सत्यशोधक समाजाची दीडशे वर्षे

डॉ. छाया पोवार -

महात्मा जोतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर, १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सर्वांसाठी एकच ‘सार्वजनिक सत्यधर्म’ सांगितला. या काळात “ब्राह्मण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादी लोकांच्या दास्यत्वातून शूद्र लोकांस मुक्त करण्याकरिता व आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारे आज हजारो वर्षे ते शूद्र लोकांस नीच मानून गफलतीने लुटीत आहेत, यास्तव सदुपदेश व विद्याद्वारे त्यास त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता; म्हणजे धर्म व व्यवहारासंबंधी ब्राह्मणांचे बनावट व कार्यसाधक ग्रंथांपासून मुक्त करण्याकरिता काही सूज्ञ शूद्र मंडळींनी हा समाज २४ सप्टेंबर १८७३ रोजी स्थापन केला. या समाजात राजकीय विषयावर बोलणे अजिबात वर्ज्य आहे.” (महात्मा फुले समग्र वाङ्मय पृ. १९५) अशा शब्दांत सत्यशोधक समाज स्थापन करण्याचा हेतू महात्मा फुले यांनी स्पष्ट केला आहे.

एकोणिसाव्या शतकात बहुजन समाजात धार्मिक व सामाजिक बाबतीत सर्वत्र ग्लानी पसरली होती. धर्माचे खरे ज्ञान बहुजन समाजाला कळत नव्हते. खुळ्या चालींना धर्माचे स्वरूप आले होते. या चालीविरुद्ध थोडेसे पाऊल टाकले, तरी ‘धर्म बुडाला,’ असा चहूकडून टाहो फोडण्यात येत असे. सत्यशोधक चळवळीमुळे ब्राह्मणेतर जनतेला आपल्या वास्तविक हक्कांची जाणीव झाली. आपणही माणसे आहोत व ब्राह्मणांच्या बरोबरीनेच आपले निसर्गसिद्ध हक्क आहेत, हे त्यांना पटले. धार्मिक बाबतीत सत्यशोधक चळवळीने ब्राह्मणेतर जनतेला स्वातंत्र्याभिमुख केले. अंधश्रद्धा टाकून विचाराने मार्ग चोखाळण्यास शिकविले. गेल्या दीडशे वर्षांत या चळवळीने ब्राह्मणेतर समाजात मोठी विचारक्रांती घडविली आहे.

सत्यशोधक समाजा’ची तत्त्वे पुढीलप्रमाणे

अ) सर्व माणसे एकाच देवाची लेकरे आहेत व देव त्यांचा आई-बाप आहे.

ब) आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थाची जरुरी नसते, त्याप्रमाणे देवाची प्रार्थना करण्यास पुरोहित अगर गुरू यांची आवश्यकता नाही.

क) वरील तत्त्व कबूल असल्यास कोणासही सभासद होता येते. (सत्यशोधक हीरक महोत्सव ग्रंथ पृ. १०३)

सत्यशोधक समाजाचे सभासदत्व सर्व जातींतील लोकांना मोकळे होते. स्थापनेपासून लवकरच प्रथमपणे पुणे-मुंबई येथील ग्रामीण आणि शहरी भागात सत्यशोधक समाजाच्या शाखा स्थापन झाल्या. सत्यशोधक समाजाच्या शाखेमध्ये दर रविवारी प्रार्थना व पंधरा दिवसांतून एक व्याख्यान घेतले जाई. गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे, गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे इत्यादी उपक्रम घेतले जात.

देव आणि भक्त यामध्ये दलाल किंवा मध्यस्थ नको, हे सत्यशोधक समाजाचे तत्त्व होते. याबाबत “लग्न करतेसमयी ब्राह्मण, भट, भिक्षुक इत्यादिक शूद्र लोकांची लग्ने यथासांग न लावता केवळ आपले हिताकडेच लक्ष देऊन शूद्र लोकांस खोटे-खोटे हक्क सांगून मांडव खंडणी, लज्जा होम, साडी आणि कंकण सोडणे वगैरेबद्दल शक्ती नसतानाही केवळ जुलूम करून गरीब शूद्रांचे द्रव्य हरण करतात आणि ते जर देण्यास त्यास सामर्थ्य नसेल, तर लग्ने लावायची तशीच ठेवतात. अशा प्रकारच्या पुष्कळ गोष्टी विदित आहेत. याजकरिता लग्नविधी यथासांग होण्याकरिता व लग्नात ज्या वाईट चाली आहेत, त्या बंद करणेकरिता आणि ब्राह्मणांचे सदरील जुलूमापासून मुक्तता व्हावी, या उद्देशाने ब्राह्मणास न बोलविता कित्येक लग्नासंबंधी ज्या वाईट चाली होत्या, त्या बंद करून समाजाचे मताप्रमाणे लग्ने लावण्यास सुरुवात झाली.” (महात्मा फुले वाङ्मय पृ. १९६)

धर्मविधीसाठी भटजी आवश्यक आहे, अशा प्रकारची समजूत होती. इतकेच नव्हे, तर त्या काळी जोशी वतन अस्तित्वात होते; म्हणजे विशिष्ट ग्रामजोशाकडूनच आपली धर्मकृत्ये करून घ्यावी लागत. दुसर्‍या उपाध्यायाला बोलावले, तरी कोर्टात दावे दाखल केले जात. सत्यशोधक पद्धतीने पहिला विवाह २५ डिसेंबर १८७३ रोजी पार पडला. तेव्हापासून भटजींनी कोर्टात खटले दाखल करण्यास सुरुवात केली. ओतूरच्या डुमरे- पाटलांनी आपल्या मुलाचे लग्न सत्यशोधक पद्धतीने केले, त्या वेळी जोशी नामक पंडिताने साडेसहा रुपये भरपाई मागितली. जुन्नरच्या कोर्टात पुरोहितांच्या बाजूने निकाल झाला. न्यायाधीशांनी सांगितले, ‘भटजीला लग्नात बोलावलेच पाहिजे आणि दक्षिणाही दिलीच पाहिजे, त्यांचा तो हक्क आहे.’ पुढे जिल्हा कोर्टात आणि नंतर हायकोर्टात दाद मागितली गेली. सत्यशोधक विवाहामध्ये कोणतेही विधी केले नाहीत. त्यामुळे भटजीला दक्षिणा मागण्याचा हक्क नाही. असा निकाल कोर्टाने (इ. स. १८८५) दिला. निकाल सत्यशोधकांच्या बाजूने लागला, तरी भटजी कोर्टात जायचे थांबले, असे नाही. सत्यशोधक पद्धतीच्या प्रत्येक लग्नात भटजीने कोर्टात जायचे. दक्षिणा मागायची हे सुरूच होते. त्याला ते धार्मिक हक्क म्हणत.

सन १९२१ मध्ये सत्यशोधक विचारांचे अनेक कार्यकर्तेमुंबई विधीमंडळामध्ये निवडून आले. त्यांनी विधीमंडळात जोशीवतन रद्द करण्याचे बिल आणले. शेवटी ३ ऑगस्ट १९२६ ला जोशीवतन रद्द करण्याचा कायदा पास झाला. शूद्रातिशूद्रांना पुरोहित होण्याचे व पौरोहित्याचे स्वातंत्र्य कायद्याने मिळाले.

शूद्रातिशूद्रांची, सर्व जातींच्या स्त्रियांची, शेतकर्‍यांची दुर्दशा दूर व्हावयाची असेल, तर सर्वांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली पाहिजे, यावर सत्यशोधकांचा भर होता.

विद्येविना मती गेली|

मतिविना नीती गेली|

नीतीविना गती गेली|

गतीविना वित्त गेले|

वित्ताविना शूद्र खचले|

इतके अनर्थ एका अविद्येने केले॥

– महात्मा फुले

इंग्रज राज्यकर्त्यांनी उच्च शिक्षणाला अग्रक्रम दिला. तत्कालीन ब्राह्मण पुढार्‍यांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला. १८८२ मध्ये हंटर शिक्षण आयोगासमोर एकमेव महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे, अशी मागणी केली. ती मान्य झाली नाही. शिवाय विद्या घेणे, हे आपले काम नव्हे, अशीच बहुजन समाजाची समजूत होती. बहुजन समाजात शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठीही सत्यशोधक समाजाने महत्त्वाचे काम केले. सत्यशोधक जलशांमधून, पोवाड्यांतून, लग्नसमारंभांतूनही विद्येचे महत्त्व सतत मांडले जाई. अज्ञानामुळे होणारी लुबाडणूक, भट- भिक्षुकांच्या लबाड्या, मद्यपानाचे दुष्परिणाम, शिक्षणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोचविण्यासाठी अभंग, ओवी, कटाव, लावणी, पोवाडे, नाटक इत्यादींची निर्मिती झाली. शिक्षणप्रसाराचे कार्य स्वत:च्या पायावर उभे राहून; तसेच जनतेचे सहाय्य घेऊन बहुजन समाजातील अनेक कर्मवीरांनी व शिक्षणमहर्षींनी प्रत्यक्षात आणले. १८७३ नंतर पुढे जवळजवळ पन्नास वर्षेबिनसरकारी, स्वावलंबी शिक्षण प्रसारक चळवळी, सभा, परिषदा घेतल्या गेल्या. ब्राह्मणेतरांमधील जाती-जमातींच्या शैक्षणिक संस्था, परिषदा व चळवळी या सर्वांना सत्यशोधक चळवळीने जन्म दिला. राजर्षी शाहू महाराजांनी या विद्याप्रसारक चळवळींना मोठ्यात मोठा आर्थिक हातभार लावला; तसेच रयत शिक्षण संस्था, मराठा विद्या प्रसारक मंडळ, शिवाजी शिक्षण संस्था, विवेकानंद शिक्षण संस्था इत्यादी शिक्षणसंस्थांनी ज्ञानाची गंगा खेड्यापाड्यांपर्यंत नेऊन पोचवली.

कृष्णराव भालेकर यांनी ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक सुरू केले. शेतकर्‍यांची दु:खे समाजासमोर मांडली. त्यानंतर ‘दीनमित्र’, ‘शेतकर्‍यांचा कैवारी’, ‘राष्ट्रवीर’, ‘सेवक’, ‘विजयी मराठा’, ‘जागरूक’, ‘कैवारी’, ‘हंटर’पासून ‘शिवनेर’पर्यंत अनेक ब्राह्मणेतर वृत्तपत्रांनी बहुजन समाजाच्या समस्या मांडल्या. नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईहून ‘दीनबंधू’ सुरू केला. मुंबईतील कामगारांची दु:खे, समस्या मांडल्या. कामगारांची संघटना उभारण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना काही प्राथमिक सवलती मिळवून दिल्या. सत्यशोधक समाजाच्या कार्यातूनच स्वतंत्र कामगार चळवळीचा जन्म झाला.

“बहुजन समाजाला विद्येची दारे बंद होती, असे म्हणणे केवळ कादंबरीप्रमाणे काल्पनिक नव्हते! शूद्र म्हणजे दास-गुलाम, अतिशूद्र म्हणजे तर अस्पृश्य असूनही बंदा गुलाम! शिवाजीच्या काळानंतर मराठे लोकांना शूद्र म्हणण्याची वहिवाट वाढली. समान दर्जा, समान हक्क, समान संधी यासाठी मूळ सत्यशोधक प्रवाह निर्माण झाला होता. मालकाला, यजमानाला शूद्र समजून त्याला नीच, अस्पृश्य मानण्याचा प्रघात उत्तर पेशवाईत वाढला! दक्षिणा, दान-देणगी मात्र शूद्र नव्हती. शिंदे-गायकवाड-भोसले वगैरे राजे सर्व शूद्र! क्षत्रिय कोणी नाही. संस्कार लोप होऊन चुकला! राजर्षी शाहू महाराजांनी श्री शिवाजी-प्रतापसिंह यांच्यापासून चालत आलेल्या वेदोक्त प्रकरणाचा शेवट एकादाच केला ‘क्षात्र जगत् गुरू’ नामक नवे पुरोगामी पीठ तयार केले!” (रा. ना. चव्हाण पृ. १४२-४३) अशा शब्दांत सत्यशोध समाजाचे अभ्यासक रा. ना. चव्हाण यांनी क्षात्रजगत्गुरू पीठाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

माधवराव बागल यांनी ‘हीरक महोत्सव’ ग्रंथामध्ये याबाबत आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणतात – “नव्या पुरोहित वर्गामुळे पूर्वीची परंपरा मोडली. समाज एक पायरी पुढे गेला. महाराजांनी एकदम क्रांती घडवून न आणता त्यांच्या अंधश्रद्धेला धरूनच हा एक तात्पुरता उपाय काढला. समाजसुधारणेची ही एक पद्धत आहे.” अर्थात, धर्मविधीला ब्राह्मणच पाहिजे, हा हट्ट बहुतेक ब्राह्मणेतर जनतेतून पुष्कळच निघून गेला आहे.”

इंग्रजी राज्यात पाश्चात्य पंडितांना वेद आणि संस्कृत शिकविण्यासाठी वैदिक पंडित तयार असत. वेदांची जर्मन व इंग्रजीत भाषांतरेही झाली. मात्र शूद्रांना वेद वाचण्याची परवानगी नाही. राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव महाराज यांना वेदोक्त संस्काराचा हक्क नाही. यामुळे चळवळ भडकली. वणव्याप्रमाणे सर्वत्र पसरली. याच काळातील चळवळीच्या स्वरुपावर मुख्यत: आक्षेप घेतले जातात. तथापि रा. ना. चव्हाण यांचे मते “याच घणाघाती काळाच्या समयात सत्यशोधक चळवळीचे प्रमुख उद्देश तडीस गेले. ब्राह्मण-अब्राह्मण-हरिजन वगैरे सर्व महाराष्ट्रीय समाजथरावर या चळवळीचा धार्मिक-सामाजिक-राजकीय-शैक्षणिक वगैरे दृष्टींनी परिणाम होऊन चुकला.” (पृ. १४३) सत्यशोधक चळवळीमुळे बहुजन समाजात शैक्षणिक जागृती, स्वाभिमान जागृती आणि स्वहक्काची जाणीव निर्माण झाली.

सत्यशोधक चळवळीने जी स्वतंत्र व स्वावलंबी विचारांची नवी दृष्टी दिली, धार्मिक आणि सामाजिक स्वातंत्र्यासाठी लढा देण्याचे शिक्षण दिले, त्यातून नवीन नेतृत्व पुढे आले. त्याने महात्मा गांधींच्या लढ्यात भाग घेतला. नाना पाटील, केशवराव जेधे वगैरे पुढारी स्वपक्ष बाजूला ठेवून स्वातंत्र्य लढ्यात प्राणपणाने लढले…. स्वातंत्र्य आले. सर्व प्रकारच्या स्वातंत्र्यासाठी, समतेसाठी सत्यशोधकाला काळानुसार व प्रसंगानुसार लढावे लागते. सत्य, समता व स्वातंत्र्य, स्वावलंबन, वैज्ञानिक दृष्टी, मानवी समान हक्क, समान दर्जा, मानवी धर्म, बुद्धिस्वातंत्र्य, निधर्मी दृष्टी, लोकशाही, समाजवाद, ही विचारमूल्ये सत्यशोधक चळवळीत बीजरुपाने सापडतात. सत्यशोधक चळवळीतील लेखन पाहिल्यास शेतकरी-मजूर-कामगार-हरिजन यांची दु:खे व दारिद्य्र त्यामध्ये मांडले आहे. सावकारशाहीचा जुलूम यांनीच नजरेस आणला. ‘गरीबी हटाव’ ही यांचीच चळवळ.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे मते – “बहुजन समाजावर हिंदूंच्या ब्राह्मणी परंपरेने जे युगानुयुगे वर्चस्व गाजविले आणि खालच्या समाजाला अज्ञान, दारिद्य्र, भोळेपणा, मागसलेपणा, अस्वच्छता, मालिन्य, मनोदौर्बल्य आणि हताश वृत्ती यांचेच भागीदार राहू दिले. तिच्याविरुद्ध बंड करणारी प्रवृत्ती सत्यशोधक समाजाच्या रुपाने जागी झाली. शेतकर्‍यांचे, कारागीर वर्गाचे आणि कामगार वर्गाचे दीर्घकालीन आर्थिक शोषण हीही गोष्ट या असंतोषाच्या मुळाशी होती. हिंदू धर्माच्या परंपरेवर बौद्धिक आक्रमण करणारी वैचारिक जाणीव या चळवळीत होती… सत्यशोधक समाजामुळे शेतकरी-कामकरी यांच्या जीवनविषयक लढ्याला आकार प्राप्त झाला. अस्पृश्यांच्या आत्मोद्धाराच्या चळवळीला दक्षिण हिंदुस्थानात ब्राह्मणेतर चळवळीमुळेच काही बळ चढले… सरकार संस्थेतील ब्राह्मणी वर्चस्व आणि समाजातील सर्व महत्त्वाच्या व्यवहारातील ब्राह्मणी नेतृत्व या गोष्टींच्या विरुद्ध एक प्रकारचा वर्गविग्रहच या चळवळीने निर्माण केला” (वैदिक संस्कृतीचा विकास पृ. २३५-३६)

सत्यशोधक समाजाने ‘सत्यशोधन करणे’ हा आपल्या चळवळीचा उद्देश ठरविला आहे. सत्यशोधक समाज स्थापनेला १५० वर्षेझाली. आज सत्यशोधक समाजाची गरज आहे का? या प्रश्नाचे उत्तर होय! आजही समाजाला सत्यशोधक समाजाची सत्यशोधन करण्याची गरज आहे, असेच द्यावे लागेल. दीडशे वर्षांत काही प्रमाणात समाजातील अंधश्रद्धा कमी झालेल्या असल्या, तरी भुते-खेते, साप्ताहिक भविष्ये, ग्रहपीडा, फलज्योतिष, देव-देवऋषी, अंगात येणे, देव घालणे, चेटूक-मंत्रतंत्र, क्षुद्र देवतांचे पूजन, पशुबळी, यज्ञयाग, स्वर्ग आणि धर्माच्या अनिष्ट बाजू चालूच आहेत. शिक्षणाने या कमी होतील, अशी अपेक्षा आज फोल ठरली आहे. सुशिक्षित स्त्रिया-पुरुष देखील अंधश्रद्धा व भावनाप्रधान पूजा-अर्चा-सत्यनारायण इत्यादी बाबींचे दास आढळतात, ही धार्मिक गुलामगिरी शाबूत आहे. शिक्षण आणि विचारप्रसिद्धीची सर्व केंद्रे आजही धूर्तांच्या ताब्यात आहेत. धार्मिक बुवाबाजीत राजकीय व आर्थिक बुवाबाजी येऊन मिसळली आहे. याचे निरसन करण्यासाठी नवबुद्ध व नव सत्यशोधक तयार झाले पाहिजेत. जातिभेद, वर्णभेद आणि आर्थिक विषमता यामुळेच समतेच्या चळवळी मूळ धरत नाहीत. सर्वच सत्यशोधकांनी चिकित्सक बुद्धीने सत्यशोधनाच्या कामाला नव्याने जोडून घेण्याची आजही गरज आहे!

जय सत्यशोधक!

लेखिका संपर्क : ९८५०९२८६१२


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]