अशोक वानखडे - 9619413193
बुद्ध संपला की माणूस संपवता येतो!
राम संपला की माणूस संपवता येतो!
येशू संपला की माणूस संपवता येतो!
पैगंबर संपला की माणूस संपवता येतो! ॥1॥
पण त्या आधी…
त्यांचे उपदेश संपवायचे असतात।
उपदेश संपविण्यासाठी,
त्यांचेच शब्द घेऊन,
धर्मारंभ करायचा असतो.
मग आपोआप वाद होतात,
विवाद होतात..!
दंगे होतात, युद्धं होतात,
आणि धर्म सर्वतोपरी होतो!
धर्म महान झाला की मग,
‘बामियांन’, ‘बुतशिकन’ होतो,
‘जय श्रीराम’चा नारा होतो,
येशू परत क्रूसावर चढतो,
जिहाद ‘तालिबानी’ होतो!
तत्पूर्वी..
बुद्ध संपलेला असतो,
राम संपलेला असतो,
येशू संपलेला असतो,
पैगंबर संपलेला असतो,..!
हे संपले की मग
माणूस संपवता येतो..! ॥2॥
माणूस संपला की राहतात फक्त वस्तू!
जिकडे-तिकडे वस्तूच वस्तू..!
सजीव वस्तू, पुलिंगी वस्तू , स्त्रीलिंगी वस्तू
सर्व वस्तू धाकात असतात,
धर्माच्या ‘ब्रँडेड’ वेष्टनात असतात!
वस्तूच करतात वस्तूंचा व्यापार!
वस्तूंचे देश तुटून पडतात,
वस्तूंच्या व्यापारात..!
देशांच्या टोळ्या झालेल्या असतात!
त्यांच्यासाठी आदिम आधुनिक
असे काहीच नसते,
काळ थांबलेला असतो…!
पण त्याआधी,
पैगंबर संपलेला असतो!
येशू संपलेला असतो!
राम संपलेला असतो!
बुद्ध संपलेला असतो!
माणूस संपलेला असतो…!!! ॥3॥
–अशोक वानखडे, कल्याण
संपर्क: 9619413193