सम्राट हटकर -
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एका तांड्यावर नुकतंच लग्न झालेल्या एका नववधूच्या अंगात यायला लागलं. असंबंध बरळणेसुद्धा चालू होते. भानामती, अंगात येणे ही आसपासच्या तांड्यांवर आणि परिसरात नित्याची व सामान्य बाब आहे. याबाबत कुणाला विशेष असं काही वाटत नाही. परंतु एका सुशिक्षित आणि मुंबईला सर्व्हिसला असलेल्या मुलाच्या कुटुंबात हा प्रकार घडत असल्यामुळे त्याने मला फोन करून त्याच्या तांड्यावर येऊन हा प्रकार थांबवण्यासाठी विनंती केली. त्यानुसार रविवार, 11 जुलैचा दिवस ठरला होता. त्या मुलाने पुन्हा फोन केला आणि सांगितले की, इतर दिवशी नेम नाही. परंतु अमावस्या-पौर्णिमेला हमखास अंगात येण्याचे प्रकार तांड्यावर होतातच. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी; म्हणजे 9 जुलै रोजी येण्याचा आग्रह त्याने धरला. परभणी जिल्ह्यातील घटना असल्यामुळे तेथील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या तांड्यावर गेलो. ज्यांना भानामती होती, त्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. असल्या प्रकाराबद्दल उपस्थित सर्वांना सविस्तर माहिती दिली, मार्गदर्शन केले. ‘यापुढे आम्ही जाणत्याकडे जाणार नाही, गंडा-दोरा करणार नाही. असा काही प्रकार घडल्यास किंवा आजारी पडल्यास डॉक्टरकडे जाऊ,’ असेही आश्वासन त्यांनी दिले. आम्ही असेपर्यंत कोणाच्याही अंगात आलं नाही किंवा भानामतीचा प्रकार घडला नाही. या अमावस्येच्या दिवशी कोणाच्याही अंगात आले नाही, असा त्या मुलांचा फोन आला होता. सध्या सर्व नॉर्मल आहे. या प्रकरणात नांदेड शाखेचे प्रधान सचिव नितीन ऐंगडे, गंगाखेडचे कार्यकर्ते प्रकाश शिंगाडे, मुंजाजी कांबळे व सम्राट हटकर यांनी सहभाग घेतला.
– सम्राट हटकर, नांदेड