‘अंनिस’च्या पुढाकारामुळे डोंबिवलीत बालविवाहाविरोधात गुन्हा दाखल

अ‍ॅड. तृप्ती पाटील -

‘महाराष्ट्र अंनिस’च्या पुढाकारामुळे डोंबिवलीत बालविवाहाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवलीतील मानपाडा भागातील सोसायटीमधील एका घरात अतिशय गुप्तपणे पार पडलेल्या बालविवाहातील अल्पवयीन मुलीचे वय मात्र 15 वर्षे, 3 महिने, 11 दिवस आहे; तर नवरदेव 27 वर्षांचा आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बुवाबाजीविरोधी संघर्ष विभागाच्या राज्य कार्यवाह अ‍ॅड. रंजना गवांदे (संगमनेर) यांना आलेल्या निनावी फोनद्वारे मिळालेल्या माहीतीनुसार ‘महाराष्ट्र अंनिस’ कायदा व्यवस्थापन विभागाच्या राज्य सहकार्यवाह अ‍ॅड. तृप्ती पाटील (डोंबिवली) यांना दि.30 जून रोजी दुपारी एकच्या दरम्यान फोन झाला. त्यांनी डोंबिवलीच्या मानपाडा भागातील एका सोसायटीच्या घरात बालविवाह होणार असल्याबद्दल तक्रारीची माहिती सांगितली. मुलगी ही अल्पवयीन असून अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे, असे समजले.

अ‍ॅड. तृप्ती पाटील यांनी ताबडतोब मानपाडा पोलीस स्टेशनला कळवले आणि त्यांनी लगेचच बीट मार्शल आपल्या हद्दीत शहानिशा करण्यास पाठवले, परंतु काही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे स्वत: अ‍ॅड. तृप्ती पाटील, महा अंनिस ठाणे जिल्हा वार्तापत्र विभागाचे कार्यवाह प्रा. प्रवीण देशमुख व डोंबिवली शाखेचे प्रशिक्षण विभागाचे कार्यवाह परेश काठे ह्यांच्यासह मानपाडा पोलीस स्टेशन वरिष्ठ अधिकार्‍याच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अधिकार्‍यांना सोबत घेऊन शोध मोहीम केली असता अपेक्षित असलेले ठिकाण सापडले. एक बाल विवाह आज दुपारी संपन्न झाला असल्याची खबर पक्की झाली. अल्पवयीन मुलीचे वय मात्र 15 वर्ष, 3 महिने, 11 दिवस आहे. तर नवरदेव 27 वर्षांचा आहे. कार्यकर्त्यांकडे संपूर्ण पत्ता व इतर माहिती नसल्यामुळे बालविवाह होताना तो थांबवु शकले नाहीत. कारण त्यांच्याकडे वेळ खूप कमी होता. परंतु त्या दरम्यान पोलिसांना सोबत घेऊन बालविवाह पार पाडण्यासाठी जबाबदार असलेल्यांना पकडण्यात यश मिळाले. त्यानंतर सर्वांना मानपाडा पोलीस स्टेशनला नेण्यात आले. या प्रकरणी नवरदेव, नवरी आणि नवरदेवाकडील नातेवाईकांवर बालविवाह प्रतिबंध कायदा, 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालविवाहाच्या विरोधात गुन्हा दाखल होत असताना व झाल्यानंतर देखील काही राजकीय पक्ष हस्तक्षेप करून गुन्हा दाखल होऊ नये, म्हणून प्रयत्न करत करण्यात आला. परंतु अ‍ॅड. तृप्ती पाटील व सहकारी दबावात न आल्याने सर्व प्रयत्न हाणून पाडले गेले. मानपाडा पोलीस स्टेशनचे अनुभवी पोलीस निरीक्षक तांबे, सहायक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे व त्यांचे बीट मार्शल पोलीस यांचे उत्तम सहकार्य लाभले. तसेच कोकण विभाग बालकल्याण समितीच्या सल्लागार व मदतनीस अ‍ॅड. मनीषा तुळपुळे यांचेही विशेष सहकार्य मिळाले.