निशा भोसले - 9764476476
मंगळवेढा तालुक्यातील एका गावातील शेतकरी कुटुंबात घडलेली घटना. 60 ते 65 वयाचे एक सामान्य शेतकरी. आपली पत्नी, मोठा मुलगा, त्याची बायको, तीन मुलांपैकी दोन मुली आणि एक मुलगा व त्यांची आजी असे राहत आहेत. ‘त्या’ शेतकरी जोडप्याला आणखी दोन मुले आहेत, ज्यांची लग्ने झाली आहेत. ते आपल्या कुटुंबासह पुण्यात नोकरीसाठी राहत आहेत.
अचानक त्यांच्या घरात (गावी) काही चमत्कारिक प्रसंग घडू लागले. पहिला आठवडाभर थांबेचनात, तेव्हा ते घाबरले… तर काय घडत होतं त्यांच्या घरात…? तर त्यांच्या घरातल्या वस्तू गायब होत होत्या आणि काही काळाने त्या परत मिळत होत्या; पण त्या खराब झालेल्या अवस्थेत. प्रथम घडले ते असे – त्यांच्या घरातील एका मोबाईलमधले सीमकार्ड गायब झाले. फोन समोरच ठेवलेला होता. दोन दिवसांनी ते कार्ड 213 तुकडे झालेल्या अवस्थेत सापडले. त्यानंतर घरातून गाडीची चावी, कधी तेलाचा डबा, तर कधी टी.व्ही.चा रिमोट गायब होऊ लागला; अगदी सेटटॉप बॉक्समधले कार्डसुद्धा हॉलमधून गायब झाले.
सगळ्यांनी आपापले फोन सतत जवळच बाळगायला सुरुवात केली. आता घरातील इतर वस्तू गायब होऊ लागल्या. आजोबांचे आधारकार्ड, त्यांच्या पाकिटातील पैसे. दुसर्या दिवशी त्याचे तुकडे घराच्या आजूबाजूच्या परिसरात सापडले. तशात आजोबांच्या मोठ्या मुलाचा मोबाईलच गायब झाला. दोन दिवसांनंतर त्याच हरवलेल्या मोबाईलवरून, ‘तुमचा आणि तुमच्या मुलाचा खून करणार आहे,’ मेसेज आला. तेव्हा त्या आजोबांनी आपल्या पुढ्यात राहणार्या दोन्ही मुलांना व सुनांना बोलावून घेतले. ते आल्यावर सर्व स्थिती पाहिली. घरचे अत्यंत भयभीत झाले होते. त्यातच घरातील सोन्याचे मंगळसूत्र गायब झाले. खूप शोधाशोध केली; पण सापडले नाही. असे झाले तर जगायचे कसे? काळजीपोटी ते एका मांत्रिकाकडे गेले. त्याने सर्व ऐकून घेतले आणि भस्म दिले व सांगितले की, तुमच्या घरात काळी छाया घुसली आहे. तुमच्याच नात्यातील परगावी राहणारे हे सर्व घडवून आणत आहेत. त्यांच्यामुळे तुमच्या घरातील माणसांच्या जीवालाही धोका आहे. सध्या भस्म घरात व घराभोवती टाका आणि पुढच्या आठवड्यात काय होते ते सांगायला या. जर हा प्रकार थांबला नाही, तर त्याला बांधायला, घरातली काळी छाया बाहेर काढायला 25 हजार रुपये खर्च येईल.
भस्म फेकल्यावर दोन दिवस घरात काहीच घडले नाही; पण तिसर्या दिवशी दारात उभ्या असलेल्या दुचाकीवर, ‘तुमच्या नातवाला ठार मारीन!’ अशी चिठ्ठी दिसली. आजी-आजोबा घाबरले. त्या मुलाची आई रडायला लागली. मग पुन्हा मांत्रिकाकडे जायचे ठरले.
एवढे सगळे ज्या कुटुंबात घडत होते, ते सर्व गावात आणि त्या कुटुंबाच्या नातेवाईकांमध्ये समजले होते. त्यामुळे गावातील लोक विचारणा करायला येऊ लागले, नातेवाईक येऊ लागले. तशातच त्यांच्या नात्यातील एकजण सातार्याजवळ एका गावात राहत होता. त्याने ‘अंनिस’चे नाव ऐकले होते. त्याने त्यांच्या घरी फोन केला. पुण्यात राहणार्या मुलाला, ‘अंनिस’च्या एखाद्या कार्यकर्त्याचा फोन नंबर मिळवा किंवा मी मिळवून देईन. तुम्ही त्यांच्याशी बोला,’ असे सांगितले. त्यांनी नंबर शोधला. त्यांना राहुल थोरातांचा नंबर मिळाला. ते त्यांच्याशी बोलले. तेव्हा राहुल थोरात (सांगली) यांनी माझा (निशा भोसले, सोलापूर) नंबर दिला. त्यांचा मला फोन आला. मी त्यांच्याशी नंतर सविस्तर बोलले. त्यांना धीर दिला. ‘आम्ही त्यांना घरी येऊन हे सर्व बंद करतो,’ असे सांगितले. त्यांना तसा सविस्तर लेखी अर्ज द्यायला सांगितला. त्यांनी लेखी अर्ज पाठवला. ‘दोन दिवसांनी येतो,’ असे सांगून वार व तारीख ठरवली; पण दुसर्या दिवशी म्हणाले की, ‘आज आमच्या घरात येणारी विजेची वायर कापली आणि बाहेर साठवलेल्या कचर्याला आगही लागली.’
ते खूपच घाबरले होते. ते त्यांच्या आवाजावरून जाणवत होते. मी त्यांना सांगितले की, “आम्ही उद्या सकाळी 11 पर्यंत तुमच्याकडे येतो. फक्त कुटुंबातील सर्व सदस्य घरातच थांबा.” दुसर्या दिवशी आमच्या सोलापूर शहर शाखेचे कार्यकर्ते धडके सर, मधुरा सलवारू आणि मी स्वत: असे आम्ही त्यांच्या गावी पोचलो.
घरातील सर्वजण आमच्याभोवती गोळा झाले आणि काय-काय होतं, ते सांगू लागले. प्रत्येकजण भयभीत झालेला होता. घरातील सर्व मौल्यवान वस्तू, पैसे एका पिशवीत घेऊन आणि नातवाला आपल्या शेजारीच बसवून आजी बसत होत्या. आम्ही परिसर पाहणी केली. वायर कशी कापली, वस्तू कुठे-कुठे सापडल्या, हे सगळे पाहून घेतले. घराभोवती फिरत असतानाच आम्ही ‘त्या’ कुटुंबातील प्रत्येकाच्या चेहर्यावरचे हावभावही निरखत होतो. काही गोष्टींचा अंदाज येऊ लागला होता. घरातील सर्वांना समोर बसवले. यावर काय-काय उपाय केले, ते विचारले, तर त्यांनी मांत्रिकाकडे गेल्याचे आणि दोन दिवसांनी परत त्याने 25 हजार रुपये घेऊन बोलावल्याचे सांगितले. तेव्हा मी त्यांना सांगितले की, “आता तुम्हाला कोणाकडेही जायची गरज नाही. आम्ही तुमच्या घरात घडणारे सर्व प्रकार आजच बंद करणार आहोत. पुन्हा तसे काहीही होणार नाही; पण तुम्ही मांत्रिकाकडे परत जाणार नाही, हे कबूल करा.”
तेव्हा आजोबा चक्क रडायला लागले. ते म्हणाले, “अहो ताई, दीड महिन्यांपासून हे सगळे घडत आहे, आम्हाला झोप नाही, जेवण जात नाही. तुम्ही हे सगळं थांबवा. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. आम्ही कोणाही मांत्रिकाकडे जाणार नाही. आमची यातून सुटका करा.”
आपण नेहमीच ज्या पद्धतीने अशा केसेस सोडवतो, त्याप्रमाणे कुटुंबातील प्रत्येक सदस्याची स्वतंत्र मुलाखत स्वरुपात संवाद साधला, तेव्हा एक गोष्ट समजली की, पुण्यात राहणारे गावी असतानाही या घटना घडत होत्या आणि ते गावी नसतानाही हे घडत होते. त्यानुसार आजी, आजोबा, मोठा मुलगा, मोठी सून अशा क्रमाने एकेक व्यक्तीशी बोललो. सर्वांचं एक म्हणणं की, “कसं होतंय आम्हाला कळत नाही. कोणीतरी बाहेरचे आपल्यावर, घरावर करणी-भानामती करत आहे.” यावर मात्र सर्वांचे एकमत झाले होते. त्यातच, ‘तुमच्या नातवाला ठार मारू,’ ही चिठ्ठी पाहिल्यापासून त्या नातवाला आजीजवळच बसवून ठेवले होते. पुण्यातील कुटुंबाशी बोललो. त्यांचं एकच म्हणणं, “जे होतंय ते थांबवा. कारण आम्ही तिकडे असतो आणि हे इकडे खूपच घाबरलेले आहेत.”
आता उरली मोठ्या मुलाची तीन मुले. दोन मुलींपैकी एक आठवीत, दुसरी सातवीत आणि तिसरा मुलगा पाचवीत. ही केस ऐकल्यापासूनच माझ्या संशयाची सुई या मुलांकडेच जात होती.
आठवीतल्या मुलीशी बोलले. क्लास कसे चाललेत? मोबाईल कोणता आहे? रेंज येते का? मोबाईलमध्ये गेम किती आहेत? तुला कोणता गेम खेळायला आवडतो? त्यावर ती म्हणाली की, “आमचे दोघींचे व्हिडिओ येतात मोबाईलवर; पण माझा भाऊ (वय 11 वर्षे, इयत्ता पाचवी) हा इंग्रजी माध्यमात असल्याने त्याची ऑनलाईन शाळा असते. त्यामुळे त्याच्याकडेच मोबाईल जास्त वेळ असतो. पुण्याच्या काकांनी खास त्याच्यासाठी 7 हजार रुपयांचा मोबाईल घेतला आहे. माझी बहीण आणि तो असे गेम खेळतात. जास्तही खेळत. मला येत नाही खेळायला व ते मला देतही नाहीत.” मग दोन नंबरच्या बहिणीशी बोललो. ती म्हणाली की, “आमच्या घरात मोबाईलमधलं सगळं माझ्या छोट्या भावाला कळतं. त्याला एका मिनिटात मोबाईलचं सीम काढून बसवता येतं. गेमही येतात. तो खूप हुशार आहे. शाळेतपण 98 टक्क्यांपर्यंत मार्क घेतो आणि मोबाईलमधलं पण खूप कळतं.” आता आमच्या सुईची दिशा पक्की झाली.
सर्वांत शेवटी पाचवीतला नातू, ज्याचे वय फक्त 11 वर्षे आहे, तो खोलीत आला. “मीच एकटी बोलेन, मध्ये तुम्ही काही बोलू नका,” असे आधीच साथींना सांगितले होते.
अतिशय शांत दिसणारा, निष्पाप चेहरा, साधारण बांधा. गोड आवाजाचा मुलगा समोर होता. अगदी हळुवारपणे बोलायला सुरुवात केली. अवांतर, शाळेबद्दल, टीचर, मित्र यांच्याबद्दल विचारले. मोठेपणी काय व्हायला आवडेल, विचारले. तर पोलीस व्हायचंय, असं म्हणाला. आवडता विषय सांगितला. मग विचारले की, “काय रे, हे सर्व कसं घडतंय?” तर म्हणाला, “मला काय माहीत; पण गोष्टी गायब झालेल्या मलाच दिसत होत्या. माझं आधी जोरात डोकं दुखायचं आणि ती वस्तू कचर्यात किंवा झाडाखाली मला दिसायची. मग मी घरच्यांना तिथं घेऊन जायचो, तर तिथं मिळायची चावी, मंगळसूत्र, बाबांचा मोबाईल, काकांचं सीमकार्ड मलाच दिसलं.”
मग मी त्याला विचारले, “सापडले तुलाच; पण तू फेकून देत असताना किंवा सीमकार्ड, आधारकार्ड कापताना तुला कोणी कसं पाहिलं नाही? तू कुठं बसून हे करत होतास?” तो म्हणाला, “नाही. मी यातली एकही गोष्ट केली नाही. मांत्रिकाने सांगितले ना की, कुणी तरी काळी शक्ती हे करतेय म्हणून. मी काहीच केलं नंही. मला काहीच माहीत नाही. त्या वस्तू तशा बाहेर कशा जातात ते.” चेहरा एकदम निर्विकार, भीती नाही. काही नाही. शांतपणे उत्तरे देत होता. मी मध्येच विषय बदलून त्याला कागद, पेन दिला आणि “तुला जे गेम येतात (व्हिडिओ गेम) त्यांची नावं लिही,” असे सांगितले. हातात पेन धरला तेव्हा हाताची किंचित थरथर मला जाणवली. काही व्हिडिओ गेम असे असतात की, त्यात तुम्हाला प्रत्यक्षात काही कृती करायला लावतात. ‘ब्लू व्हेल’ असा होता; पण तो गेम बॅन आहे. मी आदल्या रात्रीच माझ्या 11 वर्षांच्याच नातवाकडून याबद्दलची माहिती विचारून लिहून घेतली होती. त्याने अगदी साध्या गेमची नावे लिहिली. हे बाकीचे गेम त्याला माहीत नव्हते. मी त्याला विचारले, “मोबाईल कशाने उघडतो?” तो म्हणाला, “टाचणीने.” आणि लगेच पटकन विचारले, “सीम कशाने कापतो?” तर लगेच सावध होऊन म्हणाला, “नाही सीम नाही कापत.” मग त्याला जवळ बोलावले, प्रेमाने पाठीवर हात फिरवला.“तू आमच्यापुढे सांगितलेले घरात कोणालाही सांगणार नाही. तूही आम्ही तुला काय-काय विचारले ते कोणाला सांगू नकोस. घाबरू नको. आता तुला खरं सांगावंच लागेल. कारण काल जी तू वायर (जिवंत करंट असलेली) कापलीस ते कृत्य तुझा किंवा इतर कोणाचाही जीव घेणारं ठरलं असतं. हा भयंकर अपराध आहे. याचे परिणाम तुझ्या घरातील तुझ्या आवडत्या एखाद्या व्यक्तीचा जीव जाण्यात आला असता, आणि मग पोलिसांनी तुला खुनी म्हणून पकडून नेले असते. मग तुझे आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकू सर्वजण तुझे लाड करतात, ते तुझं तोंडही बघणार नाहीत. तेव्हा आता तूच हे सर्व केले आहे, याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. वायर कशाने कापली सांग.” असे म्हणताच तो म्हणाला, “मोठ्या कात्रीने!” “का असे केले? सर्वांचे मोबाईल आणि सीमकार्डच का खराब केले?” त्यावर त्याने सांगितले की, “मला जो मोबाईल 17 हजारांचा स्मार्टफोन काकाने घेऊन दिला आहे, त्याच्यामध्ये यू-ट्यूब आणि व्हिडिओ गेम लॉक आहे. ते ओपन होत नाही, म्हणून मी दुसर्यांचे सीम काढून घेत होतो आणि घरच्यांना कळू नये म्हणून तोडून फेकत होतो. ‘फक्त मोबाईल आणि सीमकार्डच कसं काय गायब होतंय,’ असे सगळे विचारायला लागले म्हणून मी इतर वस्तूही गायब करू लागलो. ‘तुमच्या नातवाला ठार मारीन,’ मीच लिहून ठेवलं. वाईट अक्षर काढून; म्हणजे कोणी माझे नाव घेणार नाही म्हणून.”
आता त्याच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. चेहर्यावर भीती होती; पण त्याला प्रेमाने समजावले आणि सांगितले की, “आता घरातली एक जरी गोष्ट सापडली नाही किंवा गायब झाली, तर मी तुझी पोलिसांत तक्रार करीन. कारण मी माझ्या मोबाईलमध्ये तू बोललेलं सर्व रेकॉर्ड केले आहे. (प्रत्यक्षात तसं काही रेकॉर्ड केलेलं नव्हतं) त्यामुळे आता सर्व प्रकार आज, या क्षणापासून थांबले पाहिजेत. आम्ही कोणालाही तुझं नाव सांगणार नाही. जरा मोठा झालास की, सर्व पाहायला मिळेल. मोबाईल गेम किंवा यू-ट्यूब, काहीही पळून जात नाही. त्यासाठी घरच्या सर्वांना एवढा त्रास दिलास. अशाने तू अट्टल गुन्हेगार झाला असतास. आता नीट अभ्यास कर. पोलीस ऑफीसर हो. आता हस बघू,” असे म्हणून आम्हीही सर्वजण हसलो. तोही हसला. हसतच सर्व बाहेर आलो. बाहेर येऊन दोन चमत्कार करून दाखविले. त्यामागचे सायन्स सांगितले. त्यांच्या गावात कधीतरी कार्यक्रम घ्या, असे सांगितले. चहा-पोहे घेतले. “तुमच्या घरातले सर्व काही बंद झाले आहे. आता यावर रोजची चर्चा करू नका. बिनधास्त राहा,” असे सांगून निघालो. सात-आठ दिवसांनी मुलाचा फोन आला – “मी शाळेत जाऊ लागलो. चांगला अभ्यास करतोय. आजीला तुमच्याशी बोलायचं घ्या,” म्हणाला. आजी म्हणाल्या, “ताई, आमच्याकडं सगळं वाईट बंद झालं बरं का. तुमचे खूप उपकार झाले. परत एकदा आमच्या गावी या भेटायला.” मी ‘हो’ म्हणाले. अशा प्रकारे मोबाईलची भानामती बंद झाली.
– निशा भोसले, सोलापूर
संपर्क : 9764476476