धर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन

राहुल थोरात -

जगभर पसरलेल्या कोरोना रोगाच्या साथीचा फटका सर्व धर्मांच्या धर्मस्थळांना बसला आहे. मंदिर, मस्जिद, चर्च, गुरूद्वारा, विहारे सध्या बंद आहेत. मानवी संसर्गाने रोगप्रसार होऊ नये म्हणून सरकारने ही सर्व धर्मस्थळे ‘लॉकडाऊन’ केली होती.

सार्वजनिक ठिकाणी सण, समारंभ, उत्सव, यात्रा, जत्रा साजरे करण्यासही सरकारने अजुनही बंदी घातली असून ‘घरातच सण साजरे करावेत’ असे आवाहन केले आहे. त्यामुळे धर्म एकप्रकारे घरातच ‘क्वॉरंटाईन’ झाला आहे, असे म्हणावे लागेल.

कोरोना संकटाने आपल्याला धर्म व धर्मस्थळांच्याकडे एका वेगळ्या चिकित्सक नजरेने पाहण्याची संधी मिळवून दिलीय. या कोरोना संकटकाळात आपल्या रोजच्या जीवनात या देवधर्माला, धर्मस्थळांना किती स्थान द्यायचे, याचा सर्वांनी पुनर्विचार करावा. नुकतीच महाराष्ट्र शासनाने पंढरपूरच्या पायी जाणार्‍या वारीवर काही बंधने घातली आहेत. पादुका हवाईमार्गे पंढरपूरला घेऊन जाऊन प्रतिकात्मक सोहळा करण्याचे ठरवले आहे. शासनाने वारीसंबंधी घेतलेल्या या निर्णयाचे समस्त वारकरी स्वागत करतील, अशी आशा आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊन 5 मधील देशातील धार्मिक स्थळे काही अटींवर खुली करण्यास परवानगी दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संत आणि समाजसुधारकांची साक्ष काढून, ‘धर्म आणि धर्मस्थळे’ यांचा ‘सत्यशोधकी धांडोळा’ या लेखात घेतला आहे.

धार्मिक स्थळे आणि कोरोना आपत्ती

कोरोना हा रोग प्रचंड संसर्गजन्य असल्यामुळे जगभरातील धार्मिक स्थळे त्या-त्या सरकारांनी बंद केली आहेत. धार्मिक स्थळांवर होणार्‍या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे सरकारांनी ही सर्व धार्मिक स्थळे, यात्रा-जत्रा, सण-उत्सवावर मर्यादित स्वरुपात बंदी आणली आहे.

धर्मस्थळे बंदला राज्य घटनेचा आधार

भारतीय राज्य घटनेने कलम 25 नुसार भारताच्या सर्व नागरिकांना धार्मिक उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यानुसार नागरिकांच्या धार्मिक उपासनेला सरकार आडकाठी करू शकत नाही. पण जर आपल्या धार्मिक उपासनेमुळे देशाची कायदा-सुव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकते, असे सरकारला वाटत असेल, तर ते नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर बंधने घालू शकते. याचाच आधार घेऊन आज सरकारने देशातील काही नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यापेक्षा सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याला अधिक महत्त्व दिले आहे. त्यामुळे सरकारने सर्वधर्मियांची सार्वजनिक धार्मिक स्थळे कायद्यानेे तात्पुरती बंद केली आहेत.

देशभरातील धार्मिक स्थळे बंद

दररोज लाखोंच्या संख्येने भाविक ज्या धर्मस्थळांना भेट देतात, अशी देशातील सर्व मोठी धार्मिक स्थळे कोरोनाच्या साथीमुळे सध्या बंद आहेत. यामध्ये तिरुपती बालाजी, शिर्डीचे साईबाबा मंदिर, मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर, काशीचे विश्वनाथ मंदिर, अमृतसरचे सुवर्णमंदिर, अजमेरचा गरीब ख्वॉजा दर्गा, बुद्धगया, गोव्याचे झेवियर चर्च अशी हजारो मंदिरे, दर्गा, चर्चेस, विहारे बंद आहेत.

लॉकडाऊन सुरू असल्यामुळे कोणीही भाविक धर्मस्थळांना भेट देत नाही. त्यामुळे धर्मस्थळांना शेकडो कोटींच्या देणग्या मिळाल्या नाहीत, म्हणून त्यांच्या व्यवस्थापनाला तोटा होतोय. यावर उपाय म्हणून काही मंदिरांनी आपल्या सेवकांना नोकरीतून काढून टाकले आहे.

रोगाच्या साथीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळे बंद होण्याची ही इतिहासामध्ये पहिलीच घटना असेल. परंतु या विरोधात सर्वसामान्य लोकांनी कोणत्याही प्रकारे धार्मिक स्थळे सुरू करा, असा आग्रह धरलेला दिसत नाही. लोकांना धार्मिक स्वातंत्र्यापेक्षा सार्वजनिक आरोग्याची जास्त काळजी आहे, हे यातून अधोरेखित होते.

मंदिरं आणि वारकरी संप्रदाय

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हा पुरोगामी विचारांचा म्हणून ओळखला जातो. वारकरी संतांनी मंदिरातील बंदिस्त देव सर्वसामान्य माणसांत आणला. ‘माणसात देव बघा’ अशी शिकवण दिली. ‘आपल्या धार्मिक उद्धारासाठी मंदिरात गेलेच पाहिजे असे नाही,’ ही शिकवणही वारकरी संतांनी महाराष्ट्राला दिली आहे. मंदिरात न जाताही तुम्ही करीत असलेल्या कामातून जनसेवा करा, गरजूंना मदत करा, असा उपदेशही संतांनी आपल्याला केला आहे. याबाबत संत सावता माळी म्हणतात – कांदा, मुळा, भाजी। अवघी विठाई माझी ॥

मोट नाडा विहिर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥

आपल्या कार्यातच ईश्वर आहे, त्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही. संत गाडगेबाबा तर कधीही मंदिरात जास्त नसत, तर ते वारीदरम्यान घाण झालेले पंढरपूर आपल्या हातांनी स्वच्छ करीत. ’स्वच्छतेत ईश्वर आहे,’ अशी त्यांची श्रद्धा होती. मंदिरावर भाष्य करताना ते कठोर होऊन म्हणतात की, मंदिरात देव नसतो; तर पुजार्‍यांचे पोट असते.’ सातशे वर्षांपूर्वी वारकरी संतांनी मंदिरात पूजा करण्यापेक्षा आपले कर्तव्य पार पाडण्याला महत्त्व दिले. त्यामुळे कोरोना काळात मंदिरे बंद असल्यामुळे लोकांच्या मनात असंतोष आहे, असे निदान महाराष्ट्रात तरी दिसत नाही. यामागे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे, हे मान्य करावे लागेल.

संतांच्या उपदेशाप्रमाणेच सध्या लोकांची वाटचाल

जे का रंजले गांजले। त्याशी म्हणे जो आपुले। तोचि साधू ओळखावा। देव तेथेची जाणावा॥ हा संतविचार घेऊन सध्या जनता कोरोना संकटकाळात एकमेकांना मदत करीत आहे. गरजवंताला मदत करा, भुकेल्याला अन्न द्या, आजारी व्यक्तीची सेवा करा, यातच तुम्हाला ईश्वर भेटेल, असा संतांनी केलेला उपदेश या संकटकाळात देशातील जनता पाळताना दिसत आहे.

आजच्या कोरोना महामारीच्या अभूतपूर्व संकटकाळात सरकारी यंत्रणा सर्व ठिकाणी पोचणार नाही, हे माहिती असल्यामुळे देशातील जनतेनेच आता मदतकार्य हाती घेतले आहे. कोरोना संकटात अडकलेल्या आजारी व्यक्ती, प्रवासी, मजदूर, हातावर पोट असणारे श्रमिक यांना अन्नदान करणे, आसरा देणे, औषध पुरविणे असे उपक्रम स्वयंस्फूर्तीने सुरू केले आहेत. संकटकाळात माणसानेच माणसाच्या मदतीला धावले पाहिजे. ’जनसेवा हिच ईश्वर सेवा आहे,’ हे पुन्हा एकदा भारतीय जनतेने मंदिरात न जाता सिद्ध केले आहे.

गावोगावच्या जत्रा-यात्रा बंद

कोरोना संसर्गामुळे देशातील नव्हे, जगभरातील जत्रा-यात्रा-उत्सव बंद केले आहेत. भारतातील सुप्रसिद्ध अमरनाथ यात्रा, जगभर प्रसिद्ध असलेली हज यात्रा या सध्या स्थगित आहेत. तब्बल 222 वर्षांनंतर पहिल्यांदा ही हज यात्रा रद्द होणार, असे दिसते. व्हॅटिकन सिटीचे दरवाजेही भाविकांसाठी बंद आहेत.

महाराष्ट्रात एप्रिल, मे या महिन्यांमध्ये गावोगावीच्या यात्रांचा सिझन असतो. कोरोनाच्या भीतीमुळे या सर्व यात्रा-जत्रा रद्द कराव्या लागल्या आहेत.

यापूर्वीही यात्रा बंद केल्या होत्या

महाराष्ट्रात 1897 साली प्लेगची साथ मोठ्या प्रमाणात आली होती. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध जोतिबा यात्रा छत्रपती शाहू महाराजांनी खास आदेश काढून बंद केली होती. छत्रपती शाहू महाराजांनी काही लोकांच्या धार्मिक श्रद्धेपेक्षा सर्वसामान्य जनतेच्या सार्वजनिक आरोग्याकडे जास्त लक्ष दिले होते.

तसेच बेळगावचे सत्यशोधक कार्यकर्तेगुरुवर्य शामराव देसाई आणि त्यांच्या सहकार्‍यांनी बेळगाव परिसरातील गावोगावच्या लक्ष्मी जत्रा बंद करण्याची मोहीमच काढली होती. कारण गावोगावीच्या जत्रा-यात्रांमुळे गरीब शेतकरी कर्जबाजारी होतो, व्यसनी होतो, म्हणून हे सत्यशोधक कार्यकर्तेगावोगावी जाऊन लोकांना जत्रा-यात्रा करू नका, म्हणून सांगत असत. बेळगाव, चंदगड, खानापूर परिसरात 10-10 दिवस चालणार्‍या ‘लक्ष्मी यात्रा’ या सत्यशोधकांनी ‘यात्रा विरोधी मोहीम’ चालवून बंद केल्या. लोकांनाही या सत्यशोधकांचे विचार पटल्यामुळे अक्षरश: शेकडो गावातील यात्रा त्याकाळी बंद झाल्या होत्या.

जत्रा-यात्रांबद्दल संत काय म्हणतात…?

जत्रा-यात्रा-तीर्थाटन करून ईश्वरप्राप्ती होत नाही, याचे अनेक दाखले आपल्या संतांनी दिलेत. संत तुकाराम महाराज म्हणतात – तिर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनी॥’

संत कबीर महाराज तीर्थयात्रेचा समाचार घेताना म्हणतात-

हज करने गया । कई बार कबीर।

खुदा मुझ पर ही किया खता, मुख से न बोले पी॥

एक जाये काबा (मक्का), एक जाये काशी।

दोनो के गले में, लग गई है फाँसी॥

भले जाय बद्री (बद्रीनाथ), भले जाय गया।

कहे कबीर सुनो भाई साधो, सबसे बडी दया॥

तीर्थयात्रा केल्याने काय होते, हे सांगताना कबीर महाराज शेवटी म्हणतात –

जत्रा में बिठाया फतरा, तीरथ बनाया पानी।

दुनिया भयी दीवानी, ये सब है पैसे की धुलधानी॥

या संतविचारांवरून स्पष्ट होते की, जत्रा-यात्रा-तीर्थयात्रा करायची काहीही गरज नाही, अशी शिकवणच आम्हाला संतांनी दिली आहे. त्यामुळे कोरोना काळात जत्रा-यात्रा बंद असल्यामुळे खर्‍या धार्मिक लोकांना काहीही फरक पडणार नाही.

मग जत्रा-यात्रा, मंदिरे हवीत कुणाला?

आमच्या संतांनी, सुधारकांनी जर जत्रा-यात्रा, मंदिरे यांच्यावर एवढे जबरदस्त प्रहार केले असतील, तर या जत्रा-यात्रा, मंदिरे हवीत कुणाला? यावर ‘प्रबोधन’कार ठाकरे यांनी आपल्या ‘धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म’ या ग्रंथात आपल्या ठाकरी शैलीत समाचार घेतलाय. ‘प्रबोधन’कार म्हणतात की, देवळांचा धर्म म्हणजे भटांच्या पोटा-पाण्याचे गुप्त मर्म आहे. देवळे म्हणजे भिक्षुशाहीच्या जन्मसिद्ध वतनी जहागिर्‍या आहेत. देवळाशिवाय भट नाही आणि भटांशिवाय देऊळ नाही.

त्यामुळे कोरोनाकाळात धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे कोणाही सर्वसामान्य नागरिकास काही फरक पडत नाही; पण धर्मस्थळांवर ज्यांचे पोट असते, त्यांना मात्र फरक पडतो. म्हणूनच मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशामधील काही मंदिरांतील पुजार्‍यांनी सरकारकडे या काळात मदतीची मागणी केली आहे. मध्य प्रदेश सरकारने तर पुजार्‍यांसाठी 8 कोटी मदतीच्या पॅकेजची घोषणाही केली आहे म्हणे! लक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र विकून लोकांना फसविणार्‍या या पुजार्‍यांना या पैशाच्या यंत्राचा कोरोना संकटकाळी काही उपयोग करून घेता आला नाही, असे दिसते.

ऑनलाईन पूजा – देणगीचा फंडा

कोरोना लॉकडाऊनमुळे भाविक हे धार्मिक स्थळी येऊ शकत नाहीत. त्यामुळे देशातील काही धर्मस्थळांनी आधुनिक विज्ञानाचा वापर करून ‘ऑनलाईन पूजा’ घालून देण्याचा उपक्रम सुरू केलाय. ‘तुम्ही घरातच बसा, तुमच्या नावाने आम्ही मंदिरात पूजा घालू, ती तुम्ही ऑनलाईन पाहा. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करून दक्षिणा द्या,’ असा काहीसा हा ‘ऑनलाईन’ उपक्रम सुरू आहे. ’ऑनलाईन‘ पूजा केलेले, ऑनलाईन पेमेंट करून दक्षिणा दिल्यावरही पुण्य मिळते,’ असा प्रचारही सध्या जोरात सुरू आहे. या प्रचारास काही बहुजन बळी पडत आहेत.

घरातला देव धर्म बाहेर कोणी आणला?

कोरोनाने आपल्याला घरातच देव धर्म ठेवायला भाग पाडले.15 मार्चपासून देशात लॉकडाऊन सुरू झाला. दरम्यान, भारतात विविध धर्मियांचे सण-उत्सव आले. जसे – 25 मार्चला गुढी पाडवा, 2 एप्रिलला श्रीराम नवमी, 6 एप्रिलला महावीर जयंती, 8 एप्रिलला हनुमान जयंती, 10 एप्रिलला गुडफ्रायडे, 12 एप्रिलला ईस्टर संडे, 14 एप्रिलला आंबेडकर जयंती, 26 एप्रिलला बसवेश्वर जयंती, 26 एप्रिललाच अक्षय्य तृतीया, 1 मे ला महाराष्ट्र दिन/कामगार दिन, 7 मे ला बुद्ध जयंती, 25 मे ला रमजान ईद.

हे सर्व सण उत्सव भारतीयांनी आपल्या घरामध्ये राहून आनंदाने साजरे केले. कोणीही शासनाने घातलेले लॉकडाऊनचे नियम मोडले नाहीत. यातूनच हे स्पष्ट होते की, ’आपण आपला देव-धर्म घरातच पाळू शकतो, त्याला सार्वजनिक स्वरूप देण्याची गरज नाही’. देव-धर्म सार्वजनिक झाला की, अनेक जातीय, धार्मिक समस्या निर्माण होतात याची असंख्य उदाहरणे आपल्याकडे आहेत. खरं तर राजकारण्यांना व धर्मांधांना सण-उत्सव सार्वजनिकपणे रस्त्यावर साजरे करण्याची हौस असते. त्यातून त्यांना मतांची गणिते व धर्ममार्तंडांना स्वत:चे वर्चस्व टिकवून ठेवायचे असते. या काळात कोरोनाने आपल्याला हे दाखवून दिले की, सण-उत्सव, देव-धर्म सार्वजनिकरित्या साजरे न करता ही आपण धर्माचरण करू शकतो. राजकारण्यांचा व धर्ममार्तंडांचा स्वार्थ मोडून काढणेसाठी आपण सण-उत्सव हे सार्वजनिक ठिकाणी साजरे करणे हळूहळू कमी केले पाहिजे.

वारी आणि कोरोना संकट

पुढील आठवड्यात आषाढी वारी आहे. लाखो वारकरी या वारीला दरवर्षी पंढरपूरला पायी जातात. परंतु यावर्षी कोरोनाचे संकट वारीवर येऊ घातले आहे. कोरोना काळात सार्वजनिक उत्सव साजरे करण्यास सरकारने बंदी घातल्यामुळे वारीचे भवितव्य अधांतरी आहे. याबाबत काही फडकरी, पालखीप्रमुख वारीची शेकडो वर्षांची परंपरा खंडित पडू नये म्हणून वारी काढण्यावर आग्रही आहेत. त्यांना काही राजकारणी मंडळी फूस लावत आहेत. काही मानाच्या पालख्यांनी कोरोना साथीमुळे यावर्षी पालख्या निघणार नाहीत, असा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही दोनवेळा वारीची परंपरा साथीच्या रोगामुळे खंडीत झाली होती. सन 1889 साली प्लेगच्या साथीमुळे तर 1918 साली फ्ल्यूच्या साथीमुळे वारीवर तत्कालीन सरकारने काही बंधने घातली होती.

‘वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून या कोरोना संकटकाळी वारी काढावीच,’ असा आग्रह धरणार्‍यांना सांगावं वाटतं की, मुळात वारकरी परंपरा हीच समाजातील कर्मठतेच्या, चालीरीतीच्या विरोधातील आहे. याविषयी तुकोबा म्हणतात –

आंधळ्याच्या काठी, लागले आंधळे। घात एकेवेळी पुढे मागे ।

न धरवी चाली, करावा विचार।

आंधळ्याच्या काठीला जसे आंधळे येऊन चिकटतात. त्यामुळे पुढे चालणार्‍या सर्वांचा एकाच वेळी घात होऊ शकतो. एक खड्ड्यात पडला की, मागचा देखील खड्ड्यात पडतो. त्यामुळे तुकोबा म्हणतात की, ‘न धरावी चाली’ म्हणजे पूर्वापार चालीरीती आहे म्हणून ती करण्याचा अट्टाहास करू नये, त्यावर विवेकी विचार करावा.

वारकर्‍यांना फूस लावण्यार्‍या भामट्यांच्या चुकीच्या ऐकण्यामुळे आपले नुकसान होऊ शकते. म्हणून लोकहो, संकट असताना तुम्ही सजग राहा, असे तुकोबा म्हणतात-

तुका म्हणे काही उघडा रे डोळे।

जाणोनि आंधळे होऊ नका॥

यावेळी कोरोनाचं संकट समोर स्पष्ट दिसत असताना तुम्ही जाणूनबुजून आंधळे होऊ नका. त्यामुळे तुकोबा सज्जनांना डोळे उघडण्याचे आवाहन करतात. एवढा उपदेश ऐकूनही काही लोक आग्रही असतील, तर तुकोबा पुढे शेवटचा स्वत:चा निर्णयही या अभंगातून जाहीर करतात –

तुका म्हणे केला निवाडा रोकडा । राऊत हा घोडा हातोहाती ॥ तुकोबा म्हणतात, तुम्ही जर माझे ऐकत नसाल तर आता मी माझ्यापुरता रोकडा (योग्य) निवाडा केला आहे. जसे घोड्याच्या चालीवरून राऊत घोडा उत्कृष्ट किंवा निकृष्ट आहे, असे हातोहात ओळखतो. त्याचप्रमाणे होणारा परिणाम लक्षात घेऊन मी देखील माझ्या हिताचा रोकडा निवाडा केला आहे. तुकोबांचा हा उपदेश ध्यानी घेऊन महाराष्ट्रातील संतपरंपरेचे पाईकही कोरोना संकट काळात वारी काढायची की नाही, याबाबात आपला ‘रोकडा निवाडा’ करतील, अशी आम्हास खात्री आहे. नुकतीच महाराष्ट्र शासनाने पंढरपूरच्या पायी जाणार्‍या वारीवर काही मर्यादा घातल्या आहेत. पादुका हवाईमार्गे पंढरपूरला घेऊन जाऊन प्रतिकात्मक सोहळा करण्याचे ठरवले आहे. शासनाने वारीसंबंधी घेतलेल्या या निर्णयाचे समस्त वारकरी स्वागत करतील, अशी आशा आहे.

मंदिरातील सोने आणि कोरोना

सध्या भारतात 76 लाख कोटी रुपयांचं सोनं हे विविध धर्मांच्या धर्मस्थळामध्ये पडून आहे. कोरोनामुळे देशावर जे आर्थिक संकट आलंय, त्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी सरकारने हे सोने ताब्यात घावं, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. यावरून बराच गदारोळ उठवला गेला.

सोशल मीडियातही तरुणांची हीच मागणी

या मागणीच्या अगोदर मंदिरातील संपत्तीवरून सोशल मीडियावर देशातील तरुणांची तुफान चर्चा-प्रतिचर्चा सुरू होत्या. या नवविचारांच्या तरुणांच्या मागणीलाच पृथ्वीराज चव्हाण यांनी वाचा फोडली. कोणत्या मंदिरात किती सोनं आहे, याच्या याद्याही या काळात प्रसारमाध्यमांनी जाहीर केल्या.

देशाने नवे कर्ज काढून कोरोनाच्या आपत्तीशी तोंड देण्यापेक्षा आपल्या देशातील मंदिरातील संपत्ती संकटकाळात का वापरू नये, असे म्हणून चव्हाणांच्या या मागणीला जनतेने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. काही धर्मांधांनी मात्र ’मंदिरातील संपत्ती सरकारला देणे म्हणजे आमच्या धर्मावरच घाला आहे,’ अशी आवई उठवली. ‘फक्त हिंदूंच्याच देवळांतील संपत्तीवर तुमचा डोळा का?’ असा खोचक सवालही विचारला गेला. खरे तर सर्व धर्मियांच्या धार्मिक स्थळातील संपत्ती सरकारने ताब्यात घ्यावी, अशी मागणी चव्हाणांची होती. यापूर्वीच्या भाजप सरकारने मंदिरातील सोने बँकेत ठेवून घेण्याची योजना आणली होती. याचे पुरावे चव्हाण यांनी दिल्यानंतर या मागणीचा विरोध थोडा मावळला.

धर्मस्थळांची संपत्ती ताब्यात घ्या, ही जुनीच मागणी

सन 1932 साली थोर समाजसुधारक डॉ. पंजाबराव देशमुख यांनी मुंबई प्रांतात ‘हिंदू देवस्थान संपत्ती’ बिल आणले होते. सर्व देवस्थाने शासकीय नियंत्रणाखाली आणून त्यांच्या संपत्तीचा वापर शिक्षणासाठी करावा, अशी त्यांची मुख्य मागणी होती. पण हे बिल पारित होऊ शकले नाही.

वीस वर्षांपूर्वी मुस्लिम बोहरी समाजातील ज्येष्ठ बुद्धिप्रामाण्यवादी डॉ. असगर अली इंजिनिअर यांनी बोहरा मुस्लिम धर्मगुरूंच्या संपत्तीबद्दल प्रश्न विचारले, वक्फ बोर्डाकडे प्रचंड जमिनी आहेत, त्यांचा उपयोग समाजासाठी व्हावा, अशी मागणी केली. यावर चिडून धर्मांधांनी त्यांच्यावर पाच वेळा हल्ले केले. त्यामुळे डॉ. असगर अली म्हणतात की, धर्म आणि राजकारण याचे एकत्रिकरण जेवढे धोक्याचे असते, तेवढेच धर्म आणि संपत्तीचे एकत्रीकरण धोक्याचे आहे.

धर्म आणि संपत्ती जर एकत्र आले, तर धर्ममार्तंडांना अधिक बळ मिळेल, या संपत्तीद्वारे ते पुन्हा बहुजनांना गुलाम करतील, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुरते ओळखले होते. म्हणून बाबासाहेब म्हणतात की, ‘धर्मसत्ता ही मूलत: अर्थसत्ता आणि राजसत्ता आहे, याचे आकलन व्हायला बहुजनांच्या आणखी किती पिढ्या जातील?’

‘धर्मस्थळे बंद आहेत म्हणून

आम्हास आनंदाच्या उकळ्या फुटल्या नाहीत’

कोरोना साथीमुळे आज जगभरातील सर्व धर्मस्थळे बंद आहेत, म्हणून आम्हा धर्मनिरपेक्ष लोकांना काही आनंदाच्या उकळ्या फुटल्या नाहीत किंवा त्यामुळे आम्हास कोणाला मुद्दामहून हिणवायचे नाही, तर कोरोना संकटाने आपल्याला देव-धर्म, धर्मस्थळे यांच्याकडे एका वेगळ्या चिकित्सक नजरेने पाहण्याची संधी मिळवून दिलीय. या कोरोना संकटकाळात आपल्या रोजच्या जीवनात या देवधर्माला, धर्मस्थळांना किती स्थान द्यायचे, याचा सर्वांनी पुनर्विचार करावा एवढीच आमची माफक अपेक्षा आहे.

घरात थांबूनही आपण आपली श्रद्धा उन्नत करू शकतो. गेली दोन महिने आपण धर्मस्थळांमध्ये गेलो नाही म्हणून देव आपल्यावर रुसला नाही. रस्त्यावर सण-उत्सव साजरे केले नाहीत, म्हणून आपल्या सणांचे पावित्र्य कमी झाले नाही. आपण देवधर्म, श्रद्धा आपल्या घरातच उंबर्‍याच्या आतच ठेवणे सध्या तरी देशहितावह आहे, असे आम्हास वाटते. यावर पुन्हा एकदा आम्हास तुकोबाची साक्ष काढावी वाटते.

तुका म्हणे होय मनासी संवाद। आपुलाच वाद आपणाशी॥

या सर्व बाबींचा आपण अंतर्मुख होऊन विचार करावा.

यावर तुकोबा पुन्हा म्हणतात,

सत्य असत्याशी मन केले ग्वाही। मानियेले नाही बहुमता॥

म्हणून मित्रांनो, देवा-धर्माच्या, मंदिराच्या अवडंबरावर शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर नेहमी म्हणायचे- विचार तर कराल?’


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]