विश्वनाथ अर्जुन साठे - 9921056462
अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ समाजातील विविध स्तरांत जशी खोलवर, सर्वदूर पसरत प्रभावशील होत आहे, तसतसा त्या चळवळीच्या वैचारिक मांडणीचा, तिच्या समाजावरील प्रभावाचा, उणिवांचा; सारांशाने चळवळीच्या जडणघडणीचा विविध अंगांनी वेध घेण्याची उत्सुकता अभ्यासकांना, संशोधकांना, कार्यकर्त्यांना भासू लागली आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीवर संशोधन करून डॉक्टरेट मिळविण्यासाठी अनेक तरुण विद्यार्थी पुढे येत आहेत. त्यातीलच दोघांचे मनोगत डॉ. दाभोलकर स्मृती विशेषांकाच्या निमित्ताने आम्ही येथे देत आहोत.
‘माणसानं माणसाला समजून घेतलं पाहिजे. मानवी जीवन जगण्याचं मूल्यत्व समजलं पाहिजे,’ इतकं चिंतनशील आणि विवेकी विधान ऐकत होतो. त्यादिवशी दाभोलकर सरांना कामगार सभागृह, आकुर्डी येथे प्रत्यक्ष पाहिलं, ऐकलं, अनुभवलं. परिवर्तनाचा विचार जगणार्या व्यक्तीचं चळवळीशी असलेलं नातं कित्ती घट्ट आणि निस्सीम असतं, हे मी त्यांच्या बेंबीच्या देठापासून येणार्या वाणीवरून समजू शकलो. ते म्हणाले, “या पृथ्वीतलावर प्राणी-पशूही जगतात. परंतु मानवाला विवेक आहे. जगताना तो समूहाने जगतो. हा विवेक हरवून मानव प्राणी-पशू होऊ नये आणि अत्याचारी बनू नये, अविवेकी होऊ नये. संतांचं हेच सांगणं आहे!” इतक्या सोप्या आणि सरळ शब्दांत ते जगण्याचं तत्त्वज्ञान स्वभाषेत मांडत होते. सभागृह स्तब्ध होतं. त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्मरणिकेचे प्रकाशन आणि ‘मराठी साहित्यातील अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावरील विविध परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. हे महाराष्ट्रातील पहिले अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन. मुंबई-पुणे रस्त्यावरील आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे 6 – 7 जुलै 2013 रोजी झालेल्या संमेलनाची आठवण अजून ताजी आहे.
बोराडी, जिल्हा धुळे येथे अध्यापकीय शिक्षण घेत असताना महात्मा गांधी ग्रंथालयात अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे कैक अंक वाचनातून गेले. त्याआधी वर्तमानपत्रांतून वाचत होतो, दूरदर्शनवरील प्रसारित झालेल्या बातम्यांमध्ये ऐकत होतो. अंधश्रद्धा, श्रद्धा, अज्ञान, शोषण, दैववाद, धर्म, जात, जातपंचायत, सामाजिक रूढी-परंपरा, हिंसाचार, बुवाबाजी, अन्यायी घटनांची मीमांसा, विज्ञान, साहित्य, कला, राजकारण, अर्थकारण, नीती, तत्त्वज्ञान आदी कैक विषयांवरील लेख आणि लेखकांना वाचता आलं. चळवळीची दिशा आणि व्यूह नुकतेच जाणवू लागले. इयत्ता पाचवीपासून गोष्टींच्या वाचनापासून वैचारिक वाचनापर्यंत हा प्रवास. त्यामुळे सॉक्रेटिस, अॅरिस्टॉटल, लेनिन, रुसो, व्हॉल्टेअर, मॉन्टेस्क्यू, कार्ल मार्क्स; तर भारतीय परिप्रेक्ष्यात चार्वाक, गौतम बुद्धांपासून ते कबीर, रहीम, चक्रधर, ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, वस्ताद लहुजी साळवे, लोकहितवादी, महर्षी कर्वे, ताराबाई शिंदे, छत्रपती शाहू, गाडगेबाबा, डॉ. भीमराव आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णा भाऊ साठे, हमीद दलवाई, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, डॉ. नरेंद्र दाभोलकर… अशी एक वैचारिक शृंखलेची बांधणी कळत होती. वाचत होतो.
भाकरीच्या म्हणण्यापेक्षा ज्ञानाच्या शोधात पुणे शहरी आलो. भाकरी तर गावी ढोरं-शेळ्या राखून वा सालगड्याप्रमाणे शेण-गू-मूत काढूनपण मिळाली असती. तीन प्रश्न नेहमी सतावतात – ते म्हणजे, का जन्मलो? का जगायचं? अन् कशासाठी जगत आहे? या प्रश्नांनी गाव सुटलं. शिक्षणासाठी बोरडी आणि पुढे सरळ पुणे. पुण्यात आपलं असं जीवाचं कोणी नव्हतं. आकुर्डी स्टेशनवर दोन रात्री काढल्या. सकाळी स्टेशनवरून चालत-चालत कामाच्या शोधात निघालो. एका डॉक्टरांच्या केबिनमध्ये काम मिळेल का म्हणून घुसलो. डॉक्टरकी अन् साप्ताहिकाचं ते ठिकाण. डॉ. बेरी यांच्याकडे कंपाउंडर-कम-ऑफिस बॉय-कम ‘चाहूल नव्या समाजाची’ या साप्ताहिकाचा पत्रकार म्हणून काम केले. या काळात पुण्याची माहिती करून घेत होतो. शहरात होणार्या विविध कार्यक्रमांत हिंडू लागलो. बेरी हे कामगार, घरगुती कामं करणार्या महिलांच्या चळवळीचे जाणते नेतृत्व. ‘कविता लिहीत असतोस, कधी सांगितलं नाही.’ अशात, ‘एक संमेलन आहे, तू हजर राहा. बातमी कर!’ या कारणाने या ‘अंनिस’च्या संमेलनास उपस्थित राहू शकलो. इथं डॉ. दाभोलकर यांच्याशी भेटता आलं. सभागृहाच्या बाहेर पडल्यावर बोलता आलं. इथेच साहित्यिक उत्तम कांबळे सरांना भेटता आलं. एका कवितेवर त्यांची स्वाक्षरी घेता आली. अध्यापकीय शिक्षण घेत असताना तोडकी-मोडकी बातमी करण्याच्या अनुभवानं पुण्यात काम मिळवून दिलं होतं अन् चांगला विचारही.
पुढचं शिक्षण सुरूच होतं. ज्यासाठी शहरात आलो, ती गोष्ट खंड पडू द्यायची नव्हती. याअर्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात मराठीमधून एम. ए. केलं. वाचनाचं मूल्य इथं समजू लागलं. मराठी विभागात शिक्षण घेत असताना डॉ. मनोहर जाधव, डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. टिळक मॅडम, डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. सांगोलेकर, डॉ. अविनाश अवलगावकर, डॉ. आगळे आणि कार्यक्रमप्रसंगी साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले, उत्तम कांबळे, रावसाहेब कसबे, डॉ. विलास खोले, डॉ. विश्वनाथ शिंदे यांना ऐकता आलं. त्यांचे मराठी साहित्यावरील विचार समजता आले. याअर्थी सांस्कृतिक संदर्भासहित सामाजिक विश्लेषण पडताळता आलं. वाचनाचा आवाका वाढवला. वाचनाशिवाय पर्याय नाही. कारण आमची पिढी जुन्या संघर्षातून पुढे आलेली आहे, शहरात स्थलांतरित झालेली आहे आणि अनुभव हेच शिक्षण तथा वाचन हेच मार्गदर्शन आहे, हे समजून गेलं होतं. ‘नेट’ परीक्षा पात्र केली. पुढील संशोधनाच्या शिक्षणासाठी अर्ज केला.
बा कबिराचे अभ्यासक. गेली पंचेचाळीस वर्षांचा कबीर तत्त्वज्ञानाचा त्यांचा अभ्यास. त्यामुळे घरचं वातावरण मुक्त आणि कोणत्याही शोषणाला बळी न पडलेलं. ‘आपलं जीवन आपल्याला मनगटाच्या ताकदीवर ख्यालखुशाल निर्माण करता येतं,’ ही बा ची शिकवण. ‘जिवंत आहे तोपर्यंत जीवासाठी खा – मुक्त जगा, आयुष्याचा आनंद स्वाभिमानाच्या नीतीत आहे. परजीवांचा भेद करू नका, मेल्यावर जीव पुन्हा येत नाही. जिवंतपणी सन्मान करा. कोणत्याही जीवाची आबाळ होऊ नये. जीव अमूल्य आहे,’ अशी ही वैचारिक ठेवण घेत ‘मूठभर चावल घर पर फेके। कव्वा बाप बनायौ॥’ ही कबिरांची शोषणाविरुद्धची भूमिका सगळ्यांच्या काळजात. घरात कोणत्याही देवा-धर्माचे, बिरुबा-हंदूबा, मरिआईचे मूतिर्र्पूजन, छायाचित्रे, पूजापाठ नसल्याने नशीब, श्रद्धा, उपासना, प्रारब्धभोग, त्याला जोडून येणारी शोषणाची यंत्रणा आपोआपच नाकारली गेलेली. याअर्थी समाजाचा रोष जाणवत होताच. प्रगल्भ जगण्याचं तत्त्व असणारी विचारसरणी आयुष्यात परिवर्तनाचा विचार पेरत होती. दहावी – बारावीनंतर आणि पुढे विद्यापीठीय शिक्षण घेताना विविध चळवळींचा परिचय होत गेला. समाज, साहित्य आणि वैविध्यपूर्ण विचारप्रवाहांची तोंडओळख होत गेली. आपल्या आयुष्याचा संघर्ष हा भाकरीपेक्षाही जीवसन्मानाचा आहे, स्वाभिमानाचा आहे, अन्याय्य शोषणाविरुद्ध लढण्याचा आहे. संशोधनासाठी निवडलेला ‘अंधश्रद्धा निर्मूलनाच्या वार्तापत्राचा वाङ्मयीन अभ्यास’ हा आपल्या जगण्या-मरण्यातला विषय.
‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रातील वैचारिक लेखन : एक अभ्यास’ हा विषय निवडीमागे घरातील लहानपणापासूनचे मुक्त असणारे परिवर्तनशील वातावरण तर आहेच; परंतु समाजामध्ये हा प्रबोधनाचा प्रवाह अखंड पाझरणे सुरू असतानाही समाजाचे शोषण थांबत नाही. धर्म, राजकारण, अर्थकारण, औद्योगिकीकरण आणि भांडवली जगाने केलेला शोषणाचा व्यवहार नष्ट होत नाही. समाजात एका बाजूला विज्ञानाची प्रगती, तंत्रज्ञान, आधुनिकतेचे वारे; तर दुसर्या बाजूला धर्म, जात, रूढी, बुरसटलेल्या परंपरा प्रतिगामित्वाचे विचार; तसेच अंधश्रद्धा यांचे प्राबल्य आहे. अशा विरोधाभासमय कालखंडात मानवी जीवन व्यतीत होत आहे. अशावेळी मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना व्हावी, समाजाला नवी – परिवर्तनवादी सकलकल्याणार्थ दृष्टी यावी, समाज विचारप्रणव व्हावा, विज्ञानाची कास बाळगून शोषणाला नकार देणारा सामाजिक – मानसिक – भावनिक विकास व्हावा. एकूणच, मानवाच्या मनुष्यत्वाच्या आड येणारा आणि त्यांचे सजीव असण्याचे हक्क नष्ट करणारा दांभिकपणा कमी होऊन परिवर्तनाच्या विचारांचा ठाव मांडणारा विचार ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ चळवळीने प्रयत्नपूर्वक केलेला आहे. तो सातत्याने ‘अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ’ आणि चळवळीचे ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ हे जोपासण्याचे – वाढविण्याचे कार्य करत आहे. हा विचार जगण्यातला आहे. याअर्थी संशोधन आवडीच्या विषयात करण्याची प्रेरणाही तितकीच प्रेरणादायी.
‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मासिकाचे वाङ्मयीन मूल्यमापन; त्याचबरोबर समाज ज्या नैतिक मूल्यांवर उभा असतो, अशा नैतिक आणि सर्व प्राणिमात्र कल्याणार्थ मूल्यांच्या प्रतिस्थापनेसाठी घेतलेली भूमिका यासंदर्भात आपणास अधिक जाणून घेता यावे व हे समाजासमोर मांडता यावे, याचसाठी मी ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मासिकाचे या अनुषंगाने संशोधन करणार आहे.
‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ हे सामाजिक आणि वाङ्मयीन स्तराला वैधानिक आणि वैज्ञानिक दृष्टी, वैचारिक बुद्धिप्रामाण्यवादी बैठक, तात्त्विक चर्चा, विवेकवादी विचारांचा, विवेकाचा आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचा आराखडा मांडत आलेले मासिक आहे. याचसाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मासिकाचा प्रवास, लेखकांच्या भूमिका आणि समाजवास्तव, वेगळेपण, त्यामध्ये हाताळलेले विषय – आशय – शैली आणि त्यामुळे जनमानसावर निर्माण होत असलेले प्रभाव – परिणाम यांचा मेळ सकारात्मक आणि तटस्थपणे जाणून घेतला तर अधिक मोलाचे ठरेल. याच भूमिकेतून ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’चे कार्य, योगदान, मासिकाचे वेगळेपण आणि वाङ्मयीन मूल्यमापन जाणून घेऊन संशोधनाच्या माध्यमातून मासिकाचे कार्यउद्दिष्ट समाजासमोर मांडणे न्यायोचित होईल.
आजच्या महामारीच्या काळात शोषणाचे बदललेले षड्यंत्र आणि त्याला पूरक असलेली मानवी मानसिकता याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. मृत्यूच्या भीतीने खचलेली मानसिकता आणि मानवाकडून मानवाचे होणारे सर्वार्थाने शोषण हे शोषण नाही, तर जगण्याची रीत होऊ लागल्याच्या काळात संशोधनाला मानसशास्त्रीय मर्यादेचं जाळं तोडावं लागणार आहे, याचे भानही याअर्थी समजून घ्यावे लागणार आहे. नव्या व्यवहाराने पारदर्शकता आणली आहे; परंतु याचा अर्थ असा नाही की, समाजाचे शोषण होत नाही. नवा विकास हा शोषणपद्धतीचा बदल आहे. शंकरराव खरात यांच्या कथेतील मुंबईहून आलेलं पत्र वाचून घेण्याकरिता लाकडे फोडणार्या पिढीच्या पुढील ही तिसरी पिढी. अडाणी लाकडे फोडणारा आणि कॉम्प्युटर वापरता येत नाही म्हणून कॉम्प्युटर ऑपरेटरला पैसे देणारा विद्यार्थी व ते पैसे मिळविणारे त्याचे मायबाप कुणाचे तरी काम करतात, राबराब राबतात. ही नवं रूपं घेऊन आलेली गुलामगिरी आहे, शोषणाला बळी जाणारी अवस्था आहे. संगणकीकृत भारताची प्रणाली सांगताना अन्यायाची बीजे सूक्ष्मपणे रुजवली जाण्याचा काळ आहे. हे शोषण थांबलं पाहिजे. आजही ग्रामीण समाजात भूतप्रेत – भानामती यांची मानसिक – भावनिक भीती दाखवून ती निवारण्यासाठी आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण उघड घडत आहे. मुरळ्यांचे लैंगिक शोषण, शिक्षणाच्या परिघात वावरण्यापासून वंचित असलेले पोतराज भुकेच्या आकांताने दारोदार, रस्तोरस्ती भटकताना दिसतात. देवा-धर्माच्या नावावर होणारी शोषणाची यंत्रणा सर्रास सुरू आहे. शोषणाचा गाडा अव्याहतपणे चालूच आहे. समाज ‘शोषण’ हे ‘शोषण आहे’, हेच मानायला तयार नसल्याच्या काळात ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मासिकाचे कार्य व वेगळेपण आणि त्यातील वाङ्मयीन मूल्यमापनाचे संशोधन करणे, मला हे सामाजिक न्यायाच्या भूमिकेकडे जाणारे तत्त्व वाटते.
आज समाजात जाती, धर्म, संस्कृती, भाषा, प्रांत या मानवजातीच्या तुलनेत एकूणच कमी महत्त्वाच्या घटकांवर दरदिवशी काही ना काही तरी वाद – विवाद, हिंसा, दंगली, शोषण; मग हे कोणत्याही पातळीवरचे असो, होत आहेच हे वास्तव. या परिस्थितीत एका बाजूला मानव, तर दुसर्या बाजूला मानवानर्मित संस्था, व्यवस्था, संघटना, यंत्रणा यांच्यात चढाओढ लागली आहे. ‘मानवासाठी सर्वच’ हा सिद्धांत मागे पडतो आहे. ‘सर्वांसाठी मानव’ अशी संज्ञा समोर येताना दिसत आहे; जे की बहुतांश योग्य आहे की नाही, हे काळ ठरवेल.
चळवळींचे साहित्य आणि साहित्यातून चळवळींसाठी मिळणारी मूल्यांची रसद यांच्या विवेकवादी ठेव्यांवरून समाज संस्कृतीचा वारसा ठरत असतो. त्यामुळे ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ने समाजाचा गाभाघटक (Core element), विवेकी, परिवर्तनवादी विचार याला आपला केंद्रबिंदू मानले आहे. याच दिशेने वाटचाल केलेली आहे. वास्तव जगण्यात घडणारे प्रसंग, घटना, रोध – विरोध, धर्मांध वृत्तीतून शोषणाचा वाहणारा प्रवाह, माणसाला विचारप्रवण करणारे विषय, वैज्ञानिक दृष्टीकोन, योग्य – अयोग्याचा ठाव, ज्वलंत समस्या आदी सामाजिक घटकांना व जाणिवांना प्राधान्य दिले आहे. ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’च्या माध्यमातून वाङ्मयीन; तितकेच सामाजिक बदलावाचे विश्व समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉ. दाभोलकरांनी महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, गाडगे बाबा, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांशी नाळ जुळवत आपला जैविक मानवी कल्याणार्थ विचार चळवळीच्या माध्यमातून या वार्तापत्राच्या जाणिवांत ठेविला आहे. याअर्थी तथागत – कबीर – तुकाराम यांच्या विवेकाचा विचारपाझर या काळात अशा प्रकारचा आहे. हा विचार जितका साहित्याचे मूल्यमापन करताना उपयुक्त आहे, तितकाच सामाजिक क्रांतीच्या कालखंडीय व्यवच्छेदनाला विश्लेषित – प्रेरक असा ठरणारा आहे. समाजात विज्ञानाचे विचार पेरणारा आणि अमानवी जीवन मानवी जाणिवांनी मूल्यसंस्कृत करणारा हा ‘अंधश्रद्धा निर्मूलना’चा विचार अलमारीसारखा कार्यरूप ठरणारा आहे. याची या संशोधनातून स्वरूप, भूमिका, तत्त्वप्रणाली आणि वास्तवाचे मर्म मांडण्याची शैली पुढील संशोधकांना आणि अभ्यासकांनाही मूल्यप्राप्त ठरेल, इतके हे लवचिक; आणि तितकेच मोलाचे संशोधन असणार आहे, याची मला जाणीव आहे.
बाकी, गावाकडे घराशिवाय काही नसल्याने विदर्भातून पश्चिम महाराष्ट्राकडे स्थलांतरित (migrate) व्हावं लागणं, बा चं अपघाती निघून जाणं, मी अन् माय आम्ही जणू अमेरिकेतल्या न्यूयॉर्कसारख्या; म्हणजेच भारतातील पुणे शहरात जगणं, संशोधनासाठी भूगोल – इतिहास कळेल, भाषा, संस्कृती, प्रांत, जीवनव्यवहार कळतील, सामाजिक रूढी-परंपरा, श्रध्दा – अंधश्रद्धा, मानवी जाणिवा, जीवन-मृत्यूचा संघर्ष कळेल, याअर्थी कामानिमित्त भटकणं एक न सरणारा प्रवास…
विश्वनाथ अर्जुन साठे
संशोधक विद्यार्थी, मराठी संशोधन केंद्र – के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक.
विद्यापीठ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत
संपर्क : 99210 56462