श्रीपाल ललवाणी -

फ्रेंडस् ऑफ दाभोलकर आणि परिवर्तन संस्था निर्मित ‘कसोटी विवेकाची’ या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या जीवनकार्य व विचारांवर आधारित, चित्र, शिल्प, कला प्रदर्शनाचे आयोजन पुणे येथील बालगंधर्व कलादालनात दि.२६ फेब्रुवारी ते २ मार्च असे पाच दिवस पुणे जिल्ह्यातर्फे करण्यात आले होते.
प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी फ्रेंडस् ऑफ दाभोलकर गटाच्या विद्या कुलकर्णी, ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाट, मुक्ता दाभोलकर, महाराष्ट्र अं. नि. स. ट्रस्टचे अध्यक्ष मा. प्रतापराव पवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. विद्या कुलकर्णी यांनी या प्रदर्शनाच्या निर्मितीमागची पार्श्वभूमी विशद केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे जीवनकार्य व विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी या कलाकृतींची निर्मिती केली असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात श्रीपाल ललवाणी म्हणाले, “या प्रदर्शनात असलेला डॉ. दाभोलकर यांच्या हनुमान उडीचा पुतळा म्हणजे एक प्रतीक आहे. कबड्डी खेळताना डॉ. दाभोलकर प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या डोक्यावरून उडी मारून सहज गुण मिळवायचे. तसेच आपल्याला विरोधी विचारांना उल्लंघून विवेकाची स्पर्शरेषा गाठायची आहे.”
“चळवळ ही कार्यकर्त्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. चळवळी बाहेरच्या पत्रकारांनी दाभोलकर खून खटला लावून धरला आहे तसेच चळवळीत नसलेल्या विद्यार्थ्यांकडून हे प्रदर्शन तयार करून घेऊन विवेकवाद हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवला आहे”, असे प्रतिपादन मुक्ता दाभोलकर यांनी केले. या प्रसंगी प्रतापराव पवार म्हणाले, “अंधश्रद्धा निर्मूलनाचे विचार सर्वदूर पोहचवणे गरजेचे आहे. या प्रदर्शनाद्वारा हे काम होत आहे. हे प्रदर्शन महाराष्ट्रात सर्वत्र भरविण्यात यावे.”
अध्यक्षीय समारोप करताना लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, “अंधश्रद्धा पसरविणारे लोक खलनायक असले तरी अंधश्रद्ध लोक हे त्यांचे बळी आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. अंधश्रद्ध लोकांशी आपण करुणा व बंधुभावाने संवाद साधून, अविवेकाच्या लोकांशी लढले पाहिजे.”

२८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त साधना प्रकाशनाच्या ‘मला विज्ञानाने काय दिले’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे (चघउङ) प्रमुख मार्गदर्शक मा. विवेक सावंत यांच्या हस्ते सदर पुस्तकाचे प्रदर्शन करण्यात आले. २० ऑगस्ट २०२० ला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या १२ लेखांचे संकलन सदर पुस्तकात आहे. विनोद शिरसाट यांनी या पुस्तकामागची प्रेरणा व प्रवास उलगडून दाखविला. १२ विविध क्षेत्रातील लेखकांचे हे लेख असल्याचे त्यांनी सांगितले. अं. नि. स.ट्रस्टचे सचिव मा. दीपक गिरमे यांनी प्रास्ताविक करताना छोट्या पुस्तकांद्वारेच आपण लोकांपर्यंत पोहचू शकतो असे सांगितले. पुस्तक प्रकाशनानंतर मा. विवेक सावंत म्हणाले, “डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार व कार्य सध्याच्या नवमाध्यमांवर उपलब्ध करून दिले पाहिजे, तरच त्याचा प्रचार व्यापक होईल. डॉ. दाभोलकरांचे कार्य विद्यार्थ्यांना किती महत्त्वाचे वाटते हे या प्रदर्शनावरून दिसून येते.” श्रीपाल ललवाणी यांनी सूत्रसंचालन केले.
दि.१ मार्च रोजी प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याशी सवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.सध्याच्या चित्रकला प्रशिक्षण पध्दतीत अनेक दोष असून, त्या अभ्यासक्रमात बदल होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केले. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या संवादात अनेक युवकांनी चित्रकलेच्या संदर्भात प्रश्न विचारले. या वेळी गणेश चिंचोले व विनोद शिरसाट मंचावर उपस्थित होते. अनिल वेल्हाळ यांनी सूत्रसंचालन केले.

दि.२ मार्च रोजी प्रदर्शनाचा समारोप समारंभ प्रसिद्ध चित्रकार राजू सुतार व गणेश विसपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी राजू सुतार म्हणाले, “तुम्ही बोलते झालात तरच त्याला काही अर्थ आहे. जे विचार आपण मानतो त्याविषयी कृती नाही तर निदान बोलले तरी पाहिजे.” गणेश विसपुते म्हणाले, “कलाकार, लेखक हे कार्यकर्त्यांप्रमाणे रस्त्यावर उतरून मोर्चा, आंदोलन करू शकत नाही, पण ते जनमत तयार करण्याचे महत्त्वाचे काम करतात.” या वेळी विश्वास पेंडसे व विनोद शिरसाट मंचावर उपस्थित होते.

२ मार्चला संध्याकाळी प्रदर्शनाची सांगता करण्यात आली. या प्रदर्शनाला पुणेकरांनी मनापासून प्रतिसाद दिला. अनेक युवकांनी प्रदर्शन पाहताना प्रश्न विचारून अनेक गोष्टी समजून घेतल्या. अनेक कलाकार व मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली. विस्तारभयास्तव येथे नामोल्लेख करणे शक्य नाही. १७० पेक्षा जास्त लोकांनी पोस्टकार्डवर अभिप्राय लिहून दिला. यात काही शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश होता. कित्येकजण समितीचे सदस्य झाले तर अनेकांनी अं. नि. वार्तापत्राची वर्गणी भरली.
हे प्रदर्शन लावल्यापासून ते काढेपर्यंत पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्यास तोड नाही. दोन संस्थांचा ऋणनिर्देश आवर्जून केला पाहिजे. परिवर्तन संस्थेच्या रेश्मा कचरे मॅडम व त्यांचे सहकारी यांनी खूपच मदत केली. त्यांचे मनःपूर्वक आभार. तसेच ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाट व साधनाच्या कर्मचारी वर्गाने अनमोल सहकार्य केले. विनोद शिरसाट यांनी विविध कार्यक्रम, वक्ते केवळ सुचविलेच नाही तर प्रत्यक्ष कार्यक्रमात सर्वतोपरी मदत केली. त्यांचे कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत. आणखी एका व्यक्तीचा उल्लेख आवश्यक वाटतो, तो म्हणजे मिलिंद जोशी. त्यांनी पाच दिवस व्यवस्थित फोटो घेऊन ते ग्रुपवर पाठवले. वेळप्रसंगी प्रेसनोटही तयार करून दिली. धन्यवाद. फ्रेंडस् ऑफ दाभोलकर गटाच्या सुहास जोशी या उत्साही अवलियाच्या उल्लेखाशिवाय लेख पूर्णच होणार नाही. जिथे जिथे हे प्रदर्शन झाले तिथे तिथे सुहास जोशींनी प्रदर्शन लावण्यापासून ते परत पॅकिंग करण्यापर्यंत आधारवडाची भूमिका निभावली. त्यांच्या सहभागाशिवाय हे प्रदर्शन होऊच शकणार नाही. त्यांचे मनापासून आभार. माध्यमांनीही चांगली दखल घेतली. वर्तमानपत्रात रोज बातम्या येत होत्या. फ्रेंडस् ऑफ दाभोलकर गटाच्या ज्येष्ठ पत्रकार संयोगिता ढमढेरे यांचा ‘कसोटी विवेकाची, दाभोलकरांच्या विचारांचा जागर’ हा लेख लोकमतमध्ये प्रसिद्ध झाला. या लेखात त्यांनी प्रदर्शनाविषयी माहिती देतानाच, डॉ. दाभोलकरांविषयीचे गैरसमज या प्रदर्शनामुळे कसे दूर होतात हे दाखवून दिले. अनेक टी.व्ही. चॅनेलवाल्यांनीही दखल घेतली. अनेक हौशी युवकांनी व्हिडिओ शूटिंग करून ते यू ट्यूबवर अपलोड केले.

अशा प्रकारे एक उत्साहवर्धक सोहळा यशस्वीपणे पार पडला. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. नवीन कार्यकर्ते जोडले गेले. डॉ.दाभोलकरांच्या विचारांची, कार्याची माहिती नवीन पिढीपर्यंत पोहचवण्यात यश आले. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात हे प्रदर्शन भरवलेच पाहिजे असे मला वाटते.
– श्रीपाल ललवाणी, पुणे
(सर्व फोटो-मिलिंद जोशी)