जटा निर्मूलन करणार्‍या मअंनिसच्या नंदिनी जाधव यांची जाहीर मुलाखत

जयश्री बर्वे -

14 ऑगस्ट, 2021

जोगवाचित्रपटातील भूमिकेने खर्‍या देवदासींचे

खडतर जीवन समजले अभिनेत्री मुक्ता बर्वे

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने 14 ते 20 ऑगस्ट या कालावधीत ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार जागर सप्ताह’ झाला. त्यानिमित्त आयोजित केलेल्या विविधांगी कार्यक्रमात शनिवारी (14 ऑगस्ट) दोनशेपेक्षाही अधिक महिलांचे जटानिर्मूलन करणार्‍या ‘मअंनिस’च्या पुणेस्थित धडाडीच्या कार्यकर्त्या श्रीमती नंदिनी जाधव यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली. समितीच्या ‘अंधरुढीच्या बेड्या तोडा’ या अभियानाशी संबद्ध अशा या कार्यक्रमात सुप्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री मुक्ता बर्वेप्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाल्या. समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रशांत पोतदार यांनी मुलाखतीचे संवादक म्हणून काम पाहिले.

कार्यक्रमाचा प्रारंभ कोल्हापूरच्या सीमा पाटील यांच्या ‘एकाच या जन्मी जणू’ या गीताच्या गायनाने झाली. जटानिर्मूलन झाल्यावर त्या महिलेला पहिल्यापेक्षाही सुंदर, नवे आशावादी आयुष्य मिळते, या वास्तवाला साजेसे असे प्रारंभीचे गाणे होते.

प्रास्ताविक वंदना शिंदे यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्राला संतांचा आणि समाजसुधारकांचा मोठा वारसा लाभला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तोच वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न आजवर करत आली आहे. समितीचे कार्य चार सूत्रांवर आधारित आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि प्रचार करणे, धर्माची विधायक, कृतिशील, कठोर चिकित्सा करणे, शोषण करणार्‍या अंधश्रद्धांना विरोध करणे, समाजाच्या व्यापक परिवर्तनाचे भान जागृत करणे आणि समविचारी संघटनांशी जोडून घेणे, ही ती सूत्रे आहेत. जटानिर्मूलनाचे काम समिती अनेक वर्षेकरत आहे. डॉ. शैला दाभोलकर यांनीही या कामाशी स्वत:ला जोडून घेतले. कराडचे डॉ. कुंभारेही या कामाशी जोडले गेले आहेत. समितीने आजवर 1000 पेक्षाही अधिक महिलांना जटामुक्त केले आहे. गरिबी, अस्वच्छता, अज्ञान ही कारणे या समस्येमागे आहेत. ‘जट कापली तर देवाचा कोप होईल, मृत्यू येईल, गंडांतर येईल’ अशी दहशत, भीती संबंधित व्यक्तीच्या मनात असते आणि कुटुंबातील व समाजातील अशा विचारांच्या व्यक्ती ती आणखी वाढवतात. अनेकदा जट आलेल्या मुलीचे बळजबरीने देवाशी लग्न लावून देऊन देवदासी केले जाते, म्हणून या सार्‍यातून समुपदेशनाने स्त्रियांना मुक्त करावे लागते. जट ही महिलेच्या विकासाआड येणारी अंधरुढीची मोठी समस्या आहे. म्हणून त्याबाबत विचारमंथन घडावे व नेमके कृतिशील उत्तर मिळावे, हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा हेतू आहे.”

या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मुक्ता बर्वेयांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना ‘जोगवा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे आपले अनुभव, निरीक्षणे अगदी सहजसाध्या शब्दांत मांडली. त्या म्हणाल्या की, “जोगवा’ चित्रपटात एका मुलीचा जट येण्यापासून ते जोगतीण म्हणून अनुभव घेत जगण्यापर्यंतचा प्रवास आहे. ती भूमिका स्वीकारल्यानंतर वेशभूषा, देहबोली याबाबत विचार केला. देवदासींचे जीवन समजून घेण्यासाठी वाचन केले आणि एकूण भूमिकेचा आराखडा मनाशी निश्चित केला; पण चित्रीकरणाला सुरुवात झाल्यावर खरे जोगती आणि जोगतीण यांच्याशी भेट झाली. त्यांच्याशी बोलण्यातून त्यांच्या जगण्याविषयीचे तपशील कळले आणि जाणवले की, भूमिकेविषयीची माझी समज, तयारी वास्तवाच्या तुलनेत अगदी मर्यादेची आहे. सुस्थापित कुटुंबातील मुले उत्तम जगण्याची, करिअरची स्वप्ने पाहतात, त्याचे नियोजन करतात; पण इथे या जोगती आणि जोगतिणींचे आयुष्य कुठल्या तरी खोल काळोखभरल्या दरीत भिरकावून दिल्यासारखे आहे.” सौंदत्तीच्या घाटावर चित्रीकरणाच्या वेळी देवाला सोडून द्यायला आई-बापांबरोबर आलेली कोवळ्या वयातली मुले-मुली पाहताना एका बाजूला त्यांची कणव येत होती आणि दुसर्‍या बाजूला हे करायला लावणार्‍या व्यवस्थेची चीड! चित्रिकरणादरम्यान भेटलेल्या एका 50-55 वर्षीय जोगत्याने त्याच्या जगण्याबद्दल उद्विग्नता आणि हताशा व्यक्त केली. त्यानंतर एक सततची अस्वस्थता मुक्ताताईंच्या मनात निर्माण झाली. भूमिका करण्यापलिकडेही आपण जमेल ते केले पाहिजे, हे भान निर्माण झाले. त्यामुळे याबाबतची जागृती निर्माण करणार्‍या समितीच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात जबाबदारीच्या जाणिवेतून सहभागी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यानंतर जवळपास 200 पेक्षाही अधिक जटानिर्मूलन करणार्‍या नंदिनी जाधव यांना संवादक प्रशांत पोतदार यांनी विविध प्रश्न विचारत बोलके केले. त्या प्रश्नांच्या संदर्भात नंदिनी यांनी दिलेल्या उत्तरांतून नंदिनी यांचा समितीसोबतच्या कार्याचा व्यापक पट उलगडत गेला. भोंदू बाबा-बुवांचा भांडाफोड, जातपंचायतींची दहशत आणि काच दर्शविणारी कौमार्य चाचणीसारखी प्रकरणे, जादूटोणाविरोधी कायद्याबाबत जनजागृती, महिला सक्षमीकरण व त्याचाच महत्त्वाचा भाग म्हणजे जटानिर्मूलन… अशा सार्‍या बाजूंनी नंदिनी समितीच्या कार्यात आपला सहभाग देत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कामाची सुरुवात झाली. डॉक्टरांच्या निधनानंतर समितीचे कार्य हे आपले जीवनध्येय मानून त्यांनी स्वत:चा ब्यूटीपार्लरचा व्यवसाय बंद करून पूर्णवेळ समितीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. डॉ. शैलाताई दाभोलकर यांच्या जटानिर्मूलनाच्या अनुभवाबाबत जाणून घेतल्यावर त्या अधिक सजगतेने या कामाकडे वळल्या.

जटानिर्मूलनाची पहिली केस त्यांना शिक्षित कुटुंबात मिळाली, ती बँक ऑफ इंडियाच्या एका व्यवस्थापकाच्या पत्नीची. ‘जट कापली, तर तोंडातून रक्त येईल. जट असणारी आणि कापणारी दोघी मरतील,’ अशी भीती नंदिनी यांनी समुपदेशनाने घालवली व तिचे जटानिर्मूलन केले. अशीच भीती असलेल्या व जट कापण्यास ठाम नकार देणार्‍या राजश्री भोईटे यांच्या पूर्ण कुटुंबाचे समुपदेशन करून नंदिनी यांनी जटानिर्मूलन तर केलेच; पण त्या महिलेचे पती मनोज भोईटे यांनाही या कामात जोडून घेतले, ज्यामुळे आणखी काही महिला जटामुक्त झाल्या. जटानिर्मूलनातील अत्यंत खडतर आणि विदारक अनुभव हर्षा रांजणे या मुलीबाबतचा होता. नंदिनी यांच्या कथनातून तो समोर आला. केवळ 11 वर्षेवयाच्या हर्षाला केसात जट आली. तिची शाळा बंद झाली. तिला देवदासी करण्याबाबतचा निनावी फोन आल्यानंतर नंदिनी यांनी वारंवार संपर्क साधला, समुपदेशन सुरू केले. शेवटी हर्षाच्या कुटुंबाने ठाम नकार दिला, तरी नंदिनी आणि समितीचे कार्यकर्ते तिच्या गावात पोचले. ते कुटुंब आणि गावकरी यांचे जवळपास पाच तास समुपदेशन झाल्यावर गावाबाहेर 3 किलोमीटर अंतरावर जट काढणे सुरू झाले. जटेमुळे खाज, आग याचा परिणाम होऊन हर्षा जवळपास मतिमंद असावी, अशी वाटत होती. जटेचा जाड भाग कवटीला घट्ट चिकटला होता, जखमा होत्या. जट कापताना तो भाग उघडा पडून वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात, तशा ऊवा आल्या व नंदिनी यांच्या हातावर, मुलीच्या अंगावर पसरल्या. हे पाहिल्यावर मात्र मुलीचे कुटुंबीय आणि गावकरी ‘यातून वाचवा, तिला बरी करा,’ म्हणू लागले. आता हर्षा परत शाळेत जाते, हसत जीवन जगते आहे. ही समितीच्या कामातून मिळालेली मोठी आनंदाची ठेव आहे, असे नंदिनी यांना वाटले. नारायणगावच्या फडात नाचकाम करणार्‍या मालती इनामदार यांच्या जटानिर्मूलनाचा अनुभव सांगताना नंदिनी यांनी जोगती-जोगतिणींचे जीवन, त्यांचे गुरू, गुरूंकडून या कामासाठी होणारी लाखोंची मागणी आणि त्यापोटी होणारी संबंधितांची आर्थिक होरपळ यावर प्रकाश टाकला. या संपूर्ण मुलाखतीत नंदिनीताईंमधील धाडसीपणा, योजकता, सहृदयता, सामाजिक बांधिलकी, ‘अंनिस’च्या कामातील समर्पणभाव आणि प्रसिद्धी विन्मुखता सतत समोर येत होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील या गोष्टींचा प्रभाव व प्रेरणा या कार्यक्रमातून सर्वांच्या मनात ठसली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सुनीता देवलवार यांनी केले. अभिनेत्री मुक्ता बर्वेआणि कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांचा परिचय नीता सामंत यांनी करून दिला. राधा वणजू यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले. सदर कार्यक्रम ‘झूम’, ‘फेसबुक लाईव्ह’ आणि ‘यू-ट्यूब’ चॅनलद्वारे बहुसंख्य लोकांनी पाहिला आणि त्याबाबत उत्तम प्रतिक्रिया दिल्या.

– जयश्री बर्वे, रत्नागिरी


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]