निर्णयक्षमता आणि समस्या निराकरण

डॉ. चित्रा दाभोलकर -

आयुष्यात येणार्‍या विविध समस्यांवर तोडगा काढण्याची क्षमता आणि निर्णयक्षमता ही दोन महत्त्वाची जीवनकौशल्ये आहेत. किशोरवयात जीवनकौशल्य शिकवण्याचा हेतू असा आहे की, ही कौशल्यं अंगीकारली असता जीवनातील सर्व चढ-उतारांत माणूस खचून न जाता मानसिकदृष्ट्या संतुलित राहून मार्गक्रमण करेल. पौगंडावस्थेत जीवनाच्या महत्त्वाच्या कालखंडात ही कौशल्ये आत्मसात केली तर आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात; म्हणजे तारुण्यात, प्रौढत्वात आणि उतारवयात उद्भवणार्‍या विविध समस्यांची उकल करण्याची क्षमता वाढेल. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेचा विचार करणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच निर्णयाबाबतीत चौफेर विचार करणे; म्हणजेच सर्वांगाने विचार करणेही महत्त्वाचे ठरते.

जबाबदारीने निर्णय घेण्यासाठी प्रथम समस्या नीट समजून घेतली पाहिजे. नक्की समस्या काय आहे आणि कोणत्या परिस्थितीबाबत आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, याविषयी स्पष्ट विचार मनात असणे महत्त्वाचे आहे. निर्णयाबाबत उपलब्ध असलेल्या प्रत्येक मुद्द्यावर किंवा प्रत्येक पर्यायावर; तसेच त्यावर केल्या जाणार्‍या प्रत्येक कृतीवर विचार केला पाहिजे. त्या कृतीच्या योग्य आणि अयोग्य परिणामांची यादी केली पाहिजे; म्हणजेच निर्णय घेताना प्रत्येक उद्दिष्टाबद्दल योग्य आणि पूर्ण माहिती मिळवणे जरुरीचे आहे. तसेच वैयक्तिक निर्णयाचा परिणाम स्वतःवर आणि आपल्या कुटुंबावर होत असतो, हा विचार प्रत्येक किशोरवयीन मुलाच्या मनात हवा. त्यामुळे व्यक्तिगत आणि कौटुंबिक मूल्यांचा विचारही येथे महत्त्वाचा ठरतो. तेव्हा आपल्या कृतीने दुसर्‍यावर होणार्‍या परिणामांबाबत विचार निर्णय घेताना केला पाहिजे. तुम्हाला मिळालेली माहिती, तुमचे ज्ञान, नैतिक मूल्ये, संस्कार, सद्यःस्थितीतील आणि भविष्यातील उद्दिष्टे; तसेच निर्णयाचा इतर व्यक्तींवर होणारा परिणाम या सर्वांच्या दृष्टीने योग्य असणारा पर्याय निवडणे योग्य ठरते; म्हणजेच थोडयात निर्णय घेताना परिस्थितीची पार्श्वभूमी नीट समजून घ्या, माहिती मिळवा, निर्णयासाठी लागणार्‍या पर्यायांचा नीट विचार करा आणि त्याचे परिणाम लक्षात घ्या. वैयक्तिक आणि कौटुंबिक मूल्यांचा विचार करा. अनेक पर्यायांचा विचार करून त्यांतील योग्य तो पर्याय निवडणे व आपली समस्या सोडविणे म्हणजे समस्या निराकरण होय.

जीवनात आपल्याला पदोपदी समस्यांना तोंड द्यावे लागते. आपल्या समस्या आपण कितपत परिणामकारकपणे आणि कार्यक्षमतेने सोडवू शकतो, यावर आपल्या जीवनातील यश अवलंबून असते. समस्येचे निराकरण करताना चार महत्त्वाचे टप्पे लक्षात ठेवणे जरुरीचे असते. सर्वप्रथम समस्या ओळखणे आणि नीट समजून घेणे, तिच्या मुळाशी जाणे हा पहिला टप्पा आहे. तिच्याविषयी माहिती गोळा करणे, सामाजिक, भावनिक पार्श्वभूमी समजून घेणे आणि समस्या सोडवताना जो निर्णय घ्याल, त्यावरही सर्वांगीण विचार करणे हा दुसरा टप्पा ठरतो. सर्व पर्यायांना समजून घेणे हा तिसरा टप्पा; तर समस्या सोडवल्यावर आपल्या कृतीचे पुनरावलोकन करणे, म्हणजेच आपल्या कृतीसंदर्भात विचार करणे हा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा आहे.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर या कौशल्यांची निकड भासते. पौगंडावस्थेत; म्हणजे संक्रमणाच्या काळात जेव्हा शारीरिक बदलांबरोबर मानसिक बदल घडून येत असतात, याची जाणीव होऊ लागली असते, स्वतंत्र वृत्ती निर्माण होत असते, परावलंबित्वाकडून स्वावलंबनाकडे आयुष्य झुकू लागले असते, स्वप्रतिमा विकसित होऊ लागली असते, स्वत:च्या शरीरप्रतिमेची निर्मिती सुरू झाली असते, लैंगिक संबंधाविषयी कुतूहल निर्माण होत असते, विविध सामाजिक स्थित्यंतराचा परिणाम होत असतो, मनात वैचारिक आंदोलने सुरू झालेली असतात, समवयस्कांची ओढ लागली असते, भिन्नलिंगी आकर्षण सुरू झाले असते, धोका पत्करायची मानसिकता वाढली असते; तसेच विविध नवनवीन प्रयोग करून बघण्याची ओढ वाटायला लागते, तेव्हा कित्येक प्रसंगी आपल्याला आपले निर्णय घ्यावे लागतात. या निर्णयाची जबाबदारी सुद्धा घ्यावी लागते आणि त्याच्या दूरगामी परिणामांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते, म्हणूनच निर्णयक्षमतेचे कौशल्य अंगी बाणवणे आवश्यक गरज ठरते.

किशोरवयीन मुलांनी निर्णयक्षमता आणि समस्यांची उकल करण्याची क्षमता ही दोन्ही मूलभूत जीवनकौशल्ये शिकून घेतली, तर आयुष्यातील विविध कठीण प्रसंगांतून मार्ग काढण्यास सुकर ठरू शकते. परिपूर्ण आणि संतुलित व्यक्तिमत्त्वासाठी जागतिक आरोग्य संघटनेने किशोरवयीन मुलांच्या दृष्टीने पुढील आयुष्य अधिक चांगले व्हावे म्हणून पौगंडावस्थेतील मुलांना जीवनकौशल्ये आत्मसात करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. जीवनकौशल्ये आत्मसात केली तर ही मुले जीवनातील सर्व चढ-उतारांत न खचता मानसिकदृष्ट्या संतुलित राहून मार्गक्रमण करतील, असा विश्वास वाटतो.

किशोरवयीन मुलांमधील समस्या उदा. १८ वर्षेवयापूर्वीचे गर्भारपण, हिंसाचार, आत्महत्या, अपघात, दुखापती, वर्णद्वेष, दारू-तंबाखू-मादक पदार्थांचे सेवन, आहारसमस्या, बालशोषण आदींवर प्राथमिक प्रतिबंधकात्मक उपाय (primary prevention) म्हणून जीवनकौशल्य शिक्षण देणे महत्त्वाचे ठरते, असे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मत आहे.

लेखिका संपर्क : ९४२२४ ९६४९५


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]