डॉ. सुनीलकुमार लवटे -
‘अंनिेवा’च्या एन. डी. पाटील अभिवादन विशेषांकाचे प्रकाशन
अन्यायी-अत्याचारी व्यवस्थेविरोधात सर्वसामान्य जनतेला संघटित करीत त्यांना न्याय मिळवून देत गुलामीतून मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून देत विवेकाचे राज्य निर्माण करावयाचे आहे, अशा एका अत्युच्च ध्येयाने प्रेरित झालेल्याला ग्रीक संस्कृतीत ‘लोकयोद्धा’ म्हटले जाते. एन. डी. सरही असेच लोकयोद्धे होते. अशा या लोकयोद्ध्याच्या विचारांवर कार्यरत राहत समाज बदलण्यासाठी सत्ताधार्यांना जागे करण्याचे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे, असे आवाहन प्रसिद्ध साहित्यिक, सामाजिक कार्यकर्तेडॉ. सुनीलकुमार लवटे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या ‘लोकयोद्धा डॉ. एन. डी. पाटील अभिवादन विशेषांका’च्या प्रकाशनानिमित्त झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमात उपस्थितांना केले.
‘अंनिवा’च्या या विशेषांकाचे प्रकाशन डॉ. लवटे यांच्या हस्ते झाल्यानंतर केलेल्या भाषणात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष मा. प्रतापराव पवार या ऑनलाईन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
एन. डी. सर स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक आंदोलनाच्या सोबत; मग ते जागतिकीकरणविरोधी असो, ‘सेझ’विरोधी, नव्या शैक्षणिक धोरणाविरोधात अगर अंधश्रद्धा विरोधात असो, ठामपणे उभे राहिले. त्यामुळे या आंदोलनांना धार आली, नैतिक ताकद आली. या आंदोलनांतून त्यांनी स्वतंत्र बुद्धीचे, विवेकवादी कार्यकर्ते निर्माण केले, ज्याचा पाया ‘अंनिस’चे तत्वज्ञान आहे, असे प्रतिपादन करून ते पुढे म्हणाले, एन. डी. सर, कॉ. पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर या तिघांच्या बरोबर सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मला प्रदीर्घ काळ मिळाली, ज्यामुळे आपण जे काही काम करू शकलो त्यामागे या ‘लोकयोद्ध्या’चे नेतृत्व आहे
आपल्या भाषणात डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, बुद्धिमत्ता, नैतिकता, पुरोगामी विवेकी मूल्यांप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर एन. डी. सरांनी शेतकरी, कामगारांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. अशा या आयुष्यभर संघर्षरत असणार्या एन. डी. सरांना अभिवादन करणारा अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा ‘लोकयोद्धा डॉ. एन. डी. पाटील अभिवादन विशेषांक’ जनतेला विवेकवादी जग निर्माण करण्याची प्रेरणा देणारा आहे. प्रत्येक प्रगल्भ होऊ इच्छिणार्याने तो वाचावा, असे आवाहन करीत त्यांनी भाषणाची अखेर केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष मा. प्रतापराव पवार यांनी डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी डॉ. दाभोलकरांचे विचार हिंदी भाषेत नेण्याच्या कामाचा आवर्जून उल्लेख करीत पुरोगामी विचारांशी बांधिलकी असणारे स्वयंप्रेरित, निःस्वार्थी कार्यकर्तेही ‘अंनिस’ची खरी ताकद असल्याचे सांगून आपण सर्वांनी मिळून ‘अंनिस’ची विचारधारा पुढे नेऊया, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या सहसंपादिका मुक्ता दाभोलकर यांनी केले. सूत्रसंचालन रमेश माने यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात बुलढाण्याच्या शालेय विद्यार्थिनींनी गायलेल्या अण्णा कडलासकर यांच्या ‘विवेकवादी जग हे सारे व्हावे रे’ या स्फूर्तिदायी गीताने झाली. संयोजन राजीव देशपांडे, राहुल थोरात, अमोल पाटील यांनी केले. या ऑनलाईन प्रकाशनाच्या कार्यक्रमास अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यभरातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.