21 सप्टेंबर 1995 – अंधारलेला दिवस

-

पंचवीस वर्षांपूर्वी, 21 सप्टेंबर 1995 ला गणेश दुग्धप्राशनाची अफवा सगळ्या देशभर पसरली आणि जो-तो हातात दुधाची वाटी आणि चमचा घेत गणपतीच्या मूर्तीपुढे गणपतीला दूध पाजण्यासाठी रांगा लावू लागला. ‘त्या’ दिवसाच्या भयंकर गोंधळाचे वर्णन एका मराठी वृत्तपत्राने आपल्या संपादकीयाला ‘अंधारलेला दिवस’ असे शीर्षक देत केले होते. त्यात म्हटले होते – माणसे शिकली की शहाणी होतात, हा समज कसा तडकाफडकी निकालात निघाला, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीत भारताचा क्रमांक कितवा आहे, याची चर्चासुद्धा मातीमोल ठरली, अवकाशात सोडलेले उपग्रह अवकाशात विरून गेले; उरली ती फक्त झुंबड, सामूहिक बेभानपणा आणि मंदिरातील श्रद्धापिसाटांची गर्दी. गुरुवारी अख्ख्या भारतवर्षात हा भयसूचक अंधार दाटून आला होता. या अंधाराच्या सावल्या तिकडे – ब्रिटन, अमेरिका, नेपाळपर्यंत पोेचलेल्या होत्या. पण त्या अंधारालाही प्रकाशाची किनार होती. त्या अवैज्ञानिक, अविवेकी झुंडीपुढे बुद्धिवादी, शास्त्रज्ञ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या देशभरातील विवेकवादी व पुरोगामी, डाव्या संघटना आपल्या ताकदीनुसार उभ्या राहिल्या व त्यांनी या चमत्काराचा भांडाफोड केला. हा चमत्कार नाही, त्यामागचे विज्ञान त्यांनी त्याच क्षणी निर्विवादपणे पुढे आणले; पण या अफवेचा उगम कोठे होता? ती पसरवण्यामागचे सूत्रधार कोण? कुणाचे हितसंबंध होते, या बाबी मात्र चौकशीच्या मागण्या करूनही आजवर ‘गूढ’च राहिल्या आहेत, जशी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या सूत्रधारांबाबतची ‘गूढता’ आज सात वर्षांनंतरही कायमच आहे.

बुवा-बाबांच्या कथित चमत्कारांचा प्रत्यक्षात; तसेच गावोगावी प्रात्यक्षिकाच्या कार्यक्रमांद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोनाने भांडाफोड करणे, हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचे नित्याचेच काम आहे. दैववाद, नियती, प्रारब्ध, दैव, विधिलिखित, कर्मविपाक वगैरे बुबाबाजीची जशी हत्यारे आहेत, तसेच हे कथित ‘चमत्कार’ हेही बुवा-बाबांचे एक हत्यारच आहे. सत्य साईबाबा त्यांच्या चमत्कारांना आधुनिक भाषेत ‘व्हिजिटिंग कार्ड’ म्हणायचे. देवाधिकांचे, संत-महात्म्यांचे चमत्कार भक्तिभावाने सांगण्याची, ऐकण्याची हजारो वर्षांची परंपरा आपल्याकडे आहे. चमत्काराला शरण गेलेल्या या मानसिकतेचे बेबंद दर्शन 25 वर्षांपूर्वीच्या 21 सप्टेंबरला गणेश दुग्धप्राशनाच्या चमत्काराच्या निमित्ताने झाले, म्हणूनच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 25 वर्षे 21 सप्टेंबर हा दिवस ‘चमत्कार सत्यशोधन दिन’ म्हणून पाळत आहे. त्या अनुषंगाने 25 वर्षांपूर्वीच्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा व जादूटोणाविरोधी कायदा झाल्याने बुवा-बाबांच्या कथित चमत्कारांना जरब बसली असली, तरी समाजमनातील चमत्कारांना शरण जाण्याच्या मानसिकतेला छेद बसला आहे काय, याचा धांडोळा आम्ही या अंकातील विविध लेखांत घेतला आहे.

दिवसागणिक कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. एकेका दिवसात देशभरात 75 हजार रुग्णांची भर पडत आहे. अर्थव्यवस्थेच्या घसरणीची भयानकता खुद्द रिझर्व्ह बँकच सांगत आहे आणि अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन अपेक्षेपेक्षा संथ गतीने होण्याचा इशारा देत आहे. अचानक घोषित केलेल्या प्रदीर्घ टाळेबंदीमुळे लाखो कामगारांना आपली राहती शहरे, कामधंदे सोडून आपल्या मूळ गावी परतावे लागले. त्यांना जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे त्यांच्या हालांना पारावार उरला नाही. जाताना अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. लाखोंनी नोकर्‍या गेल्या आहेत, जाऊ लागल्या आहेत, बेरोजगारी वाढतच चालली आहे. या सगळ्या परिस्थितीच्या व अर्थव्यवस्थेच्या या दुर्दशेचे खापर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाच्या साथीवर फोडलेले आहे आणि साथीचे खापर देवावर! (याचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निषेध केला असून निर्मला सीतारामन यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.) म्हणजे आता या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी एखाद्या ‘दैवी चमत्कारा’चीच वाट बघण्याची मानसिकता वाढीस लागण्याचीच शक्यता. असे हे एकूणच ‘अंनिस’साठी आव्हानात्मक वातावरण आहे.

अशा या आव्हानात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 31 व्या वर्षात प्रवेश केला आहे. त्यानिमित्ताने घेतल्या गेलेल्या विविध कार्यक्रमांतील मान्यवर वक्त्यांनी ‘अंनिस’ने गेल्या तीस वर्षांत केलेल्या कामगिरीबद्दल अभिनंदन करताना चळवळीपुढील कठीण आव्हानांची जाणीवही करून दिली आहे. या कार्यक्रमांचे या अंकातील वृत्तांत ही जाणीव वाचकांपर्यंत निश्चितच पोचवतील.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]