डॉ. हमीद दाभोलकर -
मनाची सकारात्मक अवस्था कोणत्याही प्रतिकुलतेतून बाहेर काढण्यास सहाय्यभूत ठरणारी असली तरी सतत हा दृष्टिकोन अंगीकारणं सोपं नसतं. त्यासाठी शरीराबरोबर मनाचाही नित्य व्यायाम व्हायला हवा. परिस्थितीचा स्वीकार, नातेसंबंधांतली गुंतवणूक, गरज असल्यास तज्ज्ञांची मदत आणि आवश्यक असल्यास औषधोपचार ही सकारात्मकतेमागची चतुःसूत्री आहे, जी प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवी.
माणसाचं जीवन कायमच विविध परिस्थितींच्या भोवर्यात सापडत असतं. आपला ताबा नसलेल्या विविध घटना, प्रसंग सातत्याने सामोरे येत असतात, ज्याचा संयमाने सामना करण्यातच बराच काळ व्यतीत होत असतो. जिथे आपल्या इथल्या प्रवासातल्या जन्म आणि मृत्यू या सर्वांत महत्त्वाच्या गोष्टीच आपल्या हातात नसतात, तिथे अनाहुतपणे समोर येणार्या असंख्य घटनांमुळे उद्भवलेल्या स्थितीशी मिळतं-जुळतं घेत पुढे जाणं ही अपरिहार्य ठरणारी बाब असते. सगळं काही आपल्या इच्छेप्रमाणे व्हावं, ही प्रत्येकाचीच अपेक्षा असली तरी वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक परिस्थितीनुरूप आपलं आयुष्य पुढे सरकतं. आपल्या मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध गोष्टी घडतात, तेव्हा परिस्थितीला दोष देणं हा सोपा मार्ग अनेकांकडून स्वीकारला जातो. कारण त्यामध्ये स्वत:ला दोष देण्याची अथवा स्वत:मध्ये बदल करण्याची गरज नसते. या पार्श्वभूमीवर मानवी मनाच्या सकारात्मकतेचा वेध घेत असताना अनेक मुद्द्यांचा परामर्ष घेणं गरजेचं ठरतं.
माणूस हा समूहात राहणारा प्राणी आहे. साहजिकच वैयक्तिक अडचणींबरोबरच अनेकानेक क्षेत्रांमध्ये होणार्या बदलांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम थेट त्याच्या आयुष्यावर पडत असतो. जागतिकीकरणानंतर तर विश्वाच्या एखाद्या कोपर्यात घडणार्या घटनांचे पडसादही आपल्याला जाणवू लागले आहेत. कोरोनामुळे उद्भवलेली अभूतपूर्व स्थिती आणि या साथसंसर्गाच्या परिणामस्वरूप जगात दाटलेली भीती हे याचं अलिकडचं ज्वलंत उदाहरण आहे. यापूर्वीही अशा अनेक साथी, अनेक आक्रमणं, नैसर्गिक आपत्ती झेललेल्या मानवी समूहांनी अशा प्रकारच्या सार्वत्रिक दहशतीचा अथवा भीतीचा सामना केल्याची असंख्य उदाहरणं इतिहासात बघायला मिळतात. साहजिकच त्यामुळे उत्पन्न झालेली सार्वत्रिक भीती आणि त्यापोटी जन्म घेणारं नैराश्य आपल्या मागच्या पिढ्यांनीही अनुभवलेलं आहे. मात्र सकारात्मकता जपत वाटचाल सुरू ठेवल्यामुळेच त्यांची स्वत:ची; पर्यायाने समाजाची प्रगतिवस्था खुंटलेली नाही, हे सत्य आहे. म्हणूनच आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचं महत्त्व प्रत्येकाने जाणून घ्यायला हवं.
अर्थातच हे सांगणं सोपं, तेवढं आचरणात आणणं अवघड आहे. यामध्ये बर्याच अडचणी येत असतात. मुळात मनात सकारात्मकता निर्माण होणं गरजेचं असतं. परिस्थिती कशीही असली तरी मनाला कसा विचार करायला लावायचा, हे आपल्या हातात असतं, असं आपण म्हणतो खरं; पण त्याचेही दोन शत्रू असतात. पहिला शत्रू म्हणजे मानसिक आजार. नैराश्यासारख्या मानसिक आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीच्या मनात सकारात्मक विचार येणं खूप कठीण असतं. कारण या अथवा चिंतेसारख्या आजाराच्या प्रभावामुळे माणसाच्या मनात केवळ निराशाजनक विचारच येत असतात. साहजिकच मनाची क्षमता चांगली असली, तरी तो आजार नाहीसा होत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारू शकत नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार दर पाच माणसांमधल्या एका माणसाला आयुष्यात कधी ना कधी निराशेचा आजार ग्रासतो. त्यामुळेच या आजारांंप्रती सजग होणं ही मनात सकारात्मकता असण्याच्या दृष्टीने सर्वात आवश्यक बाब आहे, असं माझं मत आहे. या मुद्द्याकडे लक्ष दिलं नाही तर आपल्या मनात सकारात्मक विचार का येत नाहीत, या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळू शकणार नाही. एखाद्याचा पाय मोडला असेल तर कितीही इच्छा असली तरी तो चालू शकत नाही, त्याचप्रमाणे मन नैराश्य आणि चिंतेच्या आजाराने ग्रासलेलं असल्यास कितीही इच्छा असूनही तो माणूस सकारात्मकतेने आयुष्याकडे बघू शकत नाही. म्हणूनच आधी मनावरील फ्रॅक्चरवर उपचार घेणं गरजेचं ठरतं. बर्याचदा जवळच्या व्यक्तीपाशी निराशादायक विचार व्यक्त करूनही मनाच्या या रोगावर इलाज होऊ शकतो. पण आजार अधिक गंभीर असेल तर मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं हा अधिक परिणामकारक उपाय ठरतो. प्रत्येक वेळी आपण स्वत: अथवा परिचित आपल्याला सकारात्मकेपर्यंत नेऊ शकत नसल्यामुळे मानसिक आजार बरे करणार्या या तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि उपचार अत्यंत उपयोगी ठरतात.
आपल्या दैनंदिन जीवनात येणारे ताणतणाव हे सकारात्मकतेच्या वाटेत अडसर आणणारे दुसरे मोठे शत्रू असतात. आजकाल आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात या शत्रूंचा प्रवेश झालेला आहेे. त्यामुळे आभाळ भरून आलेलं असताना आपल्याला सूर्यप्रकाश मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे मनाचं आभाळ भरून आलेल्या अवस्थेत सकारात्मक विचारही निर्माण होऊ शकत नाहीत. इतकंच नव्हे, तर आजूबाजूला कितीही सकारात्मक परिस्थिती असली तरी अशा झाकोळलेल्या मनामध्ये त्याचं प्रतिबिंब उमटू शकत नाही. मनावर दाटलेल्या काळ्या, नकारात्मक विचारांचे ढग त्यांच्या मार्गात मोठा अडथळा उत्पन्न करतात. अशा वेळी तो ताण योग्य पद्धतीने हाताळल्याखेरीज नकारात्मकता कमी होत नाही, म्हणूनच मनाची सकारात्मकता टिकवण्यासाठी या दोन शत्रूंचा सामना करून त्यांच्यावर विजय मिळवणं ही अत्यावश्यक बाब ठरते. काही वेळा या ताणतणावांची तीव्रता इतकी जास्त असते की, कोणत्याही सामान्य माणसाच्या मनाला त्यामधून बधिरता येऊ शकते. कसे की, एकाच वेळी जवळच्या अनेक लोकांचा कोरोनाच्या साथीत मृत्यू होणे, त्याचमध्ये आपली नोकरी पण जाणे आणि मदत करायला देखील फारसे लोक जवळ नसणे. या परिस्थितीमधून सावरायला मानवी मनाला लागणारा अवधी देणे आवश्यक असते; अन्यथा ‘केवळ सकारात्मक विचार करा,’ असा उपदेश ज्यांनी खूप जवळच्या व्यक्तींची हानी सोसली आहे, त्यांना क्रूरतेचा वाटू शकतो. प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक परिस्थितीकडे सकारात्मक पद्धतीने पाहण्याची क्षमता आहे, म्हणून शासनसंस्थेने आपले कर्तव्य न बजावता सगळी जबाबदारी केवळ लोकांच्या सकारात्मक विचारांच्यावर सोडून देणे हे देखील समाजासाठी हितकारक गोष्ट नव्हे.
यासंबंधी लक्षात घेण्याजोगा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माणूस हा पृथ्वीतलावरचा एकमेव प्राणी आहे, जो अंतर्मुख होऊन परिस्थितीकडे बघू शकतो. जगातल्या अन्य कोणत्याही प्राण्याकडे ही क्षमता नाही. अधिक नेमकेपणाने सांगायचं तर आता मी विचार करतोय तो सकारात्मक आहे की नकारात्मक, हे माणसाला तपासून पाहता येतं. पण हे समजून घेण्यासाठी तटस्थ आणि चिकित्सक नजरेने स्वत:कडे बघता यायला हवं. माझ्या मते, सकारात्मकतेच्या मुळाशी असणारं हे महत्त्वाचं सूत्र आहे. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत स्वसंवादान्वये स्वत:ला काय वाटतंय, हे जाणून घेणं, आतला आवाज ऐकणं ही अतिदुर्लभ बाब झाली आहे. सध्या यासाठी कोणाकडेच वेळ हाती उरलेला नाही. स्वत:च्या कृतीविषयी समजून घेण्याचे, ती जाणून घेण्याचे कष्ट कोणीही घेत नाही. परिणामस्वरूप दररोज घर आवरलं नाही तर कचरा साठतो, अडगळ वाढते, त्याचप्रमाणे वेळच्या वेळी साफ न केल्यामुळे मनातही नकारात्मक विचारांची जळमटं लोंबायला लागतात आणि मरगळ वाढवणारी हतबलता आपला ताबा घेते. या पार्श्वभूमीवर विचार करता शरीराबरोबरच मनाचा व्यायामही आवश्यक असतो, हे आपण लक्षात घ्यायला हवं.
शरीर आणि मनाचा जवळचा संबंध असल्याने या दोन्ही प्रकारच्या व्यायामात नियमितता असल्यास खूप चांगले परिणाम बघायला मिळतात. शरीराबरोबर मन सदृढ असेल तर कितीही मोठ्या संकटावर मात करण्याची क्षमता निर्माण होते, म्हणूनच मनाच्या उत्तम व्यायामामुळे मेंदूत सकारात्मक विचारांस कारक असणार्या संप्रेरकांची पातळी उंचावते. हे साधण्यासाठी विविध प्रकारची योगासनं, श्वसनाचे व्यायाम करणं, नातेसंबंधांमध्ये भावनिक गुंतवणूक ठेवणं गरजेचं ठरतं. कारण अडचणीच्या समयी ही गुंतवणूकही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. सगळीकडे प्रतिकुलता असल्यास नातलगांच्या आधारामुळेही आयुष्यात फार मोठी सकारात्मकता निर्माण होते. थोडक्यात, नकारात्मक विचार आल्यानंतर तो बाजूला करूया, असं म्हणून पुढे जाण्याइतका हा विषय सोपा नाही, तर त्यासाठी काही प्रयत्न करण्याची आणि प्रयत्नांची दिशा योग्य ठेवण्याची गरज असते, हे आपण समजून घ्यायला हवं.
अलिकडेच कोरोनाच्या उद्रेकाच्या काळात आपण एक सामूहिक भीती अनुभवली. आज ना उद्या संसर्गाचा हा धोका माझ्यापर्यंत पोचेल का, हे भय तेव्हा सगळ्यांनाच वाटत होतं. कोरोना हे एक प्रकारचं जैविक अस्त्र असल्याचंही बोललं गेलं. त्याचप्रमाणे भविष्यातल्या युद्धाचं स्वरूप याच प्रकारचे असल्याचे अंदाजही काही तज्ज्ञांनी वर्तवले. हे सगळं बघता आता ही भीती कमी झाली असली, तरी या कारणास्तव अनुभवायला मिळालेली नकारात्मकता पुन्हा कधीही डोकं वर काढणार नाही, असं समजण्यात अर्थ नाही. भविष्यात सामूहिक भीतीची ही स्थिती अनेक वेळा उत्पन्न होऊ शकते. अशी सार्वत्रिक नकारात्मकता उत्पन्न होते, तेव्हा समूहमन तीन प्रकारच्या प्रतिक्रिया देतं. त्यातल्या एकाला ‘फ्लाईट’ असं म्हणतात. यात परिस्थितीचा स्वीकार न करण्याची वृत्ती दिसून येते. कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात समूहमनाची ही अवस्था आपण पाहिलेली आहे. कोरोनाचा विषाणू आणि त्याचा संसर्ग असं काही खरं नसून कोणीतरी जाणीवपूर्वक ही भीती पसरवली आहे, या मानसिकतेतून काही जणांनी परिस्थितीकडे पाहिलं, तेव्हा त्यांच्या मनःस्थितीतून आपल्याला हे बघायला मिळालेलं आहे. एक प्रकारे त्या विचारांमुळे येणारा ताण टाळण्यासाठी वस्तुस्थितीचा अस्वीकार करणं, त्यापासून पळून जाणं हा तो प्रकार आहे. दुसरी प्रतिक्रिया असते, जिला ‘फाईट’ असं म्हणतात. इथे माणूस त्या स्थितीशी भांडतो आणि संकटांना हरवण्याचा प्रयत्न करतो. ही चांगली प्रतिक्रिया आहे. पण यामध्ये नेमकी माहिती नसेल तर अपेक्षित फळ मिळत नाही. कारण शत्रूची नेमकी माहिती न घेता समरांगणात उतरल्यास आपल्याला इजा होण्याची शक्यता अधिक असते.
‘कोरोनामुळे काय होतंय? हा एवढाचा विषाणू माझं काय वाकडं करू शकतोय,’ असा विचार करून बेजबाबदार आणि बिनधास्त वर्तन केल्याचं आपण पाहिलं तो याच प्रतिक्रियेचा एक भाग होता. पण या बेदरकार वागण्यामुळेच संसर्गाची तीव्रता; पर्यायाने साथीचा धोका वाढल्याचंही आपण अनुभवलं आहे. त्यामुळेच या दोन्ही प्रतिक्रिया टाळून व्यक्ती आणि समाज म्हणून आपल्याला जी प्रतिक्रिया द्यायला हवी, तिला म्हणतात ‘फेस’ अर्थात सामोरं जाणं. एखादी व्यक्ती अथवा समाज प्राप्त परिस्थितीला सामोरं जातो, तेव्हा सर्वांगीण विचार करू शकतो. अशा वेळी संभाव्य धोके लक्षात घेऊन सकारात्मक कृती करण्याकडे समाजाचा कल असतो. त्यामुळेच अशा वेळी केवळ ‘गो… कोरोना गो’ म्हटल्याने हे संकट टळेल, असा भाबडा अंधविश्वासही नसतो आणि अतिशहाणपणाही; तर यावेळची सकारात्मक आणि सावध प्रतिक्रिया येऊ शकणार्या सर्व धोके आणि संकटांचा स्वीकार करून व्यक्त झालेली असते. त्यामुळे ती आंधळी आणि भाबडी नसते. साहजिकच सकारात्मकतेचा विचार करताना या सगळ्यांचा विचार करायला हवा.