प्रागतिक चळवळीतील चालते-बोलते व्यक्तिमत्त्व : साहित्यिक नरेंद्र लांजेवार

सुरेश साबळे - 9850380598

चळवळीत सतत नवनवीन उपक्रम राबविणारे, शहराला साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी चालतं-बोलतं ठेवणारे साहित्यिक मित्र नरेंद्र लांजेवार यांचे दि. 13 फेबु्रवारी रोजी अकाली निधन झाल्याने प्रागतिक चळवळीचे; तसेच बुलडाणा शहराच्या साहित्यिक चळवळीचे सांस्कृतिक संचित गेल्याची वेदना असह्य करणारी आहे. कारण त्यांच्या निधनाने एकूण साहित्य चळवळीत; विशेषत: विदर्भ साहित्य संघ, बुलडाणा जिल्ह्यात गतिमान करण्यामध्ये नरेंद्र लांजेवार यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.

नरेंद्र लांजेवारांनी चळवळीत काम करताना एकाच वेळी विविध आघाड्यांवर बहुमुखी काम केले. ग्रंथालय चळवळ, वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी त्यांनी ग्रंथालयाच्या क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबविले. त्यात बाल वाचनालयाचा प्रकल्प महत्त्वपूर्ण म्हणता येईल. हा उपक्रम महाराष्ट्र पातळीवर विशेष चर्चिला गेला. बुलडाणा शहरात त्यांनी विभागानुसार एकाच वेळी विविध बाल वाचनालयांची स्थापना करून बालकांमध्ये वाचनसंस्कार रुजविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयोग केला. त्यांनी बालक, पालक यांच्यासाठी कार्य केले. पुरोगामी, प्रागतिक चळवळीत, प्रगतिशील लेखक संघ, राष्ट्र सेवा दल, साप्ताहिक साधना, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, ग्रंथाली, लोकवाङ्मयगृह, विदर्भ साहित्य संघ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, युवक बिरादरी, बेटी बचाव-बेटी पढाव, पर्यावरण आदी समाज उभारणीच्या चळवळींशी हे जुळलेले होते.

बुलडाणा शहरात आद्य स्त्रीलेखिका ताराबाई शिंदे यांचे स्मारक व्हावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. यासोबतच महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक ‘बालभवन’ उभारण्यासंबंधीही त्यांनी शासनाशी पत्रव्यवहार केला होता. प्रगती सार्वजनिक वाचनालयाचे ते सचिव होते आणि प्रगती व्याख्यानमाला सुरू करण्यात नरेंद्र लांजेवारांची भूमिका निर्णायक स्वरुपाची होती. अखिल भारतीय पातळीवरचे मराठी साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यात व्हावे, असे त्यांना मनोमन वाटे. म्हणून त्यांनी 2019 मध्ये त्यादृष्टीने हिवरा आश्रम येथे संमेलन घेण्याचा प्रयत्नही केला. फेबु्रवारी 2008 मध्ये नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वि. भि. कोलते यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने विदर्भ साहित्य संघाचे साहित्य संमेलन मलकापूर येथे आयोजित करण्यात त्यांनी आग्रही भूमिका घेतली होती. बुलडाणा जिल्ह्यात दोन वेळा राज्यस्तरीय तर एक वेळ विदर्भस्तरीय मराठी बाल साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. ही कार्य करीत असताना त्यांनी वाङ्मयाच्या विविध प्रकारांत साहित्यनिर्मिती केली. वाचनसंस्कृती वाढविताना बालकांना वाचनाकडे वळविणे आणि साहित्याच्या प्रांतात येणार्‍या नवागतांना प्रोत्साहित करणे, असेही कार्य ते करीत राहिले. साहित्यनिर्मिती करताना त्यांनी प्रामुख्याने शोधपत्रकारिता, स्फूट लेखन, कविता, प्रासंगिक आणि वर्तमान सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक व मानवी समस्यांना भिडणार्‍या साहित्यासह कला, संस्कृती, नाट्य आदींबाबत चर्चा करणारे साहित्यनिर्मिती केली.

नरेंद्र लांजेवार यांची साहित्यनिर्मिती

1) बुलडाणा जिल्हा साहित्यदर्शन, 2) विदर्भ राज्य ः आक्षेप आणि वास्तव (मुलाखत), 3) एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा, 4) एकाच नाण्याच्या तीन बाजू, 5) वाचनसंस्कृती ः आक्षेप आणि अपेक्षा, 6) ‘माय’ स. ग. पाचपोळ यांची कविता (संपादित), 7) शिक्षणावर बोलू काही/नाही, 8) सल-उकल, 9) प्रश्न आणि प्रश्नचिन्ह, 10) अभिव्यक्तीची क्षितिजे, 11) अभिव्यक्तीची स्पंदने, 12) वाचू आनंदे मिळवू परमानंदे आदी. अशा रीतीने विविध वाङ्मय प्रकारात साहित्यनिर्मिती करताना जवळपास 200 पेक्षा अधिक संशोधनपर लेख त्यांचे विविध नियतकालिकांत तथा वृत्तपत्रांत प्रकाशित झालेले आहेत.

सुंदरतेची आस आणि जगण्यातील उदात्त मूल्य हा नरेंद्र लांजेवारांचा ध्यास होता. त्यासाठी समाजात वाचनसंस्कृती वाढावी, संवेदनशील, विचारी माणसाचं जग अस्तित्वात यावं, यासाठी ते एकाच वेळी विविध आघाड्यांवर कार्यरत होते. गावखेड्यांपासून शहर-महानगरांपर्यंत त्यांनी विविध रचनात्मक उपक्रम राबविले. बुलडाणा शहरात त्यांनी राष्ट्र सेवा दलाचे शिबीर आयोजित केले होते. ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ संकलन कार्यक्रमात बाबा आढाव, निळू फुले, डॉ. नरेंद्र दाभोलकर, सदाशिव अमरापूरकर, सुगावा प्रकाशनचे डॉ. विलास वाघ, मेधा पाटकर आदी मंडळी या उपक्रमात शीर्षस्थ नेत्यांमध्ये होती. या मंडळींत नरेंद्र लांजेवार हे बुलडाणा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते.

वाचन, लेखन, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण, बालक-पालक-शिक्षक, बालसाहित्य चळवळ, विविध साहित्यनिर्मितीच्या प्रकाशकांच्या कार्यात ते कल्पकतेने काम करत. अशा या सतत कार्यमग्न असणार्‍या मित्राला शरीरस्वास्थ्याने फार काळ साथ दिली नाही. प्रचंड आत्मविश्वास, प्रसन्न भावमुद्रा आणि आपल्या कार्याने इतरांना प्रभावित करणारा चळवळीतील ‘जिंदादिल’ सहप्रवासी नरेंद्र लांजेवार यांचे अकाली जाणे अनेक अर्थांनी अस्वस्थ करणारे आणि वेदना देणारे आहे.

नरेंद्र लांजेवार आणि माझी ओळख साधारणत: त्यांच्या कळत्या वयापासून. लांजेवार कुटुंब तसे मूळ भंडारा जिल्ह्यातले. वडील मणीराम लांजेवार शहरातील शासकीय रुग्णालयातील नोकरीनिमित्ताने बुलडाणा शहरात विसावलेले. वडिलांच्या निधनानंतर आईला अनुकंपा तत्त्वावर तेथेच नोकरी लागली. नरेंद्रसह त्यांना एकूण तीन भाऊ. त्यांच्या शालेय जीवनाची जडणघडण बुलढाण्याच्या शिवाजी विद्यालय व मिलिंद नगर परिसरात झालेली. विद्यार्थीदशेतच चुणचुणीत, बोलण्यात स्पष्टता, सभाधारिष्ट्य यामुळे ते चळवळीशी जुळले. त्या काळात ते प्रा. सदाशिव कुल्ली यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्यातील विविध कला-गुणांचा मोहर तेथेच फुलला. 35 ते 40 वर्षांपूर्वी बुलढाणा शहरात विद्यार्थी चळवळीत व्याख्याने, परिसंवाद, विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा; तसेच नाट्यप्रयोग आदींसह सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असायची. साधारणत: 1980 पर्यंत बुलढाणा शहराची ओळख ही ‘कर्मचार्‍यांचं गाव’ अशीच होती. या शहरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण व्हायची. बुलडाणा शहरात अधिकारी-कर्मचार्‍यांची बदली होणे म्हणजे शिक्षा समजली जात होती. त्या काळी बुलडाणा शहरात शिक्षणाच्या फारशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. 1983 पर्यंत बारावीच्या पुढे विज्ञान शाखेचे शिक्षण घ्यायचे असेल, तर बाहेरगावी जावे लागत असे. अशा वातावरणातही बुलडाणा शहर हे नाट्यरसिकांचं, संगीतप्रेमींचं आणि जाणकार अभ्यासकांचं गाव, अशीही ख्याती होती. उन्हाळ्याची सुट्टी घालविण्यासाठी नागपूर-पुणे-मुंबईकडील नातेवाईक मंडळी थंड शांत अन् गोड आंब्याचं गाव म्हणून बुलडाणा शहराची निवड करत. त्यावेळी एस.एफ.आय. (स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया) ही प्रागतिक विचारांची विद्यार्थी चळवळ बुलडाणा शहरात प्रा. हिंमतराव चव्हाण व प्रा. सदाशिव कुल्ली यांच्या मार्गदर्शनात कार्यरत होती. नरेंद्र लांजेवार यांनी दहावी पास झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी जिजामाता कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांचा एस.एफ.आय. ही विद्यार्थी चळवळ आणि प्रा. सदाशिव कुल्लींशी त्यांचा संपर्क आला आणि त्यांच्याशी ते जुळले. येथे त्यांच्या लेखन, वाचन आणि वक्तृत्वकलेला धुमारे फुटू लागले. याच काळात ते भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या प्रगती वाचनालयाशी एकाच वेळी जुळले. दरम्यान, त्यांनी बी. कॉम.ची पदवी घेऊन औरंगाबादेत ग्रंथालय शास्त्राची पदवी घेऊन बुलडाणा येथे परत आले. याकाळात बुलडाणा शहरात बालसाहित्यिक शंकर कर्‍हाडे, गो. या. सावजी, प्रा. ना. जा. दांडगे, कवी सर्जेराव चव्हाण, सुरेखा भगत, अरविंद देशपांडे, पत्रकार आत्माराम पांडे, बापूसाहेब मोरे आदी मंडळी लेखन पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होती. या बाबी मी नरेंद्र लांजेवारांची जडणघडण कशा सामाजिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक पर्यावरणात घडली, त्यासाठी नोंदवली आहे. त्यांच्या कामातले आणि आज त्यांचे नाव ज्या उंचीवर आहे, त्यातून त्यांनी उपलब्ध परिस्थितीत स्वअस्तित्व शोधत उभे राहून, स्वतंत्र ओळख निर्माण करणे, ही बाब दुर्मिळ आणि अवघड असते. या काळात व्यक्तीला अनेक अपमान, निंदानालस्ती आणि नव्याने प्रवेशित असल्याने काहींच्या अभिनिवेषास सामोरे जावे लागत असते. या काळात लागणारा संयम आणि हसमुख चेहरा हे लांजेवारांनी सांभाळले, असे म्हणता येईल.

नरेंद्र लांजेवार प्रागतिक विचारांच्या प्रा. सदाशिव कुल्ली यांच्या सान्निध्यात आले. त्याच काळात महाराष्ट्रातील प्रगतिशील, सार्वजनिक, सांस्कृतिक चळवळीशी व त्यातील ज्येष्ठांशी त्यांचा संपर्क आला. त्यातून त्यांचा संवाद जुळला आणि त्याद्वारे ग्रंथ, ग्रंथालय, नाट्य, रंगभूमी आणि डाव्या विचारांच्या समाजवादी विचारांच्या चळवळीचा बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी म्हणून नरेंद्र लांजेवारांचे नाव पुढे आले. या चळवळीत त्यांनी परिणामकारक आणि दर्जेदार पद्धतीने कार्य केले. नरेंद्र लांजेवारांनी सुरुवातीला आपल्या सहकारी मित्रांच्या सहकार्याने बुलडाणा शहरात ‘ग्रंथभिशी’ योजना राबविली, ती यशस्वी करून दाखविली. त्यांनी जे-जे उपक्रम हाती घेतले, ते जोमाने पूर्णत्वास नेले. नंतरच्या काळात त्यांना भारत विद्यालयात ग्रंथपालाची नोकरी लागली. या काळात त्यांनी विद्यार्थीभिमुख उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कथा-कवितांचे संपादन केले, ते प्रकाशित केले. आकाशवाणी तथा ‘दूरदर्शन’वर आपल्या शाळेचे विद्यार्थी पाठविले. भारत विद्यालयाच्या व्यवस्थापनाला विश्वासात घेऊन स्व. शशिकलाताई आगाशे राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार सुरू केला. बुलढाण्याचे साहित्यिक केंद्र म्हणून प्रगती वाचनालय आणि भारत विद्यालयाची ओळख निर्माण करण्यामध्ये नरेंद्र लांजेवारांची महत्त्वपूर्ण अशी भूमिका राहिली आहे.

नरेंद्र लांजेवारांनी विदर्भ साहित्य संघात काम करताना जिल्हा कार्यकारिणी ते केंद्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी या पदांपर्यंत काम केले. बुलडाणा जिल्ह्यात विदर्भ साहित्य संघाच्या तालुकास्तरावर शाखाविस्तार केला आणि नव्याने लिहिती मंडळी पुढे आणली. काही दिवस ते विदर्भ साहित्य संघामार्फत अखिल भारतीय साहित्य महामंडळावर केंद्रीय सभासद म्हणून राहिले. एकाच वेळी ते प्रगतिशील लेखक संघ, महाराष्ट्र सांस्कृतिक चळवळ आदी ठिकाणी कार्यरत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे केंद्रीय सभासद असताना नरेंद्र लांजेवार यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पहिले जिल्हा साहित्य संमेलन ग्रामीण भागात बुलडाणा जिल्ह्याच्या करवंड या गावात आयोजित केले होते. सतत चिंतन, मनन, वाचन आणि कृतिशील कार्यकर्ता असलेले नरेंद्र लांजेवार काय योग्य आणि काय अयोग्य, याबाबत स्पष्ट मदत मांडत. भारत सरकारची साहित्य अकादमी ही संस्था यापूर्वी केवळ प्रौढ साहित्य आणि साहित्यिकांना पुरस्कार देऊन गौरव करायची. यामध्ये युवकांच्या साहित्याचा पुरस्कारासाठी विचार होत नव्हता. ही बाब चाणाक्ष नरेंद्र लांजेवारांना खटकली. त्यांनी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला. साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार सुरू करण्याचे श्रेय नरेंद्र लांजेवार यांच्याकडे जाते.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीत कार्य करत असताना त्यांनी प्रारंभी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून अनेक अनिष्ट बाबींवर प्रकाशझोत टाकला. पुढे, नरेंद्र दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अनेक व्याख्यानांचे आणि जादूटोणाविरोधी प्रात्यक्षिकांचे आयोजन केले, शिबिरे लावली, अनेक ठिकाणी बुवा-बाबांचे भांडाफोड उपक्रम राबविले.

महाराष्ट्र राज्याचे स्वतंत्र सांस्कृतिक धोरण असावे, त्यासाठी स्वतंत्र निधी असावा, असे त्यांचे म्हणणे होते. बुलडाणा शहरात ताराबाई शिंदे यांचे स्मारक व्हावे, यासाठी त्यांची सतत धडपड असायची, ही बाब त्यांनी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांसमोर मांडली. त्यासाठी त्यांनी बुलडाणा शहरात आलेल्या अनेक राजकीय व अराजकीय प्रतिनिधींना प्रत्यक्ष ठिकाणावर नेऊन ताराबाई शिंदेंच्या स्मारकाची उपयुक्तता पटवून दिली.

नरेंद्र लांजेवार यांचा प्रचंड लोकसंग्रह. या लोकसंग्रहात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश करता येईल. सामाजिक, सांस्कृतिक समज वाढावी, म्हणून त्या जाणिवेने ते झपाटलेले असायचे. मनमिळाऊ, सुस्वभावी असे हे व्यक्तिमत्त्व होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यरत मंडळींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रोत्साहन देणे, मतभिन्नता असली, तरी इतरांच्या मतांचा आदर करणे या गुणांमुळे विविध क्षेत्रातील मंडळींशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. माणूस म्हणून जगण्यासाठी शिकायचे आणि अर्थपूर्ण जीवन जगायचे, इतरांना जगायला शिकवायचे, यासाठी नोकरी नव्हे, तर सेवा म्हणून नोकरी करायचे, असे जीवनमूल्य त्यांनी सांभाळले. विद्यार्थ्यांना लहानपणापासून वाचनाची आवड, गोडी लागावी, असा त्यांचा प्रयत्न होता. पालकांना, लहान-मोठे सगळ्यांना वाचनाची शिस्त, सवय लागावी नव्हे, तर वाचनाचे व्यसन लागावे, असा त्यांचा प्रयत्न असे. वाचनातून माणूस घडावा, यासाठी सतत कार्यक्रम व्हावेत, असे त्यांना सतत वाटे. जिल्ह्याचा सांस्कृतिक विकास व्हावा म्हणून ते दर्जेदार साहित्यिक, कवी, विचारवंतांना कार्यक्रमानिमित्त निमंत्रित करीत. त्यांच्या विचारांची मेजवानी बुलडाणेकरांना ऐकवीत. बालक-पालक यांना हातात हात घालून दोघांचाही हसरा चेहरा पाहण्याची त्यांना आस होती. माणूस घडविण्यासाठी बालकांना नेमकेपणाने कोणते वाचन योग्य, दर्जेदार आणि प्रोत्साहित करणारे आहे, ते बालकांच्या पातळीवर जाऊन त्यांना समजावतात.

अम्माबाबाबुवा हटवा,

माणसं विचारवंत, पुस्तकं भेटवा

आपले जीवन हे अर्थपूर्ण सर्वांच्या हितासाठी असावे, हा त्यांचा संकल्प होता. त्याद्वारे त्यांना अनिष्ट व्यवस्था, परिवर्तनाची लढाई लढायची होती. म्हणून मुक्त पत्रकार, लेखक, कवी, समीक्षक, निवेदक, व्याख्याता, ग्रंथालय चळवळ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अशा कितीतरी पातळ्यांवर त्यांचे कार्य विस्तारत गेले. त्यांचा बालवाचनालयाचा उपक्रम तर राज्य पातळीवर चर्चिला गेला. बालसाहित्य लेखनाची कार्यशाळा त्यांनी आयोजित केली होती. प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी एक ‘बालभवन’ असावे. बुलडाणा शहरात सुसज्ज नाट्यगृह व्हावे, कोणत्याही वाचनालयाचा ग्रंथपाल हा चौकीदार ठरता कामा नये, तर ग्रंथपालाने वाचनसंस्कृती वाढीसाठी स्वत:चे म्हणून काही उपक्रम समाजासमोर आणले पाहिजेत, अशी त्यांची तळमळ होती.

महाराष्ट्रातील ख्यातनाम अनुवादक तथा कवी भगवान ठग यांच्या निधनाने एक सांस्कृतिक पेच निर्माण झाला होता. आता नरेंद्र लांजेवार यांच्या निधनानेही मराठी साहित्य क्षेत्रात आणि प्रागतिक चळवळीचीही कधीच भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांची पत्नी प्रज्ञा, मुलगा मकरंद, मुलगी मैत्री आणि आई, भाऊ इतर सर्वांना या मानसिक धक्क्यातून सावरण्याचे बळ मिळो. नरेंद्र लांजेवार यांना भावपूर्ण आदरांजली!

लेखक संपर्क : 9850380598


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]