सम्राट हटकर -
तोरणा (ता. बिलोली) या गावी एका कुटुंबातील मुलं वारंवार आजारी पडतात. ते कुटुंब कोणातरी जाणत्याकडे (वैद्य) गेले. त्या जाणत्याने करणी केल्यामुळे हे सर्व घडत आहे असे सांगून लता नरवाडेंचे नाव सांगितले. त्यामुळे पाच-सहा जणांनी तोरणा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आशा वर्कर लता शंकर नरवाडे यांना मारहाण केली.
त्यांनी या मारहाणीची नावानिशी तक्रार रामतीर्थ पोलीस स्टेशनला दिली. मारहाणीचा एफआयआर नोंदविण्यात आलेला आहे. परंतु त्या तक्रारीनुसार नोंद नाही. तसेच अद्याप कोणावरही कारवाई झाली नाही. त्यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात. त्यामुळे त्यांनी ‘अंनिस’कडे धाव घेतली. या प्रकारची सविस्तर माहिती राज्य कार्यकारिणी सदस्य सम्राट हटकर यांना दिली.
याची तात्काळ दखल घेत ‘अंनिस’चे सम्राट हटकर, जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदाडे, प्रधान सचिव नितीन ऐंगडे, महिला विभागाच्या कॉ. उज्ज्वला पडलवाड यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी बिलोली व रामतीर्थ पोलीस स्टेशनला भेट दिली. आशा वर्कर नरवाडे यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात गरोदर महिला, आजारी व्यक्ती, लहान मुलांचे डोस, लसीकरण, किशोरवयीन मुलींचे प्रबोधन; तसेच शासकीय सर्वेक्षण अशा कामानिमित्त घरोघरी भेटी द्याव्या लागतात. पण या करणी प्रकरणामुळे त्यांच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तसेच त्यांना सहकार्य मिळत नसल्यामुळे शासनाच्या विविध उपक्रमावर देखील यांचा परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पुढील अनर्थ टाळावा व नाव सांगणार्या त्या जाणत्यावरही (वैद्यावर) जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ‘अंनिस’ नांदेड शाखेकडून करण्यात आली आहे. मागणीप्रमाणे पोलिसांनी दखल घेण्याचे मान्य केले. पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याच्या अध्यादेशाची प्रत नसल्यामुळे आणि त्यांना अध्यादेशाची प्रत पुरवली. लोकांच्या मनातील करणी, भानामती, मूठ मारणे याबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत, याकरिता प्रबोधनपर; तसेच जादूटोणाविरोधी कायद्याविषयी माहिती देण्यासाठी, प्रचार-प्रसार करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत चर्चा झाली.
–इंजि. सम्राट हटकर, राज्य कार्यकारिणी सदस्य,
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.