फिरस्ती आणि दृष्टिकोन

अविनाश पाटील - 9422790610

आमच्या वाचक साथींनो,

आपणास ‘नववर्ष 2020’ साठी मन:पूर्वक सदिच्छा! त्यापुढे जाऊन म्हणतो की, खरं तर 2020 या दशकासाठी अधिक सदिच्छांची गरज आपल्या अखिल मानव समुदायाला असणारच आहे. कारण आपणच शहाणे-अतिशहाणे मानव पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या मुळावर घाव घालत आलो आहोत, असा आक्षेप घेतला जातो. त्याला आजच्या पर्यावरणीय असंतुलनामुळे मानवी जीवनाला निर्माण झालेला धोका कारणीभूत आहे. त्यासोबत विश्वाच्या अफाट पसार्‍यात आपल्या ग्रह-गोल-तार्‍यांच्या चलनवलनातील बदलांमुळे होणार्‍या चांगल्या-वाईट परिणामांचा धोका देखील व्यक्त केला जात आहे. अशा पार्श्वभूमीवर मानवी अस्तित्वच धोक्यात आले असताना आपल्याला परस्परसहकार्य, सहजीवन, सहअस्तित्वाने भविष्याची वाटचाल करण्याचा विवेक जागृत करावा लागणार आहे. त्यासाठी आपण ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया!’ असे आवाहन सदिच्छापर करीत आलो आहोत. त्यामुळे आपल्या अवकाशविश्वातील पृथ्वी ग्रहावरील आपले अस्तित्व विवेकी व्यवहाराचा मार्ग अवलंबून सुरक्षित आणि समाधानी करण्याचा संकल्प अखिल मानव सहचर्‍यांनी करण्याची गरज वाटते.

आम्ही असे देखील म्हणत आलो आहोत की, चालू 21 वे शतक हे ‘महिलांचे शतक’ ठरणार आहे. मागील शतक हे मानवी जीवनातील भौतिक स्थित्यंतरातून तंत्रज्ञानाधारित प्रगतीच्या वाटचालीचे राहिले आहे. त्यामध्ये आदिम काळापासून वृध्दिंगत होत आलेले स्त्री-पुरुष आणि मानवी भावबंध, जे अश्व युगात, टोळी युगात, कृषिजीवन व नागरी सहजीवनाच्या कार्यकाळात अधिक दृढ व्हायला मदत झाली होती. ते मागील शतकात बदललेले आणि बिघडलेले दिसतात. त्यांना पुन्हा नव्या परिप्रेक्ष्यात, मानवी जीवनातील अर्धा सहभाग असलेल्या महिलांच्या दृष्टिकोनातून बघण्याची, मांडण्याची, रचण्याची गरज आहे. त्याला संधी आणि अवकाश मिळवला. आताच्या एकविसाव्या शतकात बढावा मिळणार आहे, असे आमचे मत आहे. म्हणून आम्ही एकविसाव्या शतकाला ‘महिलांचे शतक’ म्हणू इच्छितो. त्यामध्ये आपण आपली वाटचाल कशी करायची आहे, याचा ऊहापोह करावा लागेल.

एकाच वेळेला विश्वाचे आक्रंदन आणि अदमास समजून घेत असताना आपल्याला पदरात वाढून ठेवलेल्या बाबींना देखील सामोरे जाणे भाग आहे. तेच आम्ही शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांसह सर्वच ‘जीवन-कार्य-विचार’ प्रेरणादात्यांमुळे ‘चित्रलेखा’कार नजू कोटकांच्या शब्दात व्यक्त होतो की,

“वारंवार डळमळणार्‍या नौकेचे सुकाणू तुम्ही माझ्या हाती दिलेत आणि विनंती केली, आता तुम्ही चालवा. आमचा तुमच्यावर विश्वास आहे, वारंवार नाविक बदलतात आणि आम्हाला नाहक बनाम व्हावे लागते.”

“तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून आम्ही सुकाणू हाती घेतले आणि जो महासागर समोर घोंघावत होता, ज्याच्या विक्राळ लाटा नौकेला गिळायला झेपावत होत्या, तो शांत झाला. आम्ही आमच्या लेखण्यांची वल्ही बनवली व त्यात आमच्या रक्ताची शाई घातली. नौका पुढे जायला लागली आणि चोहोकडून हर्षनाद उमटायला लागले. ज्या सिद्धीची रेषा तुम्ही आखली होतीत, तिची पुसट छाया समोर क्षितिजावर दिसते की नाही, हे पाहण्यासाठी मी एक दिवस नालीवर उभा राहिलो. इतक्यात तुम्ही मागून मला धक्का मारला. मी सागरात पडलो. नौकेच्या मालकाला तुम्ही सांगू लागला. ही नौका माझ्यामुळेच चालत आहे. पाहिलीत, किती पुढे नेली ती? किनार्‍यावर उभे असलेले लोक तुमचा धिक्कार करू लागले; पण जे लोक दगाबाज असतात, त्यांच्या कानावर तिरस्काराचे शब्द कधी पडत नाहीत… अशा तिरस्कारातही आणि विरोधाभासी परिस्थितीतही आपल्याला सामूहिक लोकशक्तीचा विधायक व कृतिशील आविष्कार सिद्ध करायच्या दिशेने अथक वाटचाल करायची आहे. त्यासाठी सम्यक विचार व व्यवहाराच्या आधाराने समाज बदलवता आणि घडविता येतो, या दुर्दम्य आशावादाला द्विगुणित करण्याचा दृष्टिकोन कायम राहो,” ही सद्कामना ठेवतो.

‘फिरस्ती’बाबत…

‘महा. अंनिस’च्या त्रिदशकपूर्ती सोहळ्याच्या भव्य व यशस्वी आयोजनानंतर श्रमित सहकार्‍यांच्या विश्रांतीसह आढावा, मूल्यमापन आणि यथायोग्य गुणगौरवाचा प्रयत्न केला गेला. परंतु या सर्व प्रक्रियेतून निर्माण झालेल्या सकारात्मक ऊर्जेचा व अनुकुलतेचा अवकाश ताबडतोब लक्षात घेऊन त्याला उपयोगात आणण्याची, रुजविण्याची प्रक्रिया अपूर्ण राहिली. कारण लगोलग अमेरिका दौर्‍यावर जाण्याची पूर्वतयारी आणि नियोजन सुरू झाले. ‘महाराष्ट्र अंनिस’ला जाहीर झालेला ‘अविजीत रॉय करेज अवॉर्ड’ स्वीकारण्यासाठी आणि त्यानिमित्ताने आपले म्हणणे मांडण्यासाठी ‘फ्रीडम फ्रॉम रिलिजन फौंडेशन’च्या निमंत्रणानुसार दि. 10 ते 21 ऑक्टोबर 2019 दरम्यान अमेरिका वारी झाली. त्याचा अनुभव स्वतंत्रपणे तपशिलात लिहिणार आहे. पण त्यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर विवेकवादी विचारांचे काय सुरू आहे? आपले समविचारी व सहकारी कोण व कसे आहेत, याची ओळख करून घ्यायला सुरुवात झाली, असे म्हणता येईल.

भारतात परतल्यावर लगोलग ‘दीपोत्सवा’सोबत आपल्या वार्षिक अंकासाठीच्या तयारीचा आढावा, पाठपुरावा केला गेला. आता आमच्या वाचकांपर्यंत अंक पोचून त्यावरील प्रतिक्रिया, सूचना मिळायला सुरुवात झाली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या पुढच्या टप्प्यावर वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या चष्म्यातून आपण मानवी जीवनाच्या विविधांगांकडे बघायचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. त्यासाठी वर्षभरातील अंकाच्या नियोजनाचा आराखडा आम्ही तयार केला आहे. तो आपल्याला आवडेल, प्रभावित करेल, अशी आशा आम्ही बाळगून आहोत.

आर्थिक भूमिका व धोरणांबाबत मतभेद असले, तरी शेतीच्या प्रश्नावर शेतकर्‍यांना संघटित करून त्याला राजकीय अजेंड्यावर प्रभावी करण्याची पायाभरणी ज्यांनी केली, त्या शरद जोशींच्या चौथ्या आणि त्यांच्यासोबत गेलेल्या जुने समाजवादी साथी राहिलेल्या रवी देवांग यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त विचारमंथन करायची संधी धुळ्यात मिळाली. शेतकरी आत्महत्येचे लोण विदर्भानंतर मराठवाडा व खानदेशात सुरू झाल्यावर आम्ही स्वस्थतेतून काहीतरी सकारात्मक कृती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विधिज्ञ निर्मलकुमार सूर्यवंशी आणि रवी देवांग यांना सोबत घेऊन खानदेशातील 200 गावांमध्ये शेतकरी प्रबोधन यात्रा आयोजित केली होती. शेतकर्‍यांना सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणातून होणार्‍या शोषणातून, फसवणुकीतून सोडविण्यासाठी काही प्रयत्न केले. त्याचा चांगला परिणाम मिळाला आणि अनेक शेतकर्‍यांची पिळवणूक थांबली होती. त्या सगळ्या स्मृतींना उजाळा देता आला.

आपल्या संघटनेच्या त्रिदशकपूर्ती सोहळ्यातून प्रेरणा घेऊन काही शाखांनी देखील आपापल्या शाखांच्या स्थापनेचा वर्धापनदिन साजरा करायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुरुवातीपासूनची शाखा अलिबागतर्फे त्रिदशक सोहळा ज्येष्ठ सहकारी व राज्य सरचिटणीस नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. परंतु, मला त्यावेळी हजर राहता आले नाही. पण राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर या महानगरातील उत्तर नागपूर या शाखेच्या पंचवार्षिक वर्धापन मेळाव्याला मी आवर्जून पूर्ण दिवस हजर होतो. त्या शाखेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेणारे व उभारणीपासून कष्ट करणारे रामभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनात अत्यंत उत्साहात आणि आनंदात दिवसभराच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सर्वांनाच असा अनुभव मिळाला की, जणू आपण आपल्याच कौटुंबिक सोहळ्यात सहभागी झालो आहोत. अलिबाग, उत्तर नागपूर या शाखांसह आपल्या स्थापनेचे वर्धापन दिन साजरे करणार्‍या सर्व शाखांमधील सहकार्‍यांचे अभिनंदन करतो. त्यांनी भविष्यात देखील संघटन शक्तीच्या जोरावर आपली सक्रियता कायम ठेवावी.

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या महिनाभर रंगलेल्या नाट्याचा आता समारोप झालेला आहे. त्यानिमित्ताने आपल्या मतदार जनतेची आणि नागरिकांची भरपूर करमणूक घडून आलेली आहे. आता सत्तारूढ झालेल्या राज्यकर्त्या पक्षसंघटनेच्या नेत्यांना, पदाधिकार्‍यांना भेटण्यासाठी आणि आपले म्हणणे, मागण्या त्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात गेलो होतो. मुख्यमंत्री व सहा कॅबिनेट मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून आपली निवेदने देण्याचा प्रयत्न केला. ‘नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर कामकाज मार्गी लागायला थोडा वेळ द्या,’ अशीच भावना सगळ्या संबंधितांकडून व्यक्त झाल्या. त्यामुळे आता थोडी उसंत घेऊन नवीन मंत्र्यांना त्यांच्या मंत्रालयाशी निगडित आपल्या कामांसाठी संपर्क, संवाद, समन्वय, पाठपुरावा करायला लागायचे आहे. त्याविषयक आकांक्षा, अपेक्षा व्यक्त करणार्‍या लोकप्रतिनिधींचे खुले अभिनंदन करून आवाहन पत्र आम्ही लिहिले आहे. बघूया, काय घडते ते!

‘नववर्ष 2020’च्या पहिल्या दिवशी महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी प्रयत्नपूर्वक सुरू केलेल्या मुलींसाठीच्या पहिल्या-वहिल्या शाळेच्या स्थापनेचा 1 जानेवारी 18 स्मरण कृतज्ञतापूर्वक करतो आहे. त्यावेळी त्यांचा विचार वारसा समर्थपणे पुढे घेऊन जाणार्‍यांपैकी अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासे तालुक्यातील तरवाडी गावचे मुकुंदराव पाटील यांचे स्मरण देखील त्यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त करता आले. सत्यशोधक ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील स्मारक समितीतर्फे प्रतिवर्षी साहित्य व पत्रकारिता पुरस्कार वितरण तरवडी, ता. नेवासा येथेच केले जात होते. चालू वर्षी ते पहिल्यांदाच तरवडीबाहेर अहमदनगर येथे जिल्हा पत्रकार संघ आणि नागेबाबा मल्टिस्टेट पतसंस्थेच्या सहकार्याने करण्यात आले. त्यानिमित्ताने ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील यांचे नातू उत्तमराव पाटील, अध्यक्ष माजी आमदार पांडुरंगजी अभंग आणि उपाध्यक्ष कॉम्रेड बाबा आरगडेंच्या चिकाटीच्या प्रयत्नाने व पुढाकाराने सुरू असलेल्या 5000 पानांच्या लिखित संग्रहाचे दस्तऐवजीकरण याबाबत माहिती मिळाली. सत्यशोधकी विचारांचा वारसा चालविणारा प्रवाह फुले दाम्पत्यानंतर पुढे नेणारे कोण होते? त्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे, हे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आपले कर्तव्य नाही का? विचार तर कराल!

आपला विनीत,

– अविनाश पाटील

राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती