प्रा. प्रविण देशमुख -

अत्यंत जिव्हाळ्याचे, दैनंदिन उपयोगाचे, ‘सोशल कनेक्टिव्हिटी’ आणि सोशल मीडियाच्या वापरासंबंधीची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सोशल मीडिया विभागाद्वारे आयोजित बहुप्रतीक्षित एकदिवसीय सोशल मीडिया प्रशिक्षण कार्यशाळा डोंबिवली येथे झाली.
राज्य सोशल मीडिया सदस्य श्रीप्रसाद खुळे यांनी या कार्यशाळेचे संयोजन केले होते. प्रा. प्रवीण देशमुख यांच्या लोढा हेवन, डोंबिवली येथील कुमुद बंगल्यावर रविवारी (दि. 17) सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
आरंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून लायन डॉ. सुरेंद्र भोसले यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. मान्यवरांच्या औपचारिक स्वागतानंतर ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाखांमधून आलेल्या प्रतिनिधींचा स्वपरिचय करून एकदिवसीय कार्यशाळेला आरंभ करण्यात आला. आजच्या काळात सोशल मीडियाचे महत्त्व व त्याची उपयुक्तता विषद करून त्याचा वापर व बारकावे याविषयीचे अत्यंत उद्बोधक मार्गदर्शन सोशल मीडियातील तज्ज्ञ वाघेश साळुंके (सांगली) आणि राहुल माने (पुणे) यांनी केले.
प्रा. देशमुख यांनी दिलेल्या लज्जतदार मेजवाणीचा आस्वाद घेऊन दुपारच्या सत्राला आरंभ झाला. सोशल मीडियाच्या दैनंदिन वापराच्या ‘ट्रिक्स’ देत प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांना प्रात्यक्षिकातून उत्तरे देण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजक श्रीप्रसाद खुळे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमात ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक वानखडे, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. रमाकांत जाधव, किरण जाधव यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील सुमारे 30 सदस्यांनी सहभाग घेतला.
– प्रा. प्रविण देशमुख, डोंबिवली अंनिस