प्रेमपाखरांना आधार अंनिसच्या सेफ हाऊसचा

योगेश जगताप -

स्वतःच्या मर्जीने आंतरजातीय, आंतरधर्मीय प्रेमविवाह करू इच्छिणार्‍या तरुणतरुणींना मदत करणारं महाराष्ट्र राज्यातील पहिलं ‘सेफ हाउस’ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सातारा जिल्ह्यात सुरू झाले आहे. अशी सेफ हाऊस महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात तयार करावीत, असा आदेश सुप्रीम कोर्टाने नुकताच दिला आहे. या आदेशामुळे अंनिसच्या या अभिनव उपक्रमास पाठबळ मिळाले आहे.

या सेफ हाऊसची सुरूवात कशी झाली आणि कसे आहे सेफ हाऊस याबद्दल अंनिसचे कार्यकर्ते शंकर कणसे यांचेकडून जाणून घेऊया..

योगेश जगताप

प्रसंग १

निखिल दादा, बघा ना कायतरी…पोलिसांकडे गेलो तर ते आम्हालाच ओरडतात, कशाला केलं लग्न, घरच्यांचं ऐकायला येत नाही का म्हणून..! घराबाहेर पडून २ दिवस झालेत, पण लपायचं कुठं कायच समजेना. आमचा पत्ता कळाला तर ती माणसं आम्हाला मारतील अशी भीती वाटतेय. मुलीची इच्छा नसताना तिला लग्नाला तयार केलं, बस्ता वगैरे पण झाला. पण आता आम्ही ठरवलंय, एकमेकांसोबतच जगायचं. तुम्हीच काहीतरी मदत करा.

प्रसंग २

प्रियांका आमची जात वेगळी आहे म्हणून घरातले लग्नाला तयारच होणार नाहीत. मी एक-दोन वेळा आईकडे विषय काढला, पण तिने मलाच गप्प बसवलं. आम्ही दोघे सध्या शिकतोय. मला लग्नाची घाई नाही, पण आता घरच्यांनी स्थळं बघायला सुरुवात केलीय. मला शुभमसोबतच लग्न करायचं आहे. मला कुणी कितीही विरोध केला तरी माझा निर्णय पका झालेला आहे. शुभमच्या घरचे आमचं शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागेपर्यंत आम्हाला सांभाळायला तयार आहेत, त्यामुळं आम्ही निश्चिंत आहोत.

प्रसंग ३

गौरी माझी आणि अक्षयची २ वर्षांपासून ओळख आहे. आम्हा दोघांना लग्न करायचंय. माझ्या आई-वडिलांचा अक्षयसोबत लग्नाला विरोध नाही, पण ते गरीब आहेत. पैशा-पाण्याचं बघणारा मामा आहे म्हणून तो म्हणेल तिथेच लग्न करायचं असं बोलणं चाललंय. मामाची एका आमदाराशी ओळख आहे. तो त्यांच्यासोबतच असतो सारखा. तू अक्षयसोबत लग्न करायचं नाही, केल्यावर गाठ माझ्याशी आहे असं म्हणतो. त्याचं बोलणं ऐकून वडीलसुद्धा घाबरतात. तू पळून जाऊन लग्न केलंस तर मी आत्महत्या करेन अशी धमकी मला देतात. मध्ये १-२ दिवस जेवतसुद्धा नव्हते नीट. पण मला काय वाटतंय हे त्यांना समजूनच घ्यायचं नसेल तर मी काय करू?

प्रसंग ४

गणेश गावात मोठ्या संख्येने असणार्‍या एका जातीचे लोक माझ्या लग्नाला मान्यता देणार नाहीत. मी त्यांच्या जातीचा असतो तर हेच लोक मला खांद्यावर घेऊन नाचले असते. आरती आणि मी दोघे सज्ञान आहोत, कमावते आहोत. असं असतानाही लग्न करताना बाकी मेरिट बघण्यापेक्षा जात आधी बघितली जातेय. दोन वर्षांपूर्वी मी गावचा सरपंच झालो. या लग्नाचा निर्णय घेतल्यावर आपल्या राजकीय वाटचालीला अडचण येईल याची कल्पना मला होतीच. माझ्या घरातल्या लोकांना, मित्रमंडळींना त्रास दिला जाईल याचाही थोडाफार अंदाज होताच. पण या सगळ्याच्यावर आमचं प्रेम होतं. आम्ही प्रेम करून चूक केली नाही आणि त्यामुळंच लग्न करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे.

आयुष्याचा जोडीदार निवडण्याच्या टप्प्यात असलेल्या तरुण – तरुणींच्या बाबतीत मागील ४ ते ५ वर्षांत घडलेले हे वास्तव प्रसंग. सर्वांची वयं साधारण २२ ते ३० वर्षांमधली. अशीच आणखी २०-२२ उदाहरणं आहेत. महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतून प्रेमविवाह केलेल्या प्रत्येक जोडप्याची कहाणी वेगळी आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर जोडीदार निवडण्याचा महत्त्वाचा निर्णय हा घरच्यांच्या भीती किंवा दडपणामुळे घेता येत नसल्याने ही जोडपी ‘स्वतःचंच खरं’ करत धाडसाने प्रेमविवाह करतात. येणार्‍या कोणत्याही अडचणीला सामोरं जाण्याची तयारी ठेवणार्‍या या जोडप्यांना आधार देण्याचं, त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम शंकर कणसे आणि त्यांचं कुटुंब करत आहे. कणसे कुटुंब चालवत असलेल्या लव्ह हॉस्टेल किंवा सरकारी भाषेत सेफ हाउसची माहिती अंनिस वार्तापत्राच्या वाचकांपर्यंत पोहचवण्याचा हा एक प्रयत्न.

जात ही एक अंधश्रद्धा आहे. जातीच्या खोट्या प्रतिष्ठेपायी अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच प्रश्नावर डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अनेक वर्षं काम केलं. हे काम आजही चालू आहे. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देत अंनिस कार्यकर्त्यांनी मागील ३५-४० वर्षांत शेकडो विवाह लावले. हे विवाह लावत असताना कुठेही कायदेशीर अडचण येणार नाही याची खबरदारी कार्यकर्त्यांनी घेतली. याला पूरक असा जोडीदाराची विवेकी निवड हा उपक्रम मागील ८-९ वर्षांत संघटनेने प्रभावीपणे राबवला. महाविद्यालयीन जीवनातच जोडीदार निवडण्याबाबतचं योग्य मार्गदर्शन या उपक्रमाद्वारे करण्यात येऊ लागलं. शिवाय विवाह इच्छुक तरुण-तरुणींचा व्हॉट्सअप ग्रुप बनवून त्यांना एकमेकांना समजून घेऊन निवड करण्याचा पर्याय देण्यात आला. या उपक्रमात मुलांसोबतच त्यांच्या पालकांनाही सहभागी करून घेण्यात आलं.

याच प्रवासातला पुढचा टप्पा म्हणजे लव्ह हॉस्टेल किंवा सेफ हाऊस. प्रेम तर केलंय, पण घरच्यांना सांगायची भीती वाटते. वेगळ्या जातीमुळे परवानगी देणार नाहीत असं वाटतंय. हा धर्म सोडून कुठल्याही धर्माची, जातीची व्यक्ती चालली असती ना, तू माझ्या परस्पर काही केलंस तर आम्ही आत्महत्या करू, तू लग्न कर मग दाखवतोच अशा प्रकारच्या अस्वस्थ करणार्‍या धमक्यांमुळे बरीच प्रेमी युगुलं त्रस्त असतात. ‘सैराट’ सिनेमात हे वास्तव नेमकेपणाने दाखवण्यात आलं होतं. मागील १५ वर्षांत महाराष्ट्रासह देशात ऑनर किलिंगच्या शेकडो घटना घडल्याची आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. असं असताना प्रेमविवाह करू इच्छिणार्‍या जोडप्यांना संरक्षण द्यायला हवं, ही कल्पना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शंकर कणसे यांच्या डोक्यात आली. हरयाणा आणि पंजाब राज्यात अशी सुरक्षागृहे उपलब्ध आहेत अशी माहिती कणसेंना होती. मात्र असं सुरक्षागृह उभारायचं कसं? त्यासाठी काय करावं लागतं, याबाबत ते अनभिज्ञ होते.

सातार्‍यातील रहिमतपूरजवळच्या पिंपरी गावचे रहिवासी असणारे शंकर कणसे हे १९९५ पासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते. आपली शेती आणि पोल्ट्री व्यवसाय सांभाळत ते अंनिसचं काम करतात. ४०-४५ वर्षांपूर्वी गावात घडलेल्या एका घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाला आणि भावकीला वाळीत टाकण्याचं काम गावकर्‍यांनी केलं होतं. कुठल्याही सुख-दुःखाच्या प्रसंगातील कार्यक्रमाचं निमंत्रण नाही की बोलून चर्चा नाही अशा प्रकारचं वातावरण कणसे कुटुंबाने अनुभवलं होतं. २०१६ ते १८ या कालावधीत ऑनर किलिंगच्या घडलेल्या घटना पाहून शंकर कणसे अस्वस्थ होते. आपण प्रेमविवाह लावून तर देतो, मात्र जी मुलं-मुली या प्रेमविवाहानंतर अडचणीत येतात त्यांचं काय हा विचार कणसे यांच्या डोक्यातून जात नव्हता. याच काळात शंकर कणसे आणि त्यांचे वडील स्वतःच्या स्नेह-आधार फौंडेशनमार्फत विवाह जुळवण्याचं, वृद्धांना मदत करण्याचं काम करत होते. कणसे कुटुंबीयांच्या बोलक्या आणि परोपकारी स्वभावाची जाणीव रहिमतपूर आणि सातारा शाखेतील लोकांना आधीपासूनच होती.

याच दरम्यान सातार्‍यातील पाली आणि हरपळवाडी गावातील तरुण-तरुणींनी आळंदी येथे लग्न केल्यानंतर सातारा अंनिसचा कार्यकर्ता अजय ढाणे याला सुरक्षित राहण्याची काही सोय होईल का? अंनिस अशा प्रकारच्या कामात मदत करते, ती मदत आम्हाला मिळेल का अशी विचारणा केली.

त्या वेळी सातारा जिल्ह्यातील मोजक्या कार्यकर्त्यांना या प्रेमविवाहाची माहिती देण्यात आली. सुरुवातीला अंनिसच्या शहर शाखेतील एका रूममध्ये जोडप्याची राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर मात्र शंकर कणसे यांनी गावाकडील स्वतःच्या शेतात दोन खोल्यांचं घर आहे, तिथं हे जोडपं व्यवस्थित राहू शकेल अशा प्रकारची शाश्वती दिली. त्यानंतर साधारण ८ ते १० दिवस या जोडप्याची व्यवस्थित राहण्याची सोय झाली. घरच्यांशी व्यवस्थित बोलणं केल्यानंतर या जोडप्याला पोलीस अधीक्षकांसमोर हजर करण्यात आलं. त्या वेळी त्यांनी “मुलं सज्ञान आहेत, त्यांनी स्वतःच्या मनाने निर्णय घेतलाय, त्यांना त्रास देऊ नका” अशा प्रकारची ताकीदवजा विनंती दोन्ही कुटुंबीयांना केली. या जोडप्याला झालेली मदत पाहून कणसे यांना हुरूप आला. दरम्यान नंतरच्या ४-६ महिन्यांत अशा प्रकारच्या २-३ केसेस अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आल्या. आपण करत असलेल्या कामाची दिशा योग्य आहे हे पटल्यानंतर शंकर कणसे यांनी याचा विस्तार करायचं ठरवलं. हा विस्तार करताना आधीच लग्न केलेले आणि लग्न करण्यासाठी इच्छुक असलेले अशा दोन्ही प्रकारच्या जोडप्यांना मदत आणि मार्गदर्शन करायचं ठरलं. आपण स्वतः किंवा संस्था अडचणीत येऊ नये म्हणून कायदेशीर मार्गानेच सर्व कामं करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली. त्याच नियमावलीनुसार आतापर्यंत १६ जोडप्यांना सेफ हाउसमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यांच्या अडचणीनुसार अगदी २ दिवस ते २ महिन्यांपर्यंतचा मुकाम जोडप्यांनी या ठिकाणी केला आहे. ही सर्व जोडपी आता सुखाने संसार करत असून लवकरच त्यांचा स्नेहमेळावाही आयोजित केला जाणार आहे.

काय आहे सेफ हाउसमध्ये येण्यासाठीची नियमावली?

सुरुवातीच्या टप्प्यात मुला-मुलींनी जोडीदाराविषयी घरच्यांशी व्यवस्थित संवाद करणं अपेक्षित आहे. घरी संवाद केल्यानंतरही तीव्र विरोध होत असेल तर मुला-मुलींनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडे विवाह करण्यासाठीचा प्रस्ताव द्यायला हवा. या प्रस्तावानंतर समितीचे कार्यकर्ते आणि तज्ज्ञ समुपदेशक या जोडीची मुलाखत घेतील. लग्न करण्यासाठी या जोडीची आवश्यक ती भावनिक, मानसिक आणि आर्थिक तयारी झाली आहे का याचा अंदाज मुलाखतीमधून घेतला जाईल. यामध्ये काही अडचणी असल्यास त्या संदर्भात जोडीला मार्गदर्शन केलं जाईल. दोघांपैकी कुणा एकाच्या घरून पाठिंबा असला तरी त्या पालकांना सोबत बोलावलं जाईल. दोन्ही घरून पाठिंबा नसेल तर मुला-मुलीच्या तीन अत्यंत विश्वासू साथीदारांना लग्नावेळी साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्यास सांगितलं जाईल. स्टॅम्प पेपरवर दोघांचीही लग्नासाठी संमती असल्याचं प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येईल. यानंतर सोयीची वेळ पाहून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि मित्र-मंडळींच्या उपस्थितीत अगदी कमी खर्चातील सत्यशोधक विवाह लावून देण्यात येईल. सदर विवाहाचं प्रमाणपत्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत देण्यात येईल.

घरच्यांचा विरोध अगदी तीव्र असेल, मारहाण करण्याइतपत गंभीर प्रकरण असेल तर अशा प्रकरणात पोलीस अधीक्षकांची मदत घेऊन मध्यस्थी करण्यात येईल. २०२३ अखेर याच पद्धतीने विवाह प्रक्रिया पार पाडली जात होती. आता मात्र लग्नाचा प्रस्ताव आल्यानंतर व्यवस्थित माहिती घेऊन सुरक्षा कारणास्तव हे प्रकरण पोलीस अधीक्षकांकडे कळवलं जाईल. त्यांच्या परवानगीनंतर पुढील विवाह प्रक्रिया पार पडेल. ज्या जोडप्यांनी आधीच विवाह केला असेल, मात्र सुरक्षा कारणास्तव ते सेफ हाउसचा आश्रय घेऊ इच्छित असतील तर त्या प्रकरणातही आधी पोलीस स्टेशनला माहिती देण्यात येईल.

सरकार का म्हणतं? :

ऑनर किलिंगच्या घटना रोखण्यासाठी शक्ती वाहिनी या दिल्लीतील एनजीओने मार्च २०१८ मध्ये रिट पिटीशन दाखल केली होती. आंतरजातीय-आंतरधर्मीय प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांना राज्य सरकारमार्फत सुरक्षा देण्याची मागणी या पिटीशनमध्ये करण्यात आली होती. त्याला केंद्र सरकारमार्फत मंजुरी मिळाली. त्याच धर्तीवर राज्यांमध्ये गरजेनुसार सेफ हाउस उभारण्याच्या तसेच संबंधित व्यक्तींना संरक्षण देण्याच्या सूचना केंद्र सरकारने केल्या. महाराष्ट्र सरकारने १९ डिसेंबर २०२३ रोजी काढलेल्या अध्यादेशात असे सेफ हाउस उभारण्यासाठी जिल्हा स्तरावर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी जी समिती नेमण्यात येईल त्यामध्ये जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि दोन सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश असेल. या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यातील पहिलं सेफ हाउस सातार्‍यात तयार झाल्याबद्दल शेख यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिलं. याच्या बातम्याही वर्तमानपत्रात आल्या आहेत.

पालकांकडून काय अपेक्षा?

मुलाने किंवा मुलीने पळून जाऊन लग्न करणं ही गोष्ट आजही आपल्याकडे अप्रतिष्ठेची मानली जाते. मुळात जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य आणि एकमेकांची अनुरूपता समजून घेण्याची तयारी पालकांनी दाखवली नाही की अशा अडचणी येतात. पालकांना आपल्या मुलाचं किंवा मुलीचं हित समजत असलं तरीसुद्धा जबरदस्ती करून जोडीदार निवडीचा निर्णय मुलांवर लादणे ही गोष्ट अनेकदा त्रासदायक ठरू शकते. अशा परिस्थितीत मुला-मुलींचं म्हणणं नीट समजून घेणं, आवश्यकता असल्यास समुपदेशन घेणं आवश्यक आहे. या टप्प्यात मुलं-मुली आधाराच्या शोधात असतात. एकमेकांचा आधार त्यांना असतोच, मात्र कुटुंबाचा आधार मिळाला नाही की ती कोलमडतात. अशा प्रसंगी विरोधात जाऊन लग्न करणं हाच एक पर्याय त्यांना योग्य वाटतो. मुला-मुलीच्या जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य मान्य करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मागील ३५-४० वर्षांपासून झटत आहेत. त्यांच्या याच प्रयत्नांना सेफ हाउसच्या निमित्ताने आता शासकीय पाठबळ मिळालं आहे. पालकांनी मुलांशी योग्य संवाद केला, जोडीदार निवडीच्या प्रक्रियेत त्यांना मदत केली तर येत्या काळात अशा सेफ हाउसची गरज पडणार नाही हेही तितकंच खरं..!

सेफ हाउसचं वैशिष्ट्य :

लग्नानंतर इथं राहणार्‍या जोडप्यांना सुरक्षित वाटत असल्याची भावना ते व्यक्त करतात. इथं राहण्याची उत्तम सोय असून जोडप्यांना स्वतः काहीतरी काम करता येईल अशी सोयही इथे करून देण्यात आली आहे. स्वयंपाकघरात स्वयंपाक करणे, शेतीकामात मदत करणे, वैचारिक पुस्तकं वाचणे, अभ्यास करणे, जवळच असणार्‍या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना मदत करणे अशा प्रकारची कामं इथं जोडप्यांना करता येतात. ही कामं करावीच असं कुठल्याही प्रकारचं बंधन त्यांच्यावर नसलं, तरी किमान स्वावलंबी होत काहीतरी काम त्यांनी करावं अशी अपेक्षा संस्थेची आहे.

कणसे कुटुंबाचा आणि अंनिस कार्यकर्त्यांचा दिलासा ः

स्नेहआधार फाउंडेशनचे शंकर कणसे, त्यांच्या पत्नी रोहिणी, मुलगा किरण आणि सून अंकिता यांनी स्वतःचा अमूल्य वेळ देत सेफ हाउस उभं केलं आहे. या ठिकाणी एका वेळी ८ जोडप्यांच्या राहण्याची सोय होऊ शकते. येणार्‍या जोडप्यांना घरची आठवण येऊन गलबलून जायला होऊ नये, रडायला आलं तरी भावना मोकळ्या करता याव्यात, हकाने काही बोलावंसं वाटलं तरी बोलता यावं म्हणून कणसे कुटुंब विशेष प्रयत्न करतं. सोबत स्वयंपाक करणे, जेवण करणे, दैनंदिन कामात सहभाग घेणे अशा गोष्टींतून जोडप्यांना वेळ घालवता येत असल्याचं रोहिणीताई सांगतात. बहुतांश जोडपी ही किरण आणि अंकिताच्या वयाची असल्याने त्यांना मनमोकळं बोलण्यासाठी हकाची जागा इथं मिळते. याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अधेमधे या सेफ हाउसला भेट देत असतात. काही कार्यकर्ते आपले चळवळीतील कामाचे अनुभव सांगून नवीन जोडप्यांना प्रोत्साहन देतात. भावनिक आणि मानसिक आधार देण्यासाठी अशा भेटी उपयोगी पडतात. दाभोलकर कुटुंबीयांतर्फे कणसे यांची चालू असलेल्या कामासंदर्भात वरचेवर विचारपूस केली जाते. पोलीस किंवा समुपदेशन पातळीवर कोणती मदत आवश्यक असल्यास डॉ. हमीद दाभोलकर आवर्जून उपस्थित राहतात. आतापर्यंत या सेफ हाउसच्या उभारणीचा, तिथल्या सोयी-सुविधांचा सर्व खर्च हा शंकर कणसे यांनी केला असून समाजातील दानशूर व्यक्तींनी या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन शंकर कणसे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत करण्यात येत आहे.

सेफ हाउस हेल्पलाईन व आर्थिक मदतीसाठी

राहुल थोरात – ९४२२४११९६२

संपर्क : शंकर कणसे – ९९२२३५५४३५

प्रत्येक जिल्ह्यात सेफ हाऊस सुरू करावीत, असे राज्याच्या गृहविभागाने आदेश दिले आहेत.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]