प्रभाकर नानावटी - 9503334895
आपला इवलासा मेंदू क्षणाक्षणाला, अविरत आणि न थकता कसं काम करतो, याविषयी जाणून घेतलं तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहाणार नाही. हजारो ‘सुपर कॉम्प्युटर्स’नाही कदाचित जमणार नाही, इतकं व्यापक आणि गुंतागुंतीचं काम मेंदू करत असतो. असं असूनही मेंदूच्या खर्या ताकदीची आपल्याला अद्याप कल्पनाच नाही, असं अनेक शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे ‘ब्रेन गेम्स’ वा ‘मिड् ब्रेन टेक्निक’सारखे शॉर्ट कट वापरून कमीत कमी वेळात (व भरपूर पैसे ओतून) स्मार्ट होण्याचा मार्ग तितका सुकर नाही.
पूर्वप्राथमिक वा पहिली – दुसरीतील मुलंमुली जेव्हा 70-80 टक्के गुण मिळवतात, तेव्हा पालकांना आपल्या घरात खुद्द आइन्स्टाइन जन्माला आला आहे, असेच वाटत असते. परंतु जेव्हा हीच मुलं मोठी होऊन आपले गुण उधळू लागतात, तेव्हा मात्र पालकांचे डोळे उघडतात, म्हणूनच यासाठी वस्तुनिष्ठपणे विचार करून आपल्या पाल्याच्या कुवतीचा अंदाज घेणे शहाणपणाचे ठरू शकेल. अनेक वेळा आपला अंदाज चुकत असला तरी सामान्यपणे आजच्या पिढीचा बुद्ध्यांक मागच्या पिढीच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे, हे कबूल करावे लागेल. कदाचित आपल्याला खरे वाटणार नाही. परंतु आताची पिढी मागच्या पिढीपेक्षा नक्कीच जास्त शहाणी आहे. संगणक, मोबाइल, स्मार्ट फोन, आयपॅड, आयपॉड, टॅब्लेट पीसी, टीव्ही, केबल टीव्ही, स्मार्ट टीव्ही, कऊ टीव्ही, कार्टून्स, आकर्षक जाहिराती, वेगवान कार्सचे प्रकार आदींमुळे आजची मुलं जास्त ‘स्मार्ट’ होत आहेत. त्यांच्या स्मार्टपणाचा अंदाज संगणकाच्या स्क्रीनवरील वैविध्यपूर्ण रचना, मोबाईल्सचे रिंगटोन्स, संगणक – मोबाइल प्रणालीतील गुण – दोष शोधण्याची कुशलता, संभाषणचातुर्य, हजरजबाबीपणा, बहुश्रुतता, धडाडी, आत्मविश्वास, धोका पत्करण्यासाठीचे धैर्य आदींतून सहजपणे लक्षात येतो. मुलं आपल्यापेक्षा सरस आहेत, याचा प्रत्यय वेळोवेळी व अनेक प्रसंगी आपल्याला येत असतो. व्हिडिओ गेम्स खेळत असताना दुसरी-तिसरीतील मुलंसुद्धा आई-वडिलांवर सहजपणे मात करू शकतात. मुला-मुलींनाही आपले आई-बाबा बावळट आहेत, असेच वाटत असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या या वाटण्यात खरोखरच तथ्य आहे. बुद्धिमत्तेच्या मोजमापासाठी बुद्ध्यांक (खट) हे मापदंड योग्य आहे, हे गृहित धरल्यास 1950 नंतर बुद्ध्यांकात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, हे लक्षात येईल. पुढची पिढी मागच्या पिढीपेक्षा जास्त हुशार आहे, असे जणू काही ही बुद्ध्यांकातील वाढ सुचवू इच्छिते.
नवीन पिढीतील कुणालाही विचारा, ‘तुम्हाला स्मार्ट व्हायचे आहे का?’ असे विचारल्यास ताबडतोब होकार मिळेल. जास्त स्मार्ट असल्यास दीर्घ काळ आपण सुखी होऊ, हा त्यामागचा व्यावहारिक हिशोब असेल. एवढेच नव्हे, तर हा स्मार्टनेस आपल्याला कुठलाही अपघात झाला, तरी आपलाच (तेवढा) जीव वाचवू शकेल, यावरसुद्धा या ‘स्मार्ट’जीवींचा भलताच विश्वास आहे. त्यामुळेच की काय मेंदूंना प्रशिक्षित करणार्या संगणकावर आधारित कोड्यांच्या उद्योगाचा जगभर सुळसुळाट आहे. ही एक आता बिलियन-डॉलर इंडस्ट्री म्हणून पुढे येत आहे. आपल्या मेंदूत अनुभवाधारित स्फटिकासारख्या असणार्या साठलेल्या, सुप्त/विकसित ज्ञानापेक्षा स्मार्टनेसमधून येणार्या द्रवरुपातील बुद्धिमत्ता (fluid intelligence) सर्वश्रेष्ठ आहे, ही कल्पना त्यामागे असण्याची शक्यता आहे.
परंतु ही कल्पना सपशेल चुकीची ठरत आहे. या उद्योजकांच्या अपेक्षानुसार मेंदूला प्रशिक्षित करता येत नाही. अमेरिकेतील एका मेंदू-प्रशिक्षण उद्योजकाला चुकीची व भूलथाप करणारी जाहिरात दिल्याबद्दल 20 लाख डॉलर्स दंड ठोकण्यात आला. या विषयावर संशोधन करणार्या मेंदूतज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे मेंदूंच्या खेळांच्या प्रशिक्षणातून वास्तव जगातील कुठल्याही समस्येला उत्तरं शोधण्यात अजिबात उपयोग होत नाही. अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचा प्रबंधसुद्धा अशा प्रकारचे प्रशिक्षण एका प्रकारे ‘प्लॅसिबो’ परिणाम आहे, असा निष्कर्ष काढला आहे.
एके काळी मेंदू प्रशिक्षण या विषयावर संशोधन करत असताना गेमिंग इंडस्ट्रीला अनुकूल असेच निष्कर्ष काढले गेले. त्यामुळे गेम्सवर प्रभुत्व मिळाल्यास आपली बुद्धी तीक्ष्ण होऊन आयुष्यातील समस्यांना सामोरे जाणे सुलभ होईल. या वाढत्या अपेक्षांच्यावर या इंडस्ट्रीची इमारत उभी आहे. परंतु नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या प्रबंधाने यांचा पोल खोलला आहे.
गेमिंग इंडस्ट्रीची वाढ एका गृहितकावर आधारलेली आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मेंदू प्रशिक्षणाचा कालावधी संपवते, तेव्हा बुद्धिमत्तेचा स्तर वाढलेला असणार, याबद्दलची तिची खात्री असते. कारण आपण प्रशिक्षित झालेलो आहोत व हे प्रशिक्षण नक्कीच काम करणार, याबद्दल तिच्या मनात संशय नसतो. परंतु हे गृहितकच मुळात चुकीचे आहे, हे प्रयोगानिशी सिद्ध करण्यात आले आहे. या प्रयोगासाठी दोन गट निवडले; एका गटाला या ‘ब्रेन गेम’मुळे तुमची बुद्धिमत्ता वाढणार आहे, असे सांगितले होते व दुसर्या गटाला गंमत म्हणून ‘ब्रेन गेम’मध्ये सहभागी होण्यास सांगितले होते. चाचणीपूर्वी व चाचणीनंतर प्रत्येकाच्या बुद्ध्यांकाची चाचणी घेण्यात आली. ज्या व्यक्तींना बुद्ध्यांक वाढणार आहे, म्हणून सांगितले होते त्यांच्यातील बुद्ध्यांकात किंचित फरक पडला होता. परंतु इतरांमध्ये जाणवण्याइतका फरक पडला नाही. ‘ब्रेन गेम्स’, चाचणीचा काळ, बुद्ध्यांक मोजण्याची रीत आदी सर्व गोष्टी समान असताना बुद्ध्यांकातील हा फरक केवळ ‘प्लॅसिबो’ परिणामामुळे झाला असावा, या निष्कर्षाप्रत तज्ज्ञ पोचले.
मुळात बुद्धिमत्ता ‘ब्रेन गेम्स’मुळे सुधारत नसून लहानपणापासूनचे शिक्षण, सकस व नियमित आहार, पालनपोषण, आरोग्य सुविधा आदी घटकांवर अवलंबून असते. मोबाइल स्क्रीनवर डोळे न हलविता गेम्स खेळत राहिल्यामुळे बुद्धिमत्तेत वाढ होत नाही, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ‘बुद्धिमत्ता’ या शब्दांत समस्यांचे विश्लेषण करून उत्तरं शोधण्याची कुशलता, शैक्षणिक परीक्षेतल्या यशासाठी लागणारी हुशारी, साहित्य, संगीत आदी ललित कलाप्रकारांसाठी लागणारी सर्जनशीलता, आर्थिक, राजकीय व सामाजिक यशासाठी लागणारे व्यावहारिक चातुर्य व क्रीडाक्षेत्रात नाव कमावण्यासाठी लागणारे कौशल्य अशा विविध गोष्टींचा समावेश करता येईल.
आपल्या बुद्धिमत्तेत वाढ होत आहे, याबद्दल तज्ज्ञांच्यामध्ये दुमत नाही. परंतु ही वाढ कशामुळे होत आहे, याची कारणं मात्र वेगवेगळी आहेत. सकस आहार, निरोगी शरीर, लहान कुटुंब, शिक्षणाची संधी, तंत्रज्ञानातील सोयी-सुविधा आदींमुळे बुद्धिमत्तेत वाढ झालेली जाणवते. दृक्-अवकाशीय उपक्रमांबरोबरच आपला समाज दिवसेंदिवस जास्त जटिल होत असून त्यातून उद्भवणार्या कठीण समस्यांना उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नांमुळे बुद्धिमत्तेत वाढ होत आहे. उत्तर शोधताना अमूर्त अशा संकल्पना समजून घ्याव्या लागतात, अनुभवाची शिदोरी असावी लागते. समस्यांना उत्तर मिळेपर्यंत फोकस्ड असावे लागते. मगच समस्यांचा ठावठिकाणा कळतो व उत्तरं सापडत जातात. सुरुवातीला कुठलीही संकल्पना समजून घेण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात व वेळही जास्त लागतो. आइनस्टाइनचा सापेक्षतावाद, न्यूटनचे गतीनियम, एंट्रॉपीचा सिद्धांत, क्वांटम डायनॅमिक्स आदी समजून घेण्यासाठी अर्धेअधिक आयुष्य खर्ची घालावे लागत असे. सेट थेअरी, इंटिग्रल कॅल्क्युलस, डिफरन्शिअल इक्वेशन्ससारखे विषय पदवी परीक्षेसाठी शिकविले जात होते. आता मात्र हेच विषय दहावी-बारावीची मुलं काही महिन्यांच्या अभ्यासानंतर आत्मसात करू शकतात. संकल्पना समजून घेण्यासाठी कमीत कमी वेळ लागत आहे. एकेकट्याने प्रयत्न करण्यापेक्षा परस्परसहकारातून समस्येचे विभाजन करून सामूहिकरित्या प्रयत्न केल्यास समस्या लवकर सुटतात, याची जाणीव होत आहे. त्यामुळे आता कुठलीही समस्या कठीण असे वाटेनासे झाले आहे.
फ्लिन्न या तज्ज्ञाच्या मते, आताच्या शतकातील प्रगत तंत्रज्ञान, सोयी-सुविधा, आरोग्य व शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आदींमुळे दर दशकात दोन-तीन अंकांनी बुद्ध्यांक वाढत आहे. आजचा समाज बुद्धिमत्तेच्या बाबतीत फारच हळवा होत चालला आहे. जीवनोपयोगी समस्यांकडे पाठ फिरवून अमूर्त – काल्पनिक समस्या सोडविण्यासाठी आपली बुद्धी खर्ची घालत आहे, रंजकतेला प्राधान्य दिले जात आहे. टीव्ही, स्मार्ट टीव्ही, संगणक, मोबाईल्स, वेगाने धावणार्या एस.यू.व्ही. इत्यादीमुळे दृक् – अवकाशीय कुशलतेत भर पडत आहे. ही वाढ एकाच पिढीत झालेली नसून अनेक पिढ्या उत्क्रांत होत आजच्या अवस्थेपर्यंत पोचली आहे. आपले आजोबा, पणजोबा मतिमंद होते व आपण मात्र चतुर, चाणाक्ष आहोत, असा अर्थ यातून काढता कामा नये. फार-फार तर अमूर्त अशा समस्यांची उत्तरं शोधण्यासाठी लागणारी बौद्धिक प्रगल्भता व कुशलता आत्मसात केली आहे, असा निष्कर्ष आपण यातून काढू शकतो. अशा समस्यांकडे जास्त गांभीर्याने बघण्याकडे कल वाढत आहे, असाही अर्थ यातून ध्वनित होतो. आपल्या आजोबा-पणजोबांच्या काळातील समस्यांचे स्वरूप सर्वस्वी वेगळे होते. त्यांची बौद्धिक कुशलता त्या काळानुरूप होती.
बुद्धिमत्ता ही काळाप्रमाणे बदलणारी, लवचिक अशी संकल्पना आहे. मुळात बुद्ध्यांकात वाढ होत आहे, याबद्दल मानसतज्ज्ञांत मतभेद आहेत. काही संशोधकांना बुद्धिमत्तेत वाढ झाली नसून कठीण समस्यांची उत्तरं शोधण्याच्या क्षमतेत वाढ झाली आहे, असे वाटते. इतरांच्या मते, बुद्ध्यांक वास्तव परिस्थितीशी सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या चातुर्याचे मापन ठरत आहे. या वाढीला मर्यादा आहेत व त्यानंतर वाढ शक्य नाही, असेही काही तज्ज्ञांचे मत असल्यामुळे गोंधळात भर पडत आहे. त्यामुळे आताची पिढी तुलनेने जास्त स्मार्ट आहे, असे वाटण्याची शक्यता जास्त आहे. एक मात्र खरे की, बुद्ध्यांकावर सामान्यपणे अनुवांशिकतेचा प्रभाव असून बालपणापासून प्रयत्नांती मिळविलेल्या बुद्धिमत्तेत आयुष्यभरात फार फरक पडत नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कुतूहल, प्रयत्न व योग्य समज यातून आपण आपल्या बुद्धिमत्तेचा स्तर आहे तितका राखूही शकतो व त्यासाठी नेमके काय करायला हवे, ते आपण नक्कीच ठरवू शकतो. परंतु एकमेकांवर कुरघोडी करण्यास भाग पाडणार्या स्मार्टनेस मात्र त्यातून घडविता येईल की नाही, याबद्दल अजूनही शंका आहेत. बालपणी आपण स्मार्ट असल्यास म्हातारपणीसुद्धा तितकेच स्मार्ट असण्याची शक्यता जास्त आहे.
काही वर्षांपूर्वी ‘मिड् ब्रेन अॅक्टिव्हेशन’च्या शिबिरांचे फॅड आपल्या देशातील शहरामध्ये धुमाकूळ घातल्याचे आपल्याला आठवत असेल. डोळे मिटून आपला पाल्य काहीही ओळखू शकत असल्यास स्मार्टनेसचा धनी असल्याचा भाव त्यात असे. त्यामुळे शिबिरांना मुला-बाळांची, त्यांच्या पालकांची व आमच्यासारख्या बघ्यांची गर्दी जमत होती. त्यात (अगोदरच पढवून घेतलेला व/वा) डोळ्यांच्या फटीतून बघणार्या मुला/मुलींच्या वस्तू ओळखण्याच्या कौशल्याचे कौतुक केले जात होते. परंतु ‘अंनिस’सारख्या संघटनांनी पुढाकार घेऊन फ्रँचाईजी घेतलेल्या आयोजकांना सळो की पळो करून सोडले, तरीसुद्धा गुजरात, पंजाब, दिल्लीसारख्या ठिकाणी या टेक्निकच्या सॉफ्टवेअर्सची जाहिराती झळकत असून त्यांचा धंदा तेजीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डॉ. माकाटो शिचिदा या जपानच्या तज्ज्ञाने 40 वर्षेमेंदूवर संशोधन करून हे ‘मिड ब्रेन’ तंत्र शोधले आहे म्हणे! त्याच्या मते, उजव्या व डाव्या मेंदूला जोडणार्या ब्रीजचा वापर करून मेंदूची शक्ती वाढविणे शक्य आहे. त्यातून फक्त मेंदूची शक्तीच नव्हे, तर ताणाला काबूत ठेवणे, इतर इंद्रियामधून काही सुप्त गोष्टी करवून घेणे व शिक्षणात अभूतपूर्व प्रगती आदी दावे त्या तज्ज्ञांनी केले होते. त्याच्या मते, हे ‘मिड ब्रेन’चे चमत्कार नसून ‘इंटरब्रेन’ची किमया आहे. एवढ्याशा गृहितकांचा वापर करून ‘मिड ब्रेन’च्या फॅडचा उदो-उदो करणे तथाकथित स्मार्ट पालक आपल्या पाल्याला ‘स्मार्ट’ करण्यासाठी शिबिरात गर्दी करू लागले.
मेंदू हे माणसाला पडलेले सगळ्यात अवघड कोडे आहे. या कोड्याचे उत्तर पुन्हा मेंदूतच दडलेले आहे! सगळ्या भावभावना, बुद्धिमत्ता, व्यावहारिक शहाणपण आदी गोष्टींत मेंदूतली रसायनेच जबाबदार असतात. त्यामुळे मेंदूच्या विषयी कुणीही, कुठेही, कसलेही अचाट दावे करत असल्यास जरा जपूनच त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपला इवलासा मेंदू क्षणाक्षणाला, अविरत आणि न थकता कसं काम करतो, याविषयी जाणून घेतलं तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहाणार नाही. हजारो ‘सुपर कॉम्प्युटर्स’नाही कदाचित जमणार नाही, इतकं व्यापक आणि गुंतागुंतीचं काम मेंदू करत असतो. असं असूनही मेंदूच्या खर्या ताकदीची आपल्याला अद्याप कल्पनाच नाही, असं अनेक शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे ‘ब्रेन गेम्स’ वा ‘मिड् ब्रेन टेक्निक’सारखे शॉर्ट कट वापरून कमीत कमी वेळात (व भरपूर पैसे ओतून) स्मार्ट होण्याचा मार्ग तितका सुकर नाही.
लेखक संपर्क : 95033 34895