दाभोलकरांचे पूर्वसुरी

अनिल चव्हाण - 9764147483

समता, बंधुता, न्याय ही तत्त्वे प्रत्यक्षात यावीत, म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर आयुष्यभर प्रयत्न करत राहिले. त्यातला एक भाग म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम. सर्वसामान्यांना लुबाडणार्‍या, त्यांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करणार्‍यांच्या विरोधात त्यांनी संघर्ष केला. त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा व्हावा, असा आग्रह धरला; परिणामी सनातन्यांनी त्यांचा खून केला. डॉक्टरांचा खून ही काही आपल्या देशातील पहिली घटना नाही. यापूर्वीही भोंदूगिरीला विरोध केला, शोषणाला विरोध केला, म्हणून सनातन्यांनी पुरोगाम्यांचा छळ केला, त्यांचा खून केला.

चार्वाक ते दाभोलकर : छळांची परंपरा

चार-पाच हजार वर्षापूर्वी आपल्या इथे यज्ञसंस्कृती होती. काही दिवस, काही महिने हे यज्ञ चालत. यज्ञामध्ये धनधान्य, तूप जाळले जाई. अनेक पशुबळी दिले जात. यज्ञात जाळावयाच्या वस्तू शेतकर्‍यांकडून बळजबरीने मिळवल्या जात. बळी दिल्याने शेतीसाठी जनावरे कमी पडत. यज्ञ केल्याने सुख-समृद्धी येईल, शत्रूवर विजय मिळेल, मुले होतील, पाऊस पडेल, अशा विविध भाकड कथा सांगितल्या जातात. या कथा खोट्या आहेत, असे सांगणारे पुरोगामी विचारवंत त्या काळीही होते. त्यांना चार्वाक म्हणतात –

चार्वाक :

चार्वाक म्हणत,

यावत् जीवेत् सुखम् जीवेत् । ऋणं कृत्वा घृतं पिबेत् ।

भस्मी भुतस्य देहस्य। पुनरागमनं कुता:॥

जिवंत आहात तोपर्यंत सुखाने जगा. कर्ज काढून तूप प्या. एकदा देहाचे भस्म झाले की पुन्हा येता येत नाही. आत्मा-परमात्मा, पूर्वजन्म-पुनर्जन्म, हे खरे नाहीत. यज्ञ हे पुरोहितांचे पोट भरण्याचे साधन आहे, स्वर्ग-नरक खरे नाहीत. चार्वाकांनी आपले विचार निर्भयपणे समाजासमोर मांडले, ग्रंथ लिहिले.

चार्वाकांचे विचार खोडून काढणे यज्ञसंस्कृतीच्या समर्थकांना शक्य नव्हते, म्हणून त्यांनी चार्वाकांना जाळून टाकले, त्यांची ग्रंथसंपदाही नष्ट केली. पण माणूस मारून विचार संपत नाहीत. चार्वाकांचे विचार आजही अभ्यासता येतात. विरोधकांच्या ग्रंथांमधून आज पुन्हा चार्वाकांचे विचार एकत्र केले गेले आहेत. चार्वाकांचा काळ म्हणजे बळीवंशाचा काळ.

बळीवंश :

बळीवंशातील हिरण्यकश्यपू, प्रल्हाद, विरोचन, बळी, बाणासुर अशा थोर राजांची नावे पुराणात आढळतात. पुराणातील चमत्कार बाजूला केले आणि पुराणकथांचा अर्थ लावला, की इतिहासातील सत्य सापडते.

ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो

अशी प्रार्थना भाऊबीजेला, भावाला ओवाळताना बहीण करते. यावरून बळीच्या राज्याबद्दल बहुजन समाजामध्ये अजूनही मोठे आकर्षण आहे, असे दिसते. ‘ईडा’ हा यज्ञातील महत्त्वाचा भाग आहे. यज्ञसंस्कृती नष्ट होऊ दे, वर्णव्यवस्था नष्ट होऊ दे, आणि बळीचे राज्य यावे, असे बहीण म्हणते. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी आपल्या ‘बळीवंश’ या ग्रंथात बळीचे उचित वर्णन केले आहे.

बळी, सर्वांशी समतेने वागणारा, सर्वांना परस्परांशी समतेने वागण्याची प्रेरणा देणारा, कृषी जपणारा, सकारात्मक, क्रियाशील समाजरचना घडवणारा समाजशिल्पकार, निर्मख, निरागस मनाचा, उन्नत महामानव, पराभवातही पराभूत न होणारा शांत चित्त आणि सात काळजाच्या आत जपून ठेवावा, असा जिवलग. असे त्यांनी म्हटले आहे. महात्मा फुलेंनीही बळीराजाचा वारंवार गौरव केला. ते म्हणतात,

आमच्या देशीचे अतुल स्वामी वीर।

होते रणधीर । स्मरू तयांस ।

बळीस्थानी आले शूर भैरोबा । खंडोबा ज्योतिबा । महा सुभा ॥

सद्गुणी पुतळा राजा मूळ बळी । दसरा-दिवाळी। आठवीती ॥

क्षेत्रीय भार्या ईडा पिडा जावो । बळी राज्य येवो । अशा का बा ॥

आर्यभट आले सुवर्ण लुटले । क्षेत्री दास केले । बापमत्ता ॥

वामन का घाली बळी रसातळी । प्रश्न ज्योती माळी। करी भटा ॥

आपल्या देशाच्या लोकांना परकियांनी लुटले, याचा उल्लेख महात्मा फुले यांनी केला आहे. आपल्या देशाला बळीस्थान असे म्हणतात. शेतकर्‍याला महाराष्ट्रात बळीराजा म्हणतात. अशा सर्वगुणसंपन्न, दीन-दुबळ्यांचा तारणहार, समतावादी राजाला वामनाने फसवून मारले. वामनाने बळीकडे तीन पावले जमीन मागितली. तीन पावलांचा अर्थ डॉ. आ. ह. साळुंखे यांनी दिला आहे. तो म्हणजे यज्ञयुक्त भूमी, वेद आणि वाणी. यज्ञाच्या मार्गाने वैदिक असुरांमध्ये घुसले. त्यांनी वेदांचा प्रचार केला आणि बहुजनांच्या वाणीवर बंधने आणली. या मार्गाने बळीवंशाचे राज्य संपवले. बळीवंशाचे राजे चातुर्वर्ण्याच्या विरोधी होते. त्याच विचाराचे चार्वाक आणि बौद्ध, महावीर सुद्धा.

बौद्ध :

बौद्धांनी यज्ञातील हिंसेला विरोध केला. विषमतेवर आधारित चातुर्वर्ण्याला विरोध केला. समतेचा प्रचार केला. परंपरा, धर्मग्रंथ, थोरांचे विचार यावर विश्वास ठेवताना, विचार करावा, डोके वापरावे, असे सांगितले. त्यामुळे ब्राह्मणी वर्चस्व कमी झाले. सम्राट अशोकाने दूरच्या देशात धर्मप्रसारक पाठवले. आसपासच्या देशात बौद्ध धर्म पसरला.

अशोकाचा नातू बृहद्रथ राज्यावर बसला. बृहद्रथ याने पुष्यमित्र नावाचा ब्राह्मण सेनापती नेमला. या सेनापतीने राजाचा खून केला आणि तो स्वतः राजा झाला. सत्तेवर बसल्याबरोबर त्याने बौद्ध भिक्खूंच्या कत्तली केल्या. बौद्ध भिक्खूचे मस्तक कापून आणून देणार्‍याला सुवर्ण मोहरांचे बक्षीस लावले. भिक्खूंच्या मस्तकांची रास लागली.

आठव्या शतकात शंकराचार्यांनी बौद्धांच्या विरोधात रान उठवले.

बौद्ध धर्म देशातून हद्दपार झाला; पण संपला नाही.

वारकरी संप्रदायासारख्या संप्रदायांनी बुद्धाचे विचार अभंगातून रुजवण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यानंतर देशाची मानचिन्हे बौद्ध परंपरेतील घेतलेली आहेत. अशोक चक्र, तीन सिंह; याबरोबर भारतीय घटनेत समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे बुद्धाचे ब्रीदवाक्य अनेक संस्थांनी स्वीकारलेले दिसते.

समतेचा विचार सांगणारे विविध पंथ तयार झाले. नाथ संप्रदाय, महानुभाव, वारकरी, दत्त, समर्थ, गणेश, नागेश अशा विविध संप्रदायांनी जातिभेदाला विरोध केला. उच्च-नीचता, भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता, लिंगभेद यांनाही विरोध केला. महानुभाव, लिंगायत, वारकरी अशा विविध पंथांनी समतेच्या विचारांचा समाजात प्रचार केला.

महानुभाव पंथांचे महात्मा चक्रधर :

महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर. त्यांचे मूळ नाव हरपाळदेव. ते गुजरातचे राजे होते. शूर, पराक्रमी आणि कुशाग्र बुद्धीचे. त्यांचे युद्ध झाले राजा सिंघनदेव यादव, या शूर आणि पराक्रमी यादव राजाशी.

युद्धात प्रचंड हिंसा झाली. त्यातून हरपाळदेव वीरक्त झाले. हिंसा झालेल्या भागात आले. तेराव्या शतकाच्या सुरुवातीला हरपाळदेव चक्रधर म्हणून वावरू लागले. या प्रदेशात यादवांची राजसत्ता होती. माणसामाणसांत उच्च-नीच भेदभाव होता. समाज विविध जातींत विभागला होता. महार, मांग, चांभार, कोष्टी, माळी, साळी अशा अठरापगड जातींना वरच्या जातींची सेवा, चाकरी करणे, हेच ‘मनुस्मृती’ने नेमून दिलेले काम होते. समाजात स्त्रीला कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते. सतीची चाल रुढ होती. स्त्रियांप्रमाणेच शूद्रांनाही कसलाच अधिकार नव्हता. ‘मनुस्मृती’ हीच त्या काळची सामाजिक व्यवस्थेची आचारसंहिता होती. लोक व्रतवैकल्यांच्या नादी लागून रूढी आणि अंधश्रद्धांना कवटाळून बसले होते. सोवळे-ओवळे, तीर्थयात्रा यांचे स्तोम माजले होते. रामदेव यादवांचा प्रधान हेमाद्री याने ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ ग्रंथ लिहून दर दिवशी पाच-दहा-दहा व्रते सांगितली होती. कोणी कोणत्या देवाची पक्वान्ने करावीत आणि किती ब्राह्मणांना जेवायला बोलवावे, याची विस्तृत नोंद केली होती. त्यामुळे व्रतवैकल्ये, उपास-तापास, ब्राह्मण भोजने म्हणजेच धर्म ही समजूत दृढ झाली होती. शूद्रांच्या कष्टावर सुख भोगणे हाच, उच्चकुलिनांचा जन्मसिद्ध अधिकार बनला होता. धर्ममार्तंडांना विशेष सवलती होत्या. चक्रधरांनी भ्रमण करून लोकजीवन अत्यंत सूक्ष्मपणे पाहिले.

चक्रधरांनी अंधश्रद्धा, भोंदूगिरी, दांभिकता पाहिली आणि त्याविरोधात; तसेच जातिव्यवस्थेविरुद्धही ते दंड थोपटून उभे राहिले. माणसाने माणसाला स्पर्श करणे हे मानवी आहे, असे ते ठणकावून सांगत. मनात खोलवर रुजलेला एकमेकांबद्दलचा द्वेष नाहीसा झाला पाहिजे, यावर त्यांचा भर होता. सर्व प्रकारचा विटाळ त्यांना निषिद्ध वाटत होता. जातिनिर्मिती, उच्च-नीचतेचा विचार सोडा, असे ते आवर्जून सांगत. अज्ञानी समाजाला साक्षर करण्यासाठी त्यांना समजेल, अशा भाषेत ज्ञान देण्याची गरज होती.

संस्कृत भाषेत उपदेश केला तर धर्माचरणासाठी, मार्गदर्शनासाठी तडफडणारी, तळमळणारी भाविक श्रद्धाळू जनता खर्‍या ज्ञानापासून, खर्‍या धर्मापासून वंचित राहील, असे त्यांना वाटत होते, म्हणून त्यांनी लोकांच्या बोलीचा आधार घेतला. त्यावेळच्या सर्वसामान्य लोकांची बोली मराठी होती. शिष्यांनाही मराठीतूनच बोलण्याचा, लिहिण्याचा, विचार मांडण्याचा आग्रह केला. जगात कोणतीही व्यक्ती जातीने अथवा जन्माने श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नाही, हा विचार फक्त बोलून न दाखवता प्रत्यक्ष अमलात आणला.

पैठणमध्ये त्यांचा महानुभव संप्रदाय स्थिर झाला. त्यांचे मानवतावादी, समतावादी विचार ऐकून अनेक सभाजन चक्रधरांच्या भेटीस येत; पण ही कीर्ती महदाश्रम व ब्रह्म सानू या ब्राह्मण पुरोहितांना खुपत होती. त्यांनी चक्रधरांचा काटा काढायचे ठरवले. त्यांच्यावर दोन वेळा विषप्रयोग केला; पण उपयोग झाला नाही. तेव्हा यादवांच्या प्रधानाला – हेमाद्रीला – आपल्याबरोबर घेतले. हेमाद्रीने चक्रधरांच्या विरोधात राजाचे कान फुंकले; परिणामी एके दिवशी चक्रधर लोकांना ज्ञानदान करत असताना सैनिकांनी त्यांच्या मठावर हल्ला चढवला. हे पाहून त्यांचे शिष्य नागदेव प्रतिकारासाठी धावले. सैनिकाची ढाल तलवार हिसकावून ते इतर सैनिकांशी लढू लागले; पण चक्रधरांनी त्याला अडविले. अहिंसेचे व्रतस्थपणे पालन करणे, अशी शपथ घालून त्यांनी नागदेवास शस्त्र ठेवण्यास भाग पाडले.

हेमाड पंडितांनी चक्रधरांना बोलावून घेतले. त्यांच्यावर स्त्रियांच्या संदर्भात खोटे आरोप ठेवण्यात आले आणि कोणतेही पुरावे न तपासता आरोप करणार्‍यांनी न्यायनिवाडा केला, तो म्हणजे चक्रधरांना अवयवछेदाची म्हणजे एक कान कापण्याची शिक्षा सुनावली. लगेच त्याची अंमलबजावणीही केली.

पण चक्रधरांचे कार्य थांबले नाही, तेव्हा चक्रधरांना पकडून नेले. राजाने आदेश दिला, ‘दांडी घेऊन जा. वोखटे करा म्हणजे ठार करा.’ अशा पद्धतीने सनातन वैदिक धर्माच्या विरोधात उभे राहून सामाजिक समतेचा संदेश देत जातिअंताच्या लढ्यात कृतिशील कार्य करणार्‍या चक्रधरांना इसवी सन 1278 मध्ये निर्घृणपणे ठार मारण्यात आले. त्याला ‘उत्तरपंथे गमन’ असे गोंडस नाव देण्यात आले. चक्रधरांना मारले; पण त्यांचे विचार मारता आलेले नाहीत. चक्रधरांच्या नंतर नागदेवाचार्य पंथाचे प्रमुख झाले. त्यांनी मराठीसाठी आग्रह धरला. त्यामुळे थोड्याच अवधीत सूत्रपाठ, रुक्मिणीस्वयंवर, शिशुपालवध, रिद्धी पूर वर्णन, सह्याद्री वर्णन, वच्छाहरण इत्यादी ग्रंथ रचले गेले. महानुभाव साहित्याने मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले. मराठीतले पहिले गद्य वांग्मय आणि मराठी भाषेतील पहिली कवयित्री महानुभाव संप्रदायातून निर्माण झाली. म्हाइंभटाने चक्रधरांच्या ‘लीळा’ म्हणजे आठवणी गोळा केल्या.

चक्रधरांनी बाराव्या शतकात परिवर्तनाचे जे बीज रोवले, त्याचा आज भलामोठा वृक्ष झाला आहे.

महात्मा बसवेश्वर वा बसवण्णा :

कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात बागेवाडी नावाचे खेडे आहे. त्या गावात इसवी सन 1106 मध्ये महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाला. शैवसंप्रदायाची परंपरा जोपासणार्‍या ब्राह्मण घराण्यातले मादरस हे त्यांचे वडील आणि मादलांबिका या मातोश्री. विजापूर जिल्ह्यात कुडल संगम म्हणून एक पवित्र क्षेत्र आहे, त्या ठिकाणी बसवेश्वरांचे बालपण गेले.

बसवेश्वरांची बुद्धिमत्ता, समाजाला नेतृत्व देण्याची शक्ती, सामाजिक समतेसाठी केलेले प्रयत्न, दाखवलेले धैर्य, यामुळे ते वीरशैव लिंगायत धर्म स्थापन करण्यात यशस्वी झाले. त्यांचे सारे आयुष्य रुढींचे भंजन करण्यात आणि सामाजिक समतेचा ध्वज उंच उभारण्यात गेले.

ते म्हणत – परंपरेने जन्मावरून ठरविण्यात आलेल्या जाती आणि वर्ण हे खोटे आहेत. माणसामाणसांत कोणताही भेद करू नये. स्त्री-पुरुषांना समान वागणूक मिळावी. विधवांना सन्मानाने वागवावे. त्यांना पुनर्विवाहाची संधी द्यावी. सती जाण्याची अमानुष प्रथा बंद करावी. बालविवाह करू नयेत. प्रत्येकाने कष्ट करून आपली उपजीविका करावी. कुटुंबपोषणासाठी आवश्यक असणारे धन ठेवून उरलेले समाजासाठी खर्च करावे. ईष्टलिंगाची पूजा करावी, अन्य देव-देवतांची पूजा करू नये. देवळे सुद्धा बांधू नयेत. चमत्कारावर विश्वास ठेवू नये.

त्यांचे अनुयायी समाजाच्या सर्व स्तरांतून आले होते. त्या सर्वांनी धार्मिक परिवर्तनाच्या महान कार्यात सहभाग घेतला. त्यांना आलेले अनुभव काव्यरुपाने रचून ठेवले. कन्नड भाषेत या साहित्याला ‘वचन साहित्य’ म्हणतात. कल्याण नगरीत बसवेश्वरांनी ‘अनुभव मंटप’ची स्थापना केली. तेथे विविध विषयावर चर्चा होई. निरनिराळ्या भागांतून आलेल्या शिवशरणांनी लिहिलेली वचने तेथे वाचून दाखवण्यात येत आणि निर्दोष ठरले तर त्यांना ‘शरण साहित्या’त अढळ पद प्राप्त होई.

कल्याण नगरीत दोन नामवंत वीरशैव शरण राहत होते. एक ढोर (चांभार) समाजातले हरळय्या, तर दुसरे ब्राह्मण जातीतील मधुवरस. दोघेही सच्चे अनुयायी. त्यांनी लिंगायत धर्म स्वीकारला होता. मधुवरसाने आपल्या मुलीचे लग्न हरळय्याच्या मुलाशी करण्याचे ठरवले. त्याला ‘अनुभव मंटप’ने संमती दिली.

ही बातमी गावात पसरली. राजाच्या कानावर गेली. राजाने बसवेश्वरांना स्पष्टीकरण विचारले. ते म्हणाले, “महाराज, हे दोन्ही वीरशैव लिंगायत बनले आहेत. वीरशैव धर्मात जाती नाहीत. त्यामुळे येथे वर्णसंकराचा प्रश्नच येत नाही.” पण पुरोहित सनातन्यांनी उचल खाल्ली. कल्याण नगरीत एकच गदारोळ माजला. लोकांना बसवेश्वरांच्या विरोधात भडकावून दिले, दंगे होऊ लागले, रक्तपात होऊ लागला. राजाने नवदांपत्य व हरळय्या आणि मधवुरस यांना पकडून ठार मारले.

बसवेश्वरांच्या अनुयायांवर हल्ले झाले. त्यांचे ‘वचन साहित्य’ जाळून टाकण्याचा आज्ञा सुटल्या, तेव्हा शरणांनी, ‘वचन साहित्या’च्या नकला केल्या आणि वचने पाठ केली. अशा रीतीने बसवेश्वरांच्या अनुयायांनी ‘वचन साहित्या’चे रक्षण केले. लिंगायतांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ‘शरण साहित्या’चे रक्षण करण्यासाठी हातात तलवार घेतली.

कल्याणमधील यादवीनंतर वीरशैवांवर फार मोठे संकट आले. राजाचे सैनिक त्यांच्या घरांना आगी लावत. कोणाकडे ‘शरण साहित्य’ सापडले तर ते जाळण्यात येई आणि असेच साहित्य जवळ बाळगणार्‍यांना जबरदस्त शासन केले जाई; प्रसंगी त्याला आपले प्राण देखील गमवावे लागत; पण तरीही बसवेश्वरांचा विचार नष्ट झाला नाही.

वारकरी संप्रदाय :

नामदेवे रचिला पाया। तुका झालासे कळस॥

असे वर्णन वारकरी संप्रदायाचे केले जाते. नामदेव आणि ज्ञानेश्वर हे समकालीन. महात्मा चक्रधरांना सनातन्यानी ठार मारले. त्यानंतर एक वर्षाने संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. शूद्रातिशूद्रांसाठी त्यांनी संस्कृतमधील ज्ञान मराठीत आणले आणि इथला रेड्यासारखा केवळ राबणारा शूद्र समाज वेद जाणू लागला.

वारकरी संप्रदायात विविध जातींमधील संत सामील झाले. त्यांनी अभंगरचना केली आणि समतेचा विचार सर्वदूर पसरविला. अध्यात्म क्षेत्रात वर्णभेद, जातिभेद, स्त्री-पुरुष असमानता टाळून समता आणली. देव भावाचा भुकेला, त्याला पूजा-अर्चा, तीर्थाटन, उपास-तपास, यज्ञयाग, जप-तप, मंत्र-तंत्र, अशा कशाचीही गरज नाही. आपले काम करत असताना देवाचे नामस्मरण करा, एवढेच पुरेसे आहे, असा भक्तिमार्ग सांगितला.

संत तुकारामांनी आपल्या अभंगांतून भोंदू बुवांचे वाभाडे काढले. गर्विष्ठ सनातन्यांचा बुरखा फाडला. रोजच्या जीवनातील उदाहरणे घेऊन त्यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात, असाध्य गोष्ट प्रयत्न आणि अभ्यासाने साध्य करता येते. त्यासाठी यज्ञ, पूजा, मंत्र-तंत्राची गरज नाही. भलामोठा खडकही ओले मूळ प्रयत्नाने फोडून काढते.

ओले मूळ भेदी खडकाचे अंग । अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी ॥

नव्हे असे काही नाही अवघड। नाही कईवाड तोच वरी ॥

सनातनी पढत पंडितांना ते म्हणतात-

वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा। येरांनी वाहावा भार माथा॥

नवस-सायास करणार्‍यांना ते म्हणतात,

नवसे कन्या पुत्र होती। तरी का करणे लागे पती॥

खरा देव हा रंजल्या-गांजलेल्यांना मदत करण्यात आहे; कर्मकांडात नाही. संत तुकारामांचे विचार त्यांच्या हयातीतच महाराष्ट्रभर पसरले होते. कोल्हापूरच्या संत बहिणाबाई त्यांची कीर्ती ऐकून देहूला गेल्या आणि शिष्या बनल्या. अशा प्रचारामुळे वर्णाभिमानी सनातनी लोक चवताळले. त्यांनी संत तुकारामांचा छळ आरंभला.

सर्वच वारकरी संतांचा छळ करण्यात आला आहे. अनेकांनी कमी वयात समाधी घेतली, तर काहींचा मृत्यू संशयास्पद आहे. समतेचा जयघोष करणार्‍या पुरोगाम्यांचा वर्णवर्चस्ववादी सनातन्यांनी छळ केला, खून पाडले, तरी ते समतेचा प्रवाह थांबवू शकले नाहीत, त्यांचे विचार संपवू शकले नाहीत, हेच यावरून दिसून येते.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]