गार्गी सपकाळ -

सैलानी बाबा दर्गा परिसरात ‘महाराष्ट्र अंनिस’चा पथदर्शी प्रयोग
सैलानी बाबा, ज्यांना हजरत अब्दुर रहमान शाह सैलानी रहमतुल्ला अलैह (१८७१-१९०६) या नावानेही ओळखले जाते, हे बुलढाणा महाराष्ट्र, भारतातील नक्शबंदी सुफी क्रमातील एक सुफी संत होते. सैलानी बाबा दर्गा सुफी यांची समाधी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात सैलानी येथे आहे. सैलानी बाबा हे मूळचे दिल्लीचे होते. नंतर ते हैदराबादला गेले. त्यांचा सुफी प्रवास इथून सुरू झाला, असे सांगितले जाते. त्यांच्याजवळ सर्व जाती-धर्मांचे लोक आशीर्वाद घेण्यास येऊ लागले. त्यांचा मृत्यूनंतर त्यांचा दर्गा त्याच जागी बांधण्यात आला. त्यानंतर दरवर्षी हजारो लोक सैलानी बाबांचा दर्ग्यावर आशीर्वाद घेण्यास येऊ लागले. महाराष्ट्रातील क्रमांक दोनची सर्वांत मोठी यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथे भरते. सोबतच दर अमावस्या-पौर्णिमेला तोबा गर्दी असते. बारमाही बरेच मनोरुग्ण त्या ठिकाणी पाल करून मुक्कामी राहतात, तर काही साप्ताहिक खेटे देखील मारतात.
येथे येणार्या जवळपास सगळ्याच लोकांची भावना असते की, बाबांच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबातील व्यक्तीला होणारा त्रास बरा होईल. अर्थात, करणी, भूतबाधा, देवाचा कोप, जादूटोणा अशा कल्पनांवर त्यांचा विश्वास असतो व यापासून मुक्तता व्हावी, किंवा याची बाधा होऊ नये, या भावनेने लोक दुवा घेण्यास येत असतात.
तीव्र मानसिक आजाराने ग्रस्त असलेले अक्षरश: शेकडो लोक आपल्या रुग्णाचा आजार बरा होईल, या आशेने इथे येतात. यातूनच आपला नातेवाईक बरा होणार, यावर त्यांचा विश्वास असतो. येथे येणारेे लोक गरीब, श्रीमंत, मध्यम वर्ग, शिक्षित, अशिक्षित, हिंदू, मुस्लिम अशा समाजाच्या सर्व स्तरांतून येतात आणि एकमेकांना मदत करत असतात. अगदी कुटुंबाप्रमाणे राहत असतात. कितीतरी लोकांची आर्थिक परिस्थिती नसते, तरी कर्ज काढून हजारो रुपये खर्चून गाडी करून लोक इथं येत असतात. बरेच लोक मनोविकारतज्ज्ञांना भेटून अर्धवट उपचार घेऊन आलेले असतात. दर अमावस्या व पौर्णिमेला दर्गा येथे प्रचंड गर्दी असते. रुग्णमित्र व नातेवाईक दर्ग्याच्या अवतीभवती बसलेले असतात. तीव्र मानसिक आजाराने ग्रस्त असलेले रुग्णमित्र मोठमोठ्याने बडबडत असतात, हातवारे करत असतात. कुणी गडबडा लोळत असतात, तर कुणी दर्ग्याच्या असलेल्या जाळीला हात लावून बसलेले असतात. कुणी रुग्णाच्या डोक्यावर लिंबू पिळून डोळ्यांत लिंबू पिळतात. त्याचबरोबर काही रुग्णमित्रांना साखळदंडाने बांधून ठेवलेले असते. काही महिलांच्या अंगात आलेलं असते, त्यांच्या भोवती अनेक लोकं वाद्ये वाजवत फिरत असतात. त्या महिला जोरजोरात आपली मान फिरवून जमिनीवर केस आपटत असतात. कुणी बकरीला कौल लावण्याचा प्रयत्न करत असतात. बकरीने कौल द्यावा म्हणून ते जोरजोरात बकरीशी बोलत असतात. याच ठिकाणी आपल्या रुग्णमित्रांना बरे वाटेल, या खोट्या आशेपायी कित्येक वर्षे त्या ठिकाणी वास्तव्य करून राहणारेही नातेवाईक आहेत. घरदार सोडून ऊन-वार्याची, पावसाची कसलीही तमा न बाळगता कित्येक नातेवाईक कायमस्वरुपी तिथं राहिलेले आहेत. त्या ठिकाणी कोणत्याही मूलभूत गरजा भागत नसल्या, तरीही मिळेल ते काम करून; प्रसंगी भीक मागूनही स्वतःची ते गुजराण करत आहेत. यातून त्यांच्या स्वतःच्याही शारीरिक व मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मुलांच्याही आरोग्याचा प्रश्न समोर येताना दिसत आहे. मुलांशी संवाद साधल्यावर हे लक्षात आलं की, मुलांना आपल्या पालकांच्या वागण्याची भीती वाटते. त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या व पालकांच्या भवितव्याची काळजी वाटते. दर्ग्यामध्ये येणार्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड अज्ञान, अंधश्रद्धा किंवा समजत असूनही फक्त मनाच्या भोळ्या-भाबड्या समजुतीपोटी तिथं लोक येत आहेत व अघोरी उपचारांना बळी पडत आहेत.
२०१२ साली डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी चाळीसगाव येथील दर्ग्यामध्ये ‘दवा आणि दुवा’ या प्रकल्पाची सर्वांत प्रथम संकल्पना मांडली. याच धर्तीवर आधारित बुलढाणा येथील सैलानीबाबा दर्ग्यामध्ये ‘दवा आणि दुवा’ सुरू करण्याचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, परिवर्तन संस्था, सातारा व मातृभूमी फाउंडेशन, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्याचे ठरविले. या प्रकल्पाचे उद्घााटन दि. २८ ऑगस्टला बुलढाणा येथील जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी शासनातर्फे लागेल ती मदत करण्याचे जाहीर केले. दर्ग्याचे ट्रस्टी समद शेख; तसेच चाँद मुजावर यांनी शिबिरासाठी लागणारी जागा देण्याचे जाहीर केले. मातृभूमी फाउंडेशनचे सपकाळ सर यांच्या पुढाकारानेच नियोजन करण्यात आले. आमदार राहुल बेंद्रे यांनी या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याची संमती दर्शविली.
या प्रकल्पासाठी ‘मानसमित्रा’ंची टीम तयार करण्यासाठी डॉ. हमीद दाभोलकर व त्यांच्या सहकार्यांनी ‘मानसमित्रां’ंना प्रशिक्षण दिले. प्रत्यक्ष दर्ग्यात जाऊन लोकांशी संवाद कसा सुरू साधावा. त्यांच्या प्रश्नांविषयी बोलून त्यांना शास्त्रीय उपचारांत सामावून घेणे, सुरुवातीच्या काळात दर्ग्यामध्ये जाऊन तेथील गोष्टींचे निरीक्षण करणे व तेथील रुग्णमित्रांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. योग्य समुपदेशन आणि मार्गदर्शनाचा अभाव असल्याने सैलानी दर्ग्यात येणारे हजारो लोक त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या असलेल्या औषधोपचारांपासून आणि मानवी हक्कांपासून गेली कित्येक वर्षे वंचित आहेत. त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्याशी बोलून त्यांचे प्रश्न समजावून घेणे, ‘दुवा घेताय, सोबत दवासुद्धा घ्या,’ असे आवाहन आम्ही या प्रकल्पांंतर्गत करत आहोत.
सर्वांत पहिल्यांदा दि. १३ ऑगस्टला भेट देऊन मानसिक आजारी असलेल्या लोकांसोबत चर्चा केली. त्यांचा औषधांवर विश्वास नाही, असे त्यांनी सांगितले. परंतु त्यांची परिस्थिती, आजारपण आणि मनात खोलवर रुतलेला अंधविश्वास पाहून मन प्रचंड खिन्न झाले. नंतर अजून दोन दिवस दर्गा आवारात जाऊन सगळ्यांसोबत बोलून झाल्यानंतर आता काही नातेवाईक औषध घेण्यास तयार आहेत. औषधोपचारांसोबतच तेथील व्यवसाय, रोजगार, आर्थिक चक्र, मुलांचे शिक्षण, महिलांची सुरक्षा, राहणीमान यांसारख्या विषयांचे निरीक्षण केले. तिथे येणार्या नातेवाईकांना व रुग्णमित्रांना स्वतःविषयी भरभरून माहिती सांगायचं आहे. त्यांना होणारा त्रास हा मनमोकळेपणाने त्यांनी आम्हाला सांगितला. आपण जे बोलत आहेत, ते मनापासून कुणीतरी ऐकत आहे, ही भावना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची होती दि. १७ सप्टेंबरला दर्ग्यामध्ये दुसरी व्हिजिट करून लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तिथं राहणार्या रुग्णमित्रांच्या नातेवाईकांनी छोट-छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. कोंबड्यांची देखभाल करणे, अंडी विकणे, खाद्यपदार्थ विकणे, कित्येक लोक अंधश्रध्देला खतपाणी घालणारे व्यवसायही करत आहेत. स्वतःच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी मिळेल ते काम करण्यास हे लोक प्रवृत्त होत आहेत.
‘दवा आणि दुवा’ प्रकल्पाच्या माध्यमातून दर महिन्यातून एकदा मनोविकारतज्ज्ञांची भेट त्या ठिकाणी होईल. तेथील मनोरुग्णांना तपासून ते औषधोपचार देतील. यासाठी ‘मानसमित्र’ हे लोकांशी संवाद साधून त्यांना होणार्या त्रासाविषयी शास्त्रीय माहिती देऊन गरजू लोकांना मनोविकारतज्ज्ञांपर्यंत घेऊन येतील. नातेवाईकांचे व रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना उपचाराचे महत्त्व पटवून देतील. जे रुग्ण मित्र खूप दूर ठिकाणाहून येणार आहेत, अशा रुग्णमित्रांना त्यांच्याच जवळच्या मनोविकारतज्ज्ञांशी जोडून देणे व फोनवर समुपदेशन करणे. जे रुग्णमित्र व नातेवाईक कित्येक वर्षे त्याच ठिकाणी राहिलेले आहेत, अशा लोकांबरोबर सविस्तर संवाद साधून त्यांच्या तिथं राहण्यापाठीमागचा उद्देश समजावून घेणे, त्यांनाही भावनिक आधार देऊन रुग्णमित्रांचे त्याच ठिकाणी औषधोपचार सुरू करणे. पुन्हा त्यांना त्यांच्या गावी जाण्याचे असल्यास त्याविषयी विचारणा करणे व जाण्यास काही अडचणी आहेत, ते समजून घेणे, त्याच ठिकाणी पुनर्वसन करता येईल का, याविषयी प्रयत्न करणे. ज्या लोकांना साखळदंडाने बांधलेले आहे, अशा लोकांच्या नातेवाईकाशी बोलून ते काढण्यासाठी प्रयत्न करणे. जे रुग्णमित्र खरंच खूप त्रास देत असतात, अशा रुग्णमित्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य शास्त्रीय पद्धत वापरायला शिकवणे, बरे झालेले रुग्णमित्र व नातेवाईक यांना उपचारांच्या प्रक्रियेमध्ये सामील करून घेणे या सगळ्या गोष्टी करण्याबरोबरच या ठिकाणी जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून देखील शासनाच्या मदतीने प्रयत्न केले. ‘मानसमित्र’ व काही रुग्णमित्र नातेवाईक हेच त्याठिकाणी मानसिक आरोग्यविषयक प्रबोधन करतील व जास्तीत जास्त रुग्णमित्रांना उपचारांच्या प्रवाहात सामील करून घेतील. या प्रकल्पांमध्ये ज्या लोकांना सहकार्य करण्याची इच्छा आहे, ते लोक सहभागी होऊ शकतात. त्यांना जे शक्य आहे, अशी मदत ते करु शकतात.
दुवा के साथ दवा जरुर करेंगे!!
मन की बीमारी का!
– गार्गी सपकाळ, योगिनी मगर
लेखिका संपर्क ः ९६६५८ ५०७६९