आजचे वास्तव आणि कोरोनानंतरचे चळवळीचे भवितव्य…

अनिल चव्हाण - 9764147483

कोरोनानंतर संविधानातील तत्त्वांचा जोमाने प्रचार करणे, ‘मानसमित्रा‘ची भूमिका बजावणे, ज्योतिष मुहूर्त, गोबर टिमकीबाबत वस्तुस्थिती जाहीर करणे, व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे याबरोबरच सार्वजनिक आरोग्यसेवा बळकट करण्याची मागणी करणे, प्रबोधनासाठी नवीन तंत्राचा शोध घेणे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात नवे कार्यकर्ते जोडून घेणे, अशी अनेक कामे वाट पाहात आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे आव्हान पेलेल, असा विश्वास आहे.

जगभर ‘कोविड 19’ या कोरोना साथीने थैमान घातले आहे. मीडियामधून इतर विषय हद्दपार झाले आहेत. आपण वाचणार कसे? आणि उद्या काय वाढून ठेवलंय? एवढीच चिंता सर्वांसमोर आहे. या परिस्थितीला उत्तर द्यायला ‘अंनिस‘ कार्यकर्तेम्हणून आपण सक्षम आहोत काय?

‘अंनिस’ एक विवेकी चळवळ आहे. भारतीय संविधान हा आमचा आदर्श आहे. संविधानाने प्रत्येक भारतीयाला हक्क आणि कर्तव्ये सांगितली आहेत. आम्ही त्याचा आदर करतो. राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार ही भारतीयांची कर्तव्ये आहेत. त्यांच्याच प्रस्थापनेसाठी ‘अंनिस‘ आग्रही आहे. पुढच्या कालासाठी हे मार्गदर्शक आहे का? हे आपल्याला तपासावयाचे आहे.

आजची स्थिती ..

जगाची विभागणी तीन गटांत झालेली आहे.

पहिला गट.. श्रीमंत राष्ट्रांचा.. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी इत्यादी राष्ट्रे येतात.

दुसरा गट.. समाजवादी राष्ट्रांचा.. यामध्ये चीन, क्युबा इत्यादींचा समावेश आहे.

तिसरा गट.. अविकसित आणि विकसनशील देशांचा. यामध्ये आपल्यासह पाकिस्तान, बांगलादेश, आशियाई आणि आफ्रिकी राष्ट्रे येतात.

प्रत्येक गटाची आजची परिस्थिती काय आहे?

पहिला गट – ‘कोविड 19’चे सर्वांत जास्त रुग्ण आणि मृत्यू इथेच आहेत. हे देश श्रीमंत आहेत. सर्व जगातून संपत्तीचा ओघ याच देशांकडे वाहत असतो. आपल्याला हवी ती वस्तू कोठूनही ते मिळवू शकतात. सर्वाधिक संहारक शस्त्रे त्यांच्याकडे आहेत. त्यांचा सर्वाधिक वापरही तेच करतात. सर्व मीडिया त्यांच्या पायाशी लोळण घेतो. हितसंबंधांच्या आड येणार्‍या कोणालाही ते उद्दाम, हुकूमशहा ठरवू शकतात. लष्कर पाठवून देश बेचिराख करू शकतात, तरीही स्वत:ला लोकशाहीवादी म्हणवून घेतात. आज तिथे मृत्यूचे तांडव चालू आहे. लाखो रुग्ण आणि हजारो मृत्यू.

जगातले सर्वश्रेष्ठ वैद्यकीय ज्ञान, संशोधक, औषधे हतबल झाली आहेत. याचे कारण खाजगीकरण. सर्व साधने आहेत, पण त्यांची मालकी खाजगी उद्योगपतीकडे आहे. खाजगी उद्योगाचे ध्येय असते नफा; लोककल्याण, रुग्णसेवा नव्हे. इस्पितळांची बांधणी नफ्यासाठी झाली असेल तर लोककल्याण साधता येत नाही, हे या देशांतून सिद्ध झाले. त्यांनी नफ्याचा मार्ग सोडून, लोककल्याण साधायचे ठरवले, तर लवकरच कंपनीला टाळे ठोकावे लागते.

लाखो रुपये फी देऊन पदवी घेतलेला डॉक्टर सर्दी खोकल्याच्या रुग्णाला औषध देण्याऐवजी,“काही काळजी करू नका, हळद घालून गरम दूध प्या, गरम पाण्याने गुळण्या करा,” असा सल्ला देऊ लागला, तर पैसे निघतील का?

“छाती भरेल, न्युमोनिया होईल, फोटो काढा, थुंकी तपासा, इंजेक्शन देतो,” असेच उपचार करावे लागतील. हा त्या व्यवस्थेचाच दोष आहे.

हार्ट अ‍ॅटॅक, डायबेटीस, ब्लड प्रेशर, कॅन्सर यांचीच इस्पितळे पैसा मिळवून देणार. चीनमधील वैद्यकीय सेवा शासनाच्या ताब्यात असल्याने त्यांच्याकडे गरजेवर आधारित सेवा आहेत. त्यांनी ‘कोविड 19’ला नियंत्रणात आणले. क्यूबामध्येही वैद्यकीय सेवा शासनाच्या नियंत्रणात व मोफत आहे. ते आज जगभर डॉक्टर पाठवत आहेत.

या साथीने भांडवली व्यवस्थेचे अपयश आणि समाजवादी व्यवस्थेचे श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. भारत या दोघांच्या मध्येे आहे. शासकीय सेवेचे पूर्ण खाजगीकरण झालेले नाही. आज शासकीय दवाखाने व कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, सफाई कर्मचारी, पोलीस आणि इतरही जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढणारे सर्व सेवक हे शासकीय आहेत. खाजगी क्षेत्र नगण्य आहे. यावरून संविधानातील आणि ‘अंनिस‘च्या समाजवादाच्या आग्रहाचे महत्त्व अधोरेखित होते.

ज्योतिष, मुहूर्त ..

तुलसी विवाहानंतर लग्नाचे मुहूर्त असतात. मार्च, एप्रिल, मे या महिन्यांत तर कार्यालय रिकामे मिळणे अवघड. यावर्षी या तीन महिन्यांत तीसभर मुहूर्त आहेत. पंचांगाबरोबर सुप्रसिद्ध धार्मिक कॅलेंडरमधेही याच्या नोंदी असतात. वास्तुशांती, जावळ काढणे, याचेही मुहूर्त या तीन महिन्यांत आहेत. पण हे मुहूर्त शुभ नाहीत, हे कोरोनाने सांगून टाकले. कोणीही भटजीच्या मुहुर्तावर मंगलकार्य करायला तयार नाही. एखाद्याने भटजीवर विश्वास ठेवून कार्यक्रम ठेवला, तर त्यांच्यासह हजर राहणार्‍यावरही गुन्हा दाखल झाला. या गोष्टी थोतांड असल्याचे सिद्ध झाले.

चर्च, मशिदी, देवळे ..

चर्च, मशिदी, देवळे ओस पडली आहेत. यातील कोणी आपल्याला वाचवेल, यावर कोणीही भक्त विश्वास ठेवायला तयार नाही. भक्तच काय; पुजारीही तशी खात्री देत नाही. त्यांनी सरळ टाळे लावून टाकले.

साधू वाण्याची बुडलेली नौका वर काढणार्‍या सत्यनारायणाची पूजाही कोणी घालायला तयार नाही. संत गाडगेबाबा म्हणत, ‘देवळात देव नसतो, असते पुजार्‍याचे पोट.’ सत्यनारायणात चमत्काराची शक्ती नाही. पण कोरोनाचा धोका टळल्यानंतर पुन्हा हे भोंदू डोके वर काढणार आहेत. संकटकाळी एखाद्या दैवीशक्तीने मदत करावी, असे सामान्यजनांना वाटते. याची नोंद घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार जोमाने करावा लागणार आहे.

कोरोनाच्या दहशतीमुळे, आप्तजन दुरावल्याने, आर्थिक संकट आल्याने, हतबुद्ध झालेले जन दैवीशक्तीचा आधार घेणार, व्यसनाचा आधार घेणार किंवा मनोरुग्ण बनणार, याचाही विचार वेळीच केला पाहिजे. त्यासाठी ‘अंनिस’ने ‘मानसमित्र‘ वाढवले पाहिजेत.

व्यसने

लॉकडाऊनच्या काळात व्यसनांच्या प्रमाणात खूपच घट झाली आहे. व्यसनाशिवाय आपण जगू शकतो, हा विश्वास वाढवला पाहिजे. व्यसनमुक्ती संघटनांचे कार्यकर्ते असा विश्वास वाढवतील; पण शासनाला काळजी पडेल, ती अबकारी कराची. व्यसनामागची अर्थकारणाची साखळी समजून घेतल्याशिवाय चित्र स्पष्ट होणार नाही. एखाद्या गावची दारू बंद करून प्रश्न मिटणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वांत प्रथम महात्मा फुले यांनी दारूबंदीसाठी अर्ज केला. त्यानंतर लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, क्रांतिसिंह नाना पाटील अशा अनेक थोर नेत्यांनी दारूबंदीचे प्रयत्न केले. ब्रिटीश दारूचा प्रसार करतात, याची दोन कारणे या सर्वांनी नोंदवली आहेत.

एक.. अबकारी कराचे उत्पन्न मोठे आहे.

दोन.. व्यसनाधीन बनलेले लोक ब्रिटिशांच्या पिळवणुकीविरोधात उभा राहू शकत नाहीत. हे दुसरे कारण अधिक महत्त्वाचे आहे. आज स्वतंत्र भारतातही व्यसने सुरू ठेवण्यामागे हीच दोन कारणे आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन चळवळ चालवली पाहिजे.

राष्ट्रीय एकात्मता आणि धर्मनिरपेक्षता..

कोरोना जगभर पसरला, भारतातही पसरला. त्यांनी देशी-परदेशी, परप्रांतीय, परभाषीय, परधर्मीय, परजातीय, सुशिक्षित, गरीब-श्रीमंत स्त्री-पुरुष असा कोणताही भेद केला नाही. सगळे समान आहेत, सगळे एक आहेत, हे त्यांनी कृतीने दाखवून दिले.

हाच राष्ट्रीय ऐक्याचा आणि धर्मनिरपेक्षतेचा धडा भारतीयांना पुन्हा गिरवायला लावला पाहिजे. काहीजणांनी धर्माला अवास्तव महत्त्व देऊन एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि कोरोनाचे बळी ठरले, इतरांनाही अडचणीत आणले, तर काही जणांनी त्याचा गैरफायदा घेऊन धार्मिक द्वेष पसरवण्याचे पारंपरिक कार्य पार पाडले. नेहमीप्रमाणे मीडियाने त्यांना साथ दिली. खोटे व्हिडीओ प्रसिद्ध केले. पण सामान्य जनता त्याला बळी पडली नाही. जनतेची ही वृत्ती वाढवली पाहिजे. एकूणच, राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या तत्त्वावर आधारित ‘अंनिस’चे उपक्रम योग्यच आहेत, हे स्पष्ट झाले. तेच अधिक जोमाने पुढे नेऊया.

गोबर टिमकी..कमी झाली..

गायीपासून मिळणारे, दूध, दही, तूप, शेण आणि मूत्र हे पाच पदार्थ एकत्र कालवून पंचगव्य तयार केले जाते. ते पवित्र, आरोग्यदायी, जंतुनाशक, असंख्य रोगावरचे औषध मानले जाते. मधे एका मंत्र्याने, शेणात, दुधात सोने असल्याचा दावा केला. त्यावर संशोधन सुरू झाले. जगातल्या लहान-मोठ्या प्रत्येक रोगावर गायीचे, शेण आणि मूत्र खाणे – पिणे हा रामबाण उपाय, गोबरतज्ज्ञ वारंवार सांगत असतात. उपाय सांगणारे स्वयंघोषित तज्ज्ञ बुवा-बाबांपासून, मंत्र्यासंत्र्यांपर्यंत स्वतः आजारी पडल्यावर मात्र देशी किंवा परदेशी हॉस्पिटल गाठतात.

सुरुवातीला, कोरोनावरही असले उपाय सांगितले गेले. पण या बजरंगी मंडळींना फारसे गांभीर्याने न घेतल्याने त्यांची गोबर टिमकी आता थांबली आहे. अमेरिकेने तंबी देऊन औषधाची मागणी केली, त्यातही पंचगव्याचा उल्लेख नाही.

सामान्यांच्या आरोग्याशी खेळणार्‍या या समाजद्रोेह्यांना उघडे पाडले पाहिजे. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. कोरोनानंतर संविधानातील तत्त्वांचा जोमाने प्रचार करणे, ‘मानसमित्रा’ची भूमिका बजावणे, ज्योतिष – मुहूर्त, गोबर टिमकीबाबत वस्तुस्थिती जाहीर करणे, व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे याबरोबरच सार्वजनिक आरोग्यसेवा बळकट करण्याची मागणी करणे, प्रबोधनासाठी नवीन तंत्राचा शोध घेणे, त्यासाठी मोठ्याप्रमाणात नवे कार्यकर्ते जोडून घेणे, अशी अनेक कामे वाट पाहात आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे आव्हान पेलेल, असा विश्वास आहे.