते. स्युडो सायन्सला छदमविज्ञान हा अत्यंत समर्पक शब्द वापरलेला आहे. माझ्यामते या देशाला पुढे आणायचे असेल तर दोन गोष्टी अंमलात आणायला हव्यात. पहिले म्हणजे लोकसंख्या कमी करणे (ज्याविषयी आपले पंतप्रधान एकही शब्द उच्चारात नाहीत) व दुसरे म्हणजे धर्माच्या नावाखाली चाललेले चाळे बंद करून वैज्ञानिक दृष्टीकोन देशभर पसरविला पाहिजे. त्यासाठी अंधश्रद्धा हा विषय शाळेच्या पाठ्यपुस्तकात आवर्जून घातला गेला पाहिजे व शिकविला गेला पाहिजे. धन्यवाद!
– कल्याणी गाडगीळ, पुणे