बलराज आणि ऐश्वर्या यांचा सत्यशोधक विवाह कोल्हापूर येथे संपन्न

सीमा पाटील -

माझा मुलगा बलराज रामदास पाटील (रा. कोल्हापूर) आणि ऐश्वर्या सुनील पाटील (रा. बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली) या दोघांचे मागच्या फेब्रुवारीमध्ये ठरलेले लग्न कोरोना, महापूर, पाऊस यामुळे जवळजवळ सात-आठ महिने पुढे गेले. आधीपासून योजल्याप्रमाणेच रजिस्टर्ड पद्धतीने लग्न करायचं ठरलं. परंतु मुलीकडच्यांना वैदिक पद्धतीने लग्न हवं होतं. गेली सहा-सात महिने या मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन खूप प्रकारे वेगवेगळ्या पोस्ट टाकून, कधी गप्पा मारून वधूकडील मंडळींना खूप मनवण्याचा प्रयत्न केला की, लग्न आपल्याला संवैधानिक मार्गाने रजिस्टर्ड करायचं आहे. ग्रामीण भागातल्या लोकांच्या भावनांचे दाखले देत चार अक्षता टाकून तरी लग्न करा, असा त्यांचा आग्रह होता. ‘ठीक आहे’, ‘बघूया, करूया’ असं करून ‘ऑड डे’ (मुहूर्त नसलेला दिवशी) 19 ऑक्टोबर, 2021 ला कार्यालय ठरवून घेतलं. त्यामुळे 50 टक्के आर्थिक बचत, मुहुर्ताची वेळ मनाला वाटली, ती लोकांना सांगितली. साधारण साडेअकरा.

विवाहप्रसंगी कोणतेही विधी, व्रतवैकल्य न करता जोतिबा फुले यांच्या ‘सत्यशोधक मंगलाष्टका’ आणि अण्णा कडलासकर या आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी रचलेली ‘संवैधानिक अक्षता’ नऊ रागांमध्ये सुश्राव्य सुरात, वाद्यवृंदात गायल्या गेल्या. अक्षता म्हणून तांदळाचा एक कणही टाकला गेला नाही. जोरदार टाळ्या वाजवून लोकांनी वधू-वरांना सदिच्छा दिल्या. माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, सरोजताई पाटील (माई), गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील अशा अनेक मान्यवरांसमोर अशा प्रकारच्या विवाहाची कारणमीमांसा करून लोकांना सामाजिक, आर्थिक, आरोग्याच्या प्रश्नांवर, ती बोलून विवाह सोहळा संपन्न केला. त्यानंतर होणारे कन्यादान, सप्तपदी, होमहवन काहीही केलं नाही. वधू-वरांनी उपस्थितांच्या सदिच्छा घेतल्या व मंडपाबाहेर असलेल्या शेतकर्‍याच्या आणि सैनिकाच्या कट आउटला अभिवादन केले. शेतकरी आणि सैनिकाचा कटाऊट; तेही लोकभावनांचा आदर करून…

लग्नमंडपात कुठल्याही देवाचं, दानवाच प्रतीक म्हणून काही ठेवलं नव्हतं. त्याच संध्याकाळी कोरोनाचं भान ठेवून कमी संख्येत रिसेप्शन ठेवले. घरी आल्यावर दार अडवणे वगैरे गमती-जमतीचे कार्यक्रम पार पडले. उंबर्‍यावरच्या मापाला पाय लावायचा नाही, असा आम्ही सगळ्यांनी निश्चयच केला होता. त्याप्रमाणे नववधूने आणि वराने धान्याने भरलेले माप एका माऊलीच्या पदरात ओतले. वरती तिला पैसेही दिले. त्याच्यानंतर घरात नो सत्यनारायण, नो गोंधळ.. सगळ्या नातेवाईकांना घेऊन धमाल मस्ती, गप्पाटप्पा, सुख-दुःखांची देवाण-घेवाण…आणि असं बरंच काही….सध्या मुलाचा आणि सुनेचा संसार गुण्यागोविंदाने चालू आहे…. –

सीमा पाटील, कोल्हापूर


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]