अनिल चव्हाण -
कोल्हापूरच्या स्वामी समर्थ मठातील प्रकार
शिष्य पाळतो गाई, गुरूच्या अंगात साई । समर्थांच्या मठात, देव अंगात येतो बाई॥
ही कथा आहे, कोल्हापुरातल्या स्वामी समर्थ मठातली. मध्यवस्तीत पद्माराजे हायस्कूलसमोर सिद्धाला गार्डनशेजारी काही वर्षांपूर्वी हा मठ स्थापन झाला. नुकतेच इथे स्वामी समर्थ आपल्या अंगात येतात, असे म्हणत, बाराजणांची चार कोटींची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. गुरू, शिष्य आणि मदतनीस महिला अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र नरबळी, अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा सन 1913 चे कलम 2 (1) (बी) (5) (8) प्रमाणे, कारवाई केली आहे. त्याचबरोबर भा.दं.वि. कलम 420, 323, 506, 34 नुसारही गुन्हे दाखल केले आहेत.
अलिकडच्या दहा वर्षांत स्वामी समर्थांचे मठ संपूर्ण महाराष्ट्रभर झपाट्याने वाढलेत. नाशिकच्या गुरूंकडून प्रेरणा घेऊन एकेकजण पाच-दहा मठ स्थापन करतो, महाराज बनतो. कधी भाविकाची खाजगी, तर कधी नगरसेवकाला गाठून सार्वजनिक जागा फुकटात मिळवली जाते. काहीजणांना बंधन नको असते. देवाला भेटायला मध्यस्थ नको, अशा ’उदात्त’ हेतूने, ते स्वतंत्रपणे, समर्थांचा मोठा फोटो किंवा पादुका, काही वेळा दोन्हीही खोलीमध्ये भिंतीजवळ उभा करून भक्ती करतात, म्हणजे भक्तांना आकर्षित करतात.
फसवणूकीची कार्यपद्धती ः आम्ही काहीही घेत नाही, असे म्हणत दानपेटी आणि शेजारी तबकात हळदी-कुंकवाबरोबर नोटा ठेवतात. समर्थांच्या मठात शक्यतो आठवड्यातून एका ठराविक दिवशी आरती होते. त्यामुळे जास्त मठ चालवणार्या ’दादांना’ प्रत्येक ठिकाणी वेगळा दिवस सेवेसाठी देता येतो. आरतीच्या दिवशी, सगळे भाविक एकत्र येतात. मठात दारातच शुद्ध होण्यासाठी पाय धुण्याची सोय असते. पाण्यात गोमूत्र घातलेले असते. आत आल्यावर उंबराच्या झाडाला मुजरा करायचा, त्यानंतर महाराजांना. पुढे तासभर आरती चालते. गुरुपौर्णिमा, अक्षय्य तृतीया, संक्रांत अशा हिंदू सणांच्या दिवशी त्रिकाल आरती होते. त्रिकाल म्हणजे तीन वेळा. सकाळी भूपाली आरती, दुपारी आणि संध्याकाली नैवेद्य आरती. यावेळी महाराज सणांचे महत्त्व सांगतात. सांगण्यात एकवाक्यता असावी, म्हणून नाशिकच्या मठाने ’हिंदूंचे – सण व व्रतवैकल्ये’ असे पुस्तक प्रसिद्ध केले आहे.
मठात प्रवेश ः असे भाविक मठाला शरण येतात. इथेही तसेच झाले. संदीप प्रकाश नंदगावकर आपल्या समस्या घेऊन, सिद्धाला गार्डन जवळच्या स्वामी समर्थांच्या मठात आले. इथे त्यांची भेट सविता आष्टेकर यांच्याशी झाली. त्या सेवेकरी, म्हणजे मठाची सेवा करणार्या. त्यांनी आपुलकीने चौकशी केली. महाराजांच्या अंगात प्रत्यक्ष स्वामी समर्थ येतात, अशी माहिती देऊन त्यांना प्रवीण विजय फडणीस यांच्यासमोर उभे केले.
प्रवीण फडणीस ः प्रवीण फडणीस मठाजवळच राहतात. ते मूळचे कसबा तारल्याचे. इथे फडणीसांनी गोपालनासाठी गोशाला उभी केली आहे.
गोशाला ः शेतकरी शेतीच्या मशागतीसाठी बैल पाळतात. शेतीपूरक उद्योग म्हणून गोपालन करतात. पण मधल्या काळात गोरक्षणाचे महत्त्व राजकारण्यांच्या लक्षात आले. शासनाने गोवधबंदी कायदा केला. गोरक्षकांच्या टोळ्या तयार झाल्या. लायसन तपासावे तसे त्या गोवंशाची वाहतूक तपासू लागले. गायींची खरेदी-विक्री अवघड बनली. भाकड गायही विकता येईना. पंचवीस हजारांची गाय गुपचूप पाच हजारांत विकायची पाळी आली.
गोपालन परवडेना. तेव्हा नवे गोपालक पुढे आले. गोशाला उभ्या राहिल्या. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांचे – बाई नाचवा, गायी वाचवा- असे धोरण असल्याची टीका झाली होती. गोशालेला लाखोंची अनुदाने मिळू लागली. खरा गोपालक शेतकरी रस्त्यावर आणि शहरातला पक्ष कार्यकर्ता , गोशालाप्रमुख बनून गायीचे महत्त्व सांगू लागला. यातलाच एक फडणीस. गोशालेसाठी त्यांनी 35 लाख रुपये भाविकांकडून उकळल्याची तक्रार आहे. त्यामुले गोशालेच्या नावावर असलेली चार बँकांतील खाती पोलिसांनी गोठवली आहेत. यानिमित्ताने गोशालामागील बुवाबाजीही रडारवर आली आहे. मठातील सेवेकरी, महिला गोशालेच्या संस्थेमध्ये विश्वस्त असल्याचे पोलिस तपासांत पुढे आले आहे.
गुरु–शिष्य जोडी ः श्रीधर सहस्त्रबुद्धे हे फडणीसांचे गुरू. त्यांच्या अंगात साईबाबा यांचा संचार होतो, तर फडणीसांच्या मुखातून प्रत्यक्ष स्वामी समर्थ बोलतात, असे सांगून भाविकांचा विश्वास संपादन केला जाई. मठाच्या परिसरातील, म्हणजे मंगळवार पेठेतील आणि देवकर पाणंद परिसरातील भाविक फसवणुकीला बळी पडले आहेत. त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रारी केल्या. किमान तीन कोटी 86 लाख 66हजार 990 रुपये रोख व नऊ लाख 67 हजारांचे सोन्याचे दागिने अशी एकत्रीत 3 कोटी 96 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आहे.
मठात तलवार ः विशेष म्हणजे, मठातून पोलिसांनी एक तलवार, डीव्हीआर, संगणक सीपीयू, कागदपत्रे आदी साहित्य जप्त केले. ही फसवणूक 2013 ते 2020 या काळातील आहे. संचार झाल्यावर जे सांगेल ते ऐकायचे नाही तर अवकृपा होणार, ही भीती घातली जाई. या मार्गाने रक्कम द्यायला लावलीच; पण घरही खरेदी करायला लावले. गोशालेत सध्या 25 गायी असून 65 लाखांचे कर्ज घेतल्याची बातमी आहे. या कर्जाला फिर्यादी नांदगावकर यांना सहकर्जदार केले आहे. 30 व 31 मेच्या कोल्हापूरच्या दैनिकांनी याच्या ठळक बातम्या छापल्या आहेत. अटकेची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी पाटील, राजवाडा पोलिस स्टेशनचे निरीक्षक प्रमोद जाधव, पी. एस. आय. योगेश पाटील यांनी मध्यरात्रीनंतर केली.
अंनिसची मागणी ः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर शाखेने पोलिस कारवाईचे स्वागत केले असून मठांवर नियंत्रण करण्याची शासनाकडे मागणी केली आहे.
-अनिल चव्हाण, अंनिस, कोल्हापूर