विजयवाडा येथील नास्तिक केंद्राचे प्रमुख, डॉ. विजयम गोरा यांना विनम्र आदरांजली

-

विजयवाडा, आंध्र प्रदेश येथील नास्तिक केंद्राचे प्रमुख डॉ. विजयम (1936-2020) यांचा 22 मे 2020 रोजी वृद्धापकाळामुळे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे भारतातील नास्तिक चळवळीचे अध्वर्यू कायमचे काळाच्या पडद्याआड अस्तंगत झाले. आपण एका नास्तिकालाच नव्हे, तर एका सच्चा विवेकवादी व मानवतावादीला हरवून बसलो आहोत.

भारतातील पदव्युत्तर शिक्षणानंतर डॉ. विजयम यांनी अमेरिकेतील मार्टिन ल्युथर किंग स्कूल ऑफ सोशियल चेंज येथे ‘अमेरिकेतील अल्पसंख्याकांची व कृष्णवर्णी यांची अहिंसक आंदोलने/चळवळ आणि त्यातून झालेले परिवर्तन’ या विषयावर प्रबंध लिहून डॉक्टरेट पदवी मिळविली. काही काळ डेल्वेर विश्वविद्यालयात संशोधक म्हणून काम करत असताना ते राज्यशास्त्र, संविधान व राजकीय सिद्धांत हे विषय शिकवित होते. तेथून परतल्यानंतर दिल्ली येथील गांधी पीस फौंडेशनचे निर्देशक म्हणून काही काळ जबाबदारी स्वीकारली. नंतर त्यांनी आंध्र विश्वविद्यालयातही प्राध्यापकी केली. त्यानंतर विजयवाडा येथील नास्तिक केंद्राच्या कामाला पूर्णपणे वाहून घेतले. गोरा व श्रेष्ठ गांधीवादी, जे. सी. कुमारप्पा यांनी स्थापन केलेल्या ‘आर्थिक समता मंडल’ या संस्थेचे ते निर्देशकही होते. सुमारे 150 खेड्यांच्या विकासात या संस्थेचा सहभाग होता.

विजयवाडा येथील नास्तिक केंद्राची ओळख जगभरातील मानवतावादी पुरोगामी संघ-संस्थामध्ये आहे. डॉ. विजयमचे वडील गोरा व आई सरस्वती गोरा यांनी 1940च्या सुमारास स्थापन केलेले हे केंद्र त्या परिसरातील सामाजिक कार्याबद्दल गेली 80 वर्षेप्रसिद्धीच्या झोतात आहे. गोरा कुटुंबीय त्या प्रदेशातील अंधश्रद्धांच्या विरोधात लढत होते. जाती निर्मूलनासाठी प्रयत्न करत होते. आंतरजातीय विवाहांना उत्तेजन देत होते. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांचे संपूर्ण कुटुंबच या प्रकारच्या कामात सहभागी होत असे. डॉ. विजयम यांच्या सामाजिक कार्यात त्यांची पत्नी, सुमती (1941-2013) यांचे फार मोठे योगदान होते. 60-70च्या रुढी-परंपरांचा विळखा असलेल्या कालखंडात त्यांचा लग्न समारंभ एका दलित वस्तीत, कुठलाही डामडौल न करता झाला. सुमतीसुद्धा विजयम यांच्या सर्व कार्यक्रमांत हिरिरीने भाग घेत असत. ते स्वतः शिक्षणतज्ज्ञ असल्यामुळे मागासलेल्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये विज्ञानाविषयी, वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी अनेक प्रयोग केले व त्या अनुषंगाने एक-दोन पिढ्या त्यांनी घडविल्या. त्या भागातील देवदासी प्रथेच्या विरोधात या दाम्पत्याने लढा उभारला. ग्रामीण भागातील उद्योगांना पुनरुज्जीवित करून रोजगार उपलब्ध करून दिला.

गेली 60-70 वर्षे विजयम हे समाजात पुरोगामी व विवेकवादी मूल्ये रुजविण्यासाठी प्रयत्नशील होते. आयुष्यभरातील प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगात परमेश्वर या संकल्पनेला इतर कुठलाही पर्याय नसल्याची मानसिकता असलेल्या या समाजात नास्तिकतेची मूल्ये रुजविणे, त्याविषयी चर्चा घडवून आणणे व धर्मनिरपेक्षतेला आयुष्यात महत्त्वाचे स्थान देणे, वाटते तितके सोपे नाही. प्रवाहाविरुद्ध पोहण्यास धाडस लागते. हे धाडस डॉ. विजयम यांच्याकडे असल्यामुळे नास्तिकताच विश्वबंधुत्वाकडे, मानवतेकडे नेणारा मार्ग आहे व त्यातूनच समाजाचा विकास होईल, याची खात्री त्यांना होती. हे मूल्य समाजात रुजविण्यासाठी नास्तिक केंद्रातर्फे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. जाती-पातीत व आर्थिक विषमतेत विखुरलेल्या समाजाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

1977 मध्ये इंग्रजीत ‘अथीस्ट’ व तेलुगु भाषिकांसाठी ’नास्तिक मार्गम’ ही नियतकालिके नास्तिक केंद्रातर्फे ते प्रकाशित करू लागले. डॉ. विजयम या नियतकालिकांमधून नास्तिकता, मानवता, बुद्धिप्रामाण्यता व विवेकी विचारांचा प्रसार करत होते. त्यांनी नास्तिकता, अहिंसकरित्या सामाजिक बदल, मानवी विकास, वैज्ञानिक दृष्टिकोन इत्यादी विषयांवर लेख लिहून त्याविषयी चर्चा घडवून आणल्या. विजयवाडा येथे आतापर्यंत 11 जागतिक नास्तिकता परिषदेचे आयोजन करून मानवता, विकास व विवेकी विचार यांची सांगड कशी घालता येईल, याविषयी या क्षेत्रातील इतर देशातील तज्ज्ञांना बोलते केले. नास्तिकतेतून मानवतेकडे या सूत्राने प्रेरित झालेल्या या परिषदांना पंजाब, हरियाणा, बिहार, बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडू व इतर राज्यांतील प्रतिनिधी हजर राहून चर्चेत सहभाग घेत होते. वर्ल्ड ह्युमॅनिस्ट काँग्रेस व फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोशिएशनच्या (ऋखठअ) कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाविषयी त्यांना फार उत्सुकता होती. आपल्या अनेक समारंभांना ते जातीने हजर राहून आपल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत होते.

आम्ही, अंनिवाचे संपादक मंडळ व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते, नास्तिक केंद्राच्या व विजयम यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. आम्हा सर्वांची त्यांना विनम्र आदरांजली! डॉ.विजयम यांनी आयोजित केलेल्या नास्तिक परिषदेचे काम नास्तिक केंद्र पुढे नेईल व तीच डॉ.विजयम यांना वाहिलेली खरी आदरांजली असेल.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]