जादूटोणा-भूत भानामती बंदी कायद्यास विरोध कुणाचा आणि का?

कॉ. गोविंद पानसरे -

२० फेब्रुवारी शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा ८ वा स्मृतिदिन!

६ फेब्रुवारी २०१५ ला सकाळी फिरायला गेले असताना सनातन्यांनी गोळ्या घातल्या. २० फेब्रुवारीला उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. कॉ. गोविंद पानसरे हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे जेष्ठ मार्गदर्शक होते. शहीद डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर ते चळवळीचे आधारस्तंभ बनले. जादूटोणाविरोधी कायदा व्हावा म्हणून त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या बरोबरीने संघर्ष केला. आज हा कायदा महाराष्ट्रात रद्द व्हावा म्हणून आंदोलन करण्याची भाषा बोलली जात आहे. अशा वेळेस कॉ. गोविंद पानसरे यांनी ‘जादूटोणा विरोधी कायद्यास विरोध कुणाचा व का?’ हा कायदा होण्यापूर्वी लिहिलेला लेख त्याच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीना अभिवादन करत पुन्हा प्रकाशित करत आहोत. – संपादक

जगभरच्या समाजात विभागांच्या विकासकामांत एक बाब सर्वत्र आणि सतत दिसून आली आहे. प्रत्येक समाज परंपरांत अडकून पडलेला असतो. शतकानुशतकाच्या परंपरा तशाच चालू असतात. आपण असे का वागतो, हे फारसे कुणी तपासत नाही. एखादा व्यवहार सर्व जण करीत राहतात. सतत करीत राहतात. आंधळेपणाने करीत राहतात. सतत करीत राहिल्याने त्याचेच एक वळण पडते. चालण्या-बोलण्याच्या लकबीचे जसे व्यक्तीला वळण पडते, तसे सामाजिक व्यवहाराचे समाजाला वळण पडते. व्यक्तीच्या बाबतीत म्हणतात की, ‘पडिले वळण इंद्रिया सकळा’ असे समाजाबाबत म्हणता येते की पडिले वळण समाजा सकळा.

समाजाच्या हाडीमांसी खिळलेला हा एक अवगुण असतो. मग या अवगुणाचा लाभ उठविणारे मतलबी समाजात तयार होतात. एका बाजूने भोळेभाबडेपणा तयार होतो आणि दुसर्‍या बाजूने या भोळेपणाचा लाभ उठविणारे मतलबी भोंदू तयार होतात. एका बाजूला भोळे तयार होतात आणि त्याचवेळी दुसर्‍या बाजूला मूठभर भोंदू तयार होतात. हे भोंदू मतलबी असतात. एकूण समाज मागासलेला होता, अज्ञानी होता त्या काळात हे घडले, हे समजण्याजोगे आहे. नंतर नवे शोध लागले. विज्ञान आले, तंत्रज्ञान आले. त्यांचा प्रसार झाला, तरीसुद्धा चिकित्सा न करता करत आलो म्हणून करत राहावे असे चालू राहते आणि त्याचा गैरफायदा उठविणारे नवे चलाख भोंदू तयार होतात. आधुनिक भोंदू, सुशिक्षित भोंदू, तंत्रज्ञानाचा वापर करणारे भोंदू तयार होताना दिसतात.

अलीकडे यांची संख्या सारखी वाढली आहे. नवनवे बाबा आणि नव्या नव्या आयामात तयार होत आहेत. सुशिक्षित, उच्चशिक्षित, विज्ञानाचा वापर करणारे, तंत्रज्ञानाचा वापर करणारे भोंदू होत आहेत.

अशिक्षित समाज जास्त अंधश्रद्ध आहे की सुशिक्षित समाज जास्त अंधश्रद्ध आहे, असा प्रश्न पडावा. अशी अवस्था आहे. या नव्या भोंदू बाबा, बायामाता, गुरुजी, शास्त्री, महाराज आणि त्यांचे लुच्चे सहकारी यांचा एक विभाग बनतो. त्यांचा हितसंबंध तयार होतो. भोंदूगिरी हा व्यवसाय बनतो. हा क्रम पुढे सरकतो. या भोंदूचा वापर करणार्‍या राजकीय, सामाजिक संस्था तयार होतात. समाज भोळाभाबडा, अंधश्रद्ध आहे, तो तसाच रहावा, त्याचे भाबडेपण वाढत राहावे, तो बुवा-बाया-महाराज, बनेल साधू, बनेल राजकारणी, संत यांच्या लागावा, असा त्यांचा प्रयत्न असतो. या सगळ्यांचा एक हितसंबंध तयार होतो. हे अगदी प्राचीन काळापासून चालत आले आहे व आजही चालू आहे. इ.स.पूर्वी चौथ्या शतकात कौटिल्याने राजनीतीवर एक सविस्तर ग्रंथ लिहून ठेवला आहे. त्याने राजनीतीसंबंधी बारीकसारीक तपशील सांगितला आहे. ‘ज्यास राज्य करावयाचे आहे, त्याने अंधश्रद्धा वाढू द्याव्यात. इतकेच नव्हे तर अंधश्रद्धा निर्माण कराव्यात’, असे मार्गदर्शन करून ठेवले आहे. खालील सविस्तर उतारा या ग्रंथाच्या पाचव्या प्रकरणातील दुसर्‍या भागात आहे.

“रात्रीतून एकाएकी प्रकट झालेले देवतेचे मंदिर अथवा सिद्धपुरुषाचे पवित्र ठिकाण उभे करून यात्रा किंवा मेळावा भरवून पैसे मिळवावेत किंवा चैत्याच्या बगीच्यातील एखाद्या वृक्षाला त्यांचा ऋतू नसतानाही फुले व फळे आलेली दाखवून तेथे देवता उपस्थित झाली आहे, अशी प्रसिद्धी करावी किंवा सिद्धपुरुषाच्या वेशातील हेरांनी एखाद्या झाडावर कररूपाने मनुष्याचा बळी मागणारा राक्षस वास करतो, अशी भीती दाखवून पूरवासी व जनपदनिवासी यांच्याकडून पैसे घेऊन त्या संकटाचे निवारण करावे किंवा भुयारी मार्गाने जोडलेल्या विहिरीत अनेक फणा असलेल्या नाग पैशाच्या रूपात दक्षिणा घेऊन दाखवावा. चैत्यस्थानातील बिळात अथवा वारुळाच्या बिळात लपवून ठेवलेल्या नागाच्या प्रतिमेत आहाराने संज्ञाहीन केलेल्या सापाचे दर्शन श्रद्धाळू लोकांना (पैशाच्या मोबदल्यात) घडवावे. जे त्यावर विश्वास ठेवणार नसतील त्यांच्या आचमनाच्या अथवा अंगावर शिंपडण्याच्या पाण्यात विष कालवून तो देवतेचा शाप आहे, असे जाहीर करावे किंवा वधाची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला सापाचा दंश करवून (देवतेचा शाप आहे जाहीर करावे.) किंवा अद्भुत चमत्कारांचे दर्शन झाले असता त्यांच्या निवारणासाठी पैसे घेऊन तिजोरीत भर टाकावी.”

भारतीय राज्यघटनेतील समता ज्यांना मान्य नाही, लोकशाही ज्यांना मान्य नाही, त्याऐवजी कौटिल्याचे पुरातन राज्यशास्त्र ज्यांना मान्य आहे, असे राजकारणी या देशात भरपूर आहेत. त्यांची राजकीय शक्ती वाढते आहे. कौटिल्याच्या मार्गदर्शनानुसार जे राजनीती राबवितात म्हणून अंधश्रद्धा सुरू राहतात. अंधश्रद्धा वाढतात. त्यांचे मातीचे गणपती दूध पितात, अशी मंडळी अंधश्रद्धा निर्मूलनाला सर्वतोपरी विरोध करीत असतात. त्यांचा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याला जो विरोध आहे, तो त्यांच्या राजनीतीचा भाग आहे. धर्मनीतीचा नाही. कोणत्याही धर्मात लोकांना फसवावे आणि धन कमवावे, असे सांगितलेले नाही. कौटिल्याचा ग्रंथ धर्मग्रंथ नाही, तर कूट राजनीतीचा ग्रंथ आहे. त्यांचे आजचे अनुयायी नीतिमत्तेवर आधारलेल्या धर्मग्रंथाद्वारे राजकारण करीत नाहीत. कौटिल्याच्या कूट राजनीतीच्या ग्रंथाद्वारे राजकारण करतात.

अशांच्या संदर्भातील कायद्याला असलेला विरोध अशा रीतीनेच समजावून घेतला पाहिजे. हा हितसंबंधांविरुद्ध संघर्ष अत्यावश्यक असतो. कोणताही हितसंबंधी गट किंवा विभाग आपला हितसंबंध आपणहून सोडून देत नसतो. तो सोडायला त्यांना भाग पाडावे लागते, त्यांच्याशी संघर्ष करावा लागते. संघर्षाखेरीज समाज बदलत नाही. संघर्षाखेरीज समाज पुढे जात नाही. संघर्ष हा समाजजीवनाचा अत्यावश्यक भाग आहे. संघर्षाखेरीज प्रगती नाही, हा नियमच आहे. विज्ञानाचे नियम समजावून घेऊन जशी विज्ञानाची प्रगती होते, तसेच समाजजीवनाच्या संघर्षाचे नियम समजावून घेऊन समाजाची प्रगती करता येते. चांगला समाज घडवायचा तर संघर्ष अपरिहार्य असतो. जे अपरिहार्य नीट करावे, टाळू नये. संघर्षाला घाबरू तर मुळीच नये. हा संघर्ष अनेक पातळींवर अनेक रीतीने करावा लागतो. वैचारिक संघर्ष, प्रत्यक्ष संघर्ष आणि कायद्याच्या आधारे संघर्ष अशा अनेक प्रकारे संघर्ष करावे लागतात. हे सर्व संघर्षाचे प्रकार एकमेकांना पूरक ठरतात.

भारताची राज्यघटना तयार करणार्‍या जाणत्या नेत्यांना हा संघर्ष प्रकारांचे भान होते. म्हणूनच त्यांनी घटनेत विज्ञाननिष्ठा सांगितली. भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत कायदे तयार होऊ लागले. घटनाविरोधी व्यवहाराला पायबंद घालणारे कायदे होऊ लागले. अस्पृश्यतेला बंदी घालणारा, अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविणारा आणि अशा गुन्ह्यांना शिक्षा ठोठावणारा कायदा तयार झाला. अस्पृश्यता पाळणर्‍यांचा हितसंबंध होता व आहे, अशांनी या कायद्याला उघड आणि छुपा विरोध केला. स्त्रियांना समानतेने वागविले पाहिजे, हे घटनेचे तत्त्व आहे. मग या तत्त्वानुसार स्त्री असो की, पुरुष काम समान असेल, तर वेतन समान दिले पाहिजे, असा कायदा आला. स्वस्त दरात स्त्रियांचे श्रम वापरणारे श्रमशक्तीचे जे खरेदीदार आहेत, त्यांनी या कायद्याला विरोध केला. संपत्तीत मुलीलाही मुलाप्रमाणे समान हक्क मिळाला पाहिजे, असा कायदा आला आणि पुरुषी वर्चस्वाचा हितसंबंध असलेल्यांनी या कायद्याला विरोध केला. कामगारांचे शोषण कमी करणारा किमान वेतन कायदा आला. त्याला मालकांनी विरोध केला, अजूनही करतात.

समाजसुधारणेचा सर्व कायद्यांना जगभर विरोध होत आला आहे. भारतातही होत आला आहे. सती बंदीच्या कायद्याला विरोध झाला, बालविवाह बंदीच्या कायद्याला विरोध झाला, अस्पृश्यता बंदी कायद्याला विरोध झाला, श्रमिकांच्या शोषणबंदीला विरोध होत आला आणि होत आहे, अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील. माकडापासून माणूस, विसर्जित ‘गणपती दान करा’ हे बरोबर आहे. ‘टाकून द्या’ हे चूक आहे. ‘दान करा’ हे बरोबर आहे.

ज्यांचे प्रबोधन करायचे त्यांच्या समाजाची पातळी लक्षात घेऊन प्रबोधन करावे. मतलबी भोंदूंना आणि बनवेगिरीचे राजकारण करताना आपल्या चुकीच्या शब्दयोजनेतून भांडवल मिळणार नाही, याची दक्षता घेऊन प्रबोधन करा.

भोळ्या-भाबड्यांना न थकता परोपरीने समजावून सांगावे. हितसंबंधी लोकांचे हितसंबंध उघडे करून सांगावेत; पण त्याचबरोबर हितसंबंधांना ठोकून सांगा. वैचारिक संघर्षाबरोबरच रस्त्यावरचा संघर्ष करा. भोळ्या-भाबड्यांना समजवा. मतलबी, राजकारण्यांना ठोका.

समाजसुधारणेचा कायदा हे हत्यार बनू शकते. हे हत्यार तयार व्हावे, हातात यावे, चांगले बनवा म्हणून प्रयत्न करायलाच हवेत; पण कोणतेही हत्यार स्वत: हल्ला करत नसते. हत्यार वापरणारा असेल, तरच हत्याराचा उपयोग असतो.

(‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे तरी काय?’ या पुस्तिकेतून साभार.)


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]