डॉ. नितीन अण्णा -
![](https://anisvarta.co.in/wp-content/uploads/2022/03/Shastadnya-Striya.jpg)
शास्त्रज्ञ हा शब्द उच्चारला की डोळ्यांपुढे सर्वप्रथम उभे राहतात न्यूटन, आइन्स्टाइन, गॅलिलिओ, डार्विन, सी. व्ही. रामन, ए.पी.जे. अब्दुल कलाम इत्यादी पुरुष शास्त्रज्ञ. मेरी क्युरी किंवा लिझ माईटनर इत्यादी महिला शास्त्रज्ञांचं नाव क्वचित घेतलं जातं. केवळ भारतातच नाही, तर जगभरात महिलांना ज्ञानाच्या क्षेत्रात दुय्यम समजण्यात आलं आहे. आजवरच्या नोबेल विजेत्या 943 व्यक्तींपैकी केवळ 58 महिला आहेत (6.1 टक्के). गेल्या वीस वर्षांत महिलांचं प्रमाण वाढलंय, नाहीतर विसाव्या शतकात नोबेलनं सन्मानित झालेल्या 744 व्यक्तीमध्ये केवळ 30 महिला आहेत (4 टक्के). आपल्या भारतात प्राचीन काळातील विदुषी महिलांची यादी गार्गी, मैत्रेयी यापुढं जशी सरकत नाही, तसंच चित्र जगभरात पाहायला मिळतं. सामान्य व्यक्ती हिपाटिया, मॅडम क्युरीपर्यंत नावं घेतानाच थकते. असं का? स्त्रियांकडं बुद्धिमत्ता नसते का? त्या संशोधन करण्यास अक्षम असतात का?
याचं उत्तर मी द्यायची गरज नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे की निसर्गानं असा कोणता भेद नाही केला; भेद केला आहे समाजव्यवस्थेनं. एक्स-एक्स गुणसूत्रं घेऊन जन्म घेतला की व्यक्ती केवळ चूल आणि मूल यातच बंदिस्त. ही समाजव्यवस्था भेदण्याच धाडस काही एक्स-एक्स गुणसूत्रधारी करतात आणि इतिहास घडवतात. बार्बरा मॅकक्लिटाँक हे नाव अशांपैकी एक. गुणसूत्रांवर संशोधन करणारी गुणी शास्त्रज्ञ. ‘जम्पिंग जीन्स’चा शोध लावून त्यांनी नोबेल पारितोषिक पटकावले. या महिन्यात महिला दिन साजरा होत आहे, अशा वेळी चाकोरी मोडणार्या एका सक्षम महिलेची कहाणी वाचायला हवी.
बार्बरा मॅकक्लिटाँक.. 16 जून 1902 रोजी बार्बीचा जन्म अमेरिकेतील कनेक्टिकट राज्याची राजधानी हार्टफोर्ड इथं झाला. बार्बीचे वडील थॉमस मॅकक्लिटाँक यांचा रडतखडत चाललेला डॉक्टरी व्यवसाय. एक पिढीआधी त्यांचं कुटुंब निर्वासित म्हणून अमेरिकेत आलेलं. दोन मोठ्या बहिणी होत्या. आता तरी पोरगा व्हावा, असं आईला वाटत असताना बार्बी जन्माला आलेली. नंतर हिच्या पाठीवर भाऊ जन्माला आला. बार्बीचं लहानपणी नाव वेगळं होतं.. एलेनार.. असं नाजूक-साजूक नाव सोडून घरच्यांना नंतर तिचं नाव बार्बरा असं का करावं वाटलं काय माहीत? किती बर्बरतायुक्त वाटतं ना? आपण बार्बीच म्हणू तिला..
आईशी जास्त गट्टी नसली तरी बार्बी वडिलांची लाडकी होती. बार्बी अतिशय हळवी होती. शाळेत शिक्षकांशी तिचं बिनसलं. तिनं येऊन वडिलांना सांगितलं. वडिलांनी तिला शाळा सोडायला सांगितली आणि घरीच खासगी शिकवणी सुरू केली. लहानपणी बार्बीचे मैत्रिणीपेक्षा मित्रच जास्त. रस्त्यात खेळायला आवडायचे. बर्याच वेळा घरच्यांना प्रॉब्लेम नसला तरी शेजारच्या काकूबाई जळतात. बार्बीच्या शेजारी राहणार्या काकूंनी शिकवायचा प्रयत्न केला की, ‘बाळा.. पोरात पोरगी लांडोरी. असं पोरांसोबत रस्त्यात खेळणं पोरीच्या जातीला शोभत नाही. तू आपली मुलींमध्ये खेळत जा.’ हे बार्बीच्या आईला समजल्यावर तिने फोन करून त्या काकूबाईंवर एवढा जाळ काढला की कानातून धूरच निघाला असेल.
मात्र हीच आई 1918 मध्ये बार्बी जेव्हा शालेय शिक्षण पूर्ण करून बाहेर पडली, तेव्हा बार्बीच्या पुढील शिक्षणाला नाही म्हणू लागली. मुख्य भीती ही होती की, पोरगी जास्त शिकली तर तिच्याशी लग्न कोण करणार? ऐकायला नवल वाटेल, पण शंभर वर्षांपूर्वी अमेरिकेत देखील भारतासारखीच स्थिती होती. 1923 पर्यंत अमेरिकेत विज्ञानशाखेतील केवळ 23 पदवीधर महिला होत्या. पुढील दहा वर्षांत ही संख्या हजारपटीने वाढली. (आजतर पुरुषांपेक्षा महिलांची संख्याच जास्त असते). याप्रसंगी बार्बीचे वडील तिच्यामागं खंबीर उभे राहिले, आईची समजूत काढली. बार्बीने नोकरी करत पैसे जमा केले होते. शैक्षणिक सत्र सुरू व्हायच्या दिवशी ट्रेन पकडून बार्बी इथाका शहरात गेली. पुढची आठ वर्षे ती तिकडेच राहिली.
बार्बीनं कॉर्नेल विद्यापीठात जीवशास्त्र हा मुख्य विषय घेऊन विज्ञानशाखेत 1919 मध्ये प्रवेश घेतला. सर्व नवीन मुलींची प्रमुख म्हणून तिची नेमणूक झाली. जेमतेम पाच फूट उंच असलेली ही पोरगी खेळात आघाडीवर होतीच; शिवाय संगीतात तिला जबरदस्त गती होती. जाझ बँडमध्ये ती बँजो वाजवत असे. ताल-लयींचा हा नाद जेव्हा अभ्यासावर अतिक्रमण करू लागला त्यावेळेस सावध होऊन ती बाजूला झाली. अनेक मित्र या काळात काजव्याप्रमाणे तिच्या आयुष्यात चमकून गेले. पण कुणाशी आयुष्यभर संबंध जोडावेत, असं बार्बीला वाटलं नाही. यानिमित्ताने होणार्या गॉसिपिंगला बार्बी खूप वैतागली. दुसर्याच्या आयुष्यात डोकावणार्या आणि त्यांच्याबद्दलचे खरे-खोटे किस्से चघळत बसणार्या मुली बार्बीच्या डोक्यात जात असत.
बार्बीनं 1923 साली पदवी मिळवली. अर्थातच पदवी मिळाल्यावर पुढं काय शिकायचं हे बार्बीचं ठरलेलं होतं. पण इथं पुन्हा तिचं स्त्री होणं आड आलं. विद्यापीठात गुणसूत्रंविषयक खूप चांगला अभ्यासगट तयार झाला होता. मात्र त्यात स्त्री उमेदवारांना प्रवेश नव्हता. म्हणून बार्बीनं नाईलाजानं वनस्पतीशास्त्र विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी ‘सायटोलॉजी’ हा मुख्य विषय आणि गुणसूत्रशास्त्र हा उपविषय म्हणून निवडला. 1925 मध्ये मास्टर तर 1927 मध्ये पीएच.डी. पदवीदेखील प्राप्त केली. बार्बरानं पुढाकार घेऊन कॉलेजमध्ये एक अभ्यासगट तयार केला होता. त्यात अनेक विद्यार्थी एकत्र येऊन मका आणि त्याची गुणसूत्रं याविषयी चर्चा करीत असत. विशेष म्हणजे यातील अनेक विद्यार्थ्यांनी पुढं महत्त्वाचं संशोधन करून नोबेल मिळवलं आहे.
बार्बरानं मक्याची गुणसूत्रं सूक्ष्मदर्शकाखाली पाहण्याआधी झाडाची मुळं रंगात बुडवून घेतली. त्यामुळं पेशीविभाजन होत असताना गुणसूत्रांचा आंतरछेद ती पाहू शकली. ही क्रिया पाहणारी ती पहिली व्यक्ती बरं का.., वर्ष होतं 1930. पुढच्या वर्षी तिनं मक्याच्या गुणसूत्रावरील तीन जनुकं दाखवणारं मानचित्र प्रसिद्ध केलं. लेविस स्टॅडलर या शास्त्रज्ञासोबत काम करताना एक्स-रेचा गुणसूत्रांवर होणारा परिणाम अभासला. गुणसूत्रशास्त्रात बार्बराच्या कामाचा दबदबा वाढत गेला. काळ लक्षात घ्या इथं.. अजून रोजालिंड फ्रँकलिननं लावलेला आणि वॉटसन क्रिक जोडीच्या नावावर खपवला गेलेला ‘डबल हेलिक्स’चा शोध वीस वर्षे दूर होता.
बार्बरा काळाच्या पुढं होती. त्यामुळं तिच्या संशोधनाला सहजासहजी मान्यता मिळत नव्हती. सलग सहा वर्षे ती मक्याच्या गुणसूत्रांवर विविध संशोधन पेपर प्रसिद्ध करत राहिली. तिला अजून कायम नोकरी नव्हती. पुन्हा-पुन्हा तिचं स्त्री असणं आड येत होतं. ‘त्या’ विद्यापीठात विज्ञान विषयात आजवर महिला प्राध्यापिका नेमण्यात आली नव्हती. 1931 ते 1933 याकाळात तिला नॅशनल रिसर्च कॉन्सिलची शिष्यवृत्ती मिळाली होती, त्यावर बार्बरा कशीबशी गुजराण करत होती. दुष्काळात तेरावा महिना..! तिच्या आयुष्यात एक निर्णय चुकला. 1933 साली गनिनहम स्कॉलरशिप मिळाली म्हणून ती जर्मनीला गेली. दुसर्या महायुद्धाचा सुरुवातीचा काळ होता तो. त्यामुळे तिथं एक वर्ष देखील काढू शकली नाही.
अमेरिकेला परत आली; पण आता भविष्य पूर्ण अंधारात. त्या काळात स्त्री संशोधक प्रयोगशाळेत आली तर पुरुष संशोधक संशोधन सोडून त्यांच्याकडे बघत बसतील, ही भीती बोलून दाखवली जायची. जर नवरा-बायकोची जोडी सोबत काम करणार असेल तरच स्त्रियांना प्रयोगशाळा उपलब्ध व्हायची. अविवाहित बार्बराला अनेक ठिकाणी नाकारण्यात आलं; मात्र एक संधी तिला मिळाली. कोल्ड स्प्रिंग हार्बर इथं एक नवी प्रयोगशाळा तयार होत होती. तिथं बार्बराला डेमेरेक यांच्या मदतीनं संशोधक म्हणून जागा मिळाली. लवकरच डेमेरेक त्या संस्थेचा संचालक झाला आणि बार्बरा पर्मनंट झाली. इथेच तिने ‘जम्पिंग जीन्स’चा शोध लावला, ज्यासाठी तिला नोबेल मिळालं आहे.
बार्बरा मक्याच्या दाण्यावर संशोधन करत होती. घेतलेल्या नमुन्यातील मक्याचे 50 टक्के दाणे पुनर्निर्मितीसाठी अकार्यक्षम असतील, असा तिचा अंदाज होता. प्रत्यक्षात फक्त 25 ते 30 टक्के दाणे अकार्यक्षम निघाले. असं का झालं असावं, याचा तर्कसंगत विचार केला आणि ‘एकमेकां सहाय्य करू। अवघे धरू सुपंथ॥’ हे जीन्सचं जीवनसूत्र तिच्या लक्षात आलं. गुणसूत्रं स्वतःच स्वतःला दुरुस्त करताना काही जनुके गाळतात. (जनुकं म्हणजेच जीन्स हे गुणसूत्राचा म्हणजे क्रोमोसोमचा भाग असतात बरं का.) हा ‘जम्पिंग जीन्स’चा शोध भविष्यात अमर्यादित संधी उपलब्ध करून देणारा ठरला. अनुवंशिकता शास्त्रामध्ये ज्या आदरानं मेंडेलचं नाव घेतलं जाईल, तेवढेच बार्बराचं देखील.
अर्थात, बार्बराच्या संशोधनाला लगेच मान्यता मिळाली नाही. बार्बरा ही काळाच्या पुढं दोन दशकं होती. जीनची स्थिती स्थिर आहे आणि उत्परिवर्तन ही एक दुर्मिळ आणि यादृच्छिक घटना आहे, असा आजवरचा समज होता. बार्बराच्या निष्कर्षांमध्ये त्याला अगदी उलट करून टांगलं होतं. जनुकीय द्रव्यं आपला क्रम बदलतात, शेजारच्या जनुकाला क्रियाशील किंवा निष्क्रिय करू शकतात, ज्याच्यामुळे नवीन पिढीमध्ये आधीच्या पिढीचे गुणधर्म हस्तांतरित होताना बदलत असतात, असा सिद्धांत त्याकाळी पचनी पडणं अवघड होतं. सहकारी शास्त्रज्ञ आणि विज्ञानजगतात या संशोधनाला मिळणारा थंड प्रतिसाद तिच्या पदरात नैराश्य घालत होता.
एकेकाळी कॉलेजमधली लीडर असलेली बार्बरा आता अनेक वर्षं एकलकोंडी राहिल्यामुळे प्रभावी संवादाची क्षमता गमावून बसली होती. ना तिला प्रभावी बोलता येत होतं, ना स्पष्ट आणि सुलभ, सोपं लिहिता येत होतं. नंतर तर तिनं संशोधन पेपर प्रसिद्ध करणं देखील थांबवलं; संशोधन मात्र कधीच थांबवलं नाही. तिच्या आयुष्यात संशोधन आणि वाचन या दोनच बाबींना स्थान होतं. पुस्तकं हीच तिचे एकटेपणातील साथी होते. एकटेपणाची तिला एवढी सवय होती की कधी लग्न करावं वाटलं नाही. मला कोणीच एवढा आवडला नाही; आणि मला लग्न म्हणजे काय, हे पण कधीच समजलं नाही, मला त्याची कधी गरज वाटली नाही, असं ती म्हणायची.
संशोधन देखील तिला एकटीनेच करायला आवडायचं. कारण इतर शास्त्रज्ञांवर मेंडेलचा एवढा पगडा होता की ते म्हणायचे की एकतर ही बाई वेडी तरी आहे किंवा प्रचंड ‘जीनियस’ तरी. एकटीने काम केल्यामुळेच तिच्या यशापयशाचे श्रेय तिला एकटीला मिळणार होतं. त्यामुळेच ती पहिली महिला होती, जिला आरोग्यशास्त्र विभागात न विभागता एकटीला नोबेल मिळालं आहे. तसंच ती पहिली अमेरिकन महिला, जिला कोणत्याही विषयात न विभागता एकटीला नोबेल मिळालं आहे. तिला नोबेल जाहीर झाल्याची बातमी जेव्हा रेडिओवर ऐकली, तेव्हा केवळ एकच वाक्य तिनं उद्गारलं, “ओह डीअर.”
तिच्या 90 व्या वाढदिवशी तिला एक अनोखी भेट मिळाली. तिच्या संशोधनामुळं प्रेरित होऊन लिहिलेले लेख संकलित आणि संपादित करून एक सुंदर पुस्तक बनवलं होतं. तिची सहकारी नीना फेडेरॉफने या कामात पुढाकार घेतला होता. पुस्तकाला छान नाव दिलं होतं – ‘द डायनॅमिक जिनोम.’ अनेक लेखक त्या वाढदिवसाला उपस्थित होते. एक-एक लेखक त्याचा लेख वाचू लागला अन् भीडस्त बार्बरा या अनपेक्षित कौतुकाने आधी जराशी बुजली; मात्र थोड्याच वेळात तिचा चेहरा अभिमानाने चमकू लागला. एका विज्ञानाच्या संन्यासिनीला यापेक्षा सुंदर भेट कोणती असणार! ती म्हणाली, “हा माझा सर्वांत संस्मरणीय वाढदिवस असेल.” या कार्यक्रमानंतर दोनच महिन्यांत बार्बराने या जगाचा निरोप घेतला.
नवी पिढी जन्माला घाला आणि त्यांच्यातील जीन्सच्या रुपात अमर व्हा. सामान्य व्यक्तींसमोर हा सोपा पर्याय असतो. दुसरादेखील एक पर्याय असतो – असं काहीतरी या जगाला देऊन जा, ज्यानं तुमचं नाव कायम राहील. पहिला पर्याय सोपा असतो; दुसरा अवघड. पहिल्या पर्यायात नंतरच्या पाचव्या पिढीला तुमचं नाव माहीत असण्याची शक्यता कमी. मात्र दुसर्या अवघड पर्यायासाठी ज्यांनी मेहनत घेतली असेल, त्यांचं नाव अजरामर होतं. बार्बराने जरी नवी पिढी जन्माला घातली नाही, तरी आज ती अमर आहे, कायम अमर राहील. तिचे ‘डायनॅमिक जिनोम्स’ महिलांना कायम प्रेरणा देत राहतील.