साने गुरुजींचा पंढरपूरमधील मंदीर प्रवेश लढा

अ‍ॅड. देविदास वडगावकर - 9423073911

योगायोगाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसे पाहायचे, मला माहीत नाही. माझ्या आयुष्यात खूप योगायोग आले आहेत. एप्रिल 2021 मी कोरोनाग्रस्त झालो. तेव्हा मी एक प्रकारची अस्पृश्यता अनुभवत होतो. मी वैद्यकीय कारणामुळे समर्थनीय होतो; पण हजारो वर्षेरास्त कारणांशिवाय पिढ्यान्पिढ्या ज्यांच्या वाट्याला अस्पृश्यता आली, त्यांच्या अनुभवाची अनुभूती मी या काळात घेऊ शकलो. अशा प्रकारचे मंथन माझ्या मनात चालू असतानाच साधना प्रकाशन, पुणे यांच्याकडून ‘साने गुरुजींचा पंढरपूर प्रवेश लढा’ हे पुस्तक भेट मिळाले. साने गुरुजींनी स्वातंत्र्याचा लढा ऐन शेवटच्या टप्प्यात आला असताना दि. 1 ते 10 मे 1947 दरम्यान पंढरपूरचे पांडुरंगाचे मंदिर अस्पृश्यासाठी खुले व्हावे, म्हणून उपोषण केले आणि मंदिर खुले झाले. राजकीय स्वातंत्र्यासोबत धार्मिक आणि सामाजिक स्वातंत्र्याचा लढा म्हणून या उपोषणाची नोंद आहे. या लढ्याचा दस्तऐवज म्हणजे हे पुस्तक.

साने गुरुजींची प्रिय पुतणी सुधा साने-बोडा यांनी हा दस्तऐवज संकलित केला आहे. 1997 साली उपोषणाला 50 वर्षे पूर्ण झाली म्हणून असे पुस्तक प्रकाशित झाले होते. आता या लढ्याला 75 वर्षेपूर्ण होत आहेत, म्हणून थोडीशी भर घालून साधना प्रकाशन, पुणे यांनी ही दुसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे; म्हणजे 75 वर्षांनंतरही या लढ्याची प्रस्तुतता संपली नाही, हे खरेच. परिवर्तनाच्या चळवळीत काम करणार्‍यांसाठी ही बाब चिंताजनक आहे. आजही मंदिरप्रवेशासाठी सामाजिक लढे, न्यायालयीन लढे उभारावे लागतात. याला काय म्हणायचे?

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शनि शिंगणापूरच्या शनि मंदिरांच्या चबुतर्‍यावर जाऊ देण्याबाबत मोठा संघर्ष केला होता; म्हणजे या विषयाचा थेट संबंध आपल्या कामाशी आहे, म्हणून या पुस्तकाचा परिचय करून घेणे, ज्याद्वारे असे लढे उभारताना काय प्रश्न समोर येतात, राजकारण कसे असते, धार्मिक आणि आर्थिक हितसंबंध बाजूला सारण्यासाठी कशा ढाली समोर केल्या जातात वगैरेंची माहिती आपल्याला येऊ शकते.

पुस्तकाचा परिचय करून देण्यापूर्वी मला दोन महत्त्वाचे मुद्दे नोंदवायचे आहेत. साने गुरुजींनी पंढरपूरला या कारणासाठी उपोषण करण्याचा मनोदय व्यक्त केल्यानंतर अनेक लोकांनी त्यांना, उपोषणापूर्वी महाराष्ट्राचा दौरा करा, लोकांचे प्रबोधन करा, असे सुचविले होते. साने गुरुजींनी हा प्रस्ताव मान्य केला. मग दौरा आखला. राष्ट्र सेवादल प्रणित एक कलापथक त्यांच्या दौर्‍यात सामील होते. सेनापती बापट यांच्यासह अनेक जण या प्रबोधन पर्वात गुरुजींसोबत होते. या प्रबोधन दौर्‍याचा दोन प्रकारे फायदा झाला. गावोगावी मंदिरे, जी पूर्वी अस्पृश्यांना अप्रवेशित होती, ती खुली झाली. जनमानस मंदिरप्रवेशाच्या बाजूने उभे राहण्यास मदत झाली. दुसरा परिणाम असा झाला की, मंदिर खुले झाल्यानंतर सर्वजण त्याचा लाभ घेऊ लागले. कुणाला तसे करताना संकोच वाटत नव्हता; म्हणजे आज जरी कुणी पंढरीच्या दर्शनाला गेला, तर कधी काळी कितीतरी वर्षे अस्पृश्यांना या देवळात प्रवेश मिळत नव्हता, याचा कसलाही मागमूस लागणार नाही. स्त्रीमंदिरप्रवेशाचा आजच्या काळात विचार करता किती तरी स्त्रिया मासिक पाळीच्या काळात मंदिरापासून स्वत:हून दूर राहतात; म्हणजे अजून त्यांच्या मनाची तशी तयारी होत नाही.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे 1947 साली महात्मा गांधीजी नावाचे गारूड समाजमनावर होते. ते स्वाभाविक होते. खुद्द महात्मा गांधीजींनी साने गुरुजींना या कारणास्तव उपोषणास बसू नका, असा आग्रह धरला होता. साने गुरुजींना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी महात्मा गांधीजींनी प्रयत्न केले. त्यांची भूमिका थोडीशी वेगळी होती. ती तशी का होती, याचे विश्लेषण पुस्तकात आले आहे. साने गुरुजींवर महात्मा गांधींचा प्रभाव होता. पण गुुरुजींनी महात्मा गांधीजींना कळविले की, ‘मी उपोषण करणार.’ त्यांनी तसे केले, हे खूप महत्त्वाचे होते व आहे. गुरुजींनी स्वीकारलेल्या आपल्या उत्कृष्ट ध्येयापुढे महात्मा गांधींना अत्यंत नम्रपणे; पण ठामपणे नाकारले, हे महत्त्वाचे आहे. गुरुजींनी याबाबत जी कारणे दिली आहेत, ती विवेकवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी भविष्यात अमलात आणण्यासाठी कोणत्याही दबावाला बळी पडायचे नाही, असा तो मूल्य विचार आपल्यासाठी महत्त्वाचा.

1997 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकात आता विभाग चार म्हणजे ‘साने गुरुजींचा पंढरपूर मंदिरप्रवेश आणि हिंदू धर्मसुधारणा’ हा चैत्रा रेडकर यांचा अवधूत डोंगरे यांनी अनुवाद केलेला लेख समाविष्ट केला आहे. तो उचित आहे. त्यात बरीच सैद्धांतिक मांडणी आहे.

विभाग एक – यामध्ये साने गुरुजींचे आपल्या उपोषणामागची भूमिका स्पष्ट करणारे एकूण तीन लेख आहेत. सेनापती बापट यांच्या भाषणाचा गोषवारा आहे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे संपादक असलेल्या ‘नवयुग’ दैनिकाचा विशेषांक काढला होता. त्यात गुरुजींनी दिलेले संदेश पुस्तकात आहेत. आचार्य अत्रे यांनी उघडपणे गुरुजींच्या उपोषणाला पाठिंबा दिला. दैनिकाचा विशेषांक काढून स्वत: उपोेषणास बसलेल्या साने गुरुजींना भेटायला आले. त्यांनी जोरदार भाषण केले. ते भाषण या पुस्तकात आहे. विभाग दोनमध्ये प्रा. डॉ. जयंत जोशी आणि प्रा. डॉ. ग. ना. जोशी यांचे तत्कालीन लेख आहेत. गुरुजींनी उपोषणाआधी जो दौरा केला, त्यात सहभागी असणार्‍या काहींच्या आठवणी आहेत. यामध्ये कुतुब वडगावकर नावाचा गृहस्थ कलापथकात होता. हे वाचून या वडगावकरांना आनंद झाला. शाहीर लीलाधर हेगडे, प्रा. चंद्रकांत पाटगावकर, राजाभाऊ मंगळवेढेकर, दादासाहेब रूपवते अशा मान्यवरांचे अनुभव आहेत.

पुस्तकातला भाग तीन तसा महत्त्वाचा आहे. कारण उपोषणादरम्यान घडलेल्या घटनांचा वृत्तांत आहे. लोकसभेचे पहिले सभापती दादासाहेब माळकर यांनी डायरीवजा केलेले लिखाण बर्‍याच घडामोडी उलगडून दाखविले. दै. ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या या विभागात आहेत. त्यामुळे उपोषणाच्या दहा दिवसांतल्या क्रमवार घडामोडी कळण्यास मदत होते.

परिशिष्टात साने गुुरुजींचा जीवनपट आहे. एकूण सुमारे 176 पानांच्या पुस्तकात सुद्धा साने-बोडा यांच्या दोन प्रस्तावना आहेत. त्या वाचताना त्यांना हा हस्तसंकलित करताना किती व कुणाकुणाची मदत झाली, हे स्पष्ट होते; पण त्याचबरोबर हेही स्पष्ट होते की, एवढा क्रांतिकारी लढा, अनेक दिवस प्रबोधिक दौरे, दहा दिवसांचे प्राणांतिक उपोषण घडले असताना, पुरोगाम्यांना त्याचा दस्त करता आला नाही. ही उणीव फार महत्त्वाची आहे. आजही त्यात फारसा बदल झालेला दिसत नाही. वास्तविक, राष्ट्र सेवादलासारखी संघटना यात सक्रिय होती. याचे अनेक तपशील यात येतात; पण तरीही हे घडले याचे मनन, चिंतन व्हायला हवे. ­

‘साधना प्रकाशन’चे संपादक विनोद शिरसाठ यांचे प्रयोजन उचित आहे. मुखपृष्ठ कृष्णधवल असले, तरी आकर्षक आहे. महाराष्ट्राच्या एका धार्मिक, सामाजिक आणि राजकीय लढ्याचा आशय आणि तपशील समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवेच.

अ‍ॅड. देविदास वडगावकर

संपर्क : 9423073911

पुस्तकाचे नाव : साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा
संकलन : सुधा साने-बोडा
प्रकाशक : साधना प्रकाशन, 431, शनवार पेठ, पुणे 30

किंमत : रू 150
पुस्तकासाठी संपर्क : 9921098290


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]