बाबा रामरहीम विरोधातील लढाई

राहुल थोरात - 9422411862

संविधानातील मूल्यांवर अपार विश्वास असल्यामुळेच बाबा रामरहीम विरोधातील लढाई जिंकू शकलो!

अंशुल छत्रपती (सिरसा, हरियाणा)

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर बुवाबाबांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा दिला. या लढाईत त्यांना आपले प्राण गमवावे लागले. तसाच लढा हरियाणा राज्यातील सिरसा या गावचे एक निर्भीड पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी 20 वर्षार्ंपूर्वी सुरू केला होता. महाबलाढ्य बाबा रामरहीम याची आणि त्याच्या ‘डेरा सच्चा सौदा’मधील कृष्णकृत्यं ते आपल्या सायंदैनिकातून प्रसिद्ध करत असत. एक प्रकारे ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचेच कार्य करत होते. या लढाईत त्यांनाही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारखेच प्राण गमवावे लागले. रामचंद्र छत्रपतींच्या खुनाचा सलग सतरा वर्षे अत्यंत जिद्दीने पाठपुरावा करून बाबा रामरहीमला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याला कारणीभूत ठरले, त्यांचे सुपुत्र अंशुल छत्रपती! “संविधानातील मूल्यांवर अपार विश्वास असल्यामुळेच बाबा रामरहीम विरोधातील लढाई जिंकू शकलो!” असं अंशुल छत्रपती म्हणतात. या निर्भीड तरुणाच्या बुवाबाजीविरोधी संघर्षाला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नावाचा पुरस्कार ‘महाराष्ट्र फाउंडेशन’नी दिला आहे, हे अगदी उचित आहे. अंशुल छत्रपतींच्या संघर्षाला महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेने केलेला ‘सलाम’च म्हणता येईल.

समाजसुधारणेचे काम किती कष्टप्रद असते, हे सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “समाजाकडून होणार्‍या छळाचे स्वरूप तुरुंगातल्या हालांपेक्षा अधिक व्यापक असते. राज्यकर्त्यांविरुद्ध चळवळ करणार्‍या देशभक्तांच्या वाट्याला कीर्ती येते; समाजसुधारकाला मात्र निंदा, अपमान, धिक्कार अशा छळाचे धनी व्हावे लागते आणि त्यासाठी लागणारे धैर्य तुरुंगात जाणार्‍याच्या धैर्यापेक्षा जास्त कणखर असावे लागते.” आजच्या काळात पुरोगामी विचार मांडणार्‍यांना समाजमाध्यमातल्या ‘ट्रोलधाडी’कडून जी गलिच्छ शिवीगाळ वाट्याला येते, ती पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात, त्याचे महत्त्व विशेषत्वाने ध्यानात येते.

एक तर समाजात प्रागतिक विचारांची माणसे अल्प असतात आणि या कारणांमुळे उघडपणे भूमिका घेणारी, लढणारी माणसे त्याहून अल्प असतात. या धैर्यवान अत्यल्प माणसांमध्ये हरियाणा राज्यातील दै.‘पुरा सच’चे संपादक शहीद रामचंद्र छत्रपती आणि त्यांचे चिरंजीव अंशुल छत्रपती यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.

अंशुल छत्रपती यांच्याशी अंधश्रद्धा निर्मूलन मासिकाचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी साधलेल्या संवादातून त्यांचा संघर्ष आपण जाणून घेऊयात.

राहुल थोरात : आपण ज्या मूल्यांचा उच्चार करतो, ती मूल्ये जगणार्‍या अंशुल छत्रपतींसोबत बोलण्याची संधी मिळाली, याचा आनंद वाटतो. आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याचे दुःख आम्ही समजू शकतो. जेव्हा व्यवस्था, पोलीस यंत्रणा सहकार्य करण्याऐवजी त्रास देतात, तेव्हा लढाई लढणे किती अवघड असते, हे ‘अंनिस’चा प्रत्येक कार्यकर्ता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणात जाणतो आहे. आज डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या होऊन आठ वर्षेझालीत, त्यांचे केवळ संशयित मारेकरी पकडले गेलेत; मात्र मुख्य सूत्रधार अजून मोकाट आहेत. आपण रामरहीमसारख्या बड्या बाबाच्या विरोधात सतरा वर्षे विनासंघटन उभे राहिलात, लढलात. तुमचा हा लढा आम्हाला प्रेरणा देतो. जेव्हा रामरहीमविरोधात कोणी लिहायला तयार नव्हतं, तेव्हा रामचंद्र छत्रपती यांनी लिहिलं, त्यांच्याविषयी आम्हाला अत्यंत आदर वाटतो. रामचंद्रजींनी घालून दिलेल्या निर्भयतेच्या मार्गावर पुढील अनेक पिढ्या चालतील, अशी आम्हास आशा आहे.

राहुल थोरात : अंशुलजी, मला सांगा, रामचंद्र छत्रपतींची जडणघडण कशी झाली, कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती?

अंशुल छत्रपती : माझे वडील रामचंद्र छत्रपती यांचा जन्म शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. माझे आजोबा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील होते. ते राहत असलेला भाग फाळणीनंतर पाकिस्तानात गेला. मग आजोबांनी सर्व कुटुंबाला भारतात स्थलांतरित केले. आमच्या कुटुंबाला सिरसा येथे शेतजमीन भरपाई म्हणून सरकारने दिली.

माझे वडील रामचंद्र छत्रपती हे लहानपणापासूनच धाडसी वृत्तीचे होते. त्यांच्यातील धाडसीपणा व नेतृत्वगुण पाहून त्यांचे शिक्षक एकदा त्यांना म्हणाले, “तुझ्यात छत्रपती शिवाजी महाराजांसारखी निर्भयता दिसते. त्यामुळे तुझ्या नावापुढे ‘छत्रपती’ लाव.” त्यानंतर मग ते आपल्या नावासोबत ‘संधू’ऐवजी ‘छत्रपती’ असे अभिमानाने लावू लागले. या नावामुळे आमचे संबंध महाराष्ट्राशी जोडले आहेत, याचा अभिमान वाटतो.

कॉलेजमध्ये असताना रामचंद्र छत्रपती यांनी आर्य समाज, स्वामी अग्निवेश यांच्यासोबत काम केलं. आर्य समाजाच्या एका मासिक पत्रिकेचे काम करण्यासाठी ते दिल्लीत राहिले होते. तिथे त्यांची पुरोगामी विचारांशी ओळख झाली. धर्म, जाती यांमुळे माणसाचे शोषण होते. देवा-धर्माच्या नावाखाली काही चतुर लोक इतर लोकांना फसवतात, हे त्यांचे लक्षात आले.

पुढे त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. सिरसा कोर्टात वकिली चालू केली; मात्र त्यांचं मन त्यात रमेना. त्यांचा कल पत्रकारितेकडेच होता. त्यांनी दिल्लीहून प्रकाशित होणार्‍या ‘हिंदुस्थान टाइम्स’ या वृत्तपत्रामध्ये वार्ताहर म्हणून काम सुरू केलं. त्यासोबत काही स्थानिक दैनिकांत स्तंभलेखन सुरू केले. पत्रकारितेत काम करताना संपादकाला आवडेल, रुचेल ते लिहावे लागते, अनेकदा आपण लिहिलेल्या मजकुराला संपादकाची कात्री लागते, असा त्यांना अनुभव आला. मग त्यांनी स्वतःचं ‘पुरा सच’ हे वर्तमानपत्र चालू केलं. हे वर्तमानपत्र सुरू करताना त्यांनी शपथ घेतली होती की, ‘पूरा सच’ में पूरा सच ही छपेगा।’ त्यात त्यांनी तत्कालीन चौटाला सरकार आणि आमच्याच गावात असणार्‍या ‘डेरा सच्चा सौदा’च्या दहशतीविरोधातल्या बातम्या छापायला सुरुवात केली.

तुमच्या सिरसा गावात बाबा रामरहीमने ऐवढे मोठे साम्राज्य कसे निर्माण केले?

अंशुल : नववी पास असलेल्या, राजस्थानमधून आलेल्या राम रहीमनं 1990 च्या दशकात बंदुकीच्या जोरावर डेर्‍याचे प्रमुखपद मिळवले, असे म्हणतात. त्यानंतर त्यानं सिरसा भागात आपली दहशत पसरवली, लोकांच्या जमिनी जबरदस्तीने हडप केल्या. इतकी प्रचंड संपत्ती, हजारो एकर जमिनी ‘डेरा सच्चा सौदा’ने कशा लाटल्या, याची चौकशी कोणत्याच सरकारनं कधी केली नाही. लोकांच्या विरोधामुळे तत्कालीन मुख्यमंत्री चौधरी बन्सीलाल यांनी तपास चालू केला; मात्र त्यांचं सरकार लगेच पडलं आणि पुढं काहीच झालं नाही. अर्थात, याचबरोबर हरियाणा, पंजाबातील अज्ञानी गरीब लोक ‘डेरा सच्चा सौदा’चे प्रस्थ तयार करण्यास कारणीभूत ठरले.

पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि बाबा रामरहीम यांचा संघर्ष नेमका कशामुळे सुरू झाला?

अंशुल : बाबा रामरहीम आपल्या आश्रमातील मुलींचे लैंगिक शोषण करीत आहे, यासंदर्भात ‘डेर्‍या’तील अनोळखी मुलीचं पत्र अचानक एके दिवशी बाहेर आलं, त्याच्या झेरॉक्स सगळीकडे मिळायला लागल्या, लोक कुजबुज करायला लागले; पण समोर येऊन कोणीही बाबाविरोधात बोलत नव्हते.

सिरसामध्ये डेरा सच्चा सौदा आश्रमाने शाळा, कॉलेजेस काढली, तेथील भक्त मंडळी आपल्या मुलांना अ‍ॅडमिशन घेऊ लागली; त्यातही मुला-मुलींची शाळा-कॉलेजेस वेगळी होती.

आश्रमात असणार्‍या शाळा-कॉलेजमधील सुंदर मुलींना ‘पित्या’नं; म्हणजे रामरहीमनं ‘सेवे’साठी बोलवलं आहे, असं सांगून त्याच्या गुहेत नेलं जात असे आणि तिथं त्यांचे बाबा रामरहीमकडून लैंगिक शोषण केले जात असे. अशा पीडित मुलींनी ‘रामरहीमने काय गैरकृत्य केलं,’ हे आपल्या घरी सांगितलं तर बाबाचे भक्त असलेले पालक त्या मुलींवरच अविश्वास दाखवत. बाबाविरोधी बोलणार्‍या काही मुलींना ‘डेर्‍या’त मारझोड केली जात असे. त्यांना आश्रमात धड जगता येणार नाही; बाहेरही जगता येणार नाही, अशी त्यांची असहाय्य अवस्था केली जात असे.

2002 मध्ये ‘डेरा सच्चा सौदा’चा भांडाफोड करणारं एक निनावी पत्र एका पीडित मुलीनं लिहिलं. ते पत्र छापण्याचं धाडस कोणीही करेना, तेव्हा ते पत्र रामचंद्र छत्रपतींनी आपल्या ‘पुरा सच’ या सायंदैनिकात जसंच्या तसं छापलं, त्यामुळे पंजाब, हरियाणात मोठी खळबळ उडाली. लोक बाबा रामरहीमच्या विरोधात कुजबुज करू लागले. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, पण पहिल्यांदाच बाबा रामरहीम याच्या विरोधात वातावरण तयार झालं. त्यामुळे पंजाब-हरियाणा हायकोर्टानं ‘त्या’ मुलीच्या ‘पत्रा’ची आपण होऊन (sue moto) दखल घेतली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे जिल्हा न्यायाधीशांना आदेश दिले.

रामचंद्र छत्रपती या ‘पत्र-प्रकरणा’चे रोजचे ‘अपडेट’ आपल्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध करू लागले. ‘डेर्‍या’ने जमिनी बळकवल्याबद्दल लिहू लागले. रामचंद्र छत्रपतींच्या या पत्रकारितामुळे आपल्या धार्मिक, आर्थिक साम्राज्याला हादरा बसू शकतो, हे चतुर रामरहीमनं ओळखलं, तो छत्रपतींच्यावर हरप्रकारे दबाव टाकू लागला. भक्तांकरवी ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे खोटे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले, जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या; पण माझे वडील दबले नाहीत. याची परिणती त्यांच्या खुनात झाली.

बाबा रामरहीमच्या भक्त गुंडांनी रामचंद्र छत्रपतींवर राजरोस हल्ला केला?

अंशुल : हो ना… 24 ऑक्टोबर 2002च्या संध्याकाळी घराबाहेर आमच्या वडिलांना कोणीतरी मोठ्यानं हाक मारली. कोण आलं आहे, ते पाहण्यासाठी वडील बाहेर गेले, तेव्हा दोन तरुणांनी त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करत पाच गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या आवाजानं आम्ही भावंडं बाहेर पळत आलो तर गेटजवळ वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. गोळीबार करणारे युवक पळून जात होते, तेव्हा आम्ही भावंडांनी मोठ्यानं आरडाओरडा केला. त्यामुळे आमचे शेजारी गोळा झाले, शेजार्‍यांच्या कारमधून वडिलांना तातडीने आम्ही सिरसा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले.

आमच्या घरापासून जवळच पोलीस चौकी आहे. आमचा आरडाओरडा ऐकून तेथील तैनात पोलीस सावध झाले. त्याच्या समोरूनच ते हल्लेखोर पळून जात होते. एका धाडसी पोलीस शिपायाने पाठलाग करून तिथेच एका हल्लेखोराला पकडलं; पण दुसरा निसटला. त्याच्याजवळील बंदूक, वॉकीटॉकी, गाडी आणि इतर सर्व वस्तू सापडल्या. या सर्व वस्तू म्हणजे बंदूक, वॉकीटॉकी ‘डेरा सच्चा सौदा’च्या मॅनेजरच्या नावाने रजिस्टर होत्या. त्यामुळे या खुनात बाबा रामरहीमचा हात आहे, हे प्रथमदर्शनी स्पष्ट दिसत होते.

मग सरकारने रामरहीमविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला का?

अंशुल : अजिबात नाही. कारण तत्कालीन हरियाणा सरकार मतांसाठी रामरहीमच्या बाजूने होते. या सरकारचे रामरहीमला आतून सहकार्य होते. पोलीस आम्हाला सहकार्य न करता उलट त्रासच देत असत. रामरहीमचा आमच्यावर दबाव होता. नैतिक आणि विचारी जनांची ताकद सोडली तर आमच्याकडे कोणतीच ताकद नव्हती. आम्हाला लोकशाही मार्गाने सगळं करायचं होतं.

या खुनानंतर सिरसामध्ये ‘जन संघर्ष मंच’ आणि ‘पुरोगामी तर्कशील संघटनां’नी मोठे आंदोलन पुकारले, वकिलांनी संप पुकारला, पत्रकार संघटनाही या आंदोलनात उतरल्या. बाबा रामरहीमविरोधात मोठे जनआंदोलन संपूर्ण हरियाणा आणि पंजाब राज्यात उभे राहिले. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री चौटाला वडिलांना भेटायला हॉस्पिटलमध्ये आले. त्यावेळी मुखमंत्र्यांनी, ‘या खुनामध्ये कितीही मोठी व्यक्ती असली तरी तिच्यावर सरकार नक्की कारवाई करेल,’ असे आश्वासन दिले; पण त्याप्रमाणे मुख्यमंत्री वागले नाहीत.

हल्ला झाल्यानंतरही वडील 15 दिवस हॉस्पिटलमध्ये जिवंत होते. मृत्यूशी अखेरची झुंज देत होते. यावेळी आम्ही पोलिसांकडे मागणी करूनही या खून खटल्यात अत्यंत महत्त्वाचा ठरला असता, असा माझ्या वडिलांचा ‘ऑन रेकॉर्ड’ न्यायालयीन जबाब पोलिसांनी शेवटपर्यंत नोंदवला नाही. आम्ही मागणी करूनही ‘एफआयआर’मध्ये ‘डेरा सच्चा सौदा’ आणि बाबा रामरहीम यांचे नाव पोलिसांनी नोंदवले नाही.

खुनातील मुख्य सूत्रधारावर कारवाई व्हावी म्हणून तुम्ही जो न्यायालयीन लढा दिला, त्याच्याविषयी सांगा?

अंशुल : हरियाणा सरकार व पोलीस हे संपूर्णपणे बाबा राम रहीमला अप्रत्यक्षपणे पाठीशी घालत होते, हे आम्ही पाहत होतो. त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळणार नव्हता. ‘डेर्‍या’चे भक्त असणार्‍या हल्लेखोरांची ओळख पटूनही ‘डेर्‍या’चा प्रमुख रामरहीम याची साधी पोलीस चौकशी होऊ शकत नव्हती. त्यामुळे आम्ही याविरोधात पंजाब-हरियाणा हायकोर्टात जायचं ठरवलं. त्यानुसार वडिलांच्या वकीलमित्रांकडून चंदीगड हायकोर्टात मी एक याचिका दाखल केली. या याचिकेत आम्ही अशी मागणी केली केली की, ‘हरियाणा पोलीस या प्रकरणात पक्षपातीपणा करत आहेत, प्राथमिक पुरावे बाबा रामरहीमच्या विरोधात असूनही त्याला आरोपी केले जात नाही, तेव्हा हे प्रकरण हरियाणा पोलांसाकडून काढून घेऊन ते सीबीआय कडे द्यावे.’

आम्ही कोर्टात गेल्याचा राग मनात धरून पोलिसांनी हे प्रकरण रामचंद्र छत्रपतींच्या सासूरवाडीतील एका जमिनीच्या वादातून घडलं आहे, असं धादांत असत्य पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. या प्रकरणाला अशा रीतीनं वेगळं वळण देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.

या अगोदर 10 जुलै, 2002 रोजी ‘डेरा सच्चा सौदा’चा मॅनेजर रणजित सिंग याचा खून झाला होता. त्यानंच ते पत्र बाहेर काढलं होतं, असा त्याच्यावर संशय असल्यानं त्याला संपवण्यात आलं. आमच्या प्रकरणामुळे बाबा रामरहीमविरोधात वातावरण तयार झाले होते, तेव्हा मॅनेजर रणजित सिंगच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या खुनाची सीबीआय चौकशी व्हावी, म्हणून हायकोर्टात याचिका दाखल केली. या दोन्ही याचिका हायकोर्टात एकत्रित सुनावणीला आल्या, तेव्हा रामरहीमनं दिल्लीतील सुप्रीम कोर्टातील मोठमोठे वकील प्रचंड फी देऊन आमच्या विरोधात उभे केले; पण कोर्टाने योग्य साक्षी-पुरावे तपासून सीबीआय चौकशीची ‘जॉईंट ऑर्डर’ दिली.

सीबीआय चौकशीवेळीही मोठमोठे अडथळे आणले गेले, त्याविषयीही सांगा

अंशुल : हायकोर्टाने सीबीआयकडे तपास सोपविण्याच्या या निर्णयाविरोधात बाबा रामरहीम सुप्रीम कोर्टात गेला. तेव्हा सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या या निकालावर ‘स्टे’ दिला, तेव्हा तेथील अवघड लढाईत सुप्रसिद्ध विधिज्ञ राजेंद्र सच्चर यांनी आमचे वकीलपत्र घेऊन मोठे सहकार्य केले. त्यांनी ही केस सुप्रीम कोर्टात विनामोबदला लढवली व आमच्या बाजूने निकाल लागला. आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बाबा रामरहीमची सीबीआय चौकशी सुरू झाली.

तपास यंत्रणेवर सरकार आणि बाबाचा दबाव होता. ‘डेरा’चे भक्त तपासात अडथळा आणत असत. साक्षीदारांच्या गावी सीबीआय पोलीस गेले की, बाबाचे हजारो भक्त त्या गावात जमा होऊन पोलिसांचीच नाकाबंदी करत. पोलिसांना त्या गावातून बाहेर पडू देत नसत. जमाव पांगवण्यासाठी सीबीआय राज्य पोलिसांना विनंती करत असे; परंतु राज्य पोलीस सीबीआयला सहकार्य करत नसत, तरीही सीबीआयचे निर्भीड अधिकारी सत्यपाल सिंगजी, सतीश डागरजी आणि त्यांच्या हाताखाली काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी उत्तम काम केलं. या केसच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला. रामचंद्र छत्रपती यांचा खून बाबा रामरहीम याच्या सांगण्यावरून केला गेला, असा निष्कर्ष सीबीआयने काढला आणि तो कोर्टात सिद्धही झाला. कोर्टाने बाबा रामरहीमला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

केवळ सीबीआयमुळे वडिलांची हत्या, मॅनेजर रणजित सिंग यांची हत्या आणि साध्वीवरील लैंगिक अत्याचार या प्रकरणांच्या मुळाशी जाऊन अंतिम निष्कर्षापर्यंत पोचता आलं. हे सगळं घडत असताना कोर्टात रामरहीमचा ड्रायव्हर खट्टरसिंग यांची साक्ष महत्त्वाची ठरली. कारण त्यांच्यासमोरच खुनाचा कट रचला गेला होता.

(ही मुलाखत घेत असतानाच एक बातमी येऊन धडकली, ‘बाबा रामरहीमला तुरुंग प्रशासनाने 3 आठवड्याची रजा (फर्लो) मंजूर केली आहे.’ मी त्या संदर्भात लगेचच प्रश्न केला-)

अनेक निरपराध विद्यार्थ्यांना, विद्वानांना सहजासहजी बेल मिळत नाही, तुरुंगात खितपत पडावं लागतं. या पार्श्वभूमीवर आपण या घटनेकडे कसे बघता?

तेव्हा ते म्हणाले, बाबा रामरहीमला ज्यावेळी ही सुट्टी तुरुंग प्रशासनाने दिली आहे, ती वेळ तुम्ही बघा. सध्या पंजाब व उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. बाबा रामरहीमला मानणारा मोठा समुदाय अजूनही पंजाब व पश्चिम उत्तर प्रदेश राज्यात आहे. बाबाच्या भक्तांची मते आपल्या पक्षाला मिळावीत, असा ‘छुपा’ उद्देश या रजेमागे आम्हाला दिसतो. बाबांच्या भक्तांच्या मतावर काही राजकीय पक्षांचा डोळा आहे, म्हणून हे बाबासोबत केलेले साटेलोटे आहे. नाहीतर दोन खून आणि दोन बलात्कार अशा चार फौजदारी गुन्ह्यांबद्दल आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या बाबावर प्रशासन इतके का ‘प्रसन्न’ होते? का ‘मेहेरबान’ होते? या रजेची निष्पक्ष चौकशी निवडणूक आयोगाने करावी आणि बाबाची रजा त्वरित नामंजूर करावी, अशी मागणी मी केली आहे. यासंबंधी अनेक वृत्तवाहिन्यांवर मी अलीकडेच माझ्या मुलाखती दिल्या आहेत.

सतरा वर्षे तुम्ही न्यायालयीन लढाई लढलात. या सर्व संघर्षाबद्दल तुम्हाला आता काय वाटतं?

अंशुल : ही लढाई लढणं म्हणजे स्वत:ला, स्वतःच्या कुटुबांला मोठ्या संकटात ओढवून घेणं होतं. सरकार, पोलीस, महाबलाढ्य बाबा आणि त्याचं आर्थिक साम्राज्य हे सर्व आमच्या विरोधी असूनही आपल्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही झटत होतो; आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुलींचं राजरोस लैंगिक शोषण करणार्‍या या बाबाला शिक्षा झालीच पाहिजे, हा आमचा विचार होता. या बाबाला शिक्षा झाली तरच अजून काही मुली त्याच्या शोषणापासून वाचतील, तेव्हा हे काम आपण केलेच पाहिजे, असा माझा आतला आवाज मला सांगत होता. त्यासाठी आपल्याला आपल्या वडिलांप्रमाणेच मरण आलं तरी बेहत्तर, असं मनोमन ठरवूनच या लढाईच्या मैदानात मी उतरलो होतो.

भारतीय संविधानातील नागरिकांच्या हक्कावर माझा अपार विश्वास होता. कितीही मोठा बाबा असू दे, पोलीस असू दे, सरकार असू दे, भारतीय संविधानानं दिलेले हे हक्क कोणीही आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही, हे मला पक्कं ठाऊक होतं. याच संविधानाच्या हक्काच्या पाठिंब्याने मी ही लढाई लढून जिंकू शकलो. एका मोठ्या बाबाला जन्मठेपेची शिक्षा देऊ शकलो.

या सर्व लढाईत मानसिक आधार देण्याचे, कायदेशीर लढाईत साथ देण्याचे काम ज्यांनी केले, त्यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. त्यांच्या सहकार्याची परतफेड मला करता येऊ शकत नाही.

माझ्या वडिलांसारखेच बुवा-बाबाच्या हल्ल्यात प्राणांची आहुती देणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या नावाने आज हा पुरस्कार मला मिळतोय, याचा आनंद किती झाला आहे, हे मी शब्दांत सांगू शकत नाही. मी महाराष्ट्र फाउंडेशन, मासूम संस्था, साधना साप्ताहिक, डॉ. हमीद दाभोलकर व आमचे मित्र राहुल थोरात यांचा मन:पूर्वक आभारी आहे.

शेवटी एवढेच सांगतो की, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि माझे वडील रामचंद्र छत्रपती यांनी ही जी बुवाबाजीविरोधी लढाई सुरू केली आहे, ती नक्की यशस्वी होईल. या महान हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.

मुलाखतकार : राहुल थोरात, सांगली

94224 11862

मुंकुद टाकसाळे यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांच्या 2022’च्या स्मरणिकेतून साभार


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]