अंनिवा -
कोरोना संकटकाळात योग्य खबरदारी घेत अंनिसचे कार्य सुरूच
मिरज तालुक्यातील नांद्रे या गावी लक्ष्मी सुभाष सादरे या महिलेला गेल्या 10 वर्षांपासून डोक्यात जट तयार झाली होती. त्यांचा मुलगा मिरासो हा आईच्या मागे जट काढून टाकण्याचा सतत आग्रह धरत होता. पण देवीच्या कोपाची अनाठायी भीती लक्ष्मीताईंच्या मनात घर करून होती.
नांद्रे येथील महिला पोलीस पाटील स्वाती वंजाळे यांनी या महिलेचे समुपदेशन केले, तिला धीर दिला. जट काढल्यानंतर कोणत्याही देवीचा कोप होणार नाही, असा विश्वास दिला. तेव्हा ती महिला जट कापून घेण्यास तयार झाली.
जटा निर्मूलनासाठी त्यांनी सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क केला. सांगली अंनिसच्या सचिव डॉ. सविता अक्कोळे, अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्तेचंद्रकांत वंजाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावीर पाटील, प्राजक्ता वंजाळे या टीमने या महिलेच्या 4 फूट लांब जटा सोडवल्या आणि या महिलेस जटेच्या त्रासातून मुक्त केले. कोरोना काळातील सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन हे जटा निर्मूलन करण्यात आले.
गेल्या 10 वर्षांपासून अंधश्रद्धेचे हे ओझे कमी झाल्याचे समाधान त्या महिलेच्या चेहर्यावर दिसत होते. हा धाडसी, पुरोगामी निर्णय घेतल्याबद्दल लक्ष्मीताई, त्यांचा मुलगा मिरासो व सादरे कुटुंबीयांचे अभिनंदन! अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प. रा.आर्डे, राहुल थोरात, डॉ. संजय निटवे, अमित ठाकर, आशा धनाले, त्रिशला शहा, संजय गलगले यांनी केले आहे.