प्रभाकर नानावटी -
![](https://anisvarta.co.in/wp-content/uploads/2023/04/Darvin.jpg)
‘उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा’ या डॉ. अरुण गद्रे यांच्या पुस्तकावरून बरेच वादंग उठले. त्या पुस्तकातील मांडणीची चिरफाड करणारे दोन लेख आम्ही मागील अंकात छापले होते. पण ते लेख पुस्तकातील मांडणीच्या अनुषंगाने होते. म्हणून आम्ही ते पुस्तक बाजूला ठेवत ‘डार्विन ः उत्क्रांतीचा सिद्धांत’ या विषयीच्या विविध पैलूंची माहिती वाचकांना करून देण्याच्या उद्देशाने, ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी यांचे हे सदर दरमहा चालू करीत आहोत. – संपादक
‘फिलॉसॉफर्स मॅगेझिन’ नावाच्या तत्त्वज्ञानाला वाहिलेल्या मासिकाने अलीकडेच एक ‘जन’मत चाचणी घेतली. काल्पनिक अशा एका जागतिक ग्रंथालयाला आर्थिक अडचणीमुळे केवळ पाच तत्त्वज्ञांच्या पुस्तकांचा संग्रह ठेवावयाचे असून त्यासाठी कुठल्या तत्त्वज्ञांची निवड करावी याविषयी मते मागितली होती. अपेक्षेप्रमाणे प्लेटो, कांट, अरिस्टॉटल, देकार्त, विटगिन्स्टाइन व ह्यूम यांची नावे त्यात होती. परंतु या जगद्विख्यात तत्त्वज्ञांच्या यादीत तिसर्या क्रमांकावर डार्विनचे नाव वाचून संपादकांना आश्चर्याचा धक्का बसला. याविषयीचा एक स्फुट लेख ‘दि लॅन्सेट’ या साप्ताहिकात आला आहे.
रूढ अर्थाने डार्विन हा तत्त्वज्ञ नाही. तत्त्वज्ञानाचे अभ्यासक चिकित्सा, निरीक्षण, संशोधन, प्रयोग व विश्लेषण यावर भर देत असले तरी तात्त्विक अभ्यासाच्या मर्यादांची पुरेपूर कल्पना त्यांना असते. परंतु डार्विन हा निष्णात निरीक्षक व प्रयोग-कर्ता होता. कार्य-कारण यंत्रणा कशी काम करते यावरून सजीव प्राण्यांची वाटचाल कशी झाली हे तपासण्यात त्याने आपले अर्धेअधिक आयुष्य वेचले. तो हाडाचा वैज्ञानिक होता. तरीसुद्धा मत नोंदवणारे बहुतेक तत्त्वज्ञ डार्विनला तत्त्वज्ञांच्या यादीत वरचा क्रमांक का देत असतील? एक शक्यता अशी आहे की, अनुभवजन्य व तात्त्विक संशोधनामध्ये मूलभूत फरक असूनसुद्धा तत्त्वज्ञान व विज्ञान यांच्यामध्ये फार मोठी दरी नाही. विज्ञानात आनुभविक कार्याला प्रधानता असली, तरी तेथेच ती संपत नाही. थॉमस कुन (Kuhn) यांच्या मते, विज्ञानाच्या प्राथमिक अवस्थेत आणि वैज्ञानिक क्रांतीच्या काळातसुद्धा तात्त्विक विचार हा विज्ञानाच्या पाठीचा कणा होता आणि असतो.
सामान्यपणे बौद्धिकदृष्ट्या जास्त श्रमांची अपेक्षा करणार्या विज्ञान व्यवहारांचा पाया एखादा सिद्धांतच असतो. उदाहरणार्थ, क्रिक व वॅटसन यांचा जनुक सिद्धांताचा पाया रेण्वीय सिद्धांत हा होता. आइन्स्टाईन यांचे सर्व वैज्ञानिक संशोधन न्यूटनच्या नियमांच्या चौकटीला अनुसरून होते. वैज्ञानिक संशोधनामुळे मूलभूत सिद्धांतांना धक्का बसल्यानंतर मात्र जग वैज्ञानिकांकडे डोळे विस्फारून बघू लागते. या विरोधाभासाच्या प्रसंगात अनुभवजन्य माहितीपेक्षा मूळ सिद्धांताला धक्का देणार्या माहितीतून अर्थबोध करून घेण्याची गरज भासते. याच गरजेतून तात्त्विक चिंतनाला चालना मिळू लागते.
अशा प्रकारच्या अनेक विरोधाभासांचा सामना डार्विन व त्यांच्या समकालीनांना करावा लागला. पृथ्वीवरील जीवोत्पत्तीबद्दलच्या पारंपरिक, धार्मिक संकल्पनांना छेद देणारे अनेक पुरावे त्यांना सापडले होते. परंतु या पुराव्यांची तार्किक मांडणी करून सुसंबद्ध अशा एखाद्या सिद्धांताची रचना करून लोकांसमोर ठेवण्यास ते मागेपुढे बघत होते. डार्विनचे अनुभवजन्य ज्ञान त्याच्या विचारप्रक्रियेला गती देत होते. लोकक्षोभाचा धोका पत्करून त्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.
जीवनकलह, प्राण्यांमधील अंगभूत विविधता आणि नैसर्गिक निवड यांच्या योगे जीवसृष्टीत उत्क्रांती होत गेली, हा डार्विनच्या सिद्धांताचा गाभा होय. हा सिद्धांत अनुभवजन्य संशोधनाचे फलित नसून अगदी साध्या वाटणार्या वस्तुस्थितीच्या निरीक्षणावर आधारित होता. सजीवांची संतती व त्यांना जन्म देणारे यांच्यात साम्य असते व जन्माला येणार्या संततीची संख्या दीर्घकाळ जिवंत राहू शकणार्या संततीपेक्षा जास्त असते, ही वस्तुस्थिती नजरेआड करण्यासारखी खचितच नव्हती.
तरीसुद्धा डार्विनचे कार्य अरिस्टॉटल, न्यूटन वा आईन्स्टाईन यांच्या तात्त्विकतेच्या तोडीचे नव्हते. परंतु मासिकाच्या वाचकांना डार्विनला झुकते माप देताना तत्त्वज्ञान व विज्ञान यातील अन्योन्यता भावली असेल. विज्ञानातील प्रगती तत्त्वज्ञानाच्या कार्यावर प्रभाव पाडू शकते, या दृष्टिकोणातून बघितल्यास डार्विनचे तात्त्विक विचार इतर कुठल्याही वैज्ञानिकापेक्षा नक्कीच सरस ठरतील.
डार्विनच्या तर्कशुद्ध वैचारिक मांडणीवर त्या काळच्या जगाचे प्रतिनिधी तुटून पडले. हा धक्का त्यांना सहन करता न येण्यासारखा होता. डार्विनच्या काळापर्यंत या गुंतागुंतीच्या विश्वाचा अर्थ शोधण्यास केवळ ‘चैतन्य’ पुरेसे आहे असे वाटत होते. डार्विन मात्र ही जटिल वाटणारी विश्वरचना साध्या सरळ अशा नैसर्गिक प्रक्रियेचे फलित आहे असे ठामपणे सांगत होता. या वैचारिक मांडणीमुळे तत्त्वज्ञानाच्या प्रांतात फार मोठा फरक जाणवू लागला. नेहमी विचारत असलेल्या तात्त्विक प्रश्नांंच्या स्वरूपांना कलाटणी मिळाली. या व्यतिरिक्त मन, नीति, तत्त्वमीमांसा, ज्ञानमीमांसा, विश्वोत्पत्तिशास्त्र अशा तत्त्वज्ञानविषयक ज्ञानशाखांचे स्वरूपच आमूलाग्र बदलले. डार्विनचे नाव तत्त्वज्ञांच्या यादीत असणे कदाचित विसंगत वाटेल. तरीसुद्धा या काल्पनिक ग्रंथालयात डार्विनला, अभूतपूर्व सिद्धांतासाठी का होईना, तत्त्वज्ञांच्या पंक्तीत बसवणे योग्य ठरेल. डार्विन तत्त्वज्ञ असो वा नसो, त्याने मांडलेला सिद्धांत मात्र तत्त्वज्ञांना भेडसावणार्या अनेक प्रश्नांचे उत्तर शोधण्यात फार मोठ्या प्रमाणात हातभार लावू शकला, हे मात्र निश्चित.
क्रमशः